
ठरवून सवरून तार छेडली जात नाही. हृदयाची तार तर मुळीच नाही. अगदी अपघातानं, बोलाफुलानं जे काही होईल तेच खरं! फुलवणारी बोटं मोठी नाजूक आणि सुकुमार असली तरी कळी फुलवून फुलवून फुलत नाही. मंद वाऱ्याच्या झुळकीवरच डुलता ती फुलली पाहिजे.
धुरकट वाळूवर एका शांत निर्जन कोपऱ्यात रागिणी बसली होती. काही महत्वाचं ठरवायला ती अधीर झाली होती. खुंट्या पिळण्याच्या प्रयत्नात होती. ताणलेल्या तारावर हळुवार तर्जनी ओढायला. भविष्यात निनादणाऱ्या गोड मंद सुरांची लय-उदबत्तीतून निघणा-या सुगंधी वलयासारखी तिच्या गात्रा गात्रावरून आत्ताच तरंगत होती. कोमल शरीराची प्रत्येक नस विलग होऊन धुंदीनं थरथरत होती. गेले कित्येक दिवस या धुंदीत ती डुंबत होती. अगदी वेगळा अनुभव!
मन खोदून खोदून तिनं खोलवर पाहिलं. असे धुंद क्षण तिनं पूर्वी कधीच अनुभवले नव्हते. मधूच्या प्रेमपाशात होती तेंव्हा नाही, त्याच्या बाहुपाशात होती तेंव्हा नाही.त्याचे नाव घेऊन जुन्या मुलीसारखे उखाणे घेतले तेंव्हा नाही.
नाही....नाही....नाही!
कळी फुलण्याची क्रिया वेगळीच!
सहा महिने लोटले असतील! किंवा अधिकही! इथं काळाला अर्थ नाही. अर्थ फक्त गतीला. तीही उलटसुलट! काल भेट झाली तर ती वर्षापूर्वी झाल्यासारखी वाटावी, आणि सहा महिन्यापूर्वीचा एखादा क्षण क्षणापूर्वीच ओंजळीतून निसटल्यासारखा वाटावा.
ती वाट तिची नव्हतीच! त्या वाटेनं ऑफिसला जायचं म्हणजे दोनतीन फर्लांगची अधिक पायपीट! पण एकदा ती त्या वाटेनं गेली. कोप-याकडे वळता वळता तिनं सहज वर पाहिलं. श्री वर उभा होता. आपल्या घराच्या बाल्कनीत. उघडाच, एका खांद्यावर शुभ्र धोतराचा सोगा. लालसर गोरं अंग. आतनं पेटल्यासारखं. ऐटीत सिगारेट ओढत होता. त्याला पाहता पाहता --त्याचं लक्षच नव्हतं-रागीनीची चप्पल ठेच लागून तुटली. ती ओढत ती हळूहळू चालत राहिली. मधेच तिनं पुन: वर पाहिलं. त्याचे केस कपाळावर झुळझुळत होते आणि सिगारेटचा धूर तरळत होता. अंतर खूप होतं. तरीही सुगंधी धुराचं वलय आपल्या नाकावरून तरंगत जात आहे असं तिला वाटलं!
ती निघून गेली. जाता जाता कुठं तरी चरा पडलाय किंवा पडतो आहे, असं तिला वाटलं. म्हणून तिनं मुद्दामच मन क्षणभर ओढून धरलं. आपलं लग्न झालं आहे. मधुशी आपण प्रेमविवाह केला आहे. गेल्या पाच सहा वर्षात आपल्याला मूल झालं नसेल, नसेना. ते काही वैगुण्य नव्हे! अद्यापतरी तिला मुलाचं वेद नव्हतं. झालंच तर नको असं काही नाही, पण झालं नाही तर वेड लागेल असंही नाही! उलट आहे ते वाईट नाही. मधू फिरतीवर असतो. आपलं ऑफिस आहे. मैत्रिणी आहेत. मधू येतो तेंव्हा संसारिक व्हावं. घरी काकुसारखं जेवण करावं. तो परगावी असेल तेंव्हा बाहेर कुठंतरी! एकटीनं किंवा मैत्रिणीसह! असेल! पण आपण शेवटी मधूची बायको आहे...दुसरा एखादा पुरुष कितीही उमदा दिसला तरी मनात भरवून बरं नव्हे...!
बरं नव्हे, बरं नव्हे म्हणत म्हणताच ती बुडून गेली. मधेच भान यावं, तोल सावरण्याचा यत्न करावा, तर पायाखालची जमीन घसरू लागली. तोल सुटू लागला. एक गाठ सोडावी तर दुसरीकडे गाठ बसून गुंता वाढू लागला.
पूर्वी तो त्या बसनं कधीच जात नसे. पण त्यानं तो नवा क्रम सुरु केला. कपडे करून तो बाल्कनीत उभा रहायचा. ती दिसली की झटपट खाली उतरायचा. मागनं मागनं चपळाईनं चालायचा. बसच्या रांगेत येऊन तिच्या मागं उभा रहायचा.
कुठला सुवासिक परफ्युम वापरायचा कोण जाणे! पण जवळ उभा राहिला की तिला सुवासात, मादक, गंधात मग्न होऊन तरंगल्यासारखं वाटायचं.तिनं एकदा धीर करून विचारलं. तर प्रिन्स चार्मिंगची मखमली डबीच त्यानं तिला भेट दिली. तो तसा मागं उभा राहिला की शीतल छाया टाकणारा वृक्ष मागं असल्यासारखं तिला वाटायचं.त्यावर डोकं टेकावं, त्यावर वेलीसारखं डूलावं असं तिला वाटायचं. बसमध्ये चढताना तो तिचा पुष्ट दंड धरायचा आणि तिला वर चढवायचा. पुरुषी स्पर्श तिला अनोखा नव्हता. तरी ती मोहरून जायची. बसल्या बसल्या दंडाकडे पहायची. त्यावर चार लाल बोटं उमटलेली असायची. पुढं ती आत शिरायची. तरीही स्वप्नाळू वयात येऊन ती एकांतात आपल्या दंडावर आपले ओठ ठेवायची.
कधी कधी ऑफिस लवकर सोडून ती सिनेमाला जायची. शेजारी श्री! तिच्या चेह-यावर विलक्षण बावरे भाव तरळत असायचे. नवरा शेजारी असला म्हणजे सहजी न तरळणारे. त्यामिले भोवतीचे लोक बघायचे. बघण्यासाठी वळायचे. स्वच्छ सुगंधित अंगाला ओंगळ, गिळगिळीत डोळे चिकटल्यासारखे वाटायचे. सुरुवातीला तर खूपच!
मग तो तिच्या घरीही यायचा. ती त्याच्या आवडीचं जेवण बनवायची. गप्पा रंगायच्या. जेवताना आणि एरव्हीही गप्पा रंगवण्याची त्याची हातोटी असामान्य होती. आवाज पुरुषी पण तालबद्ध होता. सिगारेटीच्या धगीनं तापलेला. कुठल्याही विषयाचं त्याला वावडं नव्हतं. संगीत, कला, साहित्य, चित्रपट, नाटक! तन्मय होऊन बोलायचा. मधून मधून राजकारण. विनोद सभ्य आणि असभ्यही! त्याला मोठी कसली महत्वाकांक्षा नव्हती. पैशाचा विशेष लोभ नव्हता. समाधानी वाटायचा. समंजसही! तत्वज्ञान्यासारखा. तरीही मधेच वय विसरायचा. एखादा विनोद करताना टाळीसाठी हात पुढे करायचा. ती द्यायची. सलगीत आला तर खांद्यावर हात ठेवायचा.
तिचा चेहरा त्या सलगीनं मधुरा व्हायचा. तो त्याला आवडायचा. तो बघत राहायचा. तिच्या डोळ्यांकडे बघत बघता तिच्या डोळ्यांवरचे मधाचे ठिपके पसरट होत!
तिने एकदा त्याच्या मानेभोवती हाताचा विळखा टाकला आणि तोंड वर केलं. त्यानं ते मधाचे थेंब पाहिले. मंदसा हसला.
"पूर्वी एकदा सांगितलंय मी तुला!"
"काय?"
"माझं लग्न झालंय म्हणून!"
"मग?" माझंही झालंय!"
तो हसला. पण हसता हसता त्यानं नापसंतीनं मान हलवली.
तिनं हात खाली घेतले.
पण सहवास चालू राहिला.
आता मात्र ती निकरावर आली होती. श्रीला तिनं वेळ ठरवून मुद्दाम बोलावलं होतं. शांत, मोकळ्या, उल्हासित मनानं. तशाच वातावरणात. श्रीची वाट बघत ती बसली होती.
पाठीमागं उंच उंच नारळाची झाडं वा-यानं तल्लीन होऊन डुलत होती. समोर सूर्य अस्ताला चालला होता. वातावरणात एक प्रकारची विलक्षण थरथर होती. पुन्हा पुन्हा येणा-या समुद्राच्या लाटा खडकावर आदळून फुटत होत्या. फेस हर्षभरित झाल्यासारखा उसळत होता. साखळदंड आपटून फोडावेत तसा आवाज उठत होता.
अधीर होऊन ती वाट बघत होती. वाळूवर हात फिरवून त्यावर काडीनं श्रीकार काढत होती. एकदा-दोनदा-पुन: पुन:!
ऐटबाज चालीनं येताना श्री दृष्टीस पडला तेंव्हा तिचं हृद्य फुलून अंग थरथरलं. पाठीच्या मणक्यातून थंडगार नागीण सळसळत गेली. तिनं हात वर करून इवलासा हातरुमाल हवेत हलवला. प्रिन्स चार्मिंगचा गंध हवेत तरंगला. पाहता पाहता श्रीच्या खांद्याला डोकं टेकत, त्याचा दंड धरून आपणच त्याच्याबरोबर चालत आहोत असा तिला भास झाला. क्षणात तिला हरवल्यासारखं वाटलं. आपलं वेगळं अस्तित्व एकदम विरघळून गेल्यासारखं वाटलं.
"बैस ना-"
तिच्या खांद्यावर हाताचा भार ठेवीत तो शेजारी बसला. पुढ्यातल्या वाळूत श्री-श्री-श्री-श्री अशी अक्षरं दिसली!
"हे काय चाललंय?"
असं विचारताना त्याला खूप बरं वाटलं. रागिणीसारखी स्त्री आपल्यावर मन टाकून आहे हे पाहून कुणाला हर्ष होणार नाही?
तिनं लटकी मान तिरकी केली.
"काय चाललंय हे?" त्यानं पुन्हा विचारलं.
"श्रीची स्थापना करतेय-"
"वा! जागा छान आहे!"
"का?"
"लाटाही जवळच आहेत. भरती आली की आपोआप विसर्जन होईल श्रींचं!"
तिला ते आवडलं नाही. काही बोलली नाही!
तोही बोलला नाही. क्षणभर त्याने आकाशाकडे पाहिलं. किलबिलाट करीत पक्षांचा थवा परतला होता.
"ढगांचे रंग किती सुरेख दिसताहेत नाही?" असं तो म्हणाला.
तिनं वर पाहिलं पण काही बोलली नाही.
थोडासा वेळ तसाच गेला. शांत वातावरण अगदी फुटेपर्यंत फुगत आहे असं वाटलं. खळखळणा-या सागराकडे दोघांचंही लक्ष नव्हतं.
"आज काही बोलायचं नाही असं व्रत नाही ना घेतलंस-"
तरीही ती बोलली नाही. वाळूतले चार शंख तिने गोळा केले. आणि एकेक वर उडवीत झेलीत राहिली.
"आज थोडं स्पष्ट बोलायचं आहे असं म्हणाली होतीस ना?"
"होय!" असं म्हणून तिनं त्याच्याकडे टक लावली.
"काय बोलायचं आहे?"
त्यानं वाळूत टोकदार ढीग करायला सुरुवात केली.
"आपण हे असं कुठवर राहायचं?"
"म्हणजे?"
त्यानं एकदम वाळूतले हात झाडले आणि विचारलं. त्याला खरोखरच काही कळलं नाही.
"असं वेड पांघरू नकोस श्री-"
"दोघांपैकी एकालाही मैत्री नको वाटली तर आपलं भेटणं बंद होईल."
"इतकं साधं आहे हे?"
"का नाही?"
"मधुच आणि माझं दिवसेंदिवस पटणं कठीण होतंय-"
"का?"
"तो सारखा फिरतीवर असतो. त्याला कुणी कुणी भेटत असतील-"
"कशावरून?"
"पुरुषांचं काय सांगता येते?"
"पुरुष काय पुरुषाला भेटतो? तो स्त्रीला भेटत असेल तर त्या स्त्रीनं का भेटावं? मी तुला भेटतो म्हणजे तुही मला भेटतेसच ना?"
"हे पहा- श्री, उगाच लांब लांब चर्चा नको...."
"तुझा काय विचार आहे?"
"तुझी संमती असेल, तू हो म्हणत असशील तर-" ती पुन्हा शंख झेलू लागली.
"तर काय?"
"तर मी मधूला मोकळा करीन. त्याला काय हवं ते तो करील. मला हवं ते मी करीन! आपण दोघं सुखी होऊ-"
झेलता झेलता शंख खाली पडू लागले.
"रागिणी माझं लग्न झालेलं आहे. मला दोन मुलं आहेत. माझं वय बेचाळीस वर्षांचं आहे. मला वाटतं, मी हे सारं तुला पूर्वीच सांगितलं आहे-"
"मग काय झालं? पोटगी देऊन लतेला-"
श्री विचित्रच हसला. आणि ओल लागेपर्यंत वाळू खोदत राहिला.
"लतेवर माझं प्रेम आहे, रागिणी"
असं म्हणत त्यानं टायची गाठ सैल केली. आणि कॉलर सोडून गळा दाखवला, गळ्यावर एक जुनी बुजलेली जखम होती. जखमेचा वण दाखवत तो म्हणाला,
"हे काय आहे माहित आहे?"
ती जिज्ञासेने बघत राहिली.
"लतेशी लग्न करायला विरोध झालं तेंव्हा मी माझा गळा कापत होतो. मला रक्ताच्या थारोळ्यात बघून सर्वांनी विरोध मागे घेतला. मग बरा झालो आणि लग्न केलं. जिच्याशिवाय मी एकवेळ जगू शकत नव्हतो, तिला आता सोडू?"
"तसं माझंही मधुवर लग्नापूर्वी प्रेम होतं-"
"तेच म्हणतोय मी! यदाकदाचित आपण पुन: लग्न केलं आणि काही काळ लोटला म्हणजे पुन: तू किंवा मी एकमेकांना कंटाळू आणि पुन: एकदा सोडचिट्ठीची भाषा बोलू."
"नाही रे श्री! असं होणार नाही. आपलं खरं प्रेम आहे ना एकमेकांवर?"
बोलता बोलता बिलगण्यासाठी ती जवळ आली.
"खरं प्रेम? एक खरं सांगू तुला, रागिणी?"
ती मान वळवून त्याच्याकडे बघत राहिली.
"लैंगिक आकर्षणाचे हे खेळ आहेत. हे आकर्षण जन्मभर टिकत नाही, पुरत नाही. उघड मिळालेल्या वस्तूचं आकर्षण राहत नाही. जे मिळत नाही, मिळणार नाही, हाती लागणार नाही त्याचंच अधिक आकर्षण वाटतं!"
"मग आपण काय करायचं?"
"अंतर ठेवून मैत्री ठेवायची?"
"नुसतीच मैत्री? का?"
"एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं म्हणून. आपण एकमेकांना मिळालो, बिलगलो तर, काही दिवसात नवलाई संपेल. आकर्षण कमी होईल. मग कदाचित माझ्यापेक्षा तुला पुन: मधु बरा वाटेल, आणि तुझ्यापेक्षा मला लता अधिक बरी वाटेल."
"तू काय बोलतो आहेस ते तुला तरी कळतंय का नाही, कोण जाणे? असल्या आकर्षणाचा उपयोग काय?"
"मन उत्तेजित रहातं. हुरूप टिकून राहतो."
"उपयोग काय?"
"इथं नफातोट्याची भाषा काय कामाची, रागिणी? तुझं मन माझ्यामुळे उत्तेजित झालं तर त्याचा तुला तुझ्या संसारात उपयोग होईल. मला माझ्या संसारात! मनं टवटवीत हवीत?"
"तुला मला बाजूला करायचंय ! समजतंय मला!"
ती एकदम फणकारल्यासारखी बोलली. हातातले शंख तिनं तिरस्कारानं बाजूला फेकले. श्रीशी ओळखदेख नसल्यासारखी ती बाजूला तोंड फिरवून बसली. तिचा श्वास वाढत होता. नाक लालबुंद होत होतं. आता कुठल्याही क्षणाला ती रडली असती.
"रागिणी, तू वाईट वाटून घेऊ नकोस. मैत्रीचं रूपांतर शेवटी लग्नातच व्हायला पाहिजे असं मानलं तर शेवटपर्यंत दु:खच पदरात येत जाईल. आपलं मन कधीच स्थिर होणार नाही."
ती काही बोललीच नाही. पर्स उघडून तिनं रुमाल काढला आणि वर बघत तिनं घाम पुसण्याचं निमित्त करून डोळे पुसले.
सगळं वातावरण धूसर धूसर झालं होतं. काही क्षणांनी अंधार गर्द होणार होता. श्रीला अजून बोलायचं होतं. तडकाफडकी लग्न मोडून मुलाबाळांवर कशी आपत्ती ओढवते, मुलांचा दोष नसतानाही त्याची कशी परवड होते ते सारं सांगायचं होतं. या वयात वाटणारं आकर्षण टिकावू नसतं हे समजून द्यायचं होतं. आज त्याला बघून तिला आकर्षण वाटलं. तिला बघून त्याला आकर्षण वाटलं.
उद्या त्याच्यापेक्षा अधिक सुंदर, अधिक आकर्षक असा पुरुष तिच्या दृष्टीस पडेल. तिच्यापेक्षा अधिक आकर्षक स्त्री त्याच्या नजरेत येईल. आकर्षणाच्या कक्षा बदलतील. प्रेमाची आणि लग्नाची नवीन भाषा सुरू होईल. सुखाच्या मागं लागण्याच्या इर्षेत दु:खच पदरी पडेल. याला अंत नाही. हे कधीच संपणार नाही....
त्याला हे सारं समजून द्यायचं होतं. पण ती काहीएक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. संतापानं तिची नस नि नस थरथरत होती.
अंधार गडद झाला.
रुमालानं तिनं गाल पुसले. नाक पुसलं. तिच्या गालावरून पाणी ओघळत होतं. पण अंधारात त्याला काही दिसत नव्हतं.
तेवढ्यात पर्स उचलून ती उभी राहिली. आणि त्याच्याशी कधी भेटगाठ झालीच नव्हती अशा त-हेवाईक रीतीनं ती वाळूतून चालत राहिली. तोही उठला. तिच्या बरोबरीनं चालू लागला.
"रागिणी...."
तिनं न ऐकल्यासारखं केलं.
"रागिणी, तुझ्या सुखासाठी सांगतो....समजून घे-"
पण तिला परवा नव्हती. त्याला टाळण्यासाठी तिनं पावलांची गती वाढवली. त्यानं मुद्दाम आपल्या पावलांची गती कमी केली.
अंतर पडत गेलं. वाढत गेलं.
ती वेगानं चालत राहिली.
तो पाहत राहिला. पाहता पाहता एक सफेत ठिपका काळोखात विरघळून गेला.
दुसरे दिवशी तो नेहमीसारखा बाल्कनीत उभा राहिला.
त्याला मात्र तिचं आकर्षण वाटतच होतं.
पण ती मात्र त्या वाटेनं पुन: कधीच गेली नाही.
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment