
सावल्यांचा काफिला हा चालला आहे कुठे?
जीवनाचा हा बहाणा हा चालला आहे कुठे?
चेहरे ओसाड यांचे टांगले खांद्यावरी
आंधळा काळोख सारा चालला आहे कुठे?
लोटिती ही एकमेका, कोडगी यांची नशा
झिंगला बाजार यांचा चालला आहे कुठे?
घोषणांनी व्यापिती हे अंतरीची रिक्तता
आत्महत्यांचा जथा हा चालला आहे कुठे?
थुंकती सूर्यावरी हे, शौर्य यांचे केवढे!
बुडबुड्यांचा हा तमाशा चालला आहे कुठे?
पावतो ना देव यांचा एकही लाचेविना
भेकडांचा धर्ममेळा चालला आहे कुठे?
मंगेश पाडगावकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment