
#चंद्रमा हसे नभी, शांत शीतल चांदणे
आमुच्या आहे कपाळी, अमृतांजन लावणे
लावण्या हेही कपाळी, नसतो तसा नाराज मी
आहे परी नशिबात हेही, आपुल्याच हाती लावणे
#गेलो फिराया दूर, तेथे खूप आम्ही बोललो
टाळुनी बोलायचे ते, सर्व कांही बोललो
#कोणी आम्हा न पाहिले, आम्ही कुणा ना पाहिले
ओशाळलो ऐसे जसे कि, साऱ्या जगाने पाहिले
#दोघेच होतो, शक्य नव्हते, येणे तेथे तिसरे कुणी
लाजविला मी शिवाजी, गेलो तसे आलो अम्ही
#पत्रे तिला प्रणयात, आम्ही खूप होती धाडिली
धाडिली होती अशी कि, नसतील कोणी धाडिली
धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तिचे
#पत्रात त्या जेंव्हा तिचे हि, पत्र हाती लागले
पत्रात हि त्या हाय! तेथे ती काय लिहिते बघा
माकडा, आरशात आपुला, चेहरा थोडा बघा
#सार्थता संबोधनाची, आजही कळली मला
वैय्यर्थता या यौवनाची, तीही आता कळली मला
नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे
ऐसे नव्हे कि माकडाला, माकडी नसते कुठे
#
वाटले विरहात माझ्या, आसवे गाळील ती
वाटले, चिठ्ठी तरी, काही मला धाडील ती
म्हणते कशी, सौंदर्य विरही, तेंव्हाच मजला समजले
आहे अशी विरहात मी, हे लोकांस जेंव्हा समजले
पत्ता जसा विरह व्यथेचा माझ्या, जगाला लागला
जो तो मला येउनी अगदी, त्याचीच मानू लागला
प्रतिसाद मी त्या सृजनतेला, तैसाच देऊ लागले
जो जो कुणी भेटेल त्याला, तूच मानू लागले
#विसरा गुलाबी गाल, विसरा कुंतलांची विपुलता
अंचलाने स्पष्ट होते, अन्चलाची विफलता
ठेउनी जाणीव याची, प्रत्येक आहे नेसली
नाही अरे, इतुक्याच साठी, नऊवार कोणी नेसली
#ऐसे जरी समजू नका, आहे निराश व्हायची
ऐसे नव्हे अगदीच काही, सोय नाही व्हायची
बघता तसे सांगू खरे, काही कमी नाही इथे
आहे इथे सारेच आणि, तेही पुन्हा जिथल्या तिथे
समजा जरी का वाटले, कोणा कमी काही कुठे
ऐसे नाव्हेतो पार्ट यांचा, मिळणारही नाही कुठे
#केसास देतो वेव्हज आम्ही, फेस पावडर लावतो
घालतो बुशशर्ट जैसा, ब्लाउज आम्ही घालतो
मर्द पण आम्हा म्हणाया, शंका नका आणू कधी
सांगतो, शपथेवरी, बाळंत ना झालो कधी
#एकही आसू खारोखर, गाळला नसतास तू
मजनू अरे थोडा आम्हा का, भेटला असतास तू
एक नाही लाख लैला, मिळवल्या असत्या अम्ही
मिळवल्या नुसत्याच नसत्या, वाटल्या असत्या अम्ही
भाऊसाहेब पाटणकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment