Monday 29 March 2010

अल्कोहोल


रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल
भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल!

दुनियेसाठी टाकाऊ अन नकोनकोसे गटार हे
माझ्यासाठी निर्झर होऊन खळखळणारे अल्कोहोल!

हवाहवासा गंध जिण्याचा हवेत हलके विरताना
नकोनकोसा दर्प होऊनी दरवळणारे अल्कोहोल!

हाक कुणी इतुकी न देते! साथ कुणाची ना मिळते!
रक्तासोबत इमान होऊन विरघळणारे अल्कोहोल!

घाव बैसता तडफडतो जीव! ना उरतो ना जातोही!
शेपूटतुटकी पाल होऊनी वळवळणारे अल्कोहोल!

जगास वाटे अनैतिक जे! निषेध करते जग ज्याचा!
अशा अबोली दु:खावरही हळहळणारे अल्कोहोल!

सन्मानांचे दिवस झेलतो, जरी कौतुके जग अवघे!
तिच्या कटाक्षावाचून रात्री तळमळणारे अल्कोहोल!

फणा काढल्या मृत्युवरती मोहून गेला मंडूक मी!
जातिवंतसे जहर होऊनी सळसळणारे अल्कोहोल!

रसायनांची किमया नामी! यमदूतांचे कष्ट कमी!
हे मृत्यूचे भाग्य होऊनी फळफळणारे अल्कोहोल!

मी त्या पितो! ते मज पिते! दोघांमध्ये खेच सुरु!
पुरुनी उरूनी थडग्यापाशी भळ
भळणारे अल्कोहोल!


संदीप खरे
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....