Thursday, 18 March 2010

आक्टोपस च्या संघटित जनानखान्याकडे


आक्टोपस च्या संघटित जनानखान्याकडे आपण जात आहोत
मी ६५ मार्चची वृषभचिन्हांकित मुद्रा
माझे ऐवज मोहंजोदारो
मी रेखालय सिंहस्तंभ शीर्ष
माझे अलंकारिक दिवसमान
पायापासून उत्सर्जित
माझे कटोकोम्बस हातोहात मोकळे
तुम्ही विखरा आवारात दहीदूधलोणी
आक्टोपसचे संघटित जनानखाने आपल्याकडे येत आहेत

जेवताना माण्सं भेसूर भयावह
अन्नान्न दशमानात अधोरेखित
१९७० च्या गर्भाशयात
रजस्वल आवा
बिछान्यात हाताच्या कर्तृत्वात पक्षपाती वणवा
आतड्यात भांग
ज्यांनी ज्यांनी गमबूट घातले असतील त्यांनी त्यांनी हात वर करावेत
आक्टोपसचे संघटित जनानखाने आपल्याकडे येत आहेत

गर्भधारणेनंतर मादी नराला खाऊन टाकते
१२३४५६७८९० हे सर्व झाडांचे नंबर्स
एखाद्या दिवसाचा संथपणा आपणास गतीत सामील करावा लागतो
राप धरलेला चेहरा बाजारात बसवावा लागतो
बाजारातून उठवावा लागतो
आपल्यापुढे चार आणि शून्य आहेत
शून्यातून चार संभवतात चा-ही अंगानं पांगतात
चारापुढे शून्य ठेवला तर ४० घडतात
चाराच्या खाली शून्य पसरवला तर
चार शून्याने मजबूत होतात
चार शून्य यांच्या सहवासातच आपण
इन्किलाब जिंदाबाद म्हतो
रक्ताचा ध्वज रोवतो
चार आणि शून्य चाचपताना ज्यांनी जपली ग्लानी
ते सदोदित राहिले गुलामांचे गुलाम
गर्भधारणेनंतर मादी नराला खाऊन टाकते
तुम्ही विखरा आवारात दहीदूधलोणी
आक्टोपसचे संघटित जनानखाने आपल्याकडे येत आहेत


नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....