Wednesday, 31 March 2010

भ्रमर आणि कवी


सखया भ्रमरा सदैव होसी तू कमलावरी गुंग,
कवितेचा मी दास, पदाशी तिच्याच असतो दंग.

चाखुनी घेसी पुष्पामधला तू मधुतर मकरंद;
काव्यरसास्वादाचा मजला तसाच भारी छंद.

प्रेमभराने तू पुष्पांवर सदैव गासी गाणे;
आळवितो मी कवितादेवी मंजुल आलापाने.

बागडसी तू स्वैर मजेने नभात गरके घेत;
बागडतो मी सुज्ञ जनांना हर्षभरित करीत.

समशिलाचे आपण दोघे, ये, ये भ्रमरा आता;
उडू बागडू, फिरू मजेने नुरे कशाची चिंता.

ये प्रिय सखया, वनलतीकांच्या झोपाळ्यात बसून;
गाऊ सुंदर गीत आपुले, होऊ त्यात विलीन.

ये, ये कमली प्रेमबंधने बांधुनी घेऊ काया;
आनंदाच्या सुधासमुद्री जाऊ स्नान कराया.

वनराजीतुनी कुंजामधुनी वेनुध्वनी करून;
वात विहरतो; त्याचा जाऊ आपण पंथ धरून.

ये, ये स्वच्छंदाने मारू नभात उंच भरा-या;
गिरक्या घेऊ परमानंदे ओसरल्या ज्या सा-या.

रम्य गायने वेधुनी टाकू चाल दिशांना चारी;
अमृताचा वर्षाव करू ये ईशाच्या बाजारी.


बालकवी
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....