
तिनं माझ्या हातात पुस्तक दिलं. "एवढा मजकूर वाचून पहा -" अधिक बोलायची आवश्यकता नव्हती. कधी नसतेच. हा परिपाठच आहे. तिनं असं काही वाचायला दिलं कि मी ते निमुटपणे वाचतो. बहुदा ते वाचनही नंतर निमूटपना धारण करायला लावतं.
एका अस्वस्थ आत्म्यासंबंधीचा तो विलक्षणच सुंदर इंग्रजीत लिहिलेला मजकूर होता,..तो एकटा नव्हता. त्याच्या चेहऱ्यामागं [त्या काळातील चित्रकारांनी काढलेल्या इतरांच्या पोर्टेट्स च्यामानाने तो चेहरादेखील निराळाच होता.] त्याच्या विपुल, कल्पनारम्य आणि भावूक शब्दांमाग केवळ एक गार शहारा होता आणि इतर कुणालाही न पडलेलं स्वप्न होतं. सुरुवाती-सुरुवातीला वाटे, कि इतरांचंही त्याच्याच सारखं आहे. पण कधीतरी तो त्यांच्याशी त्या शून्यातल्या परार्धाविषयी बोलला कि त्याच्या एखाद्या मित्राची गोंधळलेली नजर त्याला सांगे कि कुठल्याही व्यक्तीनं त्याच्या जातभाईहून निराळं नसावं. त्याला कधी कधी वाटे कि ह्या त्याच्या व्याधीवर ग्रंथातून इलाज सापडेल.मग तो थोडंसं लॅटीन आणि त्याहूनही थोडं ग्रीक सुद्धा शिकला असं त्यानंतर त्याच्या एका सामाकालीनानंच म्हणून ठेवलंय.....
मी वाचत चाललो होतो. गुंतत चाललो होतो.
"....आपण कोणीही नाही याचा इतरांना पत्ता लागू नये म्हणून आपण कोणीतरी आहोत अशी बतावणी करत राहायचा उपजतबुद्धीनच स्वतःला सवय लावून घेण्यात त्यानं प्राविण्य मिळवलं होतं...विशीच्या घरात असताना तो लंडनला आला.लंडनला आल्यावर त्याच्या विधीलीखीतातच होतं त्याप्रमाणे त्याला नेमका धंदा सापडला.नटाचा. म्हणजे स्टेजवरून दुसरं कोणीतरी बनून खेळ करण्याचा. नाटकातले पार्ट राहण्याच्या ह्या कामानं त्याला अजोड सौख्य दिलं. अपूर्व असं सौख्य.पण शेवटच्या वाक्यानंतरची टाळी झाली आणि स्टेजवर पाडलेल्या मुडद्यांतला शेवटचा मुडदा उचलून आत नेला गेला कि शून्यत्वाची ती तिरस्करणीय भावना त्याला वेढून टाकायची. मग तो फेरेक्स उरत नसे. टॅम्बर्लेन उरत नसे.पुन्हा एकदा 'कोणी नाही' होऊन जायचा. ह्या सापळ्यात अडकल्यामूळं मग तो इतर नायक_इतर शोकांत कथा यांची स्वप्न पाहायला लागला.अशा प्रकारे लंडनच्या वेश्यागृहात आणि दारूच्या पिठ्यात देहाच्या नशिबी असणारं देहाचं देणं देऊन टाकल्यावर त्या देहात नांदत असे तो सीझरचा आत्मा-त्याला सावध करणाऱ्याच्या धोक्याचा इशारा न मानणारा, पहाटपाखरावर रुष्ट झालेली जुलिएट, डोंगरपठारावर चेटक्यांशी बोलाचाली करणारा मॅक्बेथ. त्या चेटक्या म्हणजे तरी काय? --ती देखील प्रारब्धंच होती.
"...एका माणसात इतकी माणसं असलेला दूसरा कोणीही नव्हता. अस्तीत्वाची जितकी म्हणून रूपं घडवता येतील तितकी घडवून संपवून टाकणाऱ्या त्या इजिप्शियन प्रोटीयाससारखा. कधी कधी आपल्या त्या सृष्टीच्या एखाद्या कोपऱ्यात कुणाच्या चटकन ध्यानात येणार नाही अशा विश्वासानं ठेवून दिलेलं एखादं आत्मप्रकटनही असायचं. रिचर्ड च्या तोंडून आलेल्या 'ही एक व्यक्ती अनेक सोंगं घेत असते' आणि यागोच्या तोंडाच्या,'मी जो आहे तो मी नाही' ह्या चमत्कारिक वाक्यांसारखा.अस्तित्वाच्या मुलभूत स्वरूपाविषयीचे, स्वप्नाविषयीचे आणि अभिनयाविषयीचे त्याचे उतारे तर प्रसिद्धच आहेत."
वाचता वाचता दूर अंतरावरून जवळ जवळ येत जाणाऱ्या माणसासारखा शेक्सपिअर माझ्या जवळ येत होता. शेक्सपिअर. केवळ जन्मामूळे पिंडाला चिकटलेला भारतीयत्वाचा अहंकार त्याला 'माझा' म्हणू द्यायच्या आड आला.मनाला याची टोचणी नाही असं नाही.तशा अनेक टोचण्या असतात. माणसासारख्या माणसाला ज्यात अस्पृश्य मानलं जातं अशा धर्माची मुद्रा जीवनातल्या पहिल्या ट्याँह बरोबर उठवली गेली हि टोचणी आहेच न. काय करायचीय ती वांझोटी टोचणी-? उद्या कालीदासापेक्षा शेक्सपिअर ने मला अधिक दिलं असं म्हणून गेलो तर, न जाणो, राष्ट्रद्रोहीही ठरवतील.
यागोच्या तोंडी "आय अँम नॉट व्हाँट आय अँम" हे वाक्य टाकताना स्वतःच्या मनाला लागलेल्या कुठल्या टोचणीतून ते उमटलं असेल? ही भावावस्था कुठल्या कोटीतली? केवढ्या विराट साहित्यासृष्टीचा हा विधाता. विश्वंभर. हजारो पानातून, लक्षावधी शब्दातून भरून राहिलेला.लेखणीच्या टोकाला शाश्वताचा अलौकिक स्पर्श घेऊन आलेला. त्याच्या त्या विश्वातून शांतपणान आणि संपूर्णपणाने हिंडून येणंही जमलं नाही आपल्याला.
आपल्यातलं त्याला आणखी काय सांगायचं असेल? त्यानं जे दाखवलं ते पाहताना आनंदानं, उत्साहानं, करुणेन, असहायतेने उचंबळलेले, हसणारे, अश्रू ढाळणारे-क्वचित प्रसंगी या ना त्या कारणाने बिथरलेलेही-हजारो प्रेक्षक स्वतःच्या आयुष्यात त्याने पहिले.लौकिकार्थाने यशाच्या चढत्या पायरीवरून गेलेला शेक्सपिअर. मग तो असा एकटा एकटा का व्हायचा? कि ज्याला संवेदनाशील मन दिलं जातं त्याला त्याचंच अदृश्य हातानी हे असं एकटेपणाच्या भोगाचही वाटप होतं का? चैतन्यानं फुलून येऊन काम करणाऱ्या नटनटींना रात्री नाटक आटपून चेहऱ्यावरचा रंग पुसत आरशापुढं बसल्यावर हे एकटेपण जाणवत असतं. रंग उतरल्यानंतरचा तो आरशातला आपला चेहरादेखील काहीशा उदासपणचं न्याहाळणारा नट-क्षणापूर्वी त्या चेहऱ्यानं आणखी कुणाचा तरी चेहरा होऊन गर्दीशी जुळवलेलं नातं आता तुटलेलं असतं. किती एकटा! पार्टी संपल्यावर रिकामं मद्यपात्र पडावं तसा. पण मद्यपात्राचं किती चांगलं असतं. त्या पत्राला मद्याची धुंदी चढत नाही. ह्या पात्राला ती घटकेपूर्वी चढलेली असते.
'मी जो आहे तो मी नाही' हे पूर्णविरामचं वाक्य प्रश्नचिन्हाच केलं कि,'मी कोण आहे?' असं होतं. अशीच एक फार मोठी प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या रवींद्रानीदेखील शेवटल्या आजारात लिहिलेल्या कवितेत असाच प्रश्न विचारला आहे:
अस्तित्वाच्या पहिल्या आविष्काराच्या वेळी
प्रथम दिनाच्या सूर्याने प्रश्न केला होता-
के तुमि? -कोण तुम्ही?
मिळालं नाही उत्तर.
वर्षावर वर्ष लोटली.
शेवटचा सूर्य.
शेवटचा प्रश्न विचारला त्याने
पश्चिम सागरतीरावरून
नि:स्तब्ध सायंकाळी.
के तुमि? -कोण तुम्ही?
उत्तर मिळालं नाही त्याला.
अनादिकालापासून विचारले गेलेले प्रश्न : 'कस्त्वम?'- 'को s हम्?' ....मग कोणी 'सो s हम्' वर समाधान मानलं. कुणी कशावर.कुणी कशावर. पण कुठं कोणाचं संपूर्ण समाधान झालेलं दिसत नाही.
आणि हा प्रश्न काही वैफल्यातूनच उमटतो असंही नाही. एखादं भरलं शेत, एखादी संथ वाहणारी नदी, गंभीर डोह यांचं दर्शन घडतं-आणि हे सारं पाहणारा 'मी कोण?' असं सवाल येतो. माझ्या घराशेजारच्या आंब्यावर भल्या पहाटे एक पक्षी येतो. पाणी खळखळावं तशी त्याच्या आवाजाची जात आहे. चांगला तास-अर्धातास आपली गायकी ऐकवून जातो. अनेक कलावंत असंच काही काही ऐकवून जात असतात. मैफल विलक्षण जमलेली असते. अशा वेळी 'हा आनंदघन माझ्यावर का कोसळावा? ह्या धारानृत्यात भिजणारा मी कोण?' हा प्रश्न-आजच नाही, वर्षानुवर्षे मला पडत आला आहे.अशा अत्यानंदाच्या क्षणीही एकटं एकटं व्हायला होतं.
एखाद्या सार्वजनिक समारंभात व्याख्यान द्यायला गेलोलो असतो. प्रमुख पाहुण्याचं स्वागत करणारे स्तुतीस्त्रोत्र उधळत असतात. काही वेळानं तर श्रीमंताघरच्या लग्नातल्या मिठाईच्या ताटाकडे नुसतं पाहिलं तरी जसा वीट येतो तसा त्या स्तुतीस्त्रोत्रांचा वीट येत असतो.कांही तासापूर्वीच खंडाळ्याचा घाट उतरून खाली आल्यावर भर पावसात शेत नांगरत असलेला उघडा शेतकरी आगगाडीच्या डब्याच्या खिडकीतून पाहिलेला असतो. संपूर्ण अनोळखी. मलाच नव्हे, तर ज्या क्षेत्रात मी वावरतो त्या क्षेत्राची ओळख तर जाऊ दे, पण 'साहित्यिक' ह्या शब्दाचंसुद्धा अस्तित्व ठाऊक नसलेला. जगातल्या कोट्यावधी लोकांशी, त्यांच्या सुख दु:खांशी, इच्छा-आकांक्षांशी असणारं हे अनोळखीपण घेऊन कुठल्यातरी समारंभात 'सुविख्यात-सन्माननीय' वगैरे होऊन बसणारा मी! इथं तो 'मी' कुणाला दिसणार आहे? अशा वेळी संस्थेच्या वतीनं बोलणाऱ्या त्या माणसाला ओरडून सांगावंसं वाटतं, "अहो, तुम्ही ज्याच्याविषयी हे सारं बोलता आहात ना, तो मी या क्षणी इथं नाही आहे. एका अनोळखी पावसात चिंब भिजलेल्या अर्धनग्न शेतकऱ्यानं त्या 'मी' चा आणखी एक 'मी' केला आहे. मी आत शिरताना त्या 'मी' ला बाहेर घालवू शकलो नाही. मी गळ्यात हार घालून घेतला. कुणाला तरी स्वाक्षरी दिली. तुमच्या संस्थेचा गेल्या वर्षीचा अहवाल देखील वाचला...कुणाच्या तरी नावावर कोटीही केली आणि तुम्हीही बरेचसे शिष्टचारापोटी हसलातही. छे हो ते 'अखिल भारतीय....' वगैरे म्हणू नका. कर्जतच्या शेतात-पावसात भिजणारा-चिखलात रूतणारे पाय उचलणारा एक शेतकरी...."
तुम्हाला ठाऊक आहे का? कादंबरीदेवी म्हणून रवीन्द्रनाथांची भावजय होती. लग्न होऊन ठाकुरांच्या घरात ती आली त्या वेळी नऊ वर्षांची होती आणि रवी सात वर्षांचा. त्यानंतर सतरा वर्षांचा सहवास. नात्यानं भावजय पण बालपणापासूनची खेळगडी, तारुण्यात रविन्द्रांच्या लेखनाची वाचक, कवितेची पहिली श्रोती-आणि पहिली समीक्षक. कादंबरीदेवींनी आत्महत्या केली. का ते कुणालाच कळले नाही. त्या वेळी रवींद्रनाथ कळवळून उद्गारले होते , कि माझ्या हाकेला तिची 'ओ' यायची ती सतरा वर्षातल्या सहवासातल्या साऱ्या सुखदु:खांच्या क्षणांना एकवटून घेऊन! इतकं कुणीतरी कुणाला तरी ओळखतं हा अनुभव असूनही रविंद्रना मात्र त्या पहिल्या उगवत्या आणि शेवटल्या मावळत्या सूर्याच्या 'तुम्ही कोण?' ह्या प्रश्नाला 'मी कोण'-हे सांगणारं उत्तर सापडलं नव्हतं.
आपल्यातला मी अनेक रूपांनी आणि अनेक उद्गारांनी प्रकट करणारा शेक्सपिअर. त्यालाही "आय अँम नॉट व्हाँट आय अँम" ची अनुभूती एकदा वदवून ठेवावीशी वाटली. वीस वर्षं स्वतःच्या काबूत धरून ठेवलेल्या त्या स्वप्नसृष्टीत गेली. पण एके दिवशी सकाळी, इतके निरनिराळे राजे होऊन तलवारीच्या घावांनी मारायच्या त्या भयानकतेचा, इतके अभागी प्रेमिक होऊन एकत्र यायच्या, विभक्त व्हायच्या आणि माधुर्यानं विव्हळायच्या अतिरेकाचा त्याला वीट आला. त्या दिवशी त्यानं आपलं थिएटर विकून टाकलं. एका आठवड्याच्या आत आपल्या जन्मग्रामी तो परतला.बालपणीचे वृक्ष आणि नदी त्याने परत मिळवली. त्या वृक्षांना आणि नदीला त्यानं स्वतःच्या प्रतिभेतून नटवलेल्या किंवा पुराणकथांतल्या संदर्भांनी आणि लॅटीन शब्दपंक्तिनी लोकप्रिय केलेल्या वृक्षांशी आणि नद्यांशी जखडलं नाही. पण त्याला कोणीतरी होऊन राहिल्याखेरीज गत्यंतर नव्हतं. म्हणून तो सावकारी, कोर्टकचेऱ्या, किरकोळ व्याजबट्टा असल्या धंद्यात रमणारा, भरपूर पैसे गाठीला लाऊन गावाकडे परतलेला एक निवृत्त नाटकधंदेवाला होऊन राहिला. आणि त्या भूमिकेतूनच त्यानं आपली अखेर गाठताना मृत्युपत्राचा अत्यंत कोरड्या भाषेतला मजकूर टिपून घ्यायला लावला.त्यात भावनेचा किंवा साहित्यकलेचा कुठं लवलेश दिसणार नाही ह्याची त्यानं जाणूनबुजून खबरदारी घेतली होती. त्याच्या त्या निवांतवासात त्याचे लंडनमधले मित्र भेटायला यायचे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तो कवीची भूमिका घेत असे.
-एक दंतकथा आहे, कि त्याच्या मरणापूर्वी किंवा मरणानंतर असेल- त्याला आपण साक्षात देवापुढंच उभे आहोत असं आढळून आलं. तो देवाला म्हणाला,
"देवा, मी फुकटचा इतकी माणसं होऊन राहिलो. मला आता एकंच माणूस व्हायचंय, तो म्हणजे माझा मी."
एका वावटळीतून देवाचा आवाज उमटला,
"मी देखील केवळ मीच नाही आहे. तू जशी तुझ्या सृष्टीची स्वप्नं पाहिलीस, त्याचप्रमाणे, अरे शेक्सपिअर, तूदेखील माझ्या स्वप्नांच्या अनेक रुपांतला एक आहेस-माझ्याचसारखा एक असूनही अनेक होणारा. तसा अनेक असलास तरच तू सर्व काही आहेस, नसलास तर तू काहीही नाहीस."
['पुरचुंडी'मधून]
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment