Saturday, 20 March 2010
दीपदान
फुलावया लागलीस तेंव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला....मला कुठे वर्तमान होते
असाकसा तो प्रवास होता दिले दगे सारखे तरूंनी
दुपारचे ऊन्ह सावलीच्या सुखातही विद्यमान होते
सवाल माझा स्वतंत्रतेला करून आताच ते निघाले
स्वतःच जे चोरट्या सुखाचे निलाजरे बंदिवान होते
तुझ्यापुढे न्यायदेवतेने कबूलही पिंज-यात केले-
'चुका तुझ्या वंदनीय होत्या! तुझे गुन्हे पुण्यवान होते!'
आताच कोणी फकीर माझ्या घरापुढे ओरडून गेला
शिकस्त झालीस तू न बेटा, तुझे इरादे महान होते!
घरोघरी हीच एक चर्चा-तिचे घराणेच राजवंशी!
{ जिते न ते बंडखोर ज्यांचे भिकारडे खानदान होते }
अता स्मरे एवढेच....तेंव्हा कुठेतरी खोल दंश झाला...
खरेच का सोनकेवड्याचे मनात माझ्याच रान होते?
असे दिले शब्द शृंखलांनी....असा दिला त्वेष दु:खितांनी
दुभंग मी राहिलो तरीही अभंग माझे इमान होते
तुम्ही मला पाहिलेच कोठे? तुम्ही मला भेटलाच कोठे?
जिथे मला गाठले तुम्ही ते जिवंत माझे स्मशान होते
जरा तुझ्या अंगणात आलो....उनाड वा-यासवे उडालो....
अता फुलांना विचार, 'येथे खरेच का एक पान होते?
मुठीत घेऊन जीव माझा कसातरी जन्म काढला मी
तयार बाहेर सूळ होता....घरात भिंतीस कान होते
अम्हास फिर्यादही खुनाची तुझ्यापुढे आणता न आली
तुझ्या महालातील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते
म्हणू नका आसवात माझे बुडून केंव्हाच स्वप्न गेले
उदास पाण्यात सोडलेले प्रसन्न ते दीपदान होते
सुरेश भट
संकलक:प्रवीण कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
हंस-दमयंती
Dhingana
an alcoholic
- Pravin Kulkarni
- Pune, Maharashtra, India
- Hi.. I am Pravin and I am an alcoholic....
No comments:
Post a Comment