अजिंठा
शेताभातात रानाउन्हात रमलेली महानोरांची कविता. 'ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे' इतके निसर्गाशी तादात्म्य पावलेले हे मन.'अजिंठा' हे महानोरांच्या कवितेचे वेगळे वळण. ही एक सलग दीर्घ कविता आहे. कथात्म बाजाची. अजिंठ्यातील भव्य शिल्पांच्या साक्षीने घडलेल्या मेजर गिल आणि पारूच्या प्रेमकथेचा हा काव्यात्म अविष्कार. पारूच्या रुपाने अजिंठ्यातील शिल्पे मेजर गिल समोर सजीव झाली. पारू त्याच्या चित्रांची प्रेरणा ठरली. पण पारूभोवतालच्या आडवळणी समाजाला त्यांच्या प्रेमकथेची भाषा समजू शकली नाही. आणि गिलचे आयुष्य औदासिन्याने झाकोळून गेले.
या कथेच्या निमित्ताने महानोरांच्या प्रतिभेला नवा बहर आला आहे. 'मी माझ्या मुलुखात नांदतो ऐश्वर्याचा राजा / इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा ' हा आत्मविश्वास सार्थ ठरवणारा हा बहर आहे.
प्रस्तावना
अजिंठ्याची लेणी म्हणजे अलौकिक सौंदर्याने शिगोशिग भरलेली एक स्वप्नशाला. विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणाऱ्या आणि संसाराच्या पैलथडीला गेलेल्या बुद्धाचे स्तवन-पूजन करण्यसाठी ही लेणी कोरण्यात आली. पण असामान्य कलावंतांची प्रतिभा सहसा एकसुरी, एकदेशी असत नाही. तिच्या खास आकर्षणाचे केंद्रस्थान कोणतेही असले तरी त्या स्थानाच्या अनुषंगाने ती अशेष जीवनाचाच शोध घेण्याचा प्रयत्न करीत असते. म्हणून बुद्धाला वाहिलेल्या या लेण्यांत मानवी किंबहुना सृष्ट जीवनाची सर्वच अंगे अतिशय कलात्मक रूपांत प्रकट झाली आहेत. बुद्धाने संसाराचा त्याग केला म्हणजे केवळ एका घराचा, एका पत्नीचा वा एका मुलाचा त्याग केला असे नाही. या संसाराच्या सभोवार सर्वदूर पसरलेल्या लक्षावधी संदर्भांचा, त्यातील सौंदर्याचा, सुखदु:खांचा, भावबंधनांचा आणि मानसिक प्रवृत्तीचाही त्याने त्याग केला. बुद्धाची महात्मता या सर्व संदर्भांसह चित्रित करण्याचा प्रयत्न असंख्य कलावंतांनी येथे केलेला आहे. ज्यांची नावनिशाणी आज शिल्लक नाही, अशा या कलावंतांनी पाषाणातून आणि पाषाणावर निर्माण केलेल्या या कलाकृती शिल्पकलेच्या आणि चित्रकलेच्या इतिहासात अजोडच असतील.अशा या अजिंठ्याच्या परिसरामध्ये, किंबहुना त्याच्या गाभाऱ्यामध्ये, गेल्या शतकात एक हृद्यस्पर्शी शोकांत नाट्य घडलेले आहे. अजिंठ्यातील पाषाणमय देवतांनी यक्षगंधर्वांनी भावनिर्भर दुष्टीने या घटनांकडे उत्कंठतेने पहिले असेल आणि त्यांचा अखेरचा पडदा पडल्यावर आपल्या पापण्याही पुसल्या असतील. मुळात चित्रकाराची प्रतिभा असलेला, पण सैनिकी पेशा स्वीकारून भारतात आलेला मेजर रॉबर्ट गिल, आणि फिरस्त्या बंजारा जमातीतील एक रूपवान तरुणी पारू, यांच्या अलौकिक परंतु असफल प्रेमाची ही कहाणी आहे. पश्चिमेकडील सुसंस्कृत प्रतिभा आणि पूर्वेकडील एक अनागर, जमिनीतून वर आलेल्या हिऱ्यासारखे झळझळीत स्त्रीत्व यांचे मिलन या कथेत आहे; आणि बर्बर समजुतींनी या दोन जीवांचा केलेला संहारही आहे. अजिंठ्याच्या पायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या, या परिसराशी एकात्म झालेल्या ना.धों.महानोरांसारख्या प्रतिभावान आणि निसर्गातील सौंदर्याचे सूक्ष्म, तरल झंकार आपल्या काव्यातून प्रकट करणाऱ्या कवीला, या गिल-पारूच्या कथेने आपल्याकडे ओढून घेतले नसते तरच नवल. काळाच्या प्रवाहात माणसांच्या संस्कृतीचे बह्यावरण बदलते. आपण सनातन मानतो अशी कांही मूल्येही बदलतात, किंवा वेगळ्या रूपांत विसर्जित होतात. आणि तरीही असे काही शिल्लक राहते, जे सर्वकाळच्या कवींना, कलावंतांना आवाहन करीत असते. महानोरांसारख्या संवेदनशील कवीने हे आवाहन स्वीकारून मराठी काव्याला एक सुंदर देणगी दिली आहे.
रविकिरण मंडळाच्या काळात कथात्मक काव्यांना बहर आलेला होता. सुधारक, बंदिशाला, आमराई यांसारखी रसिकमान्य झालेली खंडकाव्ये आघाडीच्या रविकिरणांनी लिहिलेली आहेत. परंतु, महानोरांचे 'अजिंठा' हे काव्य त्या प्रकारातील नाही. एखादे काल्पनिक कथानक घेऊन त्यात कादंबरीसारखे पण काव्यात्म तपशील भरत जाणे हे खंड्काव्याचे प्रमुख लक्षण. 'अजिंठा' मध्ये कथानक सांगणे वा प्रकरणश: उलगडून दाखवणे ही कवीची प्रतिज्ञाच नाही. येथे कवीने गिल-पारूच्या कथेतील स्वतःची गुंतवणूकच प्रकट केली आहे. म्हणून खंड काव्यात कवी जी निवेदकाची तटस्थ भूमिका घेतो ती येथे नाही. अजिंठ्याच्या डोंगरदऱ्यात विखुरलेली ही घटना कवीच्या मनात राहायला आली, तेथे ती कमलपुष्पासारखी अनेक पाकळ्यातून उमलली आणि त्याच्या भावसंवेदना आपल्या कब्जात घेऊन अखेर त्याचीच झाली. अशा एका पूर्णतः भरून गेलेल्या आणि भारावलेल्या मन:स्थितीत महानोरांनी ही दीर्घ कविता लिहिली आहे, हे सहज लक्षात येते. रॉबर्ट गिल अजिंठ्याच्या दर्शनाने झपाटून गेला होता. खांद्यावरची बंदूक त्याने बाजूला टाकली आणि रंगाची कुंचली हातात घेतली. भारतातील एका डोंगराच्या कडेकपारीतील ही अदभूत चित्रे , त्यांच्या प्रतिकृती करून सर्व जगातील रसिकांसमोर मांडावीत आणि आपल्या अनुभवात त्यांना सामील करून घ्यावे, ही गीलची आकांक्षा होती. गिल-पारूच्या प्रेमकथेची स्वतःला आलेली अनुभूती समानशील रसिकांपर्यंत पोचवावी ही महानोरांची भूमिका आहे. खरे तर, भूमिका म्हणणेही बरोबर नाही. काळजाचा कब्जा घेणाऱ्या एका प्रबळ अनुभवाला शब्दांत साकार करण्याची ही उर्मी आहे.(म्हणूनच अडली मधली अवतरणे देऊन मी त्याची मोडतोड करणार नाही.) हा प्रवाह आपल्या वेगवान, झपाटलेल्या ओघात आपल्याला शेवटच्या शब्दापर्यंत घेऊन जातो, भावभावनांच्या लाटालहरीत खेचून घेतो. शेवटी त्या चार सुनी फकीरांबरोबर आपणही एक पान वाघुरेच्या पाण्यात सोडतो आणि एका चिरंतन प्रवासासाठी तापीतीराकडे गेलेल्या गिलच्या मोडक्या झोपडीसमोर फुलांची एक ओंजळ वाहतो. हा अनुभव रसिक वाचकांना यावा ही इच्छा आणि येईल हा विश्वास.
वि.वा.शिरवाडकर
नाशिक, २३/११/१९८३.० अजिंठ्याचे शिल्पचित्र १८१९ मध्ये प्रथम ब्रिटीश अधिकाऱ्याच्या नजरेत आले. निजाम सरकारचे कलासक्त मन, कलाप्रेमी मंडळी ह्यांच्या १८२४ साली अजिंठ्याच्या चित्रकलेसंबंधी युरोपात पत्रवाचन/विचार झाला. त्याच्या प्रतिकृती करायच्या योजना आखल्या.
० १८४४ साली चित्रकार मेजर रॉबर्ट गिल याची अजिंठ्याच्या प्रतिकृती निर्माण करण्यासाठी नियुक्ती झाली. ते लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचे क्वालिफाईड आर्टिस्ट होते. ईस्ट इंडीया कंपनीतील मिलिटरीत मेजर होते.(मद्रास)
० अजिंठ्याच्या डोंगरावर लेणापूर गावाची आदिवासी (की बंजारा?) पोरगी गिलच्या सहवासात आली. दहा वर्षांचे दोघांचे सहजीवन.
० २३ मे १८५६ ला पारूचा अकस्मात मृत्यू. अजिंठा गावाच्या दिल्ली गेटजवळ तिची स्मृती गिलने बांधली.
ll टू द मेमरी ऑफ माय बिलव्हेड पारो ll हू डाईड २३ मे १८५६ ll
० १० एप्रिल १८७९ साली गिलचा मृत्यू. तापी नदीच्या किनाऱ्यावर भुसावळ येथे. तिथे संगमरवरी स्मृतीकबर आहे.
ll टू द मेमरी ऑफ रॉबर्ट गिल ऑफ अजंठा ll
डोळ्यांना डसले पहाड इथले ह्या गोंदल्या चांदण्या
कोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या ओल्या इथे पापण्या
गाभाऱ्यास अजून ओंजळभरी गंधार्थ संवेदना
बुद्धाच्या पडसावूलीत निजल्या ह्या राजवर्खी खुणा
अजिंठा
अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात
काठाकाठातला
झाडांच्या देठातला
रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला.
अजिंठा
झाडांच्या झुलत्या प्रवाही गाण्यातला
लेणापूर फरीदापूरच्या गावंढळ गर्तेतला.
बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा
पिवळ्याजर्द शेतातल्या पिकातलं बारादरीतला
काळ्याभोर दगडातला धबधबा झेलणारा.
अजिंठा
अदभूत भव्य दिव्य स्वप्नातला
प्रतिभावंतांच्या छिन्नीछिन्नीतला
जगड्व्याळ चिरंतन नाजूक रेषांमधला
रंगाचं आभाळ साठवून दगडांवर
कभिन्न कातळातलं दु:ख
घोटवून निर्यमक बुद्धाच्या कहाणीत
शांत सचेतन
पद्मासनातल्या गाभाऱ्यातला .
अजिंठा
जगाचे अहंकार मोडून बसलेला
नामोनिशान नसलेल्या कुठल्याच हातांचे
ह्या निर्मितीतल्या.
इथल्या दगडातल्या सृष्टीला
पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा
एक बलशाली हात
रॉबर्ट गिलचा.
चिलखती छाताडाच्या निळ्या डोळ्यांतला
एक राजवर्खी झरोखा कुंचल्यांवर रंगांच्या
जगभर युरोपच्या कानाकोपऱ्यात
द्वाही घुमवणारा, अजिंठ्यातली .
त्याच्या राजवर्खी कुंचल्यातल्या
नाजूक बोटांना
डोळ्यांना
डोळ्यांतील नितळ समुद्राला
चेतवून नेणारी एक अबलख पारू.
अजिंठा
पारूच्या पिवळ्या शुभ्र फुलांचा
फुलांच्या भारानं निस्सीम बहरलेला
कुठे विस्कटलेला
अजिंठा
पारूच्या गर्भार डोळ्यांतला
अजिंठा
चिरकाल फत्तरातला.
सराई कोटातल्या बंदिस्त कडेकोट
गेटमधून दरबारी दिमाखात हत्ती
मंद पावलांचा
बारादरीतल्या पाऊलवाटेनं अजिंठ्यात
पुन्हा एकदा बुद्धाला सामोरा जाणारा.
कित्येक हजार वर्षांनी साक्षात
जातक कथांमधला. मलूल डोळ्यांचा
दहापाच लोकांच्या सोबतीनं गिलसाब
हत्तीवरून जाणारा.चिलखती छाताडाचा.
गोराभुरा तरणा. निळ्या डोळ्यांचा.
कुंचल्यांचा झुबका
हजार रंगांच्या तबकड्या
कागद पेन्सिलींच्या गाठोड्यात
मेजर रॉबर्ट गिल
त्याचे लखलख डोळे
अथांग निळाईत आभाळाच्या.
निळ्याभोर पहाडात अजिंठ्याच्या.
पक्ष्यांचे दूरवर उडून जाणारे थवे पठारावर
झिरकत झुलणारं काळ्या पहाडातलं
पांढरंशुभ्र पाणी.
पाण्याच्या वळणांचा पांढराशुभ्र प्रवाह दुरचा
बारादरीतला घुमणारा आवाज
वाघुरच्या धबधब्यात.
पुढच्या नदीतली निस्सीम शांतता
प्रतिबिंबित झालेली अजिंठ्यात
त्याच्या अथांग डोळ्यांच्या पापण्यात.
दूरच्या दरीतला घुमटणारा आवाज
मोरांच्या स्वरांचा
त्याचा पडसाद उमटत जाणारा
अजिंठ्यातून दूरवर.....दरीदरीतून
गिलच्या डोळ्यांसमोर मोरणी
निळ्या जांभळ्या रंगांची.
पिसा-यातली.थुईथुई पावलांची.
झुलत्या झाडांच्या रांगा
वरती भरगच्च भरलेलं आभाळ.
हत्तीवरून उतरताना
वाघुरच्या पाण्यात
गिलचे पाय आपोआप
नाचू लागतात.
अजिंठा वाघुरच्या पाण्यात.
पाण्याच्या निरभ्र प्रवाही आरशात
प्रतिबिंब
काळ्याभोर गर्द पहाडाचं.
लेण्यांचं.
त्याचे डोळे अधीर उत्सुक
बेहद्द धावाधाव पावलांची.
दहा पाच माणसांची.
बोली नीट कळत नाही
तरी समजून सगळ्या
असल्या नसल्याची
सवयीनं हळूहळू सोबत लोकांची.
तबकड्या, भेंडोळे, कागदांचे कुंचले टाकून
पहिल्या दरबारात लेण्याच्या
तो विरघळून जातो पूर्णाकार.
गर्भगळीत त्याच्या शरीरातल्या
शक्तीचा सगळा पारा निथळून पडतो
तो पुन्हापुन्हा छिन्नीतल्या
दवी रेषांवर दगडांच्या
नजर टाकून पाहतो.
रंगांचे आवर्त. प्रभामंडळातले
पुष्पमाला घेतलेले गंधर्व
ओठांवर मुलायम लालसर रंग
गोंदणारी शृंगारातली सकवार बाई
शिबी राजाच्या गोष्टी.
गौतमाच्या पूर्वजन्मीच्या
जातक कथा कित्येक भिंतीभिंतींवर.
राजवाड्याचे दालन
कुठल्या रंगाचे आरेखन
त्याचे डोळे विच्छिन्न होतात पुन्हापुन्हा.
गिल अधाशी डोळ्यांचा. पुन्हापुन्हा अस्वस्थ.
पद्मासनातल्या भव्य गौतम बुद्धाच्या
मूर्तीजवळ थांबतो
मान उंचावून टकटक पाहतो
सुन्नपणानं बुद्धाच्या पायाजवळ बसतो
नि:शब्द
आपण काय पाहतोय त्याला कळत नाही
क्षणभर. तो कंदिलाचा, मशालीचा उजेड
भिंतीजवळ घ्यायला सांगतो.
अजिंठा
जगाचे अहंकार मोडून बसलेला
नामोनिशान नसलेल्या कुठल्याच हातांचे
ह्या निर्मितीतल्या.
इथल्या दगडातल्या सृष्टीला
पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा
एक बलशाली हात
रॉबर्ट गिलचा.
चिलखती छाताडाच्या निळ्या डोळ्यांतला
एक राजवर्खी झरोखा कुंचल्यांवर रंगांच्या
जगभर युरोपच्या कानाकोपऱ्यात
द्वाही घुमवणारा, अजिंठ्यातली .
त्याच्या राजवर्खी कुंचल्यातल्या
नाजूक बोटांना
डोळ्यांना
डोळ्यांतील नितळ समुद्राला
चेतवून नेणारी एक अबलख पारू.
अजिंठा
पारूच्या पिवळ्या शुभ्र फुलांचा
फुलांच्या भारानं निस्सीम बहरलेला
कुठे विस्कटलेला
अजिंठा
पारूच्या गर्भार डोळ्यांतला
अजिंठा
चिरकाल फत्तरातला.
सराई कोटातल्या बंदिस्त कडेकोट
गेटमधून दरबारी दिमाखात हत्ती
मंद पावलांचा
बारादरीतल्या पाऊलवाटेनं अजिंठ्यात
पुन्हा एकदा बुद्धाला सामोरा जाणारा.
कित्येक हजार वर्षांनी साक्षात
जातक कथांमधला. मलूल डोळ्यांचा
दहापाच लोकांच्या सोबतीनं गिलसाब
हत्तीवरून जाणारा.चिलखती छाताडाचा.
गोराभुरा तरणा. निळ्या डोळ्यांचा.
कुंचल्यांचा झुबका
हजार रंगांच्या तबकड्या
कागद पेन्सिलींच्या गाठोड्यात
मेजर रॉबर्ट गिल
त्याचे लखलख डोळे
अथांग निळाईत आभाळाच्या.
निळ्याभोर पहाडात अजिंठ्याच्या.
पक्ष्यांचे दूरवर उडून जाणारे थवे पठारावर
झिरकत झुलणारं काळ्या पहाडातलं
पांढरंशुभ्र पाणी.
पाण्याच्या वळणांचा पांढराशुभ्र प्रवाह दुरचा
बारादरीतला घुमणारा आवाज
वाघुरच्या धबधब्यात.
पुढच्या नदीतली निस्सीम शांतता
प्रतिबिंबित झालेली अजिंठ्यात
त्याच्या अथांग डोळ्यांच्या पापण्यात.
दूरच्या दरीतला घुमटणारा आवाज
मोरांच्या स्वरांचा
त्याचा पडसाद उमटत जाणारा
अजिंठ्यातून दूरवर.....दरीदरीतून
गिलच्या डोळ्यांसमोर मोरणी
निळ्या जांभळ्या रंगांची.
पिसा-यातली.थुईथुई पावलांची.
झुलत्या झाडांच्या रांगा
वरती भरगच्च भरलेलं आभाळ.
हत्तीवरून उतरताना
वाघुरच्या पाण्यात
गिलचे पाय आपोआप
नाचू लागतात.
अजिंठा वाघुरच्या पाण्यात.
पाण्याच्या निरभ्र प्रवाही आरशात
प्रतिबिंब
काळ्याभोर गर्द पहाडाचं.
लेण्यांचं.
त्याचे डोळे अधीर उत्सुक
बेहद्द धावाधाव पावलांची.
दहा पाच माणसांची.
बोली नीट कळत नाही
तरी समजून सगळ्या
असल्या नसल्याची
सवयीनं हळूहळू सोबत लोकांची.
तबकड्या, भेंडोळे, कागदांचे कुंचले टाकून
पहिल्या दरबारात लेण्याच्या
तो विरघळून जातो पूर्णाकार.
गर्भगळीत त्याच्या शरीरातल्या
शक्तीचा सगळा पारा निथळून पडतो
तो पुन्हापुन्हा छिन्नीतल्या
दवी रेषांवर दगडांच्या
नजर टाकून पाहतो.
रंगांचे आवर्त. प्रभामंडळातले
पुष्पमाला घेतलेले गंधर्व
ओठांवर मुलायम लालसर रंग
गोंदणारी शृंगारातली सकवार बाई
शिबी राजाच्या गोष्टी.
गौतमाच्या पूर्वजन्मीच्या
जातक कथा कित्येक भिंतीभिंतींवर.
राजवाड्याचे दालन
कुठल्या रंगाचे आरेखन
त्याचे डोळे विच्छिन्न होतात पुन्हापुन्हा.
गिल अधाशी डोळ्यांचा. पुन्हापुन्हा अस्वस्थ.
पद्मासनातल्या भव्य गौतम बुद्धाच्या
मूर्तीजवळ थांबतो
मान उंचावून टकटक पाहतो
सुन्नपणानं बुद्धाच्या पायाजवळ बसतो
नि:शब्द
आपण काय पाहतोय त्याला कळत नाही
क्षणभर. तो कंदिलाचा, मशालीचा उजेड
भिंतीजवळ घ्यायला सांगतो.
