Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Wednesday, 11 August 2010

विदूषक :जी.ए.कुलकर्णी

Thursday, 8 April 2010

विदूषक :जी.ए.कुलकर्णी


Wednesday, 17 March 2010

टाकलेला : जयवंत दळवी


पंडितांच घर.
त्यांची कन्या अस्वस्थ होती. पराकाष्ठेची भ्यालेली होती.
या क्षणी कोणीतरी घरी यावं असं तिला वाटतं होतं.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
तिनं दे उघडलं. दारात रंगा उभा. तिचाच धाकटा भाऊ.
"अरे बाबा, आहेस कुठं तू?"
"काय झालं?"
"काय झालं म्हणजे काय? आईचा कुठं पत्ता नाहीये..."
"म्हणजे?"
"सकाळपासून कुठं गेलीय ती आलेलीच नाहीये..."
"जेवण?"
"जेवण केलेलं नव्हतं...ऑफिसात माझा डबासुद्धा आला नव्हता..."
"करंदीकरांना कळवलं?"
"ते ऑफिस सुटल्यावर आले, तेंव्हा मी सांगितलं त्यांना..."
"ते कुठं गेले?"
"ते तीन पत्ते घेऊन गेलेत आईच्या मैत्रिणींचे."
"तुला काय वाटतं?"
"काय?"
"आई कुठं गेली असेल?"
"कसं सांगणार?"
"आज ती बया इथं यायची होती..."
"कोण?"
"तीच...प्रमिला!"
"कशाला?"
"इथं राहणार आहे म्हणे ती कायमची!"
"तुला कोणी सांगितलं?"
"आईनं..."
"आई मला कशी बोलली नाही?"
"तू रडशील म्हणून..."
एकदम तिच्या डोळ्यातनं घळघळा पाणी वाहू लागलं. ती म्हणाली,
"रडू नको तर काय करू? काय आहे आपल्या हातात?"
"खरं आहे! आपला जन्म आपल्या हातात नाही! आपलं आयुष्य आपल्या हातात नाही!"
तो बाहेर जाण्यासाठी वळला. तोही अस्वस्थ झाला.
"तू आता कुठं निघालास?"
"सिगारेटच पाकीट घेऊन येतो..."
"आता तू कुठं जाऊ नकोस..."
"मन बेचैन झालं की सिगारेट ओढल्याशिवाय मला चैन पडत नाही..."
"तू बाहेर जाऊ नकोस..."
"का?"
"भीतीनं माझे हातपाय थंड पडताहेत! कदाचित मला चक्कर येईल."
"कॉफी करून देऊ?"
"नको! तू बोलत रहा काहीतरी."
"पुर्वीच्यासारख्या तू कविता करत नाहीस?"
"अं...हं."
"का?"
"का करायच्या कविता? कशासाठी? कशात कसला पर्पजच आता वाटत नाही."
"तू, रंगा, पूर्वीसारखा अभ्यास केला असतास, तर आता कॉलेजात गेला असतास."
"-आणि?"
"कवी म्हणून तुझं नाव गाजलं असतं....याही परिस्थितीत तू शिकायला हवं होतंस..."
"का?"
"भीतीनं माझे हातपाय थंड पडताहेत! कदाचित मला चक्कर येईल."
"कॉफी करून देऊ?"
"नको! तू बोलत रहा काहीतरी."
"पुर्वीच्यासारख्या तू कविता करत नाहीस?"
"अं...हं."
"का?"
"का करायच्या कविता? कशासाठी? कशात कसला पर्पजच आता वाटत नाही."
"तू, रंगा, पूर्वीसारखा अभ्यास केला असतास, तर आता कॉलेजात गेला असतास."
"-आणि?"
"कवी म्हणून तुझं नाव गाजलं असतं....याही परिस्थितीत तू शिकायला हवं होतंस..."
"तू शिकलीस! काय झालं?"
"आमचं सोडा...आमचं शिक्षण डिग्रीसाठी! डिग्री नोकरीसाठी! आणि नोकरी लग्नासाठी!"
"-आणि लग्न? लग्न कशासाठी? ते तरी झालं का?"
"आता तर तेही मला नकोच आहे!"
"का?"
"आई-बाबाचं जे काही चाललंय ते पाहिल्यावर कुणाला वाटेल आपण लग्न करावं म्हणून?"
तेवढ्यात दोनदा बेल वाजली. हि पंडितांची पद्धत.
"रंगा, दार उघड! बाबा आलेत..."
"तू उघड!"
तो घाईघाईनं आत गेला. तो पंडितांच्या समोर कधीच उभा राहत नसे! अंजीनं दार उघडलं. ती त्यांच्या तोंडाकड भीतीनं बघत राहिली.
"बानू कुठं गेली?"
त्यांनी आत येता येता विचारलं.
"बाबा, आईचा कुठं पत्ताच नाही."
"म्हणजे..."
"सकाळपासून कुठं गेलीय ती..."
"करंदीकर कुठं गेलेत?"
त्यांना संशय आला...ती शेजारच्या करंदीकरांच्याबरोबर गेली की काय!
"काका आईला शोधायला गेलेत..."
"कुठं?"
"त्यांनी तीन पत्ते घेतलेत..."
"कुणाचे?"
"मालूताई चौबळ...कुसुमताई....निराताई..."
"निराताई कोण?"
"चिटणीस..."
पंडित विचार करत बसले. आतून ते अस्वस्थ झाले होते. त्यांच्या हातांची बोटे विचित्रपणे थरथरत होती, पण काहीच घडलेलं नाही असं ते दाखवत होते.
अंजी त्यांच्याकडे बघत राहिली...ते काही बोलतील म्हणून!
तिला काही विचारायचं होतं, पण धीर होत नव्हता, ती अवघडून उभी होती,
"तुला काही विचारायचंय का?"
"हो!"
"काय?"
"बाबा, ती..ती.."
"कोण?"
"प्रमिला...ती इथं राहायला येणार?"
"हो..."
ते एकदम चिडले. रागानं म्हणाले.
"म्हणूनच बानू तिला अपशकून करतेय...आपलं नाक कापून!"
अंजीच्या गळ्यातनं एकदम हुंदका फुटला. ती रडू लागली.
"तुला रडायला काय झालं?"
तिला वाटलं, यांना काय सांगायचं? ती फक्त रडत राहिली!
"प्रमिला आली तरी तुम्हा कुणाला काही कमी होणार नाही!"
तिनं एकदम रडू आवरलं. धीर केला आणि ती म्हणाली,
"बाबा, मी कधी तोंड उघडून तुम्हाला बोलले नाही!...पण तुम्ही आमचा सगळ्यांचा बळी घेताय. आईला कसलं म्हणून सुख नाही...आज ती कुठं कोण जाणे. माझं आणि रंगाचं तर आयुष्यच विस्कटून गेलंय! तो आज कॉलेजात शिकला असता....कवी म्हणून नावारूपाला आला असता...आपल्या आयुष्याला त्यानं उमेदीनं आकार दिला असता..."
पंडित तिच्याकडे बघत राहिले. आणि म्हणाले,
"ते त्यानं करावं! सगळं करावं! मी काही कमी पडू देणार नाही!"
"या गोष्टी पैशानं होत नाहीत, बाबा! घरात मन आनंदित राहील असं वातावरण हवं...माझं काय झालं?'
"काय?"
"मी ऑफिसात असते तेंव्हा चार घटका माझं मन रमलेल असतं! ऑफिस सुटलं की मी रेंगाळते...मला घरी येउच नये असं वाटतं-"
त्यांनी एकदम वळून बाजूला पाहिलं. कोणी तरी चुकून घरात आलेला परका माणूस बाहेर जावा तसा रंगा तोंड लपवित बाहेर जात होता. बोलणं थांबवून तिनंही रंगाकडे पाहिलं. "जरा थांब", असं तिनं किंवा त्यांनी रंगाला सांगितलं नाही. कारण दोघानाही ठावूक होतं. तो थांबला नसता!
"स्वप्नं बघण्याचं वय आमचं! पण आमची स्वप्नं तुम्ही चिरडून टाकलीत!"
"उगाच काही तरी बडबडू नकोस-"
ते किंचित रागारागानं म्हणाले,
"मी तुझं लग्न करून देईन-"
"काही नको...! सगळीकडे पत्रिकेचं निमित्त होणार आहे...असल्या बापाची मुलगी कुणीही आपल्या घरात घेणार नाही!"
"अंजे थोबाड फोडीन-"
ते हात उगारून ओरडले.
"फोडा....फोडा....ठार मारा मला....आज मी उभ्या आयुष्याचं बोलून घेतलंय!"
ती खूप मोठ्यानं रडली. रडता रडता ती धावत आपल्या खोलीत गेली. पंडित तिला पाठमोरी बघत काही क्षण तसेच बसून राहिले.
आपलं काय चुकतंय याचा त्यांनी क्षणभर विचार केला. पण नीट कळलं नाही! कळून चटकन वेगळा मार्ग घेता येतो असंही नाही!
त्यांना मद्याची तलफ आली. व्हिस्कीची बाटली घेण्यासाठी ते उठले. बाटली आणून पुन: स्वस्थ बसले. क्षण दोन क्षण बाटलीकडे टक लावून बघत राहिले!
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्यांना वाटलं, बानू आली. त्यांनी मनाशी ठरवलं, तिच्याशी एक शब्दसुद्धा बोलायाचा नाही! तिला अशीच तडफडत ठेवायची. कुठं गेली होतीस एवढंसुद्धा विचारायचं नाही-
त्यांनी दार उघडलं. बाहेर शेजारचे करंदीकर उभे होते. थकलेले दिसत होते.
"या-"
"आल्या का बानुताई?"
"नाही अजून-"
"तुम्हाला कधी कळलं?"
"आत्ताच इथं आल्यावर-"
"मी तिन्ही ठिकाणी जाऊन आलो.....चिटणीस...चौबळ...कुलकर्णी....त्या म्हणाल्या, कित्येक दिवसात बानुताई भेटलेल्या नाहीत-"
"बसा करंदीकर! तुम्ही व्हिस्की घेणार?"
'नाही-"
"एक स्मॉल वन?"
"नो!"
"सरबत?"
"काही नको!"
"का?"
"छे!...आता यांना शोधायचं तरी कुठं?"
"कुणाला?"
"बानुताई-"
"येईल, बसा तुम्ही!"
करंदीकर बसले. पण अस्वस्थ होते. मधेच उठत म्हणाले.
"पंडित, आपण पोलीस-स्टेशनवर जाऊया."
पंडितांनी ग्लास भरता भरता विचारलं, "कशाला?"
"रिपोर्ट करायला-"
"रिपोर्ट काय करायचा?"
"कुठं एक्सिडट झाला असला तर-"
"चिअर्स-"
पंडितांनी सवयीनं ग्लास उचलला आणि तोंडाला लावला.
"मघाशी अंजी म्हणाली....अंजी कुठं गेली?"
"आत झोपली आहे!...भ्यालीय ती-"
"मघाशी मी आलो तेंव्हा तर रडायलाच लागली!"
"ती काय म्हणाली?"
"कोण?"
"अंजू-"
"म्हणाली-आईनं जीवबीव तर...गाडीखाली..."
"छे-"
पंडित हातातला ग्लास ठेवून उठले. आणि टेबलावर शोधाशोध करू लागले.
"काय शोधता?"
"काही चिट्ठीबिठ्ठी ठेवलीय का पाहत होतो-"
चिठ्ठीच्या कल्पनेने करंदीकर एकदम दचकले. त्यांनी विचारलं,
"आहे?"
"नाही!"
पंडित घरात येऊन बसले. शांतपणे पिऊ लागले.
"काल काही विशेष घडलं नव्हतं ना?"
"काय घडणार? रोजचंच!"
"ती इथं येतेय?"
"कोण?"
"प्रमिला जोग-"
"तुम्हाला कुणी सांगितलं?"
"कानावर आलं!"
"बाबून सांगितलं?"
"नाही!'
"रंगा म्हणाला."
"काय म्हणाला?"
"हेच...ती इथं येऊन राहणार आहे म्हणून-"
"आणखी काय म्हणाला?"
"काय म्हणणार? पण तो फार अस्वस्थ, बेचैन आहे!"
पंडित एकदम गप्प झाले. न बोलता ग्लास भरू लागले.
करंदीकरानी विचारलं,
"हे तुम्ही बानूताईना कधी सांगितलं?"
"काल रात्री-"
"मग बरोबर! म्हणजे त्या घर सोडूनच गेल्यात-"
"जाऊ दे! येईल परत-जाऊन जाणार कुठं?"
दोघेही गप्प राहिले. थोडा वेळ! मग पंडित म्हणाले,
"आमचे खांडेकर...पर्सोनल मनेजर...त्यांनी दुसरं लग्न केलं म्हणून चिडून त्यांची पहिली बायको माहेरी निघून गेली होती! काय झालं? सहा महिन्यांनी परत आली! तिला जायला माहेरतरी होतं...बानूला तेही नाही!"
'अहो पंडित, पण बानूताईनी आत्महत्या केली तर?"
करंदीकर एकदम घाबरून उठून उभे राहिले.
"काही करीत नाही! बसा तुम्ही!"
पंडित आपण शांत आहोत असे दाखवत होते. पण ते आतून अस्वस्थ होते. गटागटा पीत होते. तिनं आत्महत्या केली तर अब्रू जाईल म्हणून!
"पण मी म्हणतो, पंडित, आता या वयात तुम्हाला असं काही का करावंस वाटतं? अड अवॉट प्राइस?"
"त्याला इलाज नाही! बायको म्हणून बानू मला आता सुख देऊ शकत नाही! मला माझ्या सुखाची गरज आहे! ती गरज घरच्यांनी ओळखायला पाहिजे. एनी वे, आय विल मनेज!"
ग्लास एकदम उलटा करून त्यांनी तोंडात ओतला!
"पंडित, बानूताईंनी आत्महत्या केली असं तुम्हाला या क्षणी कळलं....तर तुम्हाला काय वाटेल?"
"तुम्हाला आठवतं करंदीकर? तुमच्या कमलाबाईंची किडनी फेल होत होती....ते सांगताना तुम्ही माझ्या खांद्यावर मान टाकलीत.... आणि ढसाढसा रडलात-"
"मी रडलो म्हणजे काय? त्यावेळी मी दुभंगून....उन्मळून पडतोय असं मला वाटलं-"
हे सांगतानाही करंदीकरांचा गळा दाटून आला!
"मला तसं काहीही वाटणार नाही!"
"तुम्ही आयुष्यात कधी सुखी होणार नाही, पंडित! ज्याला प्रेम म्हणजे काय ते कळलं नाही-"
"मला प्रेम आणि शरीरसुख यात कधी फरकच करता आला नाही!"
"तुम्हाला एक खाजगीतल सांगू का, पंडित?"
"काय?"
"आमची कमल...तुम्हाला माहित आहे....दिसायला बरी नव्हती! आमचं दुर्दैव म्हणजे चांगली दिसणारी मुलगी आम्हाला कधी सांगून आलीच नाही! ज्या आल्या त्यात कमल उजवी! म्हणून केली! पण मला ती मनापासून आवडत नव्हती...."
"पण तुमचं केवढं प्रेम होतं तिच्यावर?"
"तेच सांगतोय! हे लग्न झालं तेंव्हाच! .....पण मग मी एकदा विचार केला....'आवडत नाही....
आवडत नाही' म्हटलं तर आम्ही दोघंही जन्मभर दु:खी होऊ! म्हणून मग आम्ही एकत्र फिरायला लागलो...बोलायला लागलो...एकमेकांच्या आवडीनिवडीत लक्ष घातलं...आणि मग एकदम चमत्कार झाला, पंडित! मग तिच्या रूपाचा...आपल्या शरीरसुखाचा विचारच गळून पडला! पण...मग ती गोडच दिसायला लागली!....तीच आपल्या अस्तित्वाचा आधार आहे असं वाटू लागलं!"
"व्हेरी स्ट्रेंज!"
काही समजत नसल्यासारखा पंडितांनी चेहरा केला! आणि ते कानोसा घेतल्यासारखे म्हणाले,
"बाय द वे...कमलावहिनी जाऊन आता दोन वर्ष झाली!...मला सांगा, तुमच्या मनात दुस-या कुण्या बाईबद्दल कधी....?"
करंदीकर हसले आणि म्हणाले,
"मनातून काही वाटणं आणि तसं वागणं यात फरक आहे, पंडित! आपण मानसं आहोत! आपण विचार करून लक्ष्मणरेषा आखू शकतो!"
"
लक्ष्मणरेषा! लक्ष्मनान आखायची आणि सीतेने ओलांडायची-"
पंडित हसले-ग्लासातल्या मद्याकडे बघत राहीले. त्यांच्या मनाचा निर्णय होत नव्हता...विचारावं की नको? पण त्यांनी निश्चय केला.
"करंदीकर, तुम्हाला एक मोकळेपणानं विचारू का?"
"आपण इथं नको त्या गोष्टी बडबडत बसलोय....आणि बानूताईचा अजून पत्ता नाही-"
"तुम्हाला तिची एवढी काळजी वाटतेय?"
"तुम्हाला नाही वाटत, पंडित?"
"तुम्हाला एक विचारू, करंदीकर?"
"विचारा ना-"
"तुम्हाला बानुमध्ये काही इटरेस्ट?"
करंदीकराना एकदम धक्का बसला.
"विचारून हे काय विचारलंत, पंडित? याचा अर्थ मी यापूढ इथं यायचं नाही."
ते त्याच क्षणी उठून उभे राहिले.
"कमॉन, करंदीकर-"
त्यांना खाली बसवीत पंडित मोठ्यानं हसले. म्हणाले,
"वी आर फ्रेंड्स, आफ्टरऑल-"
"पण तुम्हाला हा संशय कधी आला?"
"कसला?"
"की मला बानूताईमध्ये इटरेस्ट वाटत असेल-"
"छे...छे! संशय कसला?"
"त्याशिवाय का तुम्ही असं विचाराल?"
"सांगू?"
"सांगा ना-"
"गेल्या वर्षी मी इथं मोठी पार्टी दिली...माझ्या वाढदिवसाची-"
"हो! आपण सर्वजण खूप प्यालो-"
"बानुही प्याली-"
"राईट!"
"पार्टी रंगात आली तेंव्हा तुमचा व्हिस्कीचा अर्धा ग्लास एकदम बानू प्याली-"
"अशक्य! अगदी
अशक्य!....तरीही बानूताईचा अर्धा ग्लास मी प्यालो असं तुम्ही म्हटलं नाही हे माझं नशीब!"
"जे नी पाहिलंय तेवढंच सांगतोय-"
"मला हे खरं वाटत नाही! त्या प्याल्या असल्या तरी त्यांना कल्पना नसावी, की तो अर्धा ग्लास माझा होतं म्हणून-"
पंडित ते मान्य करायला तयार नव्हते! हट्टालाच पेटल्यासारखे!
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. करंदीकरानी दरवाजा उघडला.
दारात बानू उभी होती.
रात्रीचे दहा वाजले होते.
"अगं अंजू, बानुताई आल्या-"
करंदीकर एकदम जोराने ओरडले. ते हर्षभरित झाले होते.
बानू नेहमीपेक्षा अधिक प्रफुल्लीत होती.
ती हसत हसत आत आली. अंजून तिला कडकडून मिठी मारली.
पंडित बघत होते. पण तिने त्यांची दखल घेतली नाही. त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा नाही.
अंजूला गदगदून आलं होतं. रडता रडता, हसता हसता ती म्हणाली,
"सकाळी आठला तू गेलीस...आता वाजले किती?"
"कुठूनतरी फोन करायचा, बानुताई!"
करंदीकर म्हणाले. त्यांना त्या क्षणी बानुताई खूपच वेगळी दिसत होती.
"नाही केला फोन! आज वेगळं स्वातंत्र्य घेतलं! आजपर्यंत
स्वातंत्र्य की सुरक्षितता म्हटलं की, सुरक्षितता बरी वाटायची!....आता सुरक्षितता झिडकारायचं ठरवलंय मी!"
बानू बेफिकीरीन म्हणाली.
"कुठं गेली होतीस?"
पंडितांनी विचारलं. आवाजात अधिकार होतं.
"का?"
"मला प्रश्न नको आहे! आय मस्ट नो-"
"मी बांधलेली नाही-"
"बानू, तू मर्यादा ओलांडते आहेस-"
"होय! आज प्रथमच-"
"परिणाम वाईट होतील-"
"मला पर्वा नाही!"
बानू कमालीची स्वस्थ, शांत होती!
"मी जाऊ का?"
करंदीकरांनी अवघडून विचारलं, प्रसंग विचित्र होता.
"चला तुम्ही, करंदीकर तुम्हाला एंबरसिंग वाटेल-"
"थांबा काका! बानू म्हणाली, "प्रथमपासून तुम्ही या घरच्या दुर्दशेचे साक्षीदार आहात. एकदा हे शेवटचे ऐकून जा!
"इनफ ऑफ इट, बानू!" पंडित डोळे गरगर फिरवीत ओरडले. ते संतापले होते.
"मिस्टर पंडित, मी आजपासून तुम्हाला टाकलेलं आहे!"
ती एक एक शब्दावर कमालीचा जोर देत म्हणाली.
"शटप! मी तुला घटस्फोट देणार नाहीये! पोटगी मिळणार नाही!"
"मला काहीच नको आहे!"
"मग जाशील कुठं?"
"मी कुठंच जाणार नाही! तुम्हालाच जावं लागेल-"
"वॉट डू यु मीन, बानू?"
"ही जागा माझ्या नावावर आहे! सुदैवानं ! या जागेत प्रमिला येऊ शकणार नाही. तुम्हाला इथनं घालवण्याची व्यवस्था मी केलेली आहे- अतिप्रसंग टाळायचा असेल तर तुम्हाला मुकाट्यानं गेलं पाहिजे."
पंडित आणि करंदीकर तिच्याकडे बघत राहिले. तिनं रुद्रावतार धारण केला होता.
पंडितांच भस्म होत होतं!
पूर्वीच्या काळात त्यांनी तिचं थोबाड रंगवलं असतं!
पण या क्षणी त्यांना भ्याल्यासारखं वाटलं!


संकलन:प्रवीण कुलकर्णी
























Tuesday, 16 March 2010

मी.....भारताचा एडिसन : जयवंत दळवी



वेगवेगळे गुन्हे केले म्हणून चौदा वर्षांची मी शिक्षा भोगत या तुरुंगात खितपत पडलो आहे. तसे म्हणाल तर मी एकही गुन्हा केला नाही. परमेश्वरास साक्षी ठेवून खरे सांगेन, खोटे सांगणार नाही, असे मी कोर्टात वारंवार सांगितले, आणि माझ्यावर लादलेला प्रत्येक आरोप मी अमान्य केला, पण कोर्टाने माझे म्हणणे मान्य केले नाही.
तसे म्हणाल तर मी शास्त्रज्ञ होतो, एवढाच माझा गुन्हा! आता तर मला असे वाटते की भल्या माणसाने शास्त्रज्ञ होऊ नये किंबहुना अंताला 'ज्ञ' आहे [उदा: सुज्ञ, तत्वज्ञ वगैरे] असं कोणताच शब्द आपण आपल्या अंगाला चिकटवू नये. पण दुर्दैवाने मी शास्त्रज्ञ होतो. लहानपणापासूनच मला यंत्राचे आकर्षण! आपल्या हातून एखादे असामान्य यंत्र निर्माण व्हावे आणि त्याचा आपल्या देशाला अतोनात उपयोग व्हावा, त्या यंत्राचा उपयोग करता करता लोकांनी मला भारताचा एडिसन म्हणावे एवढीच माझी माफक इच्छा होती.
त्या दृष्टीने मी खूपसे प्रयत्न करत होतो. घर म्हणजे अक्षरश: प्रयोगशाळा होती. दिवसरात्र खपून मी बारीकसारीक यंत्रे तयार करीत होतो आणि समाधान होत नाही म्हणून मोडत होतो. किरकोळ एकदोन यंत्रे केली, पण परिस्थिती बदलल्यामुळे ती यंत्रे कुचकामी ठरली.
उदाहरणार्थ, बटन दाबताच आपोआप ताक घुसळणारी एक रवी मी तयार केली होती. पण दुधाचीच टंचाई निर्माण झाली. त्यामुळे ताक तयार करण्याचा प्रश्नच मिटला. [आता 'ताकाला येऊन वाटी लपवणे' एवढी एक खोटी म्हणच तेवढी शिल्लक राहिली आहे.!]
आवाज शोषून घेणारे मी आणखी एक यंत्र तयार केले होते. हे यंत्र तयार करण्यामध्ये माझा हेतू शृंगारिक होता. मुंबईसारख्या शहरात एकेका खोलीत पडदा टाकून दोन दोन जोडपी झोपतात. तोंडातून आवाज निघेल म्हणून त्यांना कडकडून चुंबने सुद्धा घेता येत नाहीत. विचार केला, त्यांना बिछान्यावर हे छोटे यंत्र ठेवता आले, तर चुंबनाचा आवाज येणार नाही. पण हे यंत्र तयार होते न होते तोच विभक्त कुटुंबपद्धती रूढ होऊ लागली. त्यामुळे आवाज चोरण्याचा प्रश्नच मिटला. त्या यंत्राला मागणीच येईना. केलेले एक यंत्र तेवढे पडून होते. ते पाहून आणि त्याच गंमत ऐकून शेजारचे नरसोपंत ते यंत्र घेऊन गेले. वयाची तब्बल साठ वर्षे उलटून गेलेले हे नरसोपंत! त्यांना ही उठाठेव कशाला? शिवाय दात पडल्यामुळे तोंडचे बोळके झाले होते. तीच गत काकूंची! पण म्हंटले, नेम नाही! तोंडात दात नसल्यामुळे त्यांच्या चुंबनाचा आवाज [आवाजच] मोठा येत असेल आणि तो चोरण्यासाठी नरसोपंत हे यंत्र नेत असतील.
मी म्हटलेही, "नरसोपंत, ही उठाठेव कशाला?"
तर ते काही बोललेच नाहीत. यंत्र घेऊन गेले. आगपेटीएवढे ते यंत्र चोवीस तास ते कनवटीला लावून हिंडत. कशासाठी ते मला कळले नाही. पण मागवून जे कळले ते ऐकून मी अस्वस्थ झालो!
मुळात शृंगारिक हेतूने तयार केलेल्या या यंत्राचा उलट उपयोग करून हा म्हातारा या यंत्रामुळे हल्ली लोकांची अक्षरश: मुस्कटदाबी करतो आहे हे ऐकून बरे वाटले नाही. त्यामुळे एखादे दिवशी म्हातारा पकडला जाईल तेंव्हा त्याला कळेल. काही दिवसापूर्वी 'मुंबई बंद' करण्यासाठी शिवतीर्थावर एक प्रचंड जाहीर सभा होती. जॉर्ज फर्नांडीसचे भाषण होणार होते. मुंबई कशी आणि केंव्हा बंद करायची हे जॉर्ज साहेब सांगणार होते. जॉर्जसाहेब अगदी पंचम जॉर्जच्या थाटात आले. व्यासपीठावर चढले. लोकांनी प्रचंड घोषणा केल्या, जॉर्जसाहेबांनी मायक्रोफोन हातात धरून 'बेहेनो और भाइयो-' अशी सुरुवात केली. काँग्रेसच्या राजवटीत कसे अन्याय चालू आहेत, ते सांगितले. तेवढ्यात
कनवटीवर हात ठेवून व्यासपीठाच्या शेजारी बावळटासारखा चेहरा करून नरसोपंत येऊन उभे राहिले. बटन दाबले आणि काय गंमत? जॉर्जसाहेबांचे फक्त हातवारे! एक वार, दोन वार....फक्त हातवारे! तोंडातून शब्द येईना. लाउडस्पीकरवाल्यांची धावपळ! पण लाउडस्पीकर तरी काय करणार? नरसोपंतानी 'स्पीकरच' आउट केला होता. जॉर्जसाहेब पाच मिनिटे तोंडाची उघडझाप करीत हवेत मूठ उडवत राहिले. पण बोलून चालून दोन मुठी, हवेत उडवणार किती? दरम्यान प्रचंड जनसमुदाय एकदम अस्वस्थ झाला. जॉर्जसाहेबांनी खांदे पाडले. आणि तोंड मिटून स्वस्थ उभे राहिले. तेवढ्यात नरसोपंतानी कनवटीवर पुन: हात घेतला आणि यंत्र बंद केले. तोच काय? लोकांची प्रचंड बोंबाबोंब! सर्वांचे म्हणणे या भंपक पुढा-याने ऐन वेळी कच खाल्ली! क्षणार्धात दगड, जोडे यांचा वर्षाव सुरु!
त्यानंतर पुन: मुंबई बंद झाली नाही!
"मी हयात असेपर्यंत मुंबई बंद होऊ देणार नाही!" असे नरसोपंत मला अभिमानाने सांगू लागले!
मी संतापलो, आणि म्हटले, "नरसोपंत, यामुळे तुम्ही एकदा..."
नरसोपंतानी कनवटीवर हात ठेवून माझाच आवाज बंद केला!
दोन यंत्रे तयार केली त्याची ही गत.
त्यानंतर फ्रांक स्टोकटन या अमेरिकन लेखकाचा एक लेख माझ्या वाचनात आला. त्या लेखाचे नाव 'उलटे गुरुत्वाकर्षण!' आले काही लक्षात?
गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? झाडावरचे फळ तुटले की खाली पडते, गच्चीतून दगड टाकला, की तो खाली पडतो. हा गुरुत्वाकर्षणचा नियम! एखाद्या यंत्राने हा नियम उलटा करता आला तर वस्तू खाली पडण्याऐवजी वर जाईल! तो लेख वाचला मात्र!---आणि माझ्या डोक्यातली चक्रे उलटी फिरू लागली. त्याचवेळी भारत-चीन युद्ध सुरु झाले. उंच उंच हिमशिखरावर चढणे, तेथे रसद पुरवणे आपल्या सैन्याला कठीण जात होते. म्हणून मी अहोरात्र झटलो. काही दिवसातच आगपेटीच्या आकाराची दोन यंत्रे तयार केली.
एकदा एक रात्री एका निर्जन अशा जागी गेलो. दोन्ही यंत्रे दोन्ही बगलेत धरली. खांद्यावर चामड्याचे पट्टे आवळले. आणि कळ दाबली. आणि किती मौज! हळूहळू तरंगत तरंगत वर गेलो. कळ आणखी थोडी वर सरकवली की सोसाट्याच्या वेगाने वर! वा:! खूपच मौज आली. पहाटेपर्यंत थंड हवेत तरंगलो. चंद्रसुद्धा जवळ आल्यासारखा वाटला.
मनात आले, अशी लाखो यंत्रे करून आपल्या सैन्याला दिली तर सारी सामग्री घेऊन आपले सैनिक हव्या त्या शिखरावर चुटकीसरशी नेता येतील.
म्हणून घरी आलो आणि ताबडतोब आपल्या संरक्षण खात्याला पत्र लिहिले. त्या पत्राला सरकारी उत्तर आले. धिस इज तो एक्नालेज युवर लेटर डेटेड सो
सो, अड कंटेन्टस देअरइन हव बीन नोटेड! या पत्रामुळे मला राग आला. प्रचंड सामर्थ्य असलेल्या या यंत्राची संरक्षण खात्याने अशी वासलात लावावी याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून ते सामर्थ्य स्पष्ट करणारे मी आणखी एक पत्र लिहिले. तरी पुन: तेच! तेच पत्र पुन्हा आले! तेवढ्यात चीनशी सुरु असलेले युद्ध संपले.
त्या युद्धात भारतीय सैनिकांना जी नामुष्की पत्करावी लागली, तिचा विचार करता करता पुन्हा मन अस्वस्थ झाले. ही यंत्रे आता लाखोंच्या संखेने तयार केली तर भारताला आपला गेलेला मुलुख परत मिळवता येईल असे वाटले. म्हणून दोन यंत्रे बरोबर घेऊन मी दिल्लीला गेलो. पण कुठेही निभाव लागेना. 'अर्ज ठेवून द्या. विचार करतो आणि कळवतो,' असे एक ठोकळेबाज उत्तर येऊ लागले. खालचा अधिकारीसुद्धा दाद देईना तेंव्हा मात्र माझा तोल गेला.
"नाऊ यु बेटर गेटाऊट-"
असे त्या मल्होत्राने मला फर्मावले तेंव्हा मात्र मी एकदम उखडलो.
मल्होत्रा फायलीत डोके खुपसून टिपणे काढीत होता.
तेवढ्यात त्याच्या टेबलावरील फायलीच्या एका ढीग-याला मी माझे यंत्र अडकवले. आणि हळूच कळ पुढे सरकवली.
"साहेब, जरा मन वर करून बघा-"
त्यांनी मान वर केली त्याचे तोंडच उघडे पडले.
फायलीचा एक ढीग हवेत तरंगत होता.
मल्होत्राने चष्मा काढून पहिले. तेच! ढीग तरंगतच होता. तो एकदम घाबरला. आणि ओरडला, "हिप्नटिझम ! यू रास्कल..."
घामाघूम होऊन तो कसाबसा खुर्चीतून उठला. पण डोक्यावर तरंगणा-या फायलीच्या ढिगाला आपटून तो पुन्हा खाली बसला. एरव्ही डोक्यावर फायलीचा ढीग आपटला तरी पर्वा न करणारा अधिकारी आता गर्भगळीत झाला होता. अर्धवट संतापाने, अर्धवट हतबल होऊन तो माझ्याकडे क्षणभर पाहत राहिला.
तेवढ्यात मी आणखी एक युक्ती केली. खिशातून दुसरे यंत्र काढले. दोन्ही मुठीत घट्ट धरले आणि हळूच कळ सरकवली. माझे पाय जमिनीवरून सुटले.
अरे बापरे!
वर गरगर फिरणा-या पंख्यातच माझे डोके जाणार होते. पण सुदैवाने बचावलो!
मला असा हवेत लटकताना पाहून मल्होत्राला मात्र घाम फुटला. एका बाजूला मी तरंगत होतो. दुस-या बाजूला फायलींचा ढीग तरंगत होता.
दोन्हीकडे आळीपाळीने बघत मल्होत्राने तोंडावर फुटलेला घाम पुसला. आणि या दिव्यातून आपली सुटका व्हावी म्हणून त्याने टेबलावरची घंटा घणघणा वाजवली. तेवढ्यात दार उघडून पट्टेवाला आत आला. तो आत आला मात्र...त्याने मला आणि फायलींचा ढीग तरंगताना पाहिलं मात्र...चक्कर येऊन तो धाडकन जमिनीवर कोसळला. त्याची तांबडी पगडी दूर जाऊन पडली.
थोडा वेळ गेला. पाहतो तो काय? खुर्चीवर मान टाकून मल्होत्राही चक्कर येऊन पडले होते.
मग मात्र माझाच पराभव झाला. एवढे करूनसुद्धा दिल्ली दरबारात कोणी तळ्यावर येत नाही हे पाहून मीच खचलो. मुठीतल्या यंत्राची कळ दाबून म जमिनीवर पाय टेकले, फायलीचे यंत्र काढून घेतले आणि येथून चक्क पोबारा केला.
थोड्या वेळाने मल्होत्रा आणि त्याचा पगडीवाला शिपाई गाढ झोपेतून जागे झाले असावेत. कामाचे निमित्त असताना सचिवालयात अशी गाढ झोप लागणे त्यांना नवीन नाही. जग आल्यावर कदाचित दोघेही लाजले असतील. माल्होत्राना आधी जाग असली तर त्यांनी बिचा-या शिपायाला डाफरले असते. पण बहुदा शिपायालाच आधी जाग आली असावी. कारण तो आधी खाली पडला होता. नंतर दोघांनीही ही कथा इतराना सांगितली असेल. ऐकणारे विश्वास न ठेवता हसले असतील! ऑफिसात झोपायचे असले तर झोपावे. कोण नको म्हणतो? पण आपल्या झोपेच्या समर्थनासाठी असल्या बिनबुडाच्या गोष्टी सांगू नयेत असाही इतर अधिका-यांनी [झोपणा-या] मल्होत्राला सल्ला दिला असेल.
मी गाडी पकडून सरळ दिल्लीहून घरी आलो.
पण पुढच्या एका आठवड्यातच माझे पत्र घेऊन मल्होत्रा माझ्या घरी माझी चौकशी करीत आला. आला आणि काही वेळ हसतच राहिला.
"क्या हुआ मल्होत्राजी?"
असे मी विचारले,
"पुछो मत-
पुछो मत!"
मल्होत्रा हसतच होता.
त्यानंतर मल्होत्रा ठिकाणावर आला. गंभीर चेहरा करून त्याने त्यादिवशी दिल्लीत माझा जो अपमान केला त्याबद्दल माझी क्षमा मागितली. आणि हे यंत्र संरक्षणाच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे हे तो मलाच पटवून देऊ लागला. मलाही आनंद झाला. काही का होईना! अखेर भारत सरकार वळले हे पाहून मला संतोष झाला.
दहा कोटी रुपयांचा कारखाना घातला तर ही यंत्रे मोठ्या प्रमाणावर आणि कमी किंमतीत कशी तयार करता येतील ते मी मल्होत्राला पटवून दिले. त्याला पटलेही. प्रथम प्रयोगासाठी म्हणून तो वीस यंत्रे घेऊन गेला. या यंत्रासंबंधी गुप्ततेच्या दृष्टीने मी कोठेही अक्षरसुद्धा बोलायचे नाही अशी त्याने माझ्याकडून शपथ घेतली. आणि लवकरच कामाला लागू असे आश्वासन देऊन तो निघून गेला.
त्यानंतर सहा महिने लोटले.
पण मल्होत्रा किंवा भारत सरकार यांचेकडून काही कळले नाही. मीही काही बोललो नाही. कारण याबाबत काही न बोलण्याची मी शपथ घेतली होती.
पण सर्वात मोठे आश्चर्य असे की सहा महिन्यानंतर माझ्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. माझी प्रयोगशाळा जप्त केली आणि मला पकडून नेले. म्हणूनच मी आज तुरुंगात आहे.
तुम्ही म्हणाल, माझा गुन्हा कुठला?
मी कुठलाच गुन्हा केला नव्हता. परंतु, फसवाफसवीच्या, विनयभंगाच्या आणि मृत्यूच्या गुन्ह्यातला एक भागीदार म्हणून मला सजा झाली आहे.
तुम्ही म्हणाल, असे झाले तरी काय?
कोर्टात जे सांगितले गेले त्यावरून काय झाले ते मला कळले.
मल्होत्रा माझ्याकडून संरक्षण खात्यासाठी वीस यंत्रे घेऊन गेला आणि त्याने संरक्षण खात्याला काहीच कळवले नाही. उलट त्याने स्वतःची नोकरी सोडून या वीस यंत्राच्या जोरावर धंदा सुरू केला.
त्याने थोरल्या मुलाच्या ताब्यात दहा-बारा यंत्रे दिली आणि त्याला देशभर मालाची ने-आण करणारी कंपनी काढून दिली. या यंत्रामुळे असे काही होईल याची मला कल्पनाच नव्हती. या पोराने ट्रकने आणि आगगाडीने कितीतरी माल देशभर फिरवला. पण सरकारच्या पदरात दमडी पडू दिली नाही.
सगळीकडे रिकाम्या पेट्या असे सांगून त्याने माल नेला. दहा दहा पेट्याना एक यंत्रा बांधायचा आणि पेट्यांचे वजन करायचा. म्युनिसिपल टोलनाके असो वा रेल्वे स्टेशनवरील काटा असो, या पोराने पेट्या ठेवल्या की चारपाचशे किलो वजनाच्या पेट्या फक्त चारपाच किलोचे वजन दाखवायच्या. एवढेच नव्हे, तर या पोराचा आगाऊपणा पैशाचा लोभ इतका दांडगा की विचारायची सोय नाही. काही ठिकाणी तो यंत्राची कळ इतकी वर सरकवायचा की, पेट्या किंचित काट्यावरून वर जायच्या आणि काट्यावर शून्य किलो वजन दिसायचे! त्यामुळे रेल्वे खात्याने आणि म्युनिसिपल टोल खात्याने आपले मोठेमोठे काटेसुद्धा निष्कारण दुरुस्तीस पाठवले. या यंत्रामुळे नगरपालिका आणि रेल्वे यांचे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले असे कोर्टात सांगण्यात आले.
दोन यंत्रे मल्होत्राच्या धाकट्या पोराने लांबवली आणि तोही खूप टिवल्याबावल्या करू लागला. काखेत यंत्रे बांधायचा आणि जाऊ नये तिथे जायचा. एक-दोनदा तो चक्क काही इमारतीत दुसर-या तीस-या मजल्यावरच्या खिडक्यातून -खोल्यात शिरला. आता कल्पना करा. रात्री नवरा-बायको आपल्या खोलीत कशा त-हेने झोपली असतील कोण जाणे! अशावेळी खिडकीतून उडत उडत या पोराने आत जायचे म्हणजे काय?
अरे, पकडायचे म्हटले तरी कठीण! एक तर असा पोरगा रात्री अपरात्री खिडकीतून उडत आला हे पाहूनच जोडपी झीट येऊन पडली. तशात शुद्धीवर असलेल्या एखाद्या माणसाने आरडओरडा करून पकडायचे, तर तेही कठीण! हा पोरगा चटकन पक्षासारखा उडून जायचा. आणि ओरडणारा माणूस "पोरगा खिडकीतून उडून गेला" असे म्हणतो म्हणून त्यालाच हसायची आणि 'स्वप्न पडले असेल, झोप-झोप!' असे म्हणत त्याला अक्षरश: उचलून खाटेवर झोपवायची.
मल्होत्राने आणखी दोन यंत्रे आपल्या सास-याला दिली होती. हा सासरा म्हातारा होता. त्याला रक्तदाब होता, काळजाचाही विकार होता. तो सहाव्या मजल्यावर राहायचा पण इमारतीत लिफ्ट नव्हती. म्हणून रोज त्याला दोन हमाल खालून सहाव्या मजल्यावर न्यायचे. त्याखातर रोजच्यारोज दोन रुपयांचा खर्च यायचा. तो वाचवण्यासाठी हा म्हातारा रोज संध्याकाळी खाकेत यंत्रे बांधून हळूहळू वर उडायचा आणि हलकेच गच्चीत उतरायचा. गच्चीतून सहाव्या मजल्यावरच्या आपल्या जागेत यायचा!
खुद्द मल्होत्राने दीड हजार रुपये पगाराची आपली नोकरी सोडून अक्षरश: सन्यास घेतला. हृषीकेशला एक छोटासा मठ बांधून तो ध्यानस्थ होऊन बसू लागला. दाढी-मिशा वाढलेल्या. डोकीवर भगवा रुमाल अंगावर भगवी कफनी, शेजारी दंड आणि कमंडलू!
आसपास अनेक छोटे मोठे साधू अंगास राख फासून बसलेले असायचे. प्रत्येकाचा थोडाफार भक्तगण! पण मल्होत्रास्वामी नव्याने आलेला. त्याला एकही भक्त मिळाला नाही. पण हजारो भक्त मिळवण्याच्याच इर्षेने तो मठात आला होता. एकदा ध्यानस्थ बसून मल्होत्राने खाकेत खाजविल्यासारखे केले. आणि काय आश्चर्य! पद्मासन घालून बसलेला हा साधूपुरुष जमिनीपासून दोन फूट हवेत तरंगू लागला. मग काय विचारता? नुसते हजारो भक्तच नव्हेत, तर शेकडो साधूसुद्धा मल्होत्राचे भक्त बनले. सा-या भारतात सगळीकडे वार्ता गेली. हजारो भक्त देशाच्या कानाकोप-यातून येवू लागले. मल्होत्राच्या चरणी पाण्यासारखा पैसा ओतू लागले. सहा महिन्यात मल्होत्राने कोट्यावधी रुपये आपल्या घरी पाठवले.
हे प्रकार किती दिवस चालले असते देव जाणे! परंतू कधी न कधी पापाचे घडे भरतातच!
मल्होत्राच्या थोरल्या पोराने एकदा माल भरलेल्या पेट्या रेल्वेच्या कपाटावर ठेवल्या आणि पेट्यांचा लोखंडी पट्ट्या काट्याला कुठे अडकल्या देव जाणे! यंत्र चालू असल्यामुळे मालाच्या पेट्यासह रेल्वेचा काटाच हवेत तरंगू लागला. त्यामुळे त्या पोराचा कट उघडकीस आला. रेल्वे पोलिसांनी यंत्र जप्त केले. त्याच आठवड्यात मालपेट्यांनी भरलेला एक ट्रक ड्रायव्हरच्या आगाउपणामुळे टोल नाका येण्याआधीच हवेत उडत असलेला पोलिसांनी पाहिला. तोही जप्त झाला.
दुस-या आठवड्यात त्याच्या धाकट्या भावाने आगंतुकपणा केला. कॉलेजातील प्रोफेसरची जिरवण्यासाठी त्याने यंत्र वर्गातल्या पलटफॉर्मलाच अडकवले. त्यामुळे वर्गात शिकवताना शिकवता
पलटफॉर्म जमिनीपासून दोन फूट वर तरंगू लागला. पण पलटफॉर्म तरंगत नसून आपल्याला चक्कर आल्यामुळे पलटफॉर्म तरंगत असल्यासारखा दिसतो आहे असे प्रोफेसरला वाटले आणि तो चक्कर आली या भीतीनेच पलटफॉर्मवर आडवा झाला. त्यावेळी वर्गात पोरांनी जो गलका केला तो ऐकून प्रिन्सिपलसाहेब वर्गात आले आणि ते यंत्र त्यांच्या हाती लागले.
दरम्यान गेले आठ दिवस मल्होत्रांचा म्हातारा सकाळी बाहेर गेला, तो परत आलाच नव्हता. खूप शोधाशोध झाली. पण पत्ताच लागला नाही. आठ दिवसांनी काही वैमानिकांनी सोळा हजार फूट उंचीवर एक 'फ्लाइंग सॉसर' पाहिल्याचे संरक्षण खात्यास सांगितले. म्हणून शोधाशोध झाली. तर एक हाडाचा सांगाडा तरंगत असलेला दिसला.म्हाता-याने बहुदा कळ जोराने फिरवली होती! आणि आठ दिवस गिधाडांनी मेजवानी लुटली होती. [म्हाता-याचे वजन दीडशे किलो होते!] धार्मिक कृत्य चालू असताना म्हाता-याने पिंड नेला नाही आणि अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची वचन देऊनसुद्धा सास-याने पिंड नेला नाही. त्याचा आत्मा आता कावळ्याच्या रूपानेसुद्धा उडायला घाबरत असावा असे जमिनीवरील काही लोकांनी गंभीरपणे निदान केले!
इकडे हृषीकेशच्या मठातला सर्वश्रेष्ठ साधुपुरुष दिगंतात विलीन झाला अशी बातमी आली. ध्यानस्थ असताना तो वर वर उडत गेला. चाळीस पन्नास फूट वर जाताच तो हातपाय झाडत ओरडू लागला. तथापि तो परमेश्वरचरणी लवकर जाण्यासाठी धडपड करीत आहे असे जमिनीवरच्या भक्तांनी एकमेकांस सांगितले.
परिणामी, मल्होत्राची दोन पोरे आणि मी यांना अटक झाली. खुद्द मल्होत्रा आणि त्याचा सासरा इहलोकातून
सहीसलामत सुटले होते.आणि फसवाफसवीच्या गुन्ह्याखाली आम्ही शिक्षापात्र ठरलो होतो.
सध्या मी तुरुंगात आहे. माझ्या खोलीला जी खिडकी आहे, तिला जाडजूड गज बसवण्यात आले आहेत. मी अजूनही उडून जाईन अशी तुरुंगाच्या अधिका-यांना सारखी धास्ती वाटते. मी जमिनीवर झोपतो. तेंव्हासुद्धा तुरुंगाचे शिपाई माझ्या पाठीखालून हात घालून मी जमिनीवर आहे की जमिनीपासून वर आहे याची खात्री करून घेतात.



संकलन:प्रवीण कुलकर्णी

Sunday, 14 March 2010

शरीर : जयवंत दळवी


ठरवून सवरून तार छेडली जात नाही. हृदयाची तार तर मुळीच नाही. अगदी अपघातानं, बोलाफुलानं जे काही होईल तेच खरं! फुलवणारी बोटं मोठी नाजूक आणि सुकुमार असली तरी कळी फुलवून फुलवून फुलत नाही. मंद वाऱ्याच्या झुळकीवरच डुलता ती फुलली पाहिजे.
धुरकट वाळूवर एका शांत निर्जन कोपऱ्यात रागिणी बसली होती. काही महत्वाचं ठरवायला ती अधीर झाली होती. खुंट्या पिळण्याच्या प्रयत्नात होती. ताणलेल्या तारावर हळुवार तर्जनी ओढायला. भविष्यात निनादणाऱ्या गोड मंद सुरांची लय-उदबत्तीतून निघणा-या सुगंधी वलयासारखी तिच्या गात्रा गात्रावरून आत्ताच तरंगत होती. कोमल शरीराची प्रत्येक नस विलग होऊन धुंदीन थरथरत होती. गेले कित्येक दिवस या धुंदीत ती डुंबत होती. अगदी वेगळा अनुभव!
मन खोदून खोदून तिनं खोलवर पाहिलं. असे धुंद क्षण तिनं पूर्वी कधीच अनुभवले नव्हते. मधूच्या प्रेमपाशात होती तेंव्हा नाही, त्याच्या बाहुपाशात होती तेंव्हा नाही.त्याचे नाव घेऊन जुन्या मुलीसारखे उखाणे घेतले तेंव्हा नाही.
नाही....नाही....नाही!
कळी फुलण्याची क्रिया वेगळीच!
सहा महिने लोटले असतील! किंवा अधिकही! इथं काळाला अर्थ नाही. अर्थ फक्त गतीला. तीही उलटसुलट! काल भेट झाली तर ती वर्षापूर्वी झाल्यासारखी वाटावी, आणि सहा महिन्यापूर्वीचा एखादा क्षण क्षणापूर्वीच ओजळीतून निसटल्यासारखा वाटावा.
ती वाट तिची नव्हतीच! त्या वाटेनं ऑफिसला जायचं म्हणजे दोनतीन फर्लांगची अधिक पायपीट! पण एकदा ती त्या वाटेनं गेली. कोप-याकडे वळता वळता तिनं सहज वर पाहिलं. श्री वर उभा होता. आपल्या घराच्या बाल्कनीत. उघडाच, एका खांद्यावर शुभ्र धोतराचा सोगा. लालसर गोरं अंग. आतनं पेटल्यासारख.
ऐटीत सिगारेट ओढत होता. त्याला पाहता पाहता --त्याचं लक्षच नव्हतं-रागीनीची चप्पल ठेच लागून तुटली. ती ओढत ती हळूहळू चालत राहिली. मधेच तिनं पुन: वर पाहिलं. त्याचे केस कपाळावर झुळझुळत होते आणि सिगारेटचा धूर तरळत होता. अंतर खूप होतं. तरीही सुगंधी धुराच वलय आपल्या नाकावरून तरंगत जात आहे असं तिला वाटलं!
ती निघून गेली. जाता जाता कुठं तरी चरा पडलाय किंवा पडतो आहे, असं तिला वाटलं. म्हणून तिनं मुद्दामच मन क्षणभर ओढून धरलं. आपलं लग्न झालं आहे. मधुशी आपण प्रेमविवाह केला आहे. गेल्या पाच सहा वर्षात आपल्याला मूल झालं नसेल, नसेना. ते काही वैगुण्य नव्हे! अद्यापतरी तिला मुलाचं वेद नव्हतं. झालंच तर नको असं काही नाही, पण झालं नाही तर वेड लागेल असंही नाही! उलट आहे ते वाईट नाही. मधू फिरतीवर असतो. आपलं ऑफिस आहे. मैत्रिणी आहेत. मधू येतो तेंव्हा संसारिक व्हावं. घरी काकुसारख जेवण करावं. तो परगावी असेल तेंव्हा बाहेर कुठंतरी! एकटीनं किंवा मैत्रिणीसह! असेल! पण आपण शेवटी मधूची बायको आहे...दुसरा एखादा पुरुष कितीही उमदा दिसला तरी मनात भरवून बरं नव्हे...!
बरं नव्हे, बरं नव्हे म्हणत म्हणताच ती बुडून गेली. मधेच भान यावं, तोल सावरण्याचा यत्न करावा, तर पायाखालची जमीन घसरू लागली. तोल सुटू लागला. एक गाठ सोडावी तर दुसरीकडे गाठ बसून गुंता वाढू लागला.
पूर्वी तो त्या बसनं कधीच जात नसे. पण त्यानं तो नवा क्रम सुरु केला. कपडे करून तो बाल्कनीत उभा रहायचा. ती दिसली की झटपट खाली उतरायचा. मागनं मागनं चपळाईन चालायचा. बसच्या रांगेत येऊन तिच्या मागं उभा रहायचा.
कुठला सुवासिक परफ्युम वापरायचा कोण जाणे! पण जवळ उभा राहिला की तिला सुवासात, मादक, गंधात मग्न होऊन तरंगल्यासारखं वाटायचं.तिनं एकदा धीर करून विचारलं. तर प्रिन्स चार्मिंगची मखमली डबीच त्यानं तिला भेट दिली. तो तसा मागं उभा राहिला की शीतल छाया टाकणारा वृक्ष मागं असल्यासारखं तिला वाटायचं.त्यावर डोकं टेकावं, त्यावर वेलीसारख डूलाव असं तिला वाटायचं. बसमध्ये चढताना तो तिचा पुष्ट दंड धरायचा आणि तिला वर चढवायचा. पुरुषी स्पर्श तिला अनोखा नव्हता. तरी ती मोहरून जायची. बसल्या बसल्या दंडाकडे पहायची. त्यावर चार लाल बोटं उमटलेली असायची. पुढं ती आत शिरायची. तरीही स्वप्नाळू वयात येऊन ती एकांतात आपल्या दंडावर आपले ओठ ठेवायची.
कधी कधी ऑफिस लवकर सोडून ती सिनेमाला जायची. शेजारी श्री! तिच्या चेह-यावर विलक्षण बावरे भाव तरळत असायचे. नवरा शेजारी असला म्हणजे सहजी न तरळणारे. त्यामिले भोवतीचे लोक बघायचे. बघण्यासाठी वळायचे. स्वच्छ सुगंधित अंगाला ओंगळ, गिळगिळीत डोळे चिकटल्यासारखे वाटायचे. सुरुवातीला तर खूपच!
मग तो तिच्या घरीही यायचा. ती त्याच्या आवडीचं जेवण बनवायची. गप्पा रंगायच्या. जेवताना आणि एरव्हीही गप्पा रंगवण्याची त्याची हातोटी असामान्य होती. आवाज पुरुषी पण तालबद्ध होता. सिगारेटीच्या धगीनं तापलेला. कुठल्याही विषयाचं त्याला वावडं नव्हतं. संगीत, कला, साहित्य, चित्रपट, नाटक! तन्मय होऊन बोलायचा. मधून मधून राजकारण. विनोद सभ्य आणि असभ्यही! त्याला मोठी कसली महत्वाकांक्षा नव्हती. पैशाचा विशेष लोभ नव्हता. समाधानी वाटायचा. समंजसही! तत्वज्ञान्यासारखा. तरीही मधेच वय विसरायचा. एखादा विनोद करताना टाळीसाठी हात पुढे करायचा. ती द्यायची. सलगीत आला तर खांद्यावर हात ठेवायचा.
तिचा चेहरा त्या सलगीनं मधुरा व्हायचा. तो त्याला आवडायचा. तो बघत राहायचा. तिच्या डोळ्यांकडे बघत बघता तिच्या डोळ्यांवरचे मधाचे ठिपके पसरट होत!
तिने एकदा त्याच्या मानेभोवती हाताचा विळखा टाकला आणि तोंड वर केलं. त्यानं ते मधाचे थेंब पाहिले. मंदसा हसला.
"पूर्वी एकदा सांगितलंय मी तुला!"
"काय?"
"माझं लग्न झालंय म्हणून!"
"मग?" माझंही झालंय!"
तो हसला. पण हसता हसता त्यानं नापसंतीन मान हलवली.
तिनं हात खाली घेतले.
पण सहवास चालू राहिला.
आता मात्र ती निकरावर आली होती. श्रीला तिनं वेळ ठरवून मुद्दाम बोलावलं होतं. शांत, मोकळ्या, उल्हासित मनानं. तशाच वातावरणात. श्रीची वाट बघत ती बसली होती.
पाठीमागं उंच उंच नारळाची झाडं वा-यानं तल्लीन होऊन डुलत होती. समोर सूर्य अस्ताला चालला होता. वातावरणात एक प्रकारची विलक्षण थरथर होती. पुन्हा पुन्हा येणा-या समुद्राच्या लाटा खडकावर आदळून फुटत होत्या. फेस हर्षभरित झाल्यासारखा उसळत होता. साखळदंड आपटून फोडावेत तसा आवाज उठत होता.
अधीर होऊन ती वाट बघत होती. वाळूवर हात फिरवून त्यावर काडीनं श्रीकार काढत होती. एकदा-दोनदा-पुन: पुन:!
ऐटबाज चालीनं येताना श्री दृष्टीस पडला तेंव्हा तिचं हृद्य फुलून अंग थरथरल. पाठीच्या मणक्यातून थंडगार नागीण सळसळत गेली. तिनं हात वर करून इवलासा हातरुमाल हवेत हलवला. प्रिन्स चार्मिंगचा गंध हवेत तरंगला. पाहता पाहता श्रीच्या खांद्याला डोकं टेकत, त्याचा दंड धरून आपणच त्याच्याबरोबर चालत आहोत असा तिला भास झाला. क्षणात तिला हरवल्यासारखं वाटलं. आपलं वेगळं अस्तित्व एकदम विरघळून गेल्यासारखं वाटलं.
"बैस ना-"
तिच्या खांद्यावर हाताचा भार ठेवीत तो शेजारी बसला. पुढ्यातल्या वाळूत श्री-श्री-
श्री-श्री अशी अक्षरं दिसली!
"हे काय चाललंय?"
असं विचारताना त्याला खूप बरं वाटलं. रागिणीसारखी स्त्री आपल्यावर मन टाकून आहे हे पाहून कुणाला हर्ष होणार नाही?
तिनं लटकी मान तिरकी केली.
"काय चाललंय हे?" त्यानं पुन्हा विचारलं.
"श्रीची स्थापना करतेय-"
"वा! जागा छान आहे!"
"का?"
"लाटाही जवळच आहेत. भरती आली की आपोआप विसर्जन होईल श्रींचं!"
तिला ते आवडलं नाही. काही बोलली नाही!
तोही बोलला नाही. क्षणभर त्याने आकाशाकडे पाहिलं. किलबिलाट करीत पक्षांचा थवा परतला होता.
"ढगांचे रंग किती सुरेख दिसताहेत नाही?" असं तो म्हणाला.
तिनं वर पाहिलं पण काही बोलली नाही.
थोडासा वेळ तसाच गेला. शांत वातावरण अगदी फुटेपर्यंत फुगत आहे असं वाटलं. खळखळणा-या सागराकडे दोघांचंही लक्ष नव्हतं.
"आज काही बोलायचं नाही असं व्रत नाही ना घेतलंस-"
तरीही ती बोलली नाही. वाळूतले चार शंख तिने गोळा केले. आणि एकेक वर उडवीत झेलीत राहिली.
"आज थोडं स्पष्ट बोलायचं आहे असं म्हणाली होतीस ना?"
"होय!" असं म्हणून तिनं त्याच्याकडे टक लावली.
"काय बोलायचं आहे?"
त्यानं वाळूत टोकदार ढीग करायला सुरुवात केली.
"आपण हे असं कुठवर राहायचं?"
"म्हणजे?"
त्यानं एकदम वाळूतले हात झाडले आणि विचारलं. त्याला खरोखरच काही कळलं नाही.
"असं वेड पांघरू नकोस श्री-"
"दोघांपैकी एकालाही मैत्री नको वाटली तर आपलं भेटणं बंद होईल."
"इतकं साधं आहे हे?"
"का नाही?"
"मधुच आणि माझं दिवसेंदिवस पटण कठीण होतंय-"
"का?"
"तो सारखा फिरतीवर असतो. त्याला कुणी कुणी भेटत असतील-"
"कशावरून?"
"पुरुषांचं काय सांगता येते?"
"पुरुष काय पुरुषाला भेटतो? तो स्त्रीला भेटत असेल तर त्या स्त्रीनं का भेटावं? मी तुला भेटतो म्हणजे तुही मला भेटतेसच ना?"
"हे पहा- श्री, उगाच लांब लांब चर्चा नको...."
"तुझा काय विचार आहे?"
"तुझी संमती असेल, तू हो म्हणत असशील तर-" ती पुन्हा शंख झेलू लागली.
"तर काय?"
"तर मी मधूला मोकळा करीन. त्याला काय हवं ते तो करील. मला हवं ते मी करीन! आपण दोघं सुखी होऊ-"
झेलता झेलता शंख खाली पडू लागले.
"रागिणी माझं लग्न झालेलं आहे. मला दोन मुलं आहेत. माझं वय बेचाळीस वर्षांचं आहे. मला वाटतं, मी हे सारं तुला पूर्वीच सांगितलं आहे-"
"मग काय झालं? पोटगी देऊन लतेला-"
श्री विचित्रच हसला. आणि ओल लागेपर्यंत वाळू खोदत राहिला.
"लतेवर माझं प्रेम आहे, रागिणी"
असं म्हणत त्यानं टायची गाठ सैल केली. आणि कॉलर सोडून गळा दाखवला, गळ्यावर एक जुनी बुजलेली जखम होती. जखमेचा वण दाखवत तो म्हणाला,
"हे काय आहे माहित आहे?"
ती जिज्ञासेने बघत राहिली.
"लतेशी लग्न करायला विरोध झालं तेंव्हा मी माझा गळा कापत होतो. मला रक्ताच्या थारोळ्यात बघून सर्वांनी विरोध मागे घेतला. मग बरा झालो आणि लग्न केलं. जिच्याशिवाय मी एकवेळ जगू शकत नव्हतो, तिला आता सोडू?"
"तसं माझंही मधुवर लग्नापूर्वी प्रेम होतं-"
"तेच म्हणतोय मी! यदाकदाचित आपण पुन: लग्न केलं आणि काही काळ लोटला म्हणजे पुन: तू किंवा मी एकमेकांना कंटाळू आणि पुन: एकदा सोडचिट्ठीची भाषा बोलू."
"नाही रे श्री! असं होणार नाही. आपलं खरं प्रेम आहे ना एकमेकांवर?"
बोलता बोलता बिलगण्यासाठी ती जवळ आली.
"खरं प्रेम? एक खरं सांगू तुला, रागिणी?"
ती मान वळवून त्याच्याकडे बघत राहिली.
"लैगिक आकर्षणाचे हे खेळ आहेत. हे आकर्षण जन्मभर टिकत नाही, पुरत नाही. उघड मिळालेल्या वस्तूच आकर्षण राहत नाही. जे मिळत नाही, मिळणार नाही, हाती लागणार नाही त्याचंच अधिक आकर्षण वाटतं!"
"मग आपण काय करायचं?"
"अंतर ठेवून मैत्री ठेवायची?"
"नुसतीच मैत्री? का?"
"एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं म्हणून. आपण एकमेकांना मिळालो, बिलगलो तर, काही दिवसात नवलाई संपेल. आकर्षण कमी होईल. मग कदाचित माझ्यापेक्षा तुला पुन: मधु बरा वाटेल, आणि तुझ्यापेक्षा मला लता अधिक बरी वाटेल."
"तू काय बोलतो आहेस ते तुला तरी कळतंय का नाही, कोण जाणे? असल्या आकर्षणाचा उपयोग काय?"
"मन उत्तेजित रहात. हुरूप टिकून राहतो."
"उपयोग काय?"
"इथं नफातोट्याची भाषा काय कामाची, रागिणी? तुझं मन माझ्यामुळे उत्तेजित झालं तर त्याचा तुला तुझ्या संसारात उपयोग होईल. मला माझ्या संसारात! मन टवटवीत हवीत?"
"तुला मला बाजूला करायचंय ! समजतंय मला!"
ती एकदम फणकारल्यासारखी बोलली. हातातले शंख तिनं तिरस्कारानं बाजूला फेकले. श्रीशी ओळखदेख नसल्यासारखी ती बाजूला तोंड फिरवून बसली. तिचा श्वास वाढत होता. नाक लालबुंद होत होतं. आता कुठल्याही क्षणाला ती रडली असती.
"रागिणी, तू वाईट वाटून घेऊ नकोस. मैत्रीचं रूपांतर शेवटी लग्नातच व्हायला पाहिजे असं मानलं तर शेवटपर्यंत दु:खच पदरात येत जाईल. आपलं मन कधीच स्थिर होणार नाही."
ती काही बोललीच नाही. पर्स उघडून तिनं रुमाल काढला आणि वर बघत तिनं घाम पुसण्याच निमित्त करून डोळे पुसले.
सगळं वातावरण धूसर धूसर झालं होतं. काही क्षणांनी अंधार गर्द होणार होता. श्रीला अजून बोलायचं होतं. तडकाफडकी लग्न मोडून मुलाबाळांवर कशी आपत्ती ओढवते, मुलांचा दोष नसतानाही त्याची कशी परवड होते ते सारं सांगायचं होतं. या वयात वाटणारं आकर्षण टिकावू नसतं हे समजून द्यायचं होतं. आज त्याला बघून तिला आकर्षण वाटलं. तिला बघून त्याला आकर्षण वाटलं.
उद्या त्याच्यापेक्षा अधिक सुंदर, अधिक आकर्षक असा पुरुष तिच्या दृष्टीस पडेल. तिच्यापेक्षा अधिक आकर्षक स्त्री त्याच्या नजरेत येईल. आकर्षणाच्या कक्षा बदलतील. प्रेमाची आणि लग्नाची नवीन भाषा सुरू होईल. सुखाच्या मागं लागण्याच्या इर्षेत दु:खच पदरी पडेल. याला अंत नाही. हे कधीच संपणार नाही....
त्याला हे सारं समजून द्यायचं होतं. पण ती काहीएक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. संतापानं तिची नस नि नस थरथरत होती.
अंधार गडद झाला.
रुमालानं तिनं गाल पुसले. नाक पुसलं. तिच्या गालावरून पाणी ओघळत होतं. पण अंधारात त्याला काही दिसत नव्हतं.
तेवढ्यात पर्स उचलून ती उभी राहिली. आणि त्याच्याशी कधी भेटगाठ झालीच नव्हती अशा त-हेवाईक रीतीनं ती वाळूतून चालत राहिली. तोही उठला. तिच्या बरोबरीनं चालू लागला.
"रागिणी...."
तिनं न ऐकल्यासारखं केलं.
"रागिणी, तुझ्या सुखासाठी सांगतो....समजून घे-"
पण तिला परवा नव्हती. त्याला टाळण्यासाठी तिनं पावलांची गती वाढवली. त्यानं मुद्दाम आपल्या पावलांची गती कमी केली.
अंतर पडत गेलं. वाढत गेलं.
ती वेगानं चालत राहिली.
तो पाहत राहिला. पाहता पाहता एक सफेत ठिपका काळोखात विरघळून गेला.
दुसरे दिवशी तो नेहमीसारखा बाल्कनीत उभा राहिला.
त्याला मात्र तिचं आकर्षण वाटतच होतं.
पण ती मात्र त्या वाटेनं पुन: कधीच गेली नाही.


संकलन:प्रवीण कुलकर्णी


Saturday, 13 March 2010

दूत: जी.ए.कुलकर्णी


चौकातील एका बाजूला विशाल प्रासाद होता व त्याला सात गोपुरे होती. प्रवेशद्वारी दोन्ही बाजूस, सुवर्णालंकार असलेले, विस्तृत गंड स्थलावर स्वस्तिक चिन्हे असलेले भव्य हत्ती सुखासिणपणे डोलत होते व त्या त्या हालचालीने त्यांच्या गजघंटिका लयबद्ध मंद स्वर निर्माण करीत होत्या. त्यामुळे आता निर्माण झालेल्या शांततेवर त्यांच्या सुरांची सौम्य कलाकुसर होत असल्याचा भास होत होता प्रसादासामोरच दुसऱ्या बाजूला आर्यस्थविरांचा मठ होता व त्याचे प्रवेशद्वार आठ पुरुष उंचीचे होते. त्यातून आतल्या बाजूला पायऱ्यांचा एक प्रवाह वर गेल्याप्रमाणे अनेक शुभ्र संगमरवरी पायऱ्या होत्या व तेथील कोरीव स्तंभाशेजारी केशरवस्त्रधारी दोन भिक्षु शीलाकृतीप्रमाणे स्तब्ध उभे होते. त्यांच्या मागे मठाच्या वर्तुळाकार सज्जात निरव शांतता होती व त्यावर एखादा भिक्षु फुलाच्या शुष्क पाकळीप्रमाणे संथपणे सरकताना दिसे.
नेहमीची प्रौढ, समययोग्य वृत्ती सोडून दूत त्वरेने रथातून उतरला व त्याच्या सेवकाने तुतारीचा नाद केला .या ध्वनीमुळे निद्रेतून अकस्मात जागा झाल्याप्रमाणे प्रासाद कोलाहलाने भरून गेला व त्यात गजघंटीकेचा मधुर नाद लाटेने उचललेल्या शिपल्याप्रमाणे नाहीसा झाला.प्रासादातील प्रांगणात रक्तवर्ण वस्त्रातील प्रतीहारींचा समुदाय दोन्ही बाजूना नम्रपणे उभा राहिला. सुवर्णवस्त्रात झगझगीत वाटणारी राजपुत्राची आकृती शांतपणे पायऱ्या उतरू लागली व प्रसादाच्या प्रवेशद्वारी येऊन थांबली. मठातील आवारातदेखील इतस्तत: फिरणाऱ्या शुष्क पाकळ्या एकत्र येऊन त्यांची माला झाल्याप्रमाणे अनेक भिक्षु एकत्र आले. आर्यस्थविरांच्या रेशमी, शिथिल वस्त्रातील आकृती खाली येऊ लागताच त्यांचे अनुयायीही त्याच आदरशील गतीने त्यांच्या मागोमाग येऊ लागले. वस्त्राच्या पुढील भागावर प्रज्वलित स्थडीलाचे चिन्ह असलेल्या एका भिक्षूच्या हातात कमल शिखर अधिकारदंड होता व दुसऱ्या भिक्षूने त्यांच्यावर रेशमी केशरी वस्त्राचे सुवर्णछत्र धरले होते.
या साऱ्या जनसमुदायाची दृष्टी आपल्यावर खिळली आहे, या कल्पनेनं दूतास अत्यंत समाधान वाटले व त्याची वृद्ध मुद्रा संतोषाने उजळली. तो किंचित गर्वाने पुढे झाला व त्याने राजपुत्र व आर्यस्थविर यांच्याकडे पहात औपचारिक, अनुभवी अभ्वादन केले. तो म्हणाला, "राजन, धर्मभूषण, सम्राटांचा विशेष दूत म्हणून मी आज येथे आलो आहे व सम्राटांची आज्ञा या जनसमुदायापुढे प्रकट करण्याचे भाग्य मला आज लाभत आहे. सम्राट मृगयेसाठी गेले असता कमल सरोवराकाठी शैलेश्वराच्या मंदिराजवळ त्यांना एक विलक्षण साक्षात्कार झाला व त्यांनी अत्यंत त्वरेने या सेवकास येथे पाठवले. मृगया अपूर्ण ठेवून स्वतः सम्राट प्रार्थना व चिंतन यासाठी अज्ञातस्थळी गेले आहेत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे घटना तात्काळ घडावी म्हणून त्यांनी पत्रिका, राजमुद्रा इत्यादी उपचारात एक क्षणही वेचला नाही, व मीही दोन दिवस अन्ननिद्रेचा विचार न करता या ठिकाणी प्राप्त झालो आहे. या आज्ञेचे स्वरूप सार्वजनिक आहे व ती सफल करण्यास कोणत्याही स्वामिनिष्ठ नागरिकास अधिकार आहे. कारण प्रत्येकाचे जीवन त्यावर अवलंबून आहे. सम्राटांची आज्ञा अशी आहे__"
त्या जनसमुदायात विलक्षण शांतता पसरली. राजपुत्राचे एक पाऊल नकळत पुढे पडले. आर्यस्थविरांनी एकमेकात गुंतवलेली बोटे उलगडली, व पुन्हा गुंतवली. हत्तींच्या गजघंटिकाचा नाद पुन्हा स्पष्ट होऊ लागताच, दोन प्रतिहारिनी त्यांच्यावर हात ठेवला व त्यांना मूक केले.
"त्यांची आज्ञा अशी आहे-" दूताने पुन्हा शब्द उच्चारले; परंतु त्याचा कंठ एकदम रुद्ध झालं व त्याचे शब्द स्पष्ट होईनात. त्याच्या डोळ्यासमोर एक पटल पसरल्याप्रमाणे झाले व अंग आतून बधीर होत आल्याप्रमाणे शुन्यपणे समोर पाहत तो स्तंभाप्रमाणे उभा राहिला. काही क्षण तसेच व्यर्थ जाताच जनांत अस्वस्थता पसरली व राजपुत्राच्या कपाळावर अधिरतेची सूक्ष्म अढी दिसू लागली. रेशमी वस्त्राआड लपलेली आर्यस्थविरांची बोटे उद्वेगाने तेथल्या तेथेच वरखाली होऊ लागली. दूताचे ओठ सारखे निष्फळपणे थरथरू लागले होते व त्याचा वृद्ध चेहरा असहाय, आर्त दिसू लागला होता. राजपुत्रसन्निध असलेल्या अमात्यांनी त्यास हलक्या स्वरात सूचना दिली. राजपुत्र दुताशेजारी आला व स्मित करत त्याने म्हटले, "दूता, तुमच्यावर अद्याप प्रवासाचा शीण आहे; आपल्या कार्याच्या महत्वाचा ताण आहे. परंतु तुम्ही आणलेल्या सम्राटांच्या आज्ञेची मला कल्पना आहे. आपल्या उत्तराधिकाराची योग्य व्यवस्था करावी अशी सम्राटांची फार दिवसांची इच्छा होती. मीच ते अधिकारपद स्वीकारावे अशी ती सम्राटांची आज्ञा असावी-"
तोपर्यंत आर्यस्थवीरही आपला दंडधारी सेवक व दोन अनुयायी यांच्यासह तेथे आले. आर्यस्थाविरांचा चेहरा पातळगूढ दिसत होता व ओठ आवळून धरल्याने त्यांची रेषा रेखीव धारदार वाटत होती.
"राजन, दूताने आणलेली आज्ञा तशी असणे अशक्य नाही." ते म्हणाले.
"सम्राटांवर धर्मपालानाचीदेखील महान पवित्र अशी जबाबदारी आहे. एका सप्ताहापूर्वीच मला त्यांच्या भेटीचा आनंद प्राप्त झाला होता, त्या वेळी याच विचाराने त्यांची मन:शांती ढळली होती. जर तसाच प्रसंग निर्माण झाला, तर धर्मशासनाची धुरा स्वीकारण्याचे मी त्यांना वाचन दिले, तेंव्हा त्यांच्या मुद्रेवर आनंदच नव्हे, तर कृतज्ञताही दिसली होती. कदाचित त्या संभाषणाची स्मृती होऊन मृगया अपूर्ण ठेऊन त्यांनी दुताकडून हीच आज्ञा पाठवली असेल."
राजपुत्राने त्यास उपरोधाने नम्र अभिवादन केले व म्हटले, "धर्मशासनाचे कार्य अतिपवित्र यात संदेह नाही, पण त्याबाबतचा निर्णय उत्तराधिकाराची निश्चितता झाल्यावरच अर्थपूर्ण होईल. राज्यशासक नसता धर्मव्यवस्था कदापि शक्य आहे का?"
आर्यस्थविरांच्या मुद्रेवर संतापाची किंचित छटा दिसली व त्यांचे ओठ जास्त रेखीव झाले. पण लगेच त्यांचा स्वर धूर्तपणे सौम्य झाला व ते म्हणाले, "आपले शब्द अयोग्य आहेत असे कोण म्हणेल? परंतु सम्राट अद्याप अधिकारपदावर आहेत. तेंव्हा त्याबाबतचा निर्णय त्यांच्या सूज्ञतेवर सोपवणे अनुरूप होणार नाही का?"
दूताच्या मनातील बधिरता झाली नाही, पण त्याचे ओठ हलले व शब्द उमटले, "या दासाला क्षमा असावी. माझी स्मृती आकस्मात निर्जीव, जड झाली आहे; सम्राटांची काय आज्ञा आहे, याचे मला पूर्ण विस्मरण झाले आहे; परंतु ती आज्ञा उत्तराधिकाराविषयी नव्हती, याचा मला पूर्ण विश्वास आहे. तशा स्वरूपाची आज्ञा नगरीतून राज्यमुद्रांकित आली असती व त्या वेळी दूताचा ध्वज श्वेतवस्त्रावर खड्गचिन्ह असा झाला असता."
त्याच्या शब्दांनी राजपुत्राचा चेहरा निस्तेज झाला, व आर्यस्थविरांचे ओठ किंचितसे विलगले. पण दूत पुढे म्हणाला, "आणि मला ती आज्ञा धर्मशासनाविषयीदेखील. त्या आज्ञा नेणारे दूत स्वतंत्र आहेत व त्यांच्या ध्वजवर कमंडलूचे चिन्ह असते. हे दोन्ही दूत सन्निध असता सम्राटांनी माझी निवड केली होती.'
"दूता, कदाचित शीघ्र प्रवासाचा शीण नाहीसा झाल्यावर तुमच्या स्मृतीला उजाळा येईल; व आम्हाला सम्राटांची आज्ञा श्रवन करता येईल; तेंव्हा तोपर्यंत प्रासादात तुम्ही आमचे स्वागत स्वीकारल्यास आम्हाला कृतज्ञ वाटेल." आमात्यांनी राजपुत्राकडे पाहत सुचवले. राजपुत्रास अमात्यांच्या चातुर्याचे कौतुक वाटले व त्याने हर्षाने दोन प्रतिहारीस खूण केली.
"हा अमात्यांचा विचार स्तुत्य आहे." आर्यस्थविरानी म्हटले. "या कार्यात आमचीही सहकार्याची नम्र इच्छा आहे." ते एका रुंद, निर्विकार चेहऱ्याच्या भिक्षुकडे वळले व म्हणाले, "भद्रानंद, तू दुतासह राजनच्या प्रासादात जा व त्यांच्या सन्निध रात्रंदिवस राहून राजनना आपली नम्र सेवा अर्पण कर."
मूळ वस्तूपासून छाया सुटल्याप्रमाणे भद्रानंद आर्यस्थविरांपासून निघाला व संथ पावले टाकत दूताजवळ उभा राहिला. पराभूत झाल्यामुळे राजपुत्राचा चेहरा संतप्त झाला. व त्याच्या तोंडून शब्द निघणार, तोच अमात्यांनी त्यास हलकाच स्पर्श केला व त्याने संयम पाळला. एका जागी खिळल्याप्रमाणे झालेल्या दूतास प्रतीहारीनी हलवले व त्याचे हात धरून ते भद्रनंदासह प्रासादात आले.
प्रासादात दूतास एका मृदू आसनावर बसवण्यात आले. भद्रानंदाने एका बाजूस आपले वस्त्र पसरले व तो तेथील अनेक शिल्पकृतीपैकीच एक असल्याप्रमाणे निश्चल बसून राहिला. दूताच्या स्नानासाठी सुगंधी उष्णजलाची सज्जता झाली. एका युवतीने त्याच्यासाठी मृदू, विलासी शय्या मांडली व ती नम्रपणे सेवेसाठी उभी राहिली. दूतासमोर वेदिकेवर विविध पक्वान्नांची पात्रे मांडण्यात आली, व त्याच्या सुखात काही न्यून रौ नये, अशी राजपुत्राने सर्वास आज्ञा दिली.
परंतु अदृश्य आघात झाल्याप्रमाणे दूत विकलपणे बसून राहिला. संध्याकाळ झाली, अंधार जमला, रत्नजडीत दीप प्रकाशित होऊन सकाळच्या प्रकाशात निस्तेज होऊन विझून गेले, परंतु दूताला निद्रेने स्पर्श केला नाही. राजपुत्र आपल्या शयनागारात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रतिहारी दूताजवळ येऊन जात असे. परंतु प्रत्येकवेळी त्याच्याकडून तेच उत्तर ऐकून राजपुत्राला अतिक्रोध आला, आणि सूर्याचे किरण आत उतरून संगमरवरी चित्रमालेवर पसरताच तो अमात्यांसह दूतासमोर येऊन उभा राहिला.
"कांही क्षणात जर तुला सम्राटांच्या आज्ञेची स्मृती झाली नाही, तर मी स्वहस्ते तुझा शिरच्छेद करीन!" तो संतप्तपणे म्हणाला. त्याच्या शब्दांनी भद्रानंदाच्या निर्विकार चेहऱ्यावर सजीवतेची खूण दिसली.
अमात्य त्याला उद्देशून म्हणाले, "राजवंशीयांनी सार्वजनिक स्थळी क्रोध प्रकट करू नये, असा राजनीतीचा दंडक आहे. आपण शांत व्हावे."
"परंतु अमात्य, हे सार्वजनिक स्थळ नाही; हा माझा प्रासाद आहे, हे माझे निवासस्थान आहे!"
"ते सत्य असेल, पण या क्षणी नाही!" भद्रानंदाकडे सूचक दृष्टीने पहात अमात्य म्हणाले," एका परक्याच्या स्पर्शाने शय्यागृहाचे वेश्यागार होते आणि मूर्तीची मृत्तिका होते, हे वचन तुम्हास अज्ञात नाही. आता दूताच्या बाबतीत मात्र आपण अन्य मार्ग शोधला पाहिजे. अनुनयाने असाध्य झालेले कार्य अनेकदा आक्रमणाने सहजसाध्य ठरते."
अमात्यांनी प्रतीहारीस आज्ञा दिली. काही वेळाने एका प्रतीहारीबरोबर चेहऱ्यासह सर्वांग काळ्या वस्त्राने झाकलेला एक उंच, बलवान मनुष्य आत आला. त्याच्या हातात तीन विविध तेजस्वी शस्त्रे होती. त्याच्या आगमनाने सर्वत्रच छाया पडल्याप्रमाणे झाले, व भद्रानंदही तत्काळ उभा राहिला. "राजदूत, आपण आणलेली सम्राटांची आज्ञा नि:संशय राजपुत्राविषयीच आहे. मात्र ती तुम्हाला या क्षणी आठवत नाही इतकेच." अत्यंत सौम्य पण कुटील स्वरात अमात्य म्हणाले, "ती स्मृती जागी व्हावी याच हेतूने मी आपणास सहाय्य करत आहे. हा या नगरातला डोंब आहे व तो आपल्या व्यवसायात अत्यंत निष्णात आहे. मनुष्याच्या अंगावरील त्वचा सोलण्याचे त्याचे कौशल्य तर अद्वितीय आहे. त्याला तुमच्यावर किंचित कौशल्य दाखवण्याची आज्ञा आम्ही दिली आहे."
सर्वत्र भीतीची एक लाट स्पर्शून गेली. परंतु दूत मात्र या साऱ्याशी आपला काहीच संबंध नसल्याप्रमाणे बधीर बसून होता. अमात्यांनी क्षणभर त्याच्याकडून उत्तराची वाट पहिली व मग डोंबाला सूचना केली. डोंब शांतपणे दूतापाशी आला व त्याने एका प्रहाराने दूताच्या पाठीवरील वस्त्र छेदून बाजूला केले. नंतर एक तिक्ष्ण शस्त्र घेऊन त्याने रक्तरेषा ओढली व निमिषात दूताच्या पाठीवरून तळहाताएवढे कातडे सोलून काढले. पहिल्या आत्यंतिक वेदनेच्या क्षणाने दूत पिळवटल्यासारखा झाला. नंतर ती वेदना केवळ असह्य झाली व तो निश्चेष्ट झाला.
काही काळ तसाच गेला. राजपुत्राच्या मुद्रेवर आत्यंतिक नैराश्यामुळे येणारा द्वेष दिसू लागला., तोच पुन्हा वेदनेचा दंश झाल्याप्रमाणे दूत उठून बसला व आर्ततेने म्हणाला, "या संथ यातनेपेक्षा माझा पूर्ण वध करा. मी अति कृतज्ञ राहीन. मला सम्राटांची आज्ञा आठवत नाही, पण ती राजपूत्राविषयी नाही हे मात्र मी शपथपूर्वक सांगतो."
राजपुत्राचा संताप अनावर झाला व त्याने दूतावर कठोर प्रहार करताच दूत मरगळल्यासारखा झाला व खाली कोसळला. "याला प्रासादाबाहेर फेकून द्या, म्हणजे तो कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानी पडेल!" तो उद्गारला व अमात्यांसह निघून गेला. डोंबाने दूतास मलीन वस्त्राप्रमाणे उचलले व राजमार्गावर आणून टाकले. त्याच्या तेजस्वी शस्त्रांवर रक्ताचे डाग होते, ते त्याने दूताच्या वस्त्रास पुसले व तो निघून गेला.
भद्रानंदाने दूताकडे निरखून पहिले. त्याची हालचाल नव्हती, तरी त्याच्यात अद्याप प्राण होता. त्याने दोन भिक्षुंना पाचारण केले. त्यांनी दूतास उचलले व अति कष्टाने पायऱ्या चढून तो तेथे उभ्या असलेल्या आर्यस्थविरांसमोर अआले. भद्रानंदाने सारी कथा त्यांना सांगितली व म्हटले, "कदाचित मठातील शांत, सात्विक वातावरणात याची स्मृती जागी होईल. मात्र माझा मार्ग निराला आहे. प्रासादात समृद्धीने साध्य झाले नाही, ते उपासमारीने मठात साध्य होईल."
आर्यस्थविरांनी अनुमती देताच भद्रानंदाने दूतास भिक्षूंच्या अत्यंत अरुंद अशा कोठडीत बंद केले व नम्रपणे म्हटले, "सम्राटांची आज्ञा आर्यस्थविरांविषयीच होती, अशी स्मृती आपणास होणे आपल्या हिताचे होईल. तोपर्यंत आम्ही आपल्याला अन्नपाण्याच्या मोहापासून अलिप्त ठेवण्याचे ठरवले आहे. परंतु जर स्मृती जागृत झाली, तर साम्रातान्कडील इच्छाभोजन क्षुद्र वाटावे असे आपले आतिथ्य होईल. आता सूर्यप्रकाश कपोत आकृतीवर आहे. तो कमलदलाना स्पर्श करण्यापूर्वी आज्ञेचे स्मरण करावे."
भिक्षूंच्या त्या अरुंद कक्षेतही दूत तसाच निश्चल राहिला, व पाठीवर धगधगीत स्थडील असल्याप्रमाणे पेटलेली वेदनादेखील त्याच्या डोळ्यात दिसेना. कपोतकृतीवरून सूर्यप्रकाश निरवपणे खाली सरकला. त्याने चतुर्दंत हत्तीला उजळत सहस्त्रदल कमलाला स्पर्श केला. त्याखालील सरोवराचे पाणी क्षणभर प्रकाशमय झाले, काठावरील झाडांची पाने सोन्याची होऊन पुन्हा काळवंडून गेली. परंतु दूताच्या चेह-यावरील निर्जीव भाव बदलला नाही, की ओठातून शब्द उमटला नाही. भद्रानंदाचा निर्विकार चेहराही संतप्त, अधीर होऊ लागला. तो म्हणाला, "आता अनुतापगृहाखेरीज मला अन्य मार्ग दिसत नाही."
भिक्शुनी दूतास बाहेर काढले, त्या वेळी त्याचा देह शुष्क, जर्जर झाला होता व मुद्रेखालील कपालकृती स्पष्ट होऊ लागली होती. त्यांनी दूतास मठाखालच्या विस्तीर्ण तळघरात नेले व तेथे एका वेदिकेवर ठेवले. दोघा भिक्शुनी त्याचे हात-पाय वेदिकेसच असलेल्या अंकुशाना दृढपणे बांधले. क्षीणपणे नि:श्वास सोडत दूताने डोळे उघडले व वर खाली पाहीले. वरच्या बाजूला भिंतीवर टांगलेल्या अनेक यातनायंत्राच्या सावल्या अतृप्त पिशाच्चाप्रमाणे हलत होत्या. वेदिकेच्या सरळ वरच्या भागात एक ताम्रपात्र टांगले होते व त्याभोवतालच्या लोहवर्तुळात जागृत होत असलेल्या अग्नीच्या मंद जिव्हा दिसत होत्या.
हे दृश्य पाहताच दूतास पाठीवरील वेदनेचाही विसर पडला व तो हताशपणे उद्गारला, "धर्मगुरू, तुम्ही काय करणार आहात याची मला कल्पना नाही. पण मला तत्काळ मृत्यू येईल असं देहदंड द्या. मला आता वेदना सहन करण्याचे सामर्थ्य उरले नाही!"
भद्रानंदाचा चेहरा निर्विकार राहिला. तोपर्यंत त्याने पाठवलेला भिक्षु परत आला, व त्याच्या मागोमाग त्याच काळ्या वस्त्रातील डोंब वेदिकेजवळ आला.
"डोंबा, राजदूतास प्रथम तैलदिव्याचा अनुभव पाहिजे. एका आततायी प्रहारापेक्षा सातत्याने होणारा तीक्ष्णग्र आघात जास्त परिणामकारक होतो. हे दिव्य किती काळपर्यंत ठेवायचे हे दूताच्या सूज्ञतेवर अवलंबून राहील." भद्रानंद म्हणाला.
त्याच्या अनुज्ञेप्रमाणे डोंब पाय-या चढून वर गेला व त्याने लोहवर्तुळातील अग्नी जास्त प्रज्वलित केला. आता अग्निजीव्हा संतापल्याप्रमाणे उंचावल्या व लालसेने ताम्रपात्राभोवती फिरू लागल्या. खाली अनुतापगृहाच्या कोप-याकोप-यात अनेक भिक्षु केशरी सावल्यांप्रमाणे एकत्र आले व श्वास आवरून ते दृश्य पाहू लागले. काही काळाने ताम्रपात्र अतिउष्ण, रक्तवर्णी झाले. तेंव्हा डोंबाने त्याखालील छिद्रावरील आवरण बाजूला केले. त्याक्षणी उकळत्या तेलाचा एक गोल, स्पष्ट बिंदू वेगाने उतरला व दूताच्या अंगावर पडला. अंगाला त्याचा स्पर्श होताच आतून एक बुडबुडा यावा त्याप्रमाणे त्वचेवर एक गोलक निर्माण झाला. आणि तेथील वर्तुळ जळून गेल्याने तो काळवंडला. दारुण यातनेने दूत जागच्या जागी ताणल्यासारखा झाला व आक्रोशाने त्याचा स्वर मग्न झाला.
"असेच कांही अंतराने तैलबिंदू पडत राहू देत." भद्रानंद समाधानाने म्हणाला.
"नको, नको! खड्गाने माझा शिरच्छेद करा, तेवढी दया या क्षुद्रास दाखवा!" दूत याचना करत म्हणाला. तोच एक एक थेंब त्याच्यावर पडला आणि अनिवार वेदनेने त्याचे शरीर अस्ताव्यस्त झाले.
"सम्राटांची आज्ञा आर्यस्थविरांविषयी होती, हे तुम्हाला आठवले ना?" भद्रानंदाने सूचित हलक्या स्वरात विचारले.
"नाही, मला ती अद्यापही आठवत नाही." दूत क्षीण, भग्न स्वरात म्हणाला. "पण ती
आर्यस्थविरांविषयी नव्हती."
स्वतः
आर्यस्थविर शांत पावलांनी येऊन सारा प्रकार पहात होते, हे अद्याप कोणाच्याच दृष्टीस पडले नव्हते. त्यांनी निराशेने मान हलवली व म्हटले, "भद्रानंद, या क्षुद्राला येथून शुकराप्रमाणे स्मशानात फेकून दे! नाहीतर त्याच्या मलीन हत्येचा दोष आपल्याला स्वीकारावा लागेल!" त्यांनी मान हलवली व ते निघून गेले.
भद्रानंदाने त्यांची आज्ञा स्वीकारली, पण त्याचा चेहरा विलक्षण कठोर झाला होता. पूर्वायुष्यातील आर्यस्थवीरांचा पुत्र कोठे वाढत आहे हे सांगण्याचे, अंगावरील मांसखंड क्षणाक्षणाला तुटत असताही, एका य:क्वश्चीत पण्यांगनेने नाकारले, तेंव्हापासून हा त्याचा सर्वात मोठा पराभव होता. त्याच्या दृष्टीने अजूनही काही मार्ग साध्य होते. धगधगीत तप्त खड्ग कंठातून खाली उतरवणे, हे कार्य डोंब अतिकौशल्याने करत असे. किंवा एका बंदिस्त हाताला मध लावून त्यावर रक्तजीवी कीटक सोडणे हा उपायही अनेकदा अत्यंत उपयुक्त ठरला होता. जर मग आवश्यकता भासली असती, तर शरीरात मांसल जागी ठिकठिकाणी पोकळ खिळे टोचून त्यांच्यात रक्त जाळणारे अतिविष भरणे, हा मार्गही स्वीकारण्याचा त्याने निश्चय केला होता. या क्षणी आर्यस्थवीर येथे यावयास नको होते. असे त्याला फार वाटले. आणि त्यांच्या आगमनाची सूचना देण्याचे कर्तव्य असलेला तरून भिक्षु तेथेच अतिभयाने स्तंभित होऊन उभा आहे हे पाहताच तर त्याचा संताप अनावर झाला.त्याने डोंबाला बोलावले व त्या भिक्षुस सर्पकक्षेत तीन प्रहार बंदिस्त करण्याची आज्ञा दिली.
"आणि यास स्मशानात फेकून दे!" भाद्रानंद कर्कशपणे ओरडला व विषादाने निघून गेला.
सर्पकक्षेचा उल्लेख ऐकताच इतर भिक्षुंमध्ये हास्याची लाट उसळली. एखाद्या नवख्या भिक्षूला अनेक सर्पांच्या सानिध्यात राहण्याचे शासन केले जात असे. हे सर्व सर्प पूर्णपणे विषहीन होते, पण हा विशेष नवख्या भिक्षूला माहित नसे. मग सर्प अंगावरून फिरू लागताच तो अतिभयाने कसा मूढासारखा वागू लागे हे पाहताना इतर भिक्षुंना हास्य आवारात नसे. मग ते त्याच मुक्त विनोदाने दोन भिक्षु केवळ भयाने कसे मरण पावले व त्यांच्या शरीराखाली हिरव्या रंगाचे तीन निष्पाप साप कसे अकारण चिरडले गेले त्याच्या हकीकती एकमेकांना सांगत. आता भद्रानंद गेल्यावर त्याचं अनिर्बंध हास्यात ते निस्तेज मुद्रा झालेल्या भिक्षुभोवती गोळा झाले.
दोन भिक्षुनी दुताला राक्षसीपणाने उचलले व काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत टाकून दिले. सर्पकक्षेतील विनोदास आपण पारखे होऊ या भीतीने मागे एकदाही दृष्टी न टाकता ते तात्काळ परतले व मठात नाहीसे झाले.
दूताचा देह अतिनिर्जीव झाला होता. कठीण भूमीचा आघात झाल्याने त्याच्या तोंडून एक निर्बल नि:श्वास बाहेर पडला. पण नंतर काही काळ तो जमिनीवर निश्चल पडून राहिला. स्मशानभूमीभोवती झाडांची गर्दी होती व जमिनीवर उंच गवत वाढलेले होते. तेथील गाढ शांततेवर झाडांतील एखाद्या पक्षाचा फडफडाट किंवा तृण-कीटकांचा कर्कश्श, एकेरी स्वर यांच्या डागाखेरीज काही जाणवत नव्हते. काही वेळाने दूताने डोळे उघडले त्या वेळी, हा देह आपला नव्हेच, त्याच्या आत खोल कोठेतरी कोप-यात आपण अतिभयाने अंग चोरून बसलो आहोत हे त्याला उमगले. पण पाऊल हलवण्याचे सामर्थ्यही आता त्याच्यातून ओसरून गेले होते. थोड्या वेळाने गवतावर पावलांचा आवाज आला. कोणीतरी येवून त्याच्या अंगाखाली हात घालून त्याला उठवून बसवले व त्याच्या तोंडाला उष्ण मधुर पेयाचे पात्र लावले.
तो उष्ण प्रवाह शरीरात उतरताच त्याची बधिरता किंचित कमी झाली. पण त्याच क्षणी त्याची वेदना नव्या तीव्रतेने जागी झाली. तिकडे निश्चयाने दुर्लक्ष करून तो म्हणाला, "आता तू मला आणखी काय यातना देणार आहेस?"
त्या उग्र बलवान मनुष्याने त्याला अत्यंत कोवळ्या हातानी उठवून बसवले व अंगावरील खरबरीत पण सुखकारक वस्त्र त्याच्यावर पसरले. "मी आता कसलीही यातना द्यायला आलो नाही," तो सौम्यपणे म्हणाला.
"या स्मशानाशेजारीच माझी झोपडी आहे. तेथे तुम्हाला नेण्यासाठी मी आलो आहे. तेथे आपण निर्भयपणे विश्रांती घ्यावी. तेथे प्रासाद किंवा मठ यांचे वैभव आढळणार नाही, पण त्याचप्रमाणे तेथील अन्नाला वेदनेचा स्पर्श नाही."
प्रासाद-मठाचे नाव ऐकताच दूताचे अंग कंपित झाले. तो म्हणाला, "तुम्ही फार सुह्दय आहात, पण आता मला तुमच्या श्रमांची आवश्यकता वाटत नाही. आता माझा फार काळ उरला नाही. अल्पावधीतच तुम्हाला मला येथे आणावे लागेल. त्यापेक्षा मी येथेच असणे जास्त योग्य नाही का? आता माझ्या शरीराला हालचालीची देखील वेदना सहन होणार नाही. माझ्या शरीराकडे पहा. पाठीवरील उघड्या मांसाला सौम्य वा-याचा स्पर्श झाला तरी सर्वांग मृत होते. या प्रत्येक व्रणातून अग्नी फुलला आहे."
"क्षमा करा राजदूत," त्या उग्र माणसाने म्हटले, "मला ते सारे माहित आहे. तुमच्या पाठीवरील त्वचा मीच काढली, अंगावर तप्त तेल मीच टाकले; कारण मीच तो डोंब आहे. परंतु ती माझ्या कर्तव्यामुळे करावी लागलेली कृत्ये होती. पण अंगावरील काळी वस्त्रे उतरली की मी मुक्त आहे. तेंव्हा आपण कसलाही संशय न धरता माझ्यासह चालावे."

त्याच्या शब्दांनी दूताच्या मनावर विजेचा आघात झाल्याप्रमाणे झाले. अंगावरील बधिरता हळूहळू वितळत जाऊन मनातील शून्यताही विरली. खोल कोठेतरी अद्याप जिवंत असलेला प्रकाशकण तेजस्वी होत गेला व सर्वांग आतून उजळल्यासारखे झाले. दूताने त्याचा हात आवेगाने धरला व म्हटले, " डोंबा, सम्राटांची आज्ञा आता मला सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट दिसत आहे. ती आता तुझ्याजवळच प्रकट करणे अनिवार्य आहे. माझा मृत्यू तर आता माझ्या इतक्या सन्निध उभा आहे की त्याचा हिमश्वास आताच मला जाणवत आहे. सम्राटांची आज्ञा अखेर तुझ्यासमोर प्रकट व्हावी अशीच दैवाची इच्छा होती!"
"ते फार मोठे भाग्य आहे. मला ती आज्ञा सांगावी." नम्रपणे डोंब म्हणाला.
"भाग्य असेल, पण ते तसेच अतिकठोर दिव्यही आहे. डोंबा, माझ्या शब्दांकडे लक्ष दे!" उत्तेजित होऊन दूत म्हणाला, "जर तुझ्याकडून या आज्ञेचे पालन झाले नाही, तर तुला मृत्युदंड प्राप्त होईल. सम्राटांना पूर्ण अंतर्ज्ञान आहे. आता आपल्याला एकट्यालाच ही आज्ञा ज्ञात आहे म्हणून जर तू कर्तव्यात कसूर केलीस, किंवा तिच्यात एका शब्दाचे परिवर्तन केलेस, तर तुला दारुण यातना होतील. तुला हे कार्य साहवेल का? अन्यथा दुसऱ्या कोणाला तरी बोलावून आन. पण त्वरा कर, माझे अखेरचे क्षण ओघळून जात आहेत."
"त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असा. मी कलिकेची अत्यंत पवित्र शपथ घेऊन सांगतो की, माझ्यात प्राण असेपर्यंत मी सम्राटांचा पवित्र शब्द निष्फळ होऊ देणार नाही!"
"तर मग ऐक, सम्राटांची आज्ञा एका डोंबाविषयीच आहे. त्याचे नाव कालमुख आहे. सम्राटांस शैलेश्वराच्या मंदिरात साक्षात्कार झाला. त्या अति पापी कालमुखास तीन दिवसात देहान्ताचे शासन झाले नाही, तर सा-या साम्राज्यावर महान संकट कोसळेल, परचक्र येईल, जनांची भीषण हत्या होईल व रक्ताचे पाट वाहतील आणि स्वतः सम्राटांना जीवितास मुकावे लागेल. त्यामुळे सम्राटांनी मला तात्काळ येथे पाठवले. कालमुखाच्या सर्वांगावरील त्वचा सोलून काढावी व मग सर्व जनांसमोर त्याला उकळत्या तेलात टाकावे अशी ती आज्ञा आहे. ती तू सर्व जनांस विदित कर व आज सूर्यास्ताच्या आत त्या प्रमाणे कृती घडव. जर तू या कर्तव्यात अंतर दाखवशील, तर तुझ्याच सर्वांगावरील त्वचा सोलली जाईल व तू तप्त तेलात अति यातनेने मृत्यू पावशील. कालमुख हे नाव तुझ्या स्मृतीत राहील ना?"


डोंबाने आपला हात मागे घेतला व तो शिलाखंडाप्रमाणे स्तब्ध राहिला. त्याने दूताच्या क्षीण निर्जीव होत चाललेल्या डोळ्यांकडे अजाणपणे पहिले. दूत सारा प्राण डोळ्यात आणून पुन्हा विचारीत होता, "कालमुख हे नाव तुझ्या स्मृतीत राहील ना?"
"होय, त्या नावाचा मला विसर पडणार नाही! राजदूत, या नगरात मीच एकटा डोंब आहे आणि माझेच नाव कालमुख आहे."
राजदूताने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात विलक्षण हालचाल झाली, पण दुस-या क्षणी ते निस्तेज होऊन विझले. त्याचा चेहरा म्लान झाला आणि भूमीतील बीजांकुर सतत वर येत असावा, त्याप्रमाणे सतत स्पष्ट होत चाललेली त्याच्या चेह-यामागील कवटी अखेर पूर्णपणे स्पष्ट होऊन गेली.


संकलन:प्रवीण कुलकर्णी


Wednesday, 10 March 2010

माणसे : जयवंत दळवी



तशी खूप रात्र झाली नव्हती. अजून तिसरा खेळ सुटायचा होता. स्टेशनातून रात्रपाळीची माणसे यायची होती, तरीसुद्धा देऊ देवळामागच्या झाडावर चढला आणि त्याने आपले गोणपाटाचे पोते खाली काढले. नेहमीच्या जागेवर त्याने आपले फुटपाथचा तुकडा गोणपाटाने झटकून साफ केला. तिथे तो गोणपाट पसरणार तोच देऊला हाक ऐकू आली.
"हा ss मुला-"
देऊने पलीकडच्या फुटपाथवर पहिले. प्लंबरच्या फळीवर मास्तर बसले होते. ते हाताने त्याला बोलावीत होते.
देऊ रस्ता ओलांडून त्यांच्याजवळ गेला.
"काय म्हणता मास्तर?"
असे विचारीत त्यांनी जबरदस्त ढेकर दिली.
"मी म्हणत होतो..." ते म्हणाले, "तिथं पलीकडे झोपण्याऐवजी इथं झोप शेजारी!"
"का?"
"का असं नाही रे मुला! हाकेला उठेल असा कुणी तरी जवळ असलेला बरा! काय नेम सांगता येतो?...."
ते पुन्हा पुन्हा तेच बोलले.
देऊ उड्या टाकत पलीकडे गेला आणि गोणपाट उचलून घेऊन आला. मास्तर बसले होते तिथेच त्यांच्या पायाशी गोणपाट पसरून तो तिथेच बसला.
"आज कुठं मिळालं तुला काम?"
"छे हो! जिकडे तिकडे माणसं टपून असतात. आज स्टेशनसमोर टक्सी उभी राहिली...मास्तर, सहा बगा होत्या...पाच सात रुपये गावले असते! पण स्टेशनातलाच पोरगा धावून आला...आता त्यालाच वहिवाटीचा हक्क! पण मग मारामारी करायला हवी...ती जमते कोणाला?...जाव!
असे म्हणत देऊ आपली जवळ ओढली पावले आवळत राहिला.
"आज जेवलास तरी? "
"कसला हो जेवान? काटवाल्याकडे चार पोळे खाल्ले चाहत बुडवून....कठीण आहे हा मास्तर, कठीण आहे."
असे म्हणून तो तिथेच विचार करत बसला.
हल्ली त्याला परतपरत वाटायचे, आपण पळून आलो यात काही चुकले का? आपण घरीच राहिलो असतो...नारळ पाडणे, लाकडे फोडणे...गावकऱ्यांच्या दुकानात काम करणे...असले काही तरी केले असते तर आपल्याला अधिक कमी झाली असती का? यापेक्षा आपले पोट अधिक भरले असते का?
पण त्याला उत्तर मिळत नव्हते.
घरी तरी त्याला काय मिळत होते? चौघा भावानंतर पाचवा नंबर त्याचा लागायला हवा होता, जेवायच्या वेळी! मग सगळी मुले दहाबारा! ....असोत बिचारी! पण चौघांनंतर सगळी मुले बसायची कलकलाट करीत...थाळ्या आपटीत आणि शेवटाला देऊ शेवटाला...बोटाने जमिनीवर थाळी फिरवीत...पण कुणी त्याला म्हणाला नाही...साबाजी तोंड उघडून बोलला नाही...देव्याला बसवा पाचवा!
सोळा वर्ष झाली तरी देव्या कुणीच नव्हता, घरात कस्पटाचीसुद्धा किंमत नव्हती.
मास्तर म्हणाले,
"देवजी, तू पळून आलास यात काही चूक नाही! नशीब काढायला इथं आलेली बहुतेक माणसं पळून, घरदार सोडूनच आलेली आहेत...अमेरिका हा सबंध देश हा नशीब काढण्यासाठीच पळून आलेल्यांचाच देश आहे...तो सी.आर.गोखले...चंद्रकांत रुद्राजी तुझ्यासारखा पळून आला...इंग्लंडात जाऊन आय.सी.एस.होऊन आला...बरीस्टर दीक्षित..आईवडिलांची नजर चुकवून मुंबईस आला, एल्फिन्स्टनमध्ये माझ्याबरोबर होता. हुशार...इंग्लंडला गेला..."
कोण गोखले..कोण दीक्षित...आय.सी.एस.काय! ...
रीस्टर काय...देऊला तो नुसता आवाज होता. पण तो त्याला ऐकावासा वाटे.
"काय आहे मास्तर, माहित आहे?" देऊने मास्तरांना म्हटले.
"कसली का होईना, समजलं ना? पण एक नोकरी मिळायला हवी...म्हणजे समजलं ना? दोन वेळ जेवण आणि दोन वेळ चापानी सुटलं तरी खूप झालं!"
बोलता बोलता त्याने आपली कंबर चाचपून पहिली. ती गाठ होती. पण गाठीत अर्थ नव्हता. एकच शेवटची दहाची नोट होती, आणि तीसुद्धा कधी बाहेर नेम नव्हता.
"तरीसुद्धा समजलास का रे देवजी?" मास्तर म्हणाले.
"तू सुद्धा थोरल्या बंधूस कार्ड टाक...म्हणावं मी मुंबईस आहे...सुखरूप आहे."
"रस्त्यावर निजतोय-"
तो कडूकडू हसला.
"छे! ते कशाला लिहायला पाहिजे?....उद्या बंगली बांधशील...बंगलीत झोपशील आपल्या राणीबरोबर!"
मास्तर मान वर करत, तोंड परत परत उघडून ढेकर देत राहिले.
त्यांचे पोट कमरेला बोचके बांधल्यासारखे सुटले होते. बसले होतेतर पोट मांडीवर ठेवल्यासारखे दिसत होते. दोन्ही बाजूनी ढराढर आवाज सुटत होते. पंचाची कणवट कमरेत चिमटली होती.
प्लंबरच्याच वर पहिल्या मजल्यावर ते राहतात. एकाच जुनी खोली आहे. थोरला मुलगा आणि सून अमेरिकेत असतात. मास्तर एकदा अमेरिकेला जाऊन आले. दुसरा मुलगा दोन वर्षांचा असताना त्यांची बायको वारली. परमानंदाला त्यांनी स्वतः वाढवला. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि संध्याकाळच्या क्लासेसमध्ये मास्तर झाले. पण कुठेतरी काहीतरी चुकले. काय ते मास्तरांना कधी कळले नाही. पण परमानंद त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पुढे गेला नाही. तो सुरुवातीला म्हणजे मट्रीकपर्यंत हुषार होता, पण पुढे काहीतरी चुकत गेले, काय ते मास्तरांना कळले नाही! मग तो मास्तरांच्या हट्टापायी शिकला. पण न शिकल्यासारखे शिकला! कसाबसा बी.ए. झाला, दोन नोकऱ्या केल्या. सोडल्या, कसला तरी धंदा करतो. एका स्मशानाला लाकडे पुरवतो. म्हणजे त्याला काहीच करावे लागत नाही. मुख्य ठेकेदारच ट्रकने लाकडे स्मशानात पाठवतो. फक्त म्युनिसिपाल्टीचे टेंडर परमानंदाचे असते. तेवढ्या कमिशनवर जगतो. लग्न नाही, संसार नाही. खोलीत बसतो. रात्री सात वाजल्यापासून पी-पी पितो...कसातरी पडलेला असतो. नेसणात मुततोसुद्धा! कधी कधी गलरीत उभा राहतो आणि...आणि तिथून रस्त्यावर मुततो. मास्तरांना लाज वाटते.
म्हणून मास्तर खाली फळीवर झोपतात.
मास्तर म्हणाले,
"समजलं ना देवजी?...तू वडील बंधूंना कार्ड पाठव."
"पाठवलं तर मास्तर तुमीच! मी कार्ड देन! किंवा तुमीच...!'
"तू दोन बुकं शिकलास ना?"
"ते गेलं सगळं उडून?"
तो खसाखसा डोकं खाजवीत हसला.
"तुला अजून शिकावस वाटतं?"
"छे!...काय शिकण्याचा नुसता इच्यार केला तरी नीज येते. डोळे झाकतात!"
मास्तर हसले.
एकदम लोकांचा गजबजाट वाढला.सिनेमा सुटला होता. स्टेशनातून येणारे रात्रपाळीचे लोकसुद्धा वाढले होते. त्याला तुडवून गेल्यासारखे जात होते.
"निजा तुम्ही मास्तर-"
असे म्हणून देऊ आडवा झाला. मास्तर अजून तसेच बसून होते.
थोड्या वेळाने वर्दळ कमी झाली. बरेचसे सामसूम झाले.
दुरून भैय्याचे भजन ऐकू येऊ लागले. बाजारात दिवसभर केळी विणारे भय्ये चिमटे, लोखंडी सळ्या वाजवत गात होते. केळबाजारात पाऊणशे-शंभर भय्ये तरी राहतात. केळ बाजार कसला? चार गाळे आहेत. प्रत्येक गाळ्यात कमरेपर्यंतच्या उंचीचा लाकडी माळा आहे. त्यावर केळ्यांच्या राशी आहेत. वसईची, जळगावची केळी...माळ्याच्या खाली भुयारात भैय्याचे संसार. शे-सव्वाशे भय्ये तिथं मुंग्यांसारखे वळवळतात. आळीपाळीने चारपाच भय्ये रोट्या बडवतात. बटाटे कापून रस्सा करतात, नाहीतर डाळ. प्रत्येक गाळ्यात माळ्याखाली पंचवीस तीस भय्ये वाटोळे बसतात....डाळीत रोटीचे तुकडे बुडवतात....खाता खाता काशी....इलाहाबाद....गडवाल, इथल्या आठवणी काढतात....एकाचे कुणाचे कार्ड आले, तरी ते आपल्यालाच आलेय असे समजून वाचताना तल्लीनतेने ऐकतात. मुछवाला ते वाचून दाखवतो.
मुछवाल्याच्याच गाळ्यासमोर थोडी उघडी जागा आहे. तिथे बसून पाचपन्नास भय्ये भजन गातात...."घरकी जोरू तीन दिन रोवे रहगई आसा रे...! चंदन पाटेपर न्हानेकू बैठा राजा गोपीचंदा रे!"
रात्रीच्या शांत वातावरणात ते गाणे गोड वाटत होते.
तेवढ्यात त्याला शब्दही कळले. त्याने डोळे उघडून पहिले. तिथेच भिंतीला टेकून एक भैय्या आपल्या पाटीत बसला होता आणि टाळ्या वाजवीत केळेवाल्यांचे त्यांच्या सुरात सूर मिसळून भजन गात होता..."किनका बंगला किनकी माडी किनका हत्ती घोडा रे...किनकी जोरू किनका बेटा सब पैसे का प्यारा रे...!"
रात्रीचे दोन वाजून गेले होते, तरी हा भैय्या बसून गोपीचंदाचा ख्याल गात होता. त्याला झोप नव्हती. त्याला नाही, बाजारातल्या त्या केळीवाल्यानाही नाही!
.
देऊ याच गोष्टीचं आश्चर्य करीत राहिला....किती दूरदूरवरन आलेली ही माणसे, पोटासाठी आली...एकटी...त्यांना रात्र रात्र झोप नाही!
देऊला खूप भूक लागली होती. खूप खायची इच्छा होती. पण त्याने मन आवरले. फक्त चहा आणि मिसळपाव, फार फार तर उसळीचा रस्सा, दहा पैशाचा आणखी घ्यायचा! पण त्यावर एक पैसा नाही!
हे सगळे स्वतःला बजावीत तो हॉटेलात चढला. बेसिनपाशी जाऊन त्याने चुळा भरल्या. डोळ्यांना पाणी लावले, बेसिनपाशी परातीत ठेवलेले पाण्याचे दोन ग्लास उचलले. गटागटा प्याला आणि तो खुर्चीत बसला.
ए ss पोर sss फडक मा sss र....तीन नंबर पाणी देव...धोतीवाला ऐंसी लेव...तीन कडक लाव...एकमे पाणी कम."
असे लांबलचक ओरडत खांद्यावर टुवाल टाकलेला पोऱ्या क्षणभर देऊच्या पुढ्यात थांबला. त्या वेळी देऊ त्याच्या कानाच्या पाळीतल्या सोन्याच्या टिकल्या बघत होता. हॉटेलचा ऑर्डर घेणारा पोऱ्या, त्याच्या कानपाळ्यात
टिकल्या...देऊ बघता बघता विचार करत राहिला...
तेवढ्यात तो पोऱ्या पुढे जाऊन परत आला.
"पाव-मिसळ...कडक चाय..."
"पाव-मिसळ...कडक चाय..."
असे ओरडत तो टिकलीवाला आत गेला.
तेवढ्यात केवळ सवयीने देऊच हात त्याच्या कमरेकडे गेला.
अरे बापरे! घात झाला! घात!
देऊचा चेहरा काळाठिक्कर पडला. त्याने पटापट दोनदा कपाळावर हात आपटले. आणि टिकलीवाला मिसळपाव घेऊन येण्याआधी तो तिथून उठला. तडक बाहेर निसटला.
"हात साले का..." असे म्हणत देऊ मटकन फुटपाथवर बसला.
त्याच्या कमरेची गाठ कुणीतरी कापली होती. कमरेची सुतळी करगोटा तसाच होता. त्याला बांधलेली गाठ कुणीतरी अलगद उडवली होती....आणि कशी?....तो नवल करीत राहिला.
पायजम्याची बटने सुटलेली नव्हती. पोटाकडे, कमरेकडे पायजमा फाटलेला नव्हता तेवढीच गाठ कापली कशी?...कोणी? कधी?
त्याची शेवटची दहा रुपयाची नोट गेली होती. जवळ एखादे पाच पैशाचे नाणेसुद्धा नव्हते...आणि अशी चारदोन नाणी असली तरी त्याचा उपयोगही नव्हता. नाणी टाकून मिळते काय? सकाळपास्न कुठे कसले काम नव्हते. बाजाराचा सुट्टीचा दिवस! सोमवार!
दुपारीच त्याला झोप लागली. बसला तिथेच आडवा झाला, त्याला कळलेच नाही तो कधी झोपला ते! त्याला आठवले ते एवढेच-तो सावलीत बसला होता...विचार करीत...हे दहा रुपये संपले म्हणजे काय करायचे? ...आणखी मनात त्याच्या संताप होता तो साबजीबद्दल! मास्तरांनी पत्र पाठवले होते...साबाजीने पोराकडून लिहून घेऊन कार्ड पाठवले होते...मास्तरांच्या पत्त्यावर....कार्डात रडगाणे होते....हा आजारी...तो आजारी...पोटात अन्न नाही! पंचवीस रुपये पाठव. शिवाय दरमहा पन्नास रुपये पाठव! मास्तरांनी त्याला ते रात्री वाचून दाखवले होते!
त्या पत्राचा विचार करीत देऊ बसला होता.
त्याच्या शेजारी एक पाटीवाला बसला होता. डोक्याला टूवाल गुंडाळून! आपल्याच पाटीत बसून जुन्या ब्लेडच्या पात्याने आपल्या पायाची नखे काढीत होता.
तेवढ्यात तो कधीतरी झोपला होता.
तासदीडतासाने त्याला कुणीतरी ढोगसून जागे केले. तो जागा झाला. तेंव्हा लाथेने त्याला तो इसम ढोंगसतो आहे हे त्याच्या लक्षात आले. देऊने डोळे किलकिले करून पहिले. त्याच्या डोळ्यांवर अजूनही झोपेचा जाड पडदा होता, तरीसुद्धा त्याला दिसत होते...फुटपाथवर चार चाकाची गाडी चढली होती. त्याच्या अंगावर आली होती आणि ती गाडी धरून एक इसम त्याला लाथेने ढोंगसत होता.
त्याने देऊला लाथेने ढोंगसले, या गोष्टीची देऊला चीड आली...उठावे आणि भोसडीच्याच्या गांडीवर लाथ घालावी असे त्याला वाटले...घातलीही असती. पण वेळीच त्याच्या लक्षात आले. त्या हातगाडीबरोबर आणखी दोघे आहेत. तिघांना तोंड द्यायला पाहिजे आणि पोलीस आला तर हातगाडीवाला त्याच्या हाताला हात लावणार...आपल्याकडे द्यायला काय आहे? भडवा गाडीच फुटपाथवर व्हाधावतो तो काय पोलिसाला दिल्याशिवाय?
"आग लागो मेल्याच्या तोंडाला."
-असा मनातल्या मनात शाप देत देऊ उठला. संतापाने गाडीवाल्याकडे बघत बाजूला झाला.
बाजूला बसता बसता चिकट तोंडाने म्हणाला,
"पाय लावने कि क्या गरज? सोयेलेला समजत नायी?"
"दोन लाफा देन! साल्या इथे झोपलासच का?"
"ही जागा कोणाच्या बापाची आहे? फुटपाथची जागा कोनच्या बापाची?"
"तुझ्या बापाची आसलं! मी रोजची गाडी इथं उभी करतो!" असे म्हणत गाडीवाल्याने बटाटवड्याची गाडी मुद्दाम त्याच्या अंगावर ढकलली...एक चाक त्याच्यावर आपटावे म्हणून!
"आता उठतो का कंबरडा मोडू?"
त्यासरशी देऊ ताठ उभा राहिला, छाती पुढे काढून.
"हिम्मत असली तर उचल तुझा तंगडा-"
असे म्हणत देऊ आणखी ताठ झाला.
वडेवाल्याच्या दुसऱ्या पोराने त्याला तिथून ढकलला आणि तो म्हणाला,
"ही गाडी शिवसेना पुरस्कृत वड्याची गाडी आहे...."
म्हणजे काय ते देऊला कळले नाही. तो अजून ढकललेल्या जागेवर तसाच ताठ उभा
होता. त्याचे डोळे जबरदस्त तारवटले होते.
तेवढ्यात चारपाच माणसे जमली. मारामारी होईल म्हणून थांबली.
"मुंबै महाराष्ट्राची हाये! तुम जैसा उपरे का नही! समजा?"
असेही तो गाडेवाला ओरडला....आणि शांत चित्ताने कालवलेल्या पिठात हात बुडवून वडे कढईत सोडू लागला.
दोन पोरे काही झालेच नाही असे समजून आपापल्या कामाला लागली. पाण्याचे पिंप ठेवले....बशा लावल्या, लाल चटणी खालीवर केली. पाव कापले.
तरी देऊ अजून तिथेच उभा होता. क्षणभर त्याला वाटले, नेटाने हि हातगाडी वडेवाल्याच्या अंगावर उलटी करावी. उकळत्या तेलाची कढई त्याच्या अंगावर पडेल....पण त्याला तेवढा धीर झाला नाही...तो तेलात चुरचुर तरंगणाऱ्या वड्याकडे बघत राहिला. असले गुबगुबीत वडे. परातीतल्या बटाट्याच्या गोळ्यात हिरवे हिरवे मिरचीचे तुकडे खूप दिसत होते....त्याला वाटले, झाऱ्यातले ते आठ दहा वडे तोंड भाजत भाजत बसून खावे!
"खायेन! हिंमतीने खायेन! पण या भडव्याकडले नाय...."
-असे तो मनातल्या मनात रागाने बोलला. मनात बोलला तरी त्याच्या चिकट तोंडात त्याची जीभ तट
तट वर उडली.
"चला रे तुमी...आपल्या धंद्याला..."
असे म्हणत वडेवाला कढईतले वडे वरखाली करू लागला.
तिथेच घोटाळणारी माणसे पांगली.
"जो तो उठतो तो मुंबैत येतो! है क्या इधर?"
असे त्यालाच कुणीतरी वाटेला लागताना बोलला. तो त्यालाच बोलला असे देऊला वाटले. म्हणून तो चिडून म्हणाला, "माहित आहे मुंबे कोणाची ती....गरीबाची नाय मुंबे..." असे म्हणत देऊ चालत राहिला. जाता जाता त्याने आसपास पहिले. भोवती रंगारी, प्लंबर आपापली अवजारे पुढ्यात ठेवून गिऱ्हाइकाची वाट बघत बसले होते. कुणालाही काही ऐकू येत नसल्यासारखे. मरून पडल्यासारखे! पुढ्यात गि-हाइक थांबले म्हणून ते जिवंत होतात. मगच त्यांना दिसते, ऐकू येते!
देऊ तिथून हॉटेलात शिरला. तिथे त्याला कळले दहा रुपयाची शेवटची नोट गेली.
ती गेली कशी या एकाच गोष्टीचा तो परत परत विचार करीत राहिला. पण असा विचार करीत बसलो तर भागायचे नाही, हेही त्याच्या लक्षात आले. तो चटकन उठला. कुणीतरी हक मारून बोलवल्यासारखा चालत राहिला. त्याने इकडे तिकडे बघत बाजारातून फेरी मारली. जड पिशव्या नेणाऱ्याना 'घेऊ?' असे विचारले, पण त्याला काम मिळाले नाही.
तेथून तो भाजी मार्केटात फिरला. पण काम मिळाले नाही. तरतर चालीने तो स्टेशनसमोर फेऱ्या मारीत राहिला. तिथे आधीच आठ-दहा हेलकरी गळ्यातला टॉवेलशी चुळबूळ करीत उभे होते. एकाच्याही डोसक्याला टॉवेल गुंडाळलेला नव्हता. त्याच्या लक्षात आले....आज वेगळा दिवस आहे. आज कुणालाच काम दिसत नाही...त्यांच्या संशयखोर नजरा परत परत देऊकडे वळत होत्या...म्हणून तो निसटला. कुणीही सामान घेऊन आला, तरी हे बेकार हेलकरी आपल्याला सामानाला हात लाऊ देणार नाहीत, हे त्याच्या लक्षात आले. तो तेथून वळला. कबुतरखान्याकडून जैनमंदिराकडे आला. डावीकड जाऊन तो मोडक्या कट्ट्यावर बसला.
तिथे पंडितजीला गि-हाइक होते. दगदगलेली एक बाई त्याच्यासानोर उकिडवी बसून पंडितजी सांगतो ते भविष्य कानात जीव ओतून ऐकत होती. तिच्या कडेवर सहा महिन्याचे शेंबडे पोर झोपले होते.
मान आडवी झाली होती. कदाचित लचकली, मोडली असती. पण आईला शुद्ध नव्हती. ती आपले भविष्य ऐकण्यात हरवून गेली होती. तिच्या नवऱ्याला नोकरी नव्हती. वर्ष झाले. तो घरी बसून राहतो. विचाराविचाराने त्याची तब्येत हटली. माणसाने खायचे काय?....ती सांगत होती. आणि भिंगातून तिच्या हातावरच्या रेषा बघत पंडितजी तोंडाने तिखट मिरच्या चावल्यासारखा आवाज करीत, खालच्या खाजगी आवाजात काही काही सांगत होता....महिनाभरात नोकरी मिळेल....गिरणीत मिळेल....पण साडेसाती आहे....ती आहेही हे तिला पटावे म्हणून तो पाटीवरचे त्यानेच मांडलेले आणि सोडवलेले गणित परत परत तिला दाखवत होता. ती सगळे समजत असल्यासारखी मान हलवत होती....या साडेसातीतच तिच्या नवऱ्याच्या वारसदार लोकांनी तिच्या नवऱ्यावर करणी केली आहे हेही पंडितजीने सांगितले. ते तिला ताबडतोब पटले. पांढरे फटफटीत ओठ करीत ती तिथल्या तिथेच जाल्फ्ळून म्हणाली,
"एकनाथाला बरीss हगवण लागात. देव एकनाथाचा निसंतान करील..." असे म्हणताना तिने हाताचे तळवे एकमेकावर घासले. बघता बघता ती पिवळी झाली.
"घाबरण्याचे कारण नाही. हि अंगठी यजमानाच्या उजव्या हाताच्या या बोटात घाल..." असे म्हणत त्याने बोट दाखवले.
तिने अंगठीसाठी पटकन हात पुढे केला.
पण पंडितजीने अंगठी लगेच दिली नाही. त्याने पिंजऱ्याचे दर उघडले, त्यासरशी पोपट बाहेर आला. तो दारासमोर ठेवलेल्या वितभर उंचीच्या शिडीवर चढला. परत उतरला...आणि त्याने एका अंगठीवर चोच मारली....ती अंगठी पंडितजीने मंत्रून तिच्या हाती दिली. एकवीस रुपये मागितले, पण कमी होता होता पाच रुपयावर मिटले!
"यजमानास नोकरी मिळाली म्हणजे इथे येऊन अंगठीचे सोळा रुपये देऊन जा. आणि कोणी अंगठी बोटातून काढून मागेल तर काढायची नाही..."
असे पंडितजी म्हणाला.
अंगठी पदराच्या गाठीला मारत बाई उठून उभी राहिली. आपल्या कडेवर तान्हे मुल आहे, याची तिला अजून शुद्ध नव्हती,
"त्याची मान सांभाळ."
असे पटकन देऊ म्हणाला.
"हि आणखी पोरां देव पदरात घालता."
असे ती एकदम करदावून बोलली.
तिच्या भाषेमुळे देऊला जवळीक वाटली. त्याने विचारले, "खंयची गे तू?"
"मी होडावड्याची...तू खंयचो?"
"आर्लीचो..."
'आर्लीचो?....आर्ली म्हणजे...आजगाव...शिरोड्याकडची मरे?"
"होय..."
"असा -असा .."
ती एकदम ओळख पटल्यासारखी म्हणाली, "थय कोण भाईबंद?"
देऊची छाती उगाचच धडधडली.
"छा! माझी एक मावळण दिलीसा आर्लेक. पण आमचा जाणायेणा नाय-"
"कोणाकडे गे?"
"राण्याकडे..."
"राणे कोण?"
"साबाजी राणेची बाइल ती माझी मावळण...मी नाय बघूक तिका."
देऊ एकदम तिच्याजवळ गेला आणि तिला बघत राहिला, पण तिचे लक्ष नव्हते. गाठीला बांधलेली अंगठी ती पोटाला खोवलेल्या पिशवीत शोधत राहिली.
"अगे शोधतंय काय तू?"
"अंगठी खय दरवलय मी."
"पदराच्या गाठीत बांधलंय मगे?"
ती एकदम कपाळावर हात मारीत हसली आणि म्हणाली,
असा रे माझा कपाळ...एकदा या अंगठीच्या कृपेनं त्येंका नोकरी गावदे! वर्ष झाला! बसान असतत! असा बसान भागात? काय रे? तीन खानावळी आसत म्हणूनशान पोटात चार घास जातत! तीन खानावळीत भागता रे? साठ साठ रुपये....साठात करून घालतलय काय? तेतली चार शिता आमच्या चौघांच्या तोंडात पडतत म्हणून खानावळ!"
तिने पदराच्या गाठीला परत परत तीन चार गाठी मारल्या आणि ती तरातरा चालत राहिली.
तिच्या पाठीमागून कितीतरी वेळ देऊ चालत राहिला.
मग त्यालाच प्रश्न पडला, मी तिच्या मागून मागून का जातोय? तिचं घर कुठंय ते कळावे म्हणून? तिची खानावळ धरावी म्हणून? घरचे अन्न मिळावे म्हणून?
ती एकदम धावली आणि शिवडीच्या बसमध्ये चढली. मग त्याच्या लक्षात आले, तिला विचारायला हवे होते. तिचे नाव काय म्हणून? आणि ती राहते कुठे ती.....


जयवंत दळवी
संकलक:प्रवीण कुलकर्णी




Sunday, 7 March 2010

कालुशा : मॅक्झीम गॉर्की


अंगाभोवती काळी चादर गुंडाळून एक वृद्ध स्त्री स्मशानाच्या कोपऱ्यात एका कबरीजवळ शांत उभी हती. दुरून तर ती जड शिळाच वाटावी आणि हा कोपराही कसा? तर फक्त अनाथ आणि गरिबांना पुरण्यासाठी सोडून दिलेला.
काही अंतरावरून मी तिला न्याहाळत होतो; पण ती तर जशी सगळं भान हरपून त्या लहानशा कबरीकडच बघत होती. मी काहीसा तिच्याजवळ गेलो; पण ती आपल्याच दुनियेत हरवलेली होती. माझी चाहूल लागताच तिने फक्त आपला चेहरा फिरवत, अगदी खोल गेलेल्या डोळ्यांनी मला न्याहाळल. मग हळूवार आपला चेहरा झुकवत पुन्हा त्या कबरेत नजर गाडून टाकली.
खरं तर एखादा अनोळखी माणूस जवळ येताना पाहून उत्सुकता, बेचैनी असे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसायला हवे होते. मात्र तसं कोणतंच चिन्ह नव्हतं. पांढरी होत चाललेली केसांची एक बट तिच्या सुकलेल्या गालावर रेंगाळत होती, तिचे पातळ ओठ आत ओढले गेलेले होते आणि त्यांच्या सुरकुतलेल्या कडा तर चेहऱ्यावरची उदासी आणखीनच गडद करीत होत्या.बहुधा, रात्रीची जागरणं आणि कायमच्या रडण्यानं पापण्याही कोमेजून डोळ्यांवर लटकत होत्या...
मला त्या म्हातारीबद्दल फार सहानुभूती वाटायला लागली. अगदी प्रेमळ शब्दांत मी बोलण्याचा प्रयत्न केला.
तिला विचारलं, "इथं कोण झोपलंय, आजीबाई?"
"माझा मुलगा कालुशा." भावशून्य रूक्ष शब्दांत ती उत्तरली.
"किती मोठा होता?"
"बारा वर्षांचा."
"कधी वारला तो?"
"चार वर्ष झालीत"
मग तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि हलकेच आपल्या अस्ताव्यस्त केसातून बाहेर पडणाऱ्या बटेला चादरीत खोसून दिलं...
एव्हाना दिवस माथ्यावर आला होता. सूर्य अगदी कठोरपणे आग ओकत होता. कबरीवर उगवलेले गवताचे खुरटे पाते उष्णता आणि धुळीनं पिवळे पडले होते. आजूबाजूची धुळीनं माखलेली आणि वाळलेली झाडेही या कबरीमध्ये इतक्या उदासपणे उभे होते कि जसे तेही शवच वाटावेत...
तिच्या मुलाच्या कबरीकडे सहानुभूतीने पाहत मी विचारलं, "असा अचानक कसा गेला तो?"
"घोड्यांनी चिरडलं त्याला." पुन्हा औपचारिक संक्षिप्त उत्तर.
मग तिनं आपला सुरकुत्या पडलेला हात त्या लहानशा कबरेवरून अलगद फिरवला. जशी ती आपल्या लेकराला झोपू घालत होती...
"कशी झाली हि दुर्घटना?" मी विचारलं.
खरं तर अशा प्रकारे चौकशी करणं हे सभ्यतेला धरून नव्हतं; पण त्या आजीबाईचा शोकविव्हल चेहरा आणि त्यावर दाटून राहिलेलं दु:ख माझी उत्सुकता वाढवत होतं. तिचा शांत आणि वेदनेनं काजळलेला चेहरा मला अस्वस्थ करत होतं. तिच्या निर्जीव डोळ्यातून अश्रू ओघळावेत असं राहून-राहून वाटत होते.
माझा प्रश्न ऐकून तिने पुन्हा माझ्याकडे पाहिलं. मग एक लहानसा श्वास घेऊन अगदी खोल आवाजात ती म्हणाली, "माझं दु:ख काय सांगू बाबा? माझ्या नवऱ्याला एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पोलीस घेऊन गेले. त्याला दीड वर्षाची कैद झाली होती. आधीचं आमची परिस्थिती नाजूक, तो गेल्यावर तर रोजच्या भाकरीचेही हाल व्हायला लागले. कारण घरात तोच एकटा कमावता होता. घरात होतं नव्हतं ते विकून आम्ही माय-लेक दिवस काढत होतो; पण ते संपल्यावर तर आमचे हाल फारचं वाढले...
मग नातेवाईकांच्या मेहरबानीवर आम्ही दिवस ढकलू लागलो. एका माळ्यानं आमच्या नातेवाईकाकडून खराब झालेलं गाडीभर गवत घरी आणून टाकलं. आम्ही तेच वळवून खात होतो, पण ते बेचव अन्न घशाखाली उतरत नव्हतं...
कालुशा शाळेत जायचा. अभ्यासाठी तो हुशार होतं. काय सांगू?...खूप समजदार होता हो माझं कालुशा! त्यानं कधी काही मागितलं नाही कि कशाची जिद्द केली नाही. उलट शाळेतून येता-येता रस्त्यात सापडलेलं एखादं लाकूड तो घरी येऊन यायचा.
तेंव्हा वसंत ऋतू चालू होता. बर्फ वितळत होता. आणि माझ्या कालुशाकडे पायात घालायला कापडी बुटाशिवाय काहीचं नव्हतं...
घरी आल्यावर तो ते बूट काढायचा, त्याचे पाय लाल लाल झालेले असत, पण आसवं गाळण्याशिवाय मी तरी काय करू शकत होते?
एक दिवस कालुशाच्या वडिलाला सोडून देण्यात आलं; पण तुरुंगातच त्याला लकवा झाला होता. घोडागाडीतून त्याला घरी आणून सोडलं. आधीच आमची खायची मारामार होती. आता खायला आणखी एक तोंड वाढलं. तो अगदी उदास डोळ्यांनी काही न बोलता आमच्याकडे बघत राहायचा. मला तर त्याचा फार राग येई. त्याच्यामुळेचतर आम्हा माय-लेकराचे असे हाल होत होते. कधी कधी वाटायचं, या मुर्द्याला उचलून तळ्यात फेकून द्यावं...
जेंव्हा कालुशानं पहिल्यांदा आपल्या वडिलांची हि स्थिती पाहीली, तेंव्हा तर त्याने दु:खाने किंकाळीच फोडली होती. अगदी पांढरा-फटक चेहरा पडला होता हो माझ्या पोराचा. डोळ्यांना तर धाराच लागल्या होत्या त्याच्या.
"काय झालंय बाबांना?" कालुशानं रडतंच विचारलं होतं.
"त्याचे दिवस भरलेत आता." मी रागातच म्हणाले होते.
नंतर तर आमची स्थिती आणखीनच वाईट होत गेली. मी मजुरी करत होते. दिवसभर अगदी अंग मोडेस्तर मी राबायचे; पण हातात वीस पैशापेक्षा जास्त रक्कम कधीच आली नाही आणि तेही हाताला काम मिळालं तरच. काय सांगू पोरा, नरकापेक्षाही वाईट स्थिती होती ती. कधी कधी तर वाटायचं कि हे आयुष्यच संपवून टाकावं. एकदा अगदीच सहन होईना, तेंव्हा मी चिडून म्हणाले, 'मला तर या जीवनाचा अगदी वीट आलाय. असं वाटतं कि, एक तर मी मरावं किंवा तुमच्या दोघांपैकी एकानं संपून जावं.'
माझ्या या बोलण्यावर नवरा तर केवळ मानच हलवू शकत होता. तो जणू म्हणत होता, 'तिरस्कार का करतेस माझा? थोड्याच दिवसांचा तर मी पाहुणा आहे. कबरेतच तर पाय लटकवून बसलोय...'
कालुशा काही न समजून माझ्याकडे पहातच राहिला. थोड्या वेळानं तो उठला आणि बाहेर गेला. नंतर मला माझ्या बोलण्याचा फार पश्चाताप होत होता. अगदी मेल्याहून मेल्यासारखं होत होतं मला.
त्यानंतर एखादा तासच झाला असेल, एक शिपाई आमच्या घरी आला.
तो म्हणाला, "कालुशाची आई तूच का?"
माझा तर जसा श्वासच अडकला. मी हो म्हणून मन हलवली.
'तर तुला दवाखान्यात यावं लागेल. तुझा मुलगा एका व्यापाऱ्याच्या घोडयाखाली येऊन गंभीर जखमी झालाय,' शिपाई म्हणाला.
ज्याची भीती वाटत होती तेच झालं होतं. शिपायाच्या गाडीतच मी दवाखान्याकडे निघाले...
गाडी तर जसे गरम कोळसे ठेवल्यासारखं वाटत होतं. मी राहून राहून स्वतःलाच शिव्या देत होते. कोणत्या अशुभ क्षणी माझ्या मेलीच्या तोंडून ते शब्द निघाले होते!
दवाखान्यात कालुशाची स्थिती पाहून तर मी सुन्नच झाले. पलंगावर जसा पांढऱ्या पट्ट्यांचा गठ्ठाच टाकलेला होता. त्याचं अख्खं शरीर कापडी पट्ट्यांनी गुंडाळलेलं होतं. त्यानं क्षीण नजरेनं माझ्याकडे पाहिलं, मग नकळतच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो कसा-बसा म्हणाला, "आई मला माफ कर. मी जास्त काळ तुझी सेवा करू शकत नाही...आणि पैसे शिपायाकडे आहेत." हे ऐकून तर मला आश्चर्यच वाटलं.
"पैसे? कसले पैसे? हे तू काय बोलतोस बेटा?" मी रडतच विचारलं.
"तेच पैसे जे रस्त्यावर लोकांनी मला दिले आणि हो, त्या घोड्याच्या व्यापाऱ्यानही काही पैसे दिलेत." कालुशा कसा-बसा बोलला.
"पण हे सगळं कशासाठी बाळा?"
माझा गोंधळ संपत नव्हता.
"यासाठी कि..." इतकं म्हणून त्याच्या तोंडून हलकीशी किंकाळी बाहेर पडली. त्याला शरीरभर वेदना होत असाव्यात. त्याचे डोळेही आपोआप मोठे झाल्यासारखे वाटले.
"कालुशा... माझ्या पोरा! मी ओरडलेच. बेटा, हे सगळं कसं झालं? तुला काय ते घोडे येताना दिसले नाहीत?"
अगदी सहजपणे कालुशा उत्तरला,"घोडे तर मी पहिले होते आई! मुद्दामच मी जागचा हललो नाही. मी विचार केला कि, या घोड्यांनी मला चिरडल, तर लोक सहानुभूतीनं पैसे देतील आणि घोड्याच्या मालकालाही नुकसानभरपाई द्यावीच लागेल. त्याने तुझा भार काही प्रमाणात तरी हलका होईल...पैसे त्या शिपायाजवळ आहेत आई. ते तू घेऊन टाक."
कालुशाचे हे शब्द माझं काळीज चिरून गेले. माझे डोळे तर अश्रूत बुडून गेले होते. माझ्या लाडक्या पोराच्या या स्थितीला तर मीच जबाबदार होते. मी, मी, त्याची स्वतःची आई! पण आता पश्चाताप करण्याशिवाय मी काय करणार होते...आणि दुसऱ्या दिवशी काळूशाने कायमचे डोळे बंद केले. त्याला शेवटपर्यंत आमचीच चिंता होती. तो शेवटपर्यंत बडबडत राहिला, बाबांसाठी हे घे, ते घे आणि आई, तुही स्वतःसाठी काही तरी घे बरं का!
"माझ्या लेकराचा जीव घेतला ते एकूण सत्तेचाळीस रुपये जमले होते. खरं म्हणायचं तर त्या पैशांनी नाही तर मीच कालूशाचा जीव घेतला होतं..."
इतकं बोलून ती म्हातारी स्त्री शांत झाली तिचं बोलणं थांबताच भयाण शांततेनं ती स्मशानभूमी व्यापून गेली. असं वाटत होतं कि, सभोवतालची शांत झाडं, आजूबाजूला पडलेली मातीची ढिगार आणि कबरीवरच्या टोकदार निशाण्या या सगळ्यांचं तिची कटू कहाणी ऐकत होते.
आकाश अगदी निरभ्र होतं. ढगांचा लहानसाही धब्बा कुठं दिसत नव्हता. सूर्याचं धरतीवर आग ओकण चालूच होतं. एवढं दु:ख सहन करूनही ही स्त्री कशी जिवंत राहिली असेल याचा मी विचार करत होतो. काय करावं ते न समजून मी खिशातून काही नाणी काढली आणि तिच्याकडे हात सरकवला.
आपली मान वळवत ती उपरोधान म्हणाली, "माझ्यावर दया करू नकोस बाबा! आजच्यासाठी माझ्याकडे भरपूर आहे. माझा कालुशा सोडून गेलाय ना! आणि पुढच्या काळासाठी मला गरजच नाही...मी एकदम एकटी आहे...या जगात एकदम एकटी."
ती पुन्हा शांत झाली. आपल्याच तंद्रीत कबरीकडे मान वळवत ती पुन्हा आपल्या लाडक्या कालूशाला पाहण्यात गुंग झाली....


क्झीम गॉर्की
अनुवाद:डॉ. विशाल तायडे
संकलक:प्रवीण कुलकर्णी

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....