
हासताना प्राण गेला का तुला आले रडे?
हे पहा लोक सारे कोरडेच्या कोरडे!
का अशी मागून ही
ढाळशी तू आसवे?
संपलो केंव्हाच मी
त्या तुझ्या स्वप्नासवे.
तारकांनाही न आता खूण माझी सापडे!
तू असा छेडू नको
अंतरीचा जोगिया;
हो चिता माझी पुन्हा
लागली जागावया.
ही पहा राख माझी वारियासंगे उडे!
एकदा नेत्री तुझ्या
चांदणे मी वेचले;
एकदा ओठी तुझ्या
गीत माझे गुंफिले.
आज अस्थाईच माझी अंत-यापाशी अडे!
सुरेश भट
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment