Saturday, 6 March 2010

मराठी भाषेची पूर्वपीठिका


मराठी लोक मराठी का बोलतात?

ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता मराठी बोलण्याचे मुख्य कारण इथल्या लोकांना एवढी एकच भाषा येते हे! मुसलमानांनी त्यांना उर्दू शिकवण्याचा प्रयत्न केला व तोबा तोबा म्हणत परत गेले. विशेषत: मिरज आणि सावंतवाडी येथील मुसलमानांचे उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि ब-हाणपुरी प्राण सोडले असे म्हणतात. पुढे हे मराठे दिल्लीवर चाल करून गेले आणि पेशव्यांचे वकील दरबारात आणि वकीलीणबाई करोलबागेत उर्दू बोलावयाला लागल्यावर 'हल्ला चालेल, पण उर्दू आवरा' अशा मागण्या आल्या. मर्द मराठ्यांनीसुद्धा शत्रूवर हल्ला चढवताना मराठी शिव्यांची शिवकालीन उर्दू-मराठी कोशातली उर्दू भाषांतरे जोरात उच्चारून यवनास हैराण केले. तात्पर्य, मराठी लोकांना मराठीखेरीज इतर भाषा येत नसल्यामुळे मराठी लोकांची भाषा मराठी आहे. पुढे इंग्रजाने आपली भाषा शिकवण्याचा एक निकराचा प्रयत्न केला. दीडशे वर्षांच्या अव्याहत परिश्रमानंतरदेखील ब्याट, ब्यांक, ब्याडमिंटन, गूड ह्याबीटस यांड ब्याड ह्याबीट वगैरे ऐकून महाराष्ट्र मराठी लोकांवर सोपवून स्वतःचे इंग्रजी सुधारावयाला तो मायदेशी[१] परतला.
मूळ भाषा
पुणे, मुंबई, नागपूर, अकोला, रत्नागिरी, संगमेश्वर, नाशिक, पिंपळगाव, तळेगाव ढमढेरे, नातेपुते वगैरे शहरे वसण्यापूर्वी महाराष्ट्रात जंगले होती. जंगलात श्वापदे असावीत असा विद्वानांचा अंदाज आहे. त्यामुळे मूळ भाषा गर्जना, डरकाळ्या, कोल्हेकुई, कावकाव वगैरे असावी. त्याची लक्षणे आजच्या मराठीत, विशेषत: वृत्तपत्रीय मराठीत, फार आढळतात. जंगलात श्वापदापुर्वी माणसे होती याचा निश्चित पुरावा मिळत नाही. मात्र नद्या व समुद्र ह्यात मासे असल्यामुळे कोळी होते असे म्हणतात. भिल्लही होते. ते आता चांगले शिकलेसवरले म्हणून त्यांना आपण आदिवासी किंवा मागासलेल्या जमाती म्हणतो. "आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशातले अतिप्राचीन व मुळचे रहिवासी राक्षस, यक्ष, कातकरी, भिल्ल, कोळी वगैरे लोक असावे," असे 'महाराष्ट्र सरस्वत' कारांचे म्हणणे आहे व पुराव्यादाखल त्यांनी तळटीपेत राक्षसभुवन, राक्षसतागडी वगैरे शब्द प्रसिध्द आहेत हे सांगितले आहे. आमच्या मते राक्षस हे अतिप्राचीन व मुळचेच काय पण आजचेही रहिवासी आहेत.[पहा: राक्षसी महात्वाकांक्षा किंवा जमल्यास राक्षसविवाह[२] ]महाराष्ट्र हे ज्या वेळी दाट जंगल होते त्यावेळी त्याला दंडकारण्य म्हणत. म्हणजे फारिष्ट खात्याचा कायदा तोडणाऱ्याला दंड करून सोडून देत. हल्ली वशिल्यावर सोडतात. संस्कृतीचा इतका विकास व्हायला बरीच वर्षे लागली. अरण्यात काही बायका शिला होऊन पडल्या होत्या. ऋषी बायकांवर भडकले की त्यांना शिला करीत. दंडकारण्यातील मराठी ऋषींचे हे वैशिष्ट्य होते. रामाचा पाय लागल्यावर एक शिला पुन्हा बाईच्या बाई होऊन उभी राहिली. सर्वच शिलाना रामाचा वशिला मिळाला नाही, त्यामुळे त्या शिलाच राहिल्या. कदाचित पुन्हा कुणाचातरी वशिला लाऊन बाईही झाल्या असतील आणि आपल्या लक्षात फरक येत नसेल. पण दंडकारण्यात राम येण्यापूर्वी नाग लोक आले. त्यांच्यामुळे साहजिकच नाग प्रॉब्लेम तयार झाला. "नागोठणे, नागपूर, नागाव हि नागांची नवे असलेली गावे अजूनही आहेत." [पहा: 'महाराष्ट्र सारस्वत', लेखक कै. वि. ल.भावे आणि पुरवणीलेखक डॉ. शं. गो. तुळपुळे.] नागांचा प्रभाव मराठीत अजूनही आहे असे आम्हास वाटते. [पहा: नागोठणे याप्रमाणेच ना. गो. कालेलकर, ना.ग. गोरे, ना. ग. जोशी इ.इ.] आता आर्य नाग वगैरे मंडळी 'मराठी' का बोलू लागली यावर विद्वानांचे दुमत[३] आहे.

मराठीची खमंग निर्मिती

थोडक्यात म्हणजे शौरसेनी, प्राकृत, पाली, कानडी पंजाबी, जपानी, मागधी, पैशाची वगैरे भाषांच्या मिसळीतून मराठीची खमंग निर्मिती झाली. आज शौरसेनी, मागधी वगैरे जरी कोणी बोलत नसले तरी पैशाची भाषा मात्र सगळे बोलतात. वरवर मात्र आपल्याला पैशाची भाषा काळात नाही हा विनय दाखवीत, प्रकाशकाला किती पैसे द्याल हे विचारून पानागणिक हिशेब असला तर त्याप्रमाणे ग्रंथाचे माप धरतात.
आता या शौरसेनी, मागधी, प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश म्हणजे मराठीखेरीज जवळ जवळ सर्वच भाषांतून तयार झालेल्या मिश्रणाला 'मराठी' हे नाव का आले ह्याबद्दल विद्वानांत तीव्र [४] मतभेद आहेत. म्हणजे 'मराठी' हा पदार्थ तयार कसा झाला याची रेसिपी मिळत नाही हा अर्थ.


ठोकळमान
"आता ठोकळमानाने असे म्हणता येईल की शकपूर्व ३१०० पासून ते शकपूर्व १००० वर्षेपर्यंत नाग लोक येथे होते." असे महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात. महाराष्ट्र सारस्वतकार भावे व पुरवणीकार डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्याशी आम्ही सहमत आहो. काही लोक उगीचच शकपूर्व ३१०१ ते शकपूर्व १००२ पर्यंत नाग लोक येथे होते म्हणतात. शकपूर्व १००० नंतर महाराष्ट्रात राहिलेला एक नाग काढून असे आमचे आव्हान[५ ]आहे. तात्पर्य, नागांच्या बाबतीत वर दिलेले ठोकळमानच अचूक आहे. आता मुख्य प्रश्न, नाग लोकांच्या देशाला 'महाराष्ट्र' हे नाव का व कोणी दिले? गुजराती लोकांच्या प्रांताला गुजरात, बंगाली लोकांच्या प्रांताला बंगाल वगैरे नवे देणाऱ्या माणसाचेच हे काम नसावे. कारण ती सरळ नावे आहेत. नाग, श्वापदे, राक्षस, यक्ष, भिल्ल वगैरे जिथे राहतात अशा प्रांताला महाराष्ट्र हे नाव द्यावयाचे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या माणसाचे काम असावे. भाषेचे इतके तिरके वळण तिथेच. कारण तिथे कंपाउंडरला सिव्हील सर्जन म्हणतात आणि बेलीफाला न्यायमूर्ती! काहीच्या मते महारांचे राष्ट्र म्हणून महाराष्ट्र. हि व्युत्पत्ती 'बालिश' आहे असे महाराष्ट्र सारस्वतकारांचे मत असल्यामुळे आम्ही गप्प बसतो. त्यांच्या विरुद्ध जाणे आम्हाला बरे वाटत नाही. मराठी साहित्याचे बरेचसे इतिहास ह्या त्यांच्या इतिहासाला नावे ठेवीत, परंतु त्यांच्याच इतिहासात विद्वत्तेचा पेंढा भरून फुगवून स्वतःचे म्हणून छापलेले आहेत. आम्ही अजून तितके विद्वान नसल्यामुळे प्रामाणिक आहो.[ एवढा हा इतिहास कुठे तरी लावा, मग बघू.]
महाराष्ट्राचे मूळ नाव 'मरहट्ट' असून तिथे हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती होती, असे कर्नाटकातील सुप्रसिद्ध संशोधक श.बा.जोशी यांचे मत आहे. मरेपर्यंत बेळगाव-कारवारचा हट्ट धरून बसलेले ते 'मरहटट॓' हे आम्हाशी मान्य आहे. पण कांही ठिकाणी 'मरहट्ट' असे नसून 'महारट्ट' असेही उल्लेख सापडतात. तेंव्हा इथे कोणीतरी कुणाला तरी 'रट्टे' दिलेले दिसतात. हि मराठ्यांची [६] सवय. त्याच्या तपशिलात न जाणे बरे. महामहोपाध्याय काणे यांचे मत, "महान लोकांचे राष्ट्र' ते महाराष्ट्र.पण हे नाव पडण्याच्या काळात राक्षस, यक्ष वगैरे लोक असल्यामुळे 'महान' हि देखील हल्लीच्या 'थोर' सारखी जात असावी. साधे पुढारी आणि थोर पुढारी, कलावंत आणि थोर कलावंत, साहित्यिक आणि '...म्हणजे थोरच' वगैरे जातीप्रमाणे महान हि जात असवी. थोर हीही असावी. महान लोक हत्तीवरून जात, म्हणून महान झाले व थोरांचे थोरात झाले. महाराष्ट्राला नाव कसे पडले यापेक्षा महाराष्ट्राला हल्ली जो तो नाव का ठेवतो याचा विचार करणे अधिक अगत्याचे आहे असे आम्हांस वाटते. त्यामुळे कांही लोकांनी मरहट्ट मानावे, काहींनी महरट्ट. ज्यांना महान लोकांचे राष्ट्र मानायचे असेल त्यांनी तसे मानावे. प्रत्येकाला आपापल्या मताच्या पुष्ट्यर्थ भरपूर शिलालेख सापडतील. जोपर्यंत ते धड कुणालाही वाचता येत नाहीत तोपर्यंत प्रत्येकाने दोनचार दगड हाताशी बाळगून ठेवावे. डोक्यात शिरले नाहीत तर घालता येतील.
तर मराठी भाषेची पूर्वपीठीका हि अशी आहे. इतक्या उप्पर विशेष पुरावा हवा असल्यास नवव्या किंवा चौथ्या अगर तिसर्या शतकातील हा शिलालेख
पाहावा:

कापासीदामासुंबाल्याचावूंडाये
कीडमेंअस्सऊन लट्ठ बुक्के लींहतें

वरील शिलालेख वाचल्यावर याचा अर्थ लागत नाही हे सहज ध्यानी येईल. अर्थ न ध्यानात येण्यासारखे लिहिण्याची प्रवृत्ती प्राचीन आहे, एवढे ध्यानात यावे म्हणून शिलालेख उद्धृत केला आहे.

१. मायदेशातला 'माय' हा मराठी की इंग्रजी याबद्दल मात्र इथे अजून वाद चालू आहे. काही भाषाशास्त्रज्ञाच्या मते माय म्हणजे आई असेही आहे. उदा: कुणाची माय व्याली? सर्वसाधारणत: हा शब्द माय म्हणजे माझं ह्याच अर्थी आहे हे उघड आहे.

२. हाही पहा. 'करा' नव्हे!

३. अज्ञानाला विद्वानांच्या जगात दुमत म्हणतात.

४. कंपोझीटर, 'तीव्र' शब्द जुळवताना तो तुमचा जबरा की काय टाईप असतो तो गावतो काय बघा. थक्यू!

५.नागपंचमीला पाटावर पीठाचे नाग काढतात ते धरले जाणार नाहीत.

६.
कंपोझीटर, 'ठ्या' वरचा अनुस्वार उच्चारीत आहे. गळू नका. नाहीतर आमची मौत. क्यू!

मराठी वामयाचा [गाळीव] इतिहास
पु.ल.देशपांडे
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....