Wednesday 20 January 2010

मराठी शायरी


* पेल्यातले प्या मद्य,पण ओठातले प्राशू नका
दुरुनिच याची ये नशा जवळी या जाऊ नका
स्पर्शने तर दूर राहो,बघितले नुसते जरी
याची नशा,मी सांगतो,उतरते मेल्यावरी

* भिन्न मद्यांच्या चवी आम्ही क्रमाने चाखतो
पेल्यातली घेऊन आधी ओठातली मग चाखतो
वेगळी कॉकटेल,ऐसी एकत्र न मिसळायची
सांगतो याची मजा चौघात नाही यायची


*कैसे म्हणू कि नजर आपुली कोणावरी टाकू नको
इतकेच कि पेल्यातल्या या मद्यावरी टाकू नको
बेहोष न होऊ कितीही आम्ही हि घेतली
सांगतो अद्याप आम्ही कॉकटेल नाही घेतली

*आपुल्याच दांती ओठ आपुला चावणे नाही बरे
हक्क आमुचा अमुच्या सामोरी मारणे नाही बरे

*घेतला तू वेळ जेंव्हा सावराया अंचला
वाटले तेंव्हाच द्यावे '
थँक्स' येउनिया तुला

*धस्स ना जर होतसे काळीज तू येता क्षणी
आपुल्या मध्ये, कोणात नाही, नक्की जरा आहे कमी


*बेवफाईचा तिच्या आरक्त वदनी निलीमा
ऐसा खुले, कि मोहुनी, मी तिला केली क्षमा

*नेसली जॉर्जेट काळे, गौर तनु झाकावया
आज वाटे अवस आली पौर्णिमा ग्रासावया
वस्त्रातुनी त्या अंगकांती तैसीच आता शोभते
यमुनाजळी गोपान्गनांचे वैवस्त्र जैसे शोभते


*घेती का वेळ थोडा सांवराया अन्चला
मानिले असतेही आमुची परवा जरा आहे तिला

*चालताना सारखी ती लचकून जेंव्हा चालते
वाटते नागीण जैसी आता उभ्याने चालते


*जाणते ती लाख नुसत्या जीव घेण्याच्या तऱ्हा
सरळ आहे भांग आणि निष्पाप आहे चेहरा

*बघता तुम्ही हि, नजर तुमची भूतली जी लागते
सौदामिनी नेत्रातलीही 'अर्थ' व्हावी लागते


*मरती जिते पण प्रेतही हासते आनंदुनी
ना कळे डोळ्यात तुझिया संहार कां संजीवनी

*आहे अम्हां जाणीव आमुचा मृत्यू कुठे हा राहतो
आहे असा वस्ताद बेटा नयनांत त्यांच्या राहतो
आहे दया हॄदयात त्यांच्या ईश्वरानेही दिली
आमुच्या नजरेस त्यांनी नजरही नाही दिली



*दोस्तहो आहो तरीही इष्कात या मेलो अम्ही
आज ना बघण्यात यांच्या ऐसे, आता मेलो अम्ही


*मानू आम्ही, यांनी अम्हाला हसून नसते पाह्यचे
सांग बरं? आहे बरं का ? अगदीच नाही पाह्यचे


*गेला तुम्ही सोडून त्याचे कांही आम्हां ना वाटले
व्हायचे इष्कात ऐसे आधीच होते वाटले
हॄदयही पण हाय! माझे बेईमान झाले शेवटी
गेले अम्हां सोडून तेही तुमच्याच मागे शेवटी

*विरहार्णवी आहे जरी का तुम्ही आम्हाला सोडिले
क्षण मात्रही नाही कधी तुमच्या स्मृतींनी सोडिले
माझ्यावरी हे प्रेम यांचे मी पाहीले नाही कुठे
धन्य या तुमच्या स्मृतिंची! या कुठे? तुम्ही कुठे?

*कुलशीलता तुमच्या स्मृतिंची आधी जरी कळती मला
मोहही तुज भेटण्याचा नसता कधी झाला मला
लाजल्या नाही कुणीही यांच्यापरी कोणापुढे
मिटल्याविना मी नेत्र नाही याही कधी आल्या पुढे

*नसते कमी इष्कांत नुसत्या यांच्या स्मृती असल्या तरी
नसते कमी या अप्सरांचा पत्ता जरी नसता तरी
वाईट या इष्कात आम्हा याचेच वाटू लागते
यांच्या स्मृती येण्यास यांची भेट व्हावी लागते

भाऊसाहेब पाटणकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी





No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....