
चल आता बोलून घेऊ! बोलून घेऊ थोडे!
सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे!
संपत चाललाय पाऊसकाळ! विरत चाललेत मेघ!
विजेचीही आता सतत उठत नाही रेघ!
मृदगंधाने आवरून घेतलाय धुंदावण्याचा खेळ!
मोरपंखी पिसा-यांनी ही मिटण्याची वेळ!
सावळ्या सावळ्या हवेत थोडं मिसळत चाललंय उन्ह!
खळखळणारी नदी आता वाहते जपून जपून!
चल आता बोलून घेऊ! बोलून घेऊ थोडे!
लक्षात ठेव अर्थापेक्षा शब्दच असतात वेडे!
मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट!
लपले असतील अजून कोठे चुकार शब्द धीट!
नजरा, आठवण, शपथा....सा-यांस उन्ह द्यायला हवे!
जाण्याआधी ओले मन वाळायला तर हवे!
हळवी बिळवी होत पाहू नको माझ्याकडे
माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे
भेटण्याआधी निश्चित असते जेंव्हा वेळ जायची!
समजूतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची!
एकदम कर पाठ आणि मन कर कोरे!
भेटलो ते ही बरे झाले! चाललो ते ही बरे!
मी हे घेतो आवरून सारे! तू ही सावरून जा!
तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा!
खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे!
'करार पूर्ण झाला' अशी सही तेवढी घे!
संदीप खरे
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment