Wednesday, 31 March 2010

एक कैफियत


रोखली संगीन छातीला रुते,
गारदी घेऊन आले शृंखला
लाथही कोणी बुटाची हाणली
अन मला माझा सुगावा लागला!

बाजूच्या दारातून डोकावती
ओळखीचे चेहरे घाणेरडे;
हालती पालीपरी काही जिभा :
सारखी माझ्यावरी थुंकी उडे!

थंड नेत्रांनी तटस्थासारख्या
येथल्या भिंती मला न्याहाळती;
मात्र मी काढून छाती बोलतो
शब्द जे ओठांवरी ओठंगती!

कातडी सांभाळून आपापली
दूर झाल्या सोबत्यांच्या इभ्रती:
सोयरे सारेच सोयीचे घरी
भाकिते माझी चुलीला सांगती.

काल ह्या गल्लीत आयुष्यासवे
गीत माझे झुंजले अन हारले!
नागवी अद्यापही माझी घृणा;
मी कुठे हत्यार खाली टाकले?

सुरेश भट
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....