
वेगवेगळे गुन्हे केले म्हणून चौदा वर्षांची मी शिक्षा भोगत या तुरुंगात खितपत पडलो आहे. तसे म्हणाल तर मी एकही गुन्हा केला नाही. परमेश्वरास साक्षी ठेवून खरे सांगेन, खोटे सांगणार नाही, असे मी कोर्टात वारंवार सांगितले, आणि माझ्यावर लादलेला प्रत्येक आरोप मी अमान्य केला, पण कोर्टाने माझे म्हणणे मान्य केले नाही.
तसे म्हणाल तर मी शास्त्रज्ञ होतो, एवढाच माझा गुन्हा! आता तर मला असे वाटते की भल्या माणसाने शास्त्रज्ञ होऊ नये किंबहुना अंताला 'ज्ञ' आहे [उदा: सुज्ञ, तत्वज्ञ वगैरे] असं कोणताच शब्द आपण आपल्या अंगाला चिकटवू नये. पण दुर्दैवाने मी शास्त्रज्ञ होतो. लहानपणापासूनच मला यंत्राचे आकर्षण! आपल्या हातून एखादे असामान्य यंत्र निर्माण व्हावे आणि त्याचा आपल्या देशाला अतोनात उपयोग व्हावा, त्या यंत्राचा उपयोग करता करता लोकांनी मला भारताचा एडिसन म्हणावे एवढीच माझी माफक इच्छा होती.
त्या दृष्टीने मी खूपसे प्रयत्न करत होतो. घर म्हणजे अक्षरश: प्रयोगशाळा होती. दिवसरात्र खपून मी बारीकसारीक यंत्रे तयार करीत होतो आणि समाधान होत नाही म्हणून मोडत होतो. किरकोळ एकदोन यंत्रे केली, पण परिस्थिती बदलल्यामुळे ती यंत्रे कुचकामी ठरली.
उदाहरणार्थ, बटन दाबताच आपोआप ताक घुसळणारी एक रवी मी तयार केली होती. पण दुधाचीच टंचाई निर्माण झाली. त्यामुळे ताक तयार करण्याचा प्रश्नच मिटला. [आता 'ताकाला येऊन वाटी लपवणे' एवढी एक खोटी म्हणच तेवढी शिल्लक राहिली आहे.!]
आवाज शोषून घेणारे मी आणखी एक यंत्र तयार केले होते. हे यंत्र तयार करण्यामध्ये माझा हेतू शृंगारिक होता. मुंबईसारख्या शहरात एकेका खोलीत पडदा टाकून दोन दोन जोडपी झोपतात. तोंडातून आवाज निघेल म्हणून त्यांना कडकडून चुंबने सुद्धा घेता येत नाहीत. विचार केला, त्यांना बिछान्यावर हे छोटे यंत्र ठेवता आले, तर चुंबनाचा आवाज येणार नाही. पण हे यंत्र तयार होते न होते तोच विभक्त कुटुंबपद्धती रूढ होऊ लागली. त्यामुळे आवाज चोरण्याचा प्रश्नच मिटला. त्या यंत्राला मागणीच येईना. केलेले एक यंत्र तेवढे पडून होते. ते पाहून आणि त्याच गंमत ऐकून शेजारचे नरसोपंत ते यंत्र घेऊन गेले. वयाची तब्बल साठ वर्षे उलटून गेलेले हे नरसोपंत! त्यांना ही उठाठेव कशाला? शिवाय दात पडल्यामुळे तोंडचे बोळके झाले होते. तीच गत काकूंची! पण म्हंटले, नेम नाही! तोंडात दात नसल्यामुळे त्यांच्या चुंबनाचा आवाज [आवाजच] मोठा येत असेल आणि तो चोरण्यासाठी नरसोपंत हे यंत्र नेत असतील.
मी म्हटलेही, "नरसोपंत, ही उठाठेव कशाला?"
तर ते काही बोललेच नाहीत. यंत्र घेऊन गेले. आगपेटीएवढे ते यंत्र चोवीस तास ते कनवटीला लावून हिंडत. कशासाठी ते मला कळले नाही. पण मागवून जे कळले ते ऐकून मी अस्वस्थ झालो!
मुळात शृंगारिक हेतूने तयार केलेल्या या यंत्राचा उलट उपयोग करून हा म्हातारा या यंत्रामुळे हल्ली लोकांची अक्षरश: मुस्कटदाबी करतो आहे हे ऐकून बरे वाटले नाही. त्यामुळे एखादे दिवशी म्हातारा पकडला जाईल तेंव्हा त्याला कळेल. काही दिवसापूर्वी 'मुंबई बंद' करण्यासाठी शिवतीर्थावर एक प्रचंड जाहीर सभा होती. जॉर्ज फर्नांडीसचे भाषण होणार होते. मुंबई कशी आणि केंव्हा बंद करायची हे जॉर्ज साहेब सांगणार होते. जॉर्जसाहेब अगदी पंचम जॉर्जच्या थाटात आले. व्यासपीठावर चढले. लोकांनी प्रचंड घोषणा केल्या, जॉर्जसाहेबांनी मायक्रोफोन हातात धरून 'बेहेनो और भाइयो-' अशी सुरुवात केली. काँग्रेसच्या राजवटीत कसे अन्याय चालू आहेत, ते सांगितले. तेवढ्यात कनवटीवर हात ठेवून व्यासपीठाच्या शेजारी बावळटासारखा चेहरा करून नरसोपंत येऊन उभे राहिले. बटन दाबले आणि काय गंमत? जॉर्जसाहेबांचे फक्त हातवारे! एक वार, दोन वार....फक्त हातवारे! तोंडातून शब्द येईना. लाउडस्पीकरवाल्यांची धावपळ! पण लाउडस्पीकर तरी काय करणार? नरसोपंतानी 'स्पीकरच' आउट केला होता. जॉर्जसाहेब पाच मिनिटे तोंडाची उघडझाप करीत हवेत मूठ उडवत राहिले. पण बोलून चालून दोन मुठी, हवेत उडवणार किती? दरम्यान प्रचंड जनसमुदाय एकदम अस्वस्थ झाला. जॉर्जसाहेबांनी खांदे पाडले. आणि तोंड मिटून स्वस्थ उभे राहिले. तेवढ्यात नरसोपंतानी कनवटीवर पुन: हात घेतला आणि यंत्र बंद केले. तोच काय? लोकांची प्रचंड बोंबाबोंब! सर्वांचे म्हणणे या भंपक पुढा-याने ऐन वेळी कच खाल्ली! क्षणार्धात दगड, जोडे यांचा वर्षाव सुरु!
त्यानंतर पुन: मुंबई बंद झाली नाही!
"मी हयात असेपर्यंत मुंबई बंद होऊ देणार नाही!" असे नरसोपंत मला अभिमानाने सांगू लागले!
मी संतापलो, आणि म्हटले, "नरसोपंत, यामुळे तुम्ही एकदा..."
नरसोपंतानी कनवटीवर हात ठेवून माझाच आवाज बंद केला!
दोन यंत्रे तयार केली त्याची ही गत.
त्यानंतर फ्रांक स्टोकटन या अमेरिकन लेखकाचा एक लेख माझ्या वाचनात आला. त्या लेखाचे नाव 'उलटे गुरुत्वाकर्षण!' आले काही लक्षात? गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? झाडावरचे फळ तुटले की खाली पडते, गच्चीतून दगड टाकला, की तो खाली पडतो. हा गुरुत्वाकर्षणाचा नियम! एखाद्या यंत्राने हा नियम उलटा करता आला तर वस्तू खाली पडण्याऐवजी वर जाईल! तो लेख वाचला मात्र!---आणि माझ्या डोक्यातली चक्रे उलटी फिरू लागली. त्याचवेळी भारत-चीन युद्ध सुरु झाले. उंच उंच हिमशिखरावर चढणे, तेथे रसद पुरवणे आपल्या सैन्याला कठीण जात होते. म्हणून मी अहोरात्र झटलो. काही दिवसातच आगपेटीच्या आकाराची दोन यंत्रे तयार केली.
एकदा एक रात्री एका निर्जन अशा जागी गेलो. दोन्ही यंत्रे दोन्ही बगलेत धरली. खांद्यावर चामड्याचे पट्टे आवळले. आणि कळ दाबली. आणि किती मौज! हळूहळू तरंगत तरंगत वर गेलो. कळ आणखी थोडी वर सरकवली की सोसाट्याच्या वेगाने वर! वा:! खूपच मौज आली. पहाटेपर्यंत थंड हवेत तरंगलो. चंद्रसुद्धा जवळ आल्यासारखा वाटला.
मनात आले, अशी लाखो यंत्रे करून आपल्या सैन्याला दिली तर सारी सामग्री घेऊन आपले सैनिक हव्या त्या शिखरावर चुटकीसरशी नेता येतील.
म्हणून घरी आलो आणि ताबडतोब आपल्या संरक्षण खात्याला पत्र लिहिले. त्या पत्राला सरकारी उत्तर आले. धिस इज तो एक्नालेज युवर लेटर डेटेड सो अँड सो, अँड कंटेन्टस देअरइन हॅव बीन नोटेड! या पत्रामुळे मला राग आला. प्रचंड सामर्थ्य असलेल्या या यंत्राची संरक्षण खात्याने अशी वासलात लावावी याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून ते सामर्थ्य स्पष्ट करणारे मी आणखी एक पत्र लिहिले. तरी पुन: तेच! तेच पत्र पुन्हा आले! तेवढ्यात चीनशी सुरु असलेले युद्ध संपले.
त्या युद्धात भारतीय सैनिकांना जी नामुष्की पत्करावी लागली, तिचा विचार करता करता पुन्हा मन अस्वस्थ झाले. ही यंत्रे आता लाखोंच्या संखेने तयार केली तर भारताला आपला गेलेला मुलुख परत मिळवता येईल असे वाटले. म्हणून दोन यंत्रे बरोबर घेऊन मी दिल्लीला गेलो. पण कुठेही निभाव लागेना. 'अर्ज ठेवून द्या. विचार करतो आणि कळवतो,' असे एक ठोकळेबाज उत्तर येऊ लागले. खालचा अधिकारीसुद्धा दाद देईना तेंव्हा मात्र माझा तोल गेला.
"नाऊ यु बेटर गेटाऊट-"
असे त्या मल्होत्राने मला फर्मावले तेंव्हा मात्र मी एकदम उखडलो.
मल्होत्रा फायलीत डोके खुपसून टिपणे काढीत होता.
तेवढ्यात त्याच्या टेबलावरील फायलीच्या एका ढीग-याला मी माझे यंत्र अडकवले. आणि हळूच कळ पुढे सरकवली.
"साहेब, जरा मन वर करून बघा-"
त्यांनी मान वर केली त्याचे तोंडच उघडे पडले.
फायलीचा एक ढीग हवेत तरंगत होता.
मल्होत्राने चष्मा काढून पहिले. तेच! ढीग तरंगतच होता. तो एकदम घाबरला. आणि ओरडला, "हिप्नॅटिझम ! यू रास्कल..."
घामाघूम होऊन तो कसाबसा खुर्चीतून उठला. पण डोक्यावर तरंगणा-या फायलीच्या ढिगाला आपटून तो पुन्हा खाली बसला. एरव्ही डोक्यावर फायलीचा ढीग आपटला तरी पर्वा न करणारा अधिकारी आता गर्भगळीत झाला होता. अर्धवट संतापाने, अर्धवट हतबल होऊन तो माझ्याकडे क्षणभर पाहत राहिला.
तेवढ्यात मी आणखी एक युक्ती केली. खिशातून दुसरे यंत्र काढले. दोन्ही मुठीत घट्ट धरले आणि हळूच कळ सरकवली. माझे पाय जमिनीवरून सुटले.
अरे बापरे!
वर गरगर फिरणा-या पंख्यातच माझे डोके जाणार होते. पण सुदैवाने बचावलो!
मला असा हवेत लटकताना पाहून मल्होत्राला मात्र घाम फुटला. एका बाजूला मी तरंगत होतो. दुस-या बाजूला फायलींचा ढीग तरंगत होता.
दोन्हीकडे आळीपाळीने बघत मल्होत्राने तोंडावर फुटलेला घाम पुसला. आणि या दिव्यातून आपली सुटका व्हावी म्हणून त्याने टेबलावरची घंटा घणघणा वाजवली. तेवढ्यात दार उघडून पट्टेवाला आत आला. तो आत आला मात्र...त्याने मला आणि फायलींचा ढीग तरंगताना पाहिलं मात्र...चक्कर येऊन तो धाडकन जमिनीवर कोसळला. त्याची तांबडी पगडी दूर जाऊन पडली.
थोडा वेळ गेला. पाहतो तो काय? खुर्चीवर मान टाकून मल्होत्राही चक्कर येऊन पडले होते.
मग मात्र माझाच पराभव झाला. एवढे करूनसुद्धा दिल्ली दरबारात कोणी तळ्यावर येत नाही हे पाहून मीच खचलो. मुठीतल्या यंत्राची कळ दाबून म जमिनीवर पाय टेकले, फायलीचे यंत्र काढून घेतले आणि येथून चक्क पोबारा केला.
थोड्या वेळाने मल्होत्रा आणि त्याचा पगडीवाला शिपाई गाढ झोपेतून जागे झाले असावेत. कामाचे निमित्त असताना सचिवालयात अशी गाढ झोप लागणे त्यांना नवीन नाही. जग आल्यावर कदाचित दोघेही लाजले असतील. माल्होत्राना आधी जाग असली तर त्यांनी बिचा-या शिपायाला डाफरले असते. पण बहुदा शिपायालाच आधी जाग आली असावी. कारण तो आधी खाली पडला होता. नंतर दोघांनीही ही कथा इतराना सांगितली असेल. ऐकणारे विश्वास न ठेवता हसले असतील! ऑफिसात झोपायचे असले तर झोपावे. कोण नको म्हणतो? पण आपल्या झोपेच्या समर्थनासाठी असल्या बिनबुडाच्या गोष्टी सांगू नयेत असाही इतर अधिका-यांनी [झोपणा-या] मल्होत्राला सल्ला दिला असेल.
मी गाडी पकडून सरळ दिल्लीहून घरी आलो.
पण पुढच्या एका आठवड्यातच माझे पत्र घेऊन मल्होत्रा माझ्या घरी माझी चौकशी करीत आला. आला आणि काही वेळ हसतच राहिला.
"क्या हुआ मल्होत्राजी?"
असे मी विचारले,
"पुछो मत-पुछो मत!"
मल्होत्रा हसतच होता.
त्यानंतर मल्होत्रा ठिकाणावर आला. गंभीर चेहरा करून त्याने त्यादिवशी दिल्लीत माझा जो अपमान केला त्याबद्दल माझी क्षमा मागितली. आणि हे यंत्र संरक्षणाच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे हे तो मलाच पटवून देऊ लागला. मलाही आनंद झाला. काही का होईना! अखेर भारत सरकार वळले हे पाहून मला संतोष झाला.
दहा कोटी रुपयांचा कारखाना घातला तर ही यंत्रे मोठ्या प्रमाणावर आणि कमी किंमतीत कशी तयार करता येतील ते मी मल्होत्राला पटवून दिले. त्याला पटलेही. प्रथम प्रयोगासाठी म्हणून तो वीस यंत्रे घेऊन गेला. या यंत्रासंबंधी गुप्ततेच्या दृष्टीने मी कोठेही अक्षरसुद्धा बोलायचे नाही अशी त्याने माझ्याकडून शपथ घेतली. आणि लवकरच कामाला लागू असे आश्वासन देऊन तो निघून गेला.
त्यानंतर सहा महिने लोटले.
पण मल्होत्रा किंवा भारत सरकार यांचेकडून काही कळले नाही. मीही काही बोललो नाही. कारण याबाबत काही न बोलण्याची मी शपथ घेतली होती.
पण सर्वात मोठे आश्चर्य असे की सहा महिन्यानंतर माझ्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. माझी प्रयोगशाळा जप्त केली आणि मला पकडून नेले. म्हणूनच मी आज तुरुंगात आहे.
तुम्ही म्हणाल, माझा गुन्हा कुठला?
मी कुठलाच गुन्हा केला नव्हता. परंतु, फसवाफसवीच्या, विनयभंगाच्या आणि मृत्यूच्या गुन्ह्यातला एक भागीदार म्हणून मला सजा झाली आहे.
तुम्ही म्हणाल, असे झाले तरी काय?
कोर्टात जे सांगितले गेले त्यावरून काय झाले ते मला कळले.
मल्होत्रा माझ्याकडून संरक्षण खात्यासाठी वीस यंत्रे घेऊन गेला आणि त्याने संरक्षण खात्याला काहीच कळवले नाही. उलट त्याने स्वतःची नोकरी सोडून या वीस यंत्राच्या जोरावर धंदा सुरू केला.
त्याने थोरल्या मुलाच्या ताब्यात दहा-बारा यंत्रे दिली आणि त्याला देशभर मालाची ने-आण करणारी कंपनी काढून दिली. या यंत्रामुळे असे काही होईल याची मला कल्पनाच नव्हती. या पोराने ट्रकने आणि आगगाडीने कितीतरी माल देशभर फिरवला. पण सरकारच्या पदरात दमडी पडू दिली नाही.सगळीकडे रिकाम्या पेट्या असे सांगून त्याने माल नेला. दहा दहा पेट्याना एक यंत्रा बांधायचा आणि पेट्यांचे वजन करायचा. म्युनिसिपल टोलनाके असो वा रेल्वे स्टेशनवरील काटा असो, या पोराने पेट्या ठेवल्या की चारपाचशे किलो वजनाच्या पेट्या फक्त चारपाच किलोचे वजन दाखवायच्या. एवढेच नव्हे, तर या पोराचा आगाऊपणा पैशाचा लोभ इतका दांडगा की विचारायची सोय नाही. काही ठिकाणी तो यंत्राची कळ इतकी वर सरकवायचा की, पेट्या किंचित काट्यावरून वर जायच्या आणि काट्यावर शून्य किलो वजन दिसायचे! त्यामुळे रेल्वे खात्याने आणि म्युनिसिपल टोल खात्याने आपले मोठेमोठे काटेसुद्धा निष्कारण दुरुस्तीस पाठवले. या यंत्रामुळे नगरपालिका आणि रेल्वे यांचे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले असे कोर्टात सांगण्यात आले.
दोन यंत्रे मल्होत्राच्या धाकट्या पोराने लांबवली आणि तोही खूप टिवल्याबावल्या करू लागला. काखेत यंत्रे बांधायचा आणि जाऊ नये तिथे जायचा. एक-दोनदा तो चक्क काही इमारतीत दुसर-या तीस-या मजल्यावरच्या खिडक्यातून -खोल्यात शिरला. आता कल्पना करा. रात्री नवरा-बायको आपल्या खोलीत कशा त-हेने झोपली असतील कोण जाणे! अशावेळी खिडकीतून उडत उडत या पोराने आत जायचे म्हणजे काय?
अरे, पकडायचे म्हटले तरी कठीण! एक तर असा पोरगा रात्री अपरात्री खिडकीतून उडत आला हे पाहूनच जोडपी झीट येऊन पडली. तशात शुद्धीवर असलेल्या एखाद्या माणसाने आरडओरडा करून पकडायचे, तर तेही कठीण! हा पोरगा चटकन पक्षासारखा उडून जायचा. आणि ओरडणारा माणूस "पोरगा खिडकीतून उडून गेला" असे म्हणतो म्हणून त्यालाच हसायची आणि 'स्वप्न पडले असेल, झोप-झोप!' असे म्हणत त्याला अक्षरश: उचलून खाटेवर झोपवायची.
मल्होत्राने आणखी दोन यंत्रे आपल्या सास-याला दिली होती. हा सासरा म्हातारा होता. त्याला रक्तदाब होता, काळजाचाही विकार होता. तो सहाव्या मजल्यावर राहायचा पण इमारतीत लिफ्ट नव्हती. म्हणून रोज त्याला दोन हमाल खालून सहाव्या मजल्यावर न्यायचे. त्याखातर रोजच्यारोज दोन रुपयांचा खर्च यायचा. तो वाचवण्यासाठी हा म्हातारा रोज संध्याकाळी खाकेत यंत्रे बांधून हळूहळू वर उडायचा आणि हलकेच गच्चीत उतरायचा. गच्चीतून सहाव्या मजल्यावरच्या आपल्या जागेत यायचा!
खुद्द मल्होत्राने दीड हजार रुपये पगाराची आपली नोकरी सोडून अक्षरश: सन्यास घेतला. हृषीकेशला एक छोटासा मठ बांधून तो ध्यानस्थ होऊन बसू लागला. दाढी-मिशा वाढलेल्या. डोकीवर भगवा रुमाल अंगावर भगवी कफनी, शेजारी दंड आणि कमंडलू!
आसपास अनेक छोटे मोठे साधू अंगास राख फासून बसलेले असायचे. प्रत्येकाचा थोडाफार भक्तगण! पण मल्होत्रास्वामी नव्याने आलेला. त्याला एकही भक्त मिळाला नाही. पण हजारो भक्त मिळवण्याच्याच इर्षेने तो मठात आला होता. एकदा ध्यानस्थ बसून मल्होत्राने खाकेत खाजविल्यासारखे केले. आणि काय आश्चर्य! पद्मासन घालून बसलेला हा साधूपुरुष जमिनीपासून दोन फूट हवेत तरंगू लागला. मग काय विचारता? नुसते हजारो भक्तच नव्हेत, तर शेकडो साधूसुद्धा मल्होत्राचे भक्त बनले. सा-या भारतात सगळीकडे वार्ता गेली. हजारो भक्त देशाच्या कानाकोप-यातून येवू लागले. मल्होत्राच्या चरणी पाण्यासारखा पैसा ओतू लागले. सहा महिन्यात मल्होत्राने कोट्यावधी रुपये आपल्या घरी पाठवले.
हे प्रकार किती दिवस चालले असते देव जाणे! परंतू कधी न कधी पापाचे घडे भरतातच!
मल्होत्राच्या थोरल्या पोराने एकदा माल भरलेल्या पेट्या रेल्वेच्या कपाटावर ठेवल्या आणि पेट्यांचा लोखंडी पट्ट्या काट्याला कुठे अडकल्या देव जाणे! यंत्र चालू असल्यामुळे मालाच्या पेट्यासह रेल्वेचा काटाच हवेत तरंगू लागला. त्यामुळे त्या पोराचा कट उघडकीस आला. रेल्वे पोलिसांनी यंत्र जप्त केले. त्याच आठवड्यात मालपेट्यांनी भरलेला एक ट्रक ड्रायव्हरच्या आगाउपणामुळे टोल नाका येण्याआधीच हवेत उडत असलेला पोलिसांनी पाहिला. तोही जप्त झाला.
दुस-या आठवड्यात त्याच्या धाकट्या भावाने आगंतुकपणा केला. कॉलेजातील प्रोफेसरची जिरवण्यासाठी त्याने यंत्र वर्गातल्या पलॅटफॉर्मलाच अडकवले. त्यामुळे वर्गात शिकवताना शिकवता पलॅटफॉर्म जमिनीपासून दोन फूट वर तरंगू लागला. पण पलॅटफॉर्म तरंगत नसून आपल्याला चक्कर आल्यामुळे पलॅटफॉर्म तरंगत असल्यासारखा दिसतो आहे असे प्रोफेसरला वाटले आणि तो चक्कर आली या भीतीनेच पलॅटफॉर्मवर आडवा झाला. त्यावेळी वर्गात पोरांनी जो गलका केला तो ऐकून प्रिन्सिपलसाहेब वर्गात आले आणि ते यंत्र त्यांच्या हाती लागले.
दरम्यान गेले आठ दिवस मल्होत्रांचा म्हातारा सकाळी बाहेर गेला, तो परत आलाच नव्हता. खूप शोधाशोध झाली. पण पत्ताच लागला नाही. आठ दिवसांनी काही वैमानिकांनी सोळा हजार फूट उंचीवर एक 'फ्लाइंग सॉसर' पाहिल्याचे संरक्षण खात्यास सांगितले. म्हणून शोधाशोध झाली. तर एक हाडाचा सांगाडा तरंगत असलेला दिसला.म्हाता-याने बहुदा कळ जोराने फिरवली होती! आणि आठ दिवस गिधाडांनी मेजवानी लुटली होती. [म्हाता-याचे वजन दीडशे किलो होते!] धार्मिक कृत्य चालू असताना म्हाता-याने पिंड नेला नाही आणि अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची वचनं देऊनसुद्धा सास-याने पिंड नेला नाही. त्याचा आत्मा आता कावळ्याच्या रूपानेसुद्धा उडायला घाबरत असावा असे जमिनीवरील काही लोकांनी गंभीरपणे निदान केले!
इकडे हृषीकेशच्या मठातला सर्वश्रेष्ठ साधुपुरुष दिगंतात विलीन झाला अशी बातमी आली. ध्यानस्थ असताना तो वर वर उडत गेला. चाळीस पन्नास फूट वर जाताच तो हातपाय झाडत ओरडू लागला. तथापि तो परमेश्वरचरणी लवकर जाण्यासाठी धडपड करीत आहे असे जमिनीवरच्या भक्तांनी एकमेकांस सांगितले.
परिणामी, मल्होत्राची दोन पोरे आणि मी यांना अटक झाली. खुद्द मल्होत्रा आणि त्याचा सासरा इहलोकातून सहीसलामत सुटले होते.आणि फसवाफसवीच्या गुन्ह्याखाली आम्ही शिक्षापात्र ठरलो होतो.
सध्या मी तुरुंगात आहे. माझ्या खोलीला जी खिडकी आहे, तिला जाडजूड गज बसवण्यात आले आहेत. मी अजूनही उडून जाईन अशी तुरुंगाच्या अधिका-यांना सारखी धास्ती वाटते. मी जमिनीवर झोपतो. तेंव्हासुद्धा तुरुंगाचे शिपाई माझ्या पाठीखालून हात घालून मी जमिनीवर आहे की जमिनीपासून वर आहे याची खात्री करून घेतात.
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment