Wednesday, 10 March 2010

माणसे : जयवंत दळवीतशी खूप रात्र झाली नव्हती. अजून तिसरा खेळ सुटायचा होता. स्टेशनातून रात्रपाळीची माणसे यायची होती, तरीसुद्धा देऊ देवळामागच्या झाडावर चढला आणि त्याने आपले गोणपाटाचे पोते खाली काढले. नेहमीच्या जागेवर त्याने आपले फुटपाथचा तुकडा गोणपाटाने झटकून साफ केला. तिथे तो गोणपाट पसरणार तोच देऊला हाक ऐकू आली.
"हा ss मुला-"
देऊने पलीकडच्या फुटपाथवर पहिले. प्लंबरच्या फळीवर मास्तर बसले होते. ते हाताने त्याला बोलावीत होते.
देऊ रस्ता ओलांडून त्यांच्याजवळ गेला.
"काय म्हणता मास्तर?"
असे विचारीत त्यांनी जबरदस्त ढेकर दिली.
"मी म्हणत होतो..." ते म्हणाले, "तिथं पलीकडे झोपण्याऐवजी इथं झोप शेजारी!"
"का?"
"का असं नाही रे मुला! हाकेला उठेल असा कुणी तरी जवळ असलेला बरा! काय नेम सांगता येतो?...."
ते पुन्हा पुन्हा तेच बोलले.
देऊ उड्या टाकत पलीकडे गेला आणि गोणपाट उचलून घेऊन आला. मास्तर बसले होते तिथेच त्यांच्या पायाशी गोणपाट पसरून तो तिथेच बसला.
"आज कुठं मिळालं तुला काम?"
"छे हो! जिकडे तिकडे माणसं टपून असतात. आज स्टेशनसमोर टक्सी उभी राहिली...मास्तर, सहा बगा होत्या...पाच सात रुपये गावले असते! पण स्टेशनातलाच पोरगा धावून आला...आता त्यालाच वहिवाटीचा हक्क! पण मग मारामारी करायला हवी...ती जमते कोणाला?...जाव!
असे म्हणत देऊ आपली जवळ ओढली पावले आवळत राहिला.
"आज जेवलास तरी? "
"कसला हो जेवान? काटवाल्याकडे चार पोळे खाल्ले चाहत बुडवून....कठीण आहे हा मास्तर, कठीण आहे."
असे म्हणून तो तिथेच विचार करत बसला.
हल्ली त्याला परतपरत वाटायचे, आपण पळून आलो यात काही चुकले का? आपण घरीच राहिलो असतो...नारळ पाडणे, लाकडे फोडणे...गावकऱ्यांच्या दुकानात काम करणे...असले काही तरी केले असते तर आपल्याला अधिक कमी झाली असती का? यापेक्षा आपले पोट अधिक भरले असते का?
पण त्याला उत्तर मिळत नव्हते.
घरी तरी त्याला काय मिळत होते? चौघा भावानंतर पाचवा नंबर त्याचा लागायला हवा होता, जेवायच्या वेळी! मग सगळी मुले दहाबारा! ....असोत बिचारी! पण चौघांनंतर सगळी मुले बसायची कलकलाट करीत...थाळ्या आपटीत आणि शेवटाला देऊ शेवटाला...बोटाने जमिनीवर थाळी फिरवीत...पण कुणी त्याला म्हणाला नाही...साबाजी तोंड उघडून बोलला नाही...देव्याला बसवा पाचवा!
सोळा वर्ष झाली तरी देव्या कुणीच नव्हता, घरात कस्पटाचीसुद्धा किंमत नव्हती.
मास्तर म्हणाले,
"देवजी, तू पळून आलास यात काही चूक नाही! नशीब काढायला इथं आलेली बहुतेक माणसं पळून, घरदार सोडूनच आलेली आहेत...अमेरिका हा सबंध देश हा नशीब काढण्यासाठीच पळून आलेल्यांचाच देश आहे...तो सी.आर.गोखले...चंद्रकांत रुद्राजी तुझ्यासारखा पळून आला...इंग्लंडात जाऊन आय.सी.एस.होऊन आला...बरीस्टर दीक्षित..आईवडिलांची नजर चुकवून मुंबईस आला, एल्फिन्स्टनमध्ये माझ्याबरोबर होता. हुशार...इंग्लंडला गेला..."
कोण गोखले..कोण दीक्षित...आय.सी.एस.काय! ...
रीस्टर काय...देऊला तो नुसता आवाज होता. पण तो त्याला ऐकावासा वाटे.
"काय आहे मास्तर, माहित आहे?" देऊने मास्तरांना म्हटले.
"कसली का होईना, समजलं ना? पण एक नोकरी मिळायला हवी...म्हणजे समजलं ना? दोन वेळ जेवण आणि दोन वेळ चापानी सुटलं तरी खूप झालं!"
बोलता बोलता त्याने आपली कंबर चाचपून पहिली. ती गाठ होती. पण गाठीत अर्थ नव्हता. एकच शेवटची दहाची नोट होती, आणि तीसुद्धा कधी बाहेर नेम नव्हता.
"तरीसुद्धा समजलास का रे देवजी?" मास्तर म्हणाले.
"तू सुद्धा थोरल्या बंधूस कार्ड टाक...म्हणावं मी मुंबईस आहे...सुखरूप आहे."
"रस्त्यावर निजतोय-"
तो कडूकडू हसला.
"छे! ते कशाला लिहायला पाहिजे?....उद्या बंगली बांधशील...बंगलीत झोपशील आपल्या राणीबरोबर!"
मास्तर मान वर करत, तोंड परत परत उघडून ढेकर देत राहिले.
त्यांचे पोट कमरेला बोचके बांधल्यासारखे सुटले होते. बसले होतेतर पोट मांडीवर ठेवल्यासारखे दिसत होते. दोन्ही बाजूनी ढराढर आवाज सुटत होते. पंचाची कणवट कमरेत चिमटली होती.
प्लंबरच्याच वर पहिल्या मजल्यावर ते राहतात. एकाच जुनी खोली आहे. थोरला मुलगा आणि सून अमेरिकेत असतात. मास्तर एकदा अमेरिकेला जाऊन आले. दुसरा मुलगा दोन वर्षांचा असताना त्यांची बायको वारली. परमानंदाला त्यांनी स्वतः वाढवला. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि संध्याकाळच्या क्लासेसमध्ये मास्तर झाले. पण कुठेतरी काहीतरी चुकले. काय ते मास्तरांना कधी कळले नाही. पण परमानंद त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पुढे गेला नाही. तो सुरुवातीला म्हणजे मट्रीकपर्यंत हुषार होता, पण पुढे काहीतरी चुकत गेले, काय ते मास्तरांना कळले नाही! मग तो मास्तरांच्या हट्टापायी शिकला. पण न शिकल्यासारखे शिकला! कसाबसा बी.ए. झाला, दोन नोकऱ्या केल्या. सोडल्या, कसला तरी धंदा करतो. एका स्मशानाला लाकडे पुरवतो. म्हणजे त्याला काहीच करावे लागत नाही. मुख्य ठेकेदारच ट्रकने लाकडे स्मशानात पाठवतो. फक्त म्युनिसिपाल्टीचे टेंडर परमानंदाचे असते. तेवढ्या कमिशनवर जगतो. लग्न नाही, संसार नाही. खोलीत बसतो. रात्री सात वाजल्यापासून पी-पी पितो...कसातरी पडलेला असतो. नेसणात मुततोसुद्धा! कधी कधी गलरीत उभा राहतो आणि...आणि तिथून रस्त्यावर मुततो. मास्तरांना लाज वाटते.
म्हणून मास्तर खाली फळीवर झोपतात.
मास्तर म्हणाले,
"समजलं ना देवजी?...तू वडील बंधूंना कार्ड पाठव."
"पाठवलं तर मास्तर तुमीच! मी कार्ड देन! किंवा तुमीच...!'
"तू दोन बुकं शिकलास ना?"
"ते गेलं सगळं उडून?"
तो खसाखसा डोकं खाजवीत हसला.
"तुला अजून शिकावस वाटतं?"
"छे!...काय शिकण्याचा नुसता इच्यार केला तरी नीज येते. डोळे झाकतात!"
मास्तर हसले.
एकदम लोकांचा गजबजाट वाढला.सिनेमा सुटला होता. स्टेशनातून येणारे रात्रपाळीचे लोकसुद्धा वाढले होते. त्याला तुडवून गेल्यासारखे जात होते.
"निजा तुम्ही मास्तर-"
असे म्हणून देऊ आडवा झाला. मास्तर अजून तसेच बसून होते.
थोड्या वेळाने वर्दळ कमी झाली. बरेचसे सामसूम झाले.
दुरून भैय्याचे भजन ऐकू येऊ लागले. बाजारात दिवसभर केळी विणारे भय्ये चिमटे, लोखंडी सळ्या वाजवत गात होते. केळबाजारात पाऊणशे-शंभर भय्ये तरी राहतात. केळ बाजार कसला? चार गाळे आहेत. प्रत्येक गाळ्यात कमरेपर्यंतच्या उंचीचा लाकडी माळा आहे. त्यावर केळ्यांच्या राशी आहेत. वसईची, जळगावची केळी...माळ्याच्या खाली भुयारात भैय्याचे संसार. शे-सव्वाशे भय्ये तिथं मुंग्यांसारखे वळवळतात. आळीपाळीने चारपाच भय्ये रोट्या बडवतात. बटाटे कापून रस्सा करतात, नाहीतर डाळ. प्रत्येक गाळ्यात माळ्याखाली पंचवीस तीस भय्ये वाटोळे बसतात....डाळीत रोटीचे तुकडे बुडवतात....खाता खाता काशी....इलाहाबाद....गडवाल, इथल्या आठवणी काढतात....एकाचे कुणाचे कार्ड आले, तरी ते आपल्यालाच आलेय असे समजून वाचताना तल्लीनतेने ऐकतात. मुछवाला ते वाचून दाखवतो.
मुछवाल्याच्याच गाळ्यासमोर थोडी उघडी जागा आहे. तिथे बसून पाचपन्नास भय्ये भजन गातात...."घरकी जोरू तीन दिन रोवे रहगई आसा रे...! चंदन पाटेपर न्हानेकू बैठा राजा गोपीचंदा रे!"
रात्रीच्या शांत वातावरणात ते गाणे गोड वाटत होते.
तेवढ्यात त्याला शब्दही कळले. त्याने डोळे उघडून पहिले. तिथेच भिंतीला टेकून एक भैय्या आपल्या पाटीत बसला होता आणि टाळ्या वाजवीत केळेवाल्यांचे त्यांच्या सुरात सूर मिसळून भजन गात होता..."किनका बंगला किनकी माडी किनका हत्ती घोडा रे...किनकी जोरू किनका बेटा सब पैसे का प्यारा रे...!"
रात्रीचे दोन वाजून गेले होते, तरी हा भैय्या बसून गोपीचंदाचा ख्याल गात होता. त्याला झोप नव्हती. त्याला नाही, बाजारातल्या त्या केळीवाल्यानाही नाही!
.
देऊ याच गोष्टीचं आश्चर्य करीत राहिला....किती दूरदूरवरन आलेली ही माणसे, पोटासाठी आली...एकटी...त्यांना रात्र रात्र झोप नाही!
देऊला खूप भूक लागली होती. खूप खायची इच्छा होती. पण त्याने मन आवरले. फक्त चहा आणि मिसळपाव, फार फार तर उसळीचा रस्सा, दहा पैशाचा आणखी घ्यायचा! पण त्यावर एक पैसा नाही!
हे सगळे स्वतःला बजावीत तो हॉटेलात चढला. बेसिनपाशी जाऊन त्याने चुळा भरल्या. डोळ्यांना पाणी लावले, बेसिनपाशी परातीत ठेवलेले पाण्याचे दोन ग्लास उचलले. गटागटा प्याला आणि तो खुर्चीत बसला.
ए ss पोर sss फडक मा sss र....तीन नंबर पाणी देव...धोतीवाला ऐंसी लेव...तीन कडक लाव...एकमे पाणी कम."
असे लांबलचक ओरडत खांद्यावर टुवाल टाकलेला पोऱ्या क्षणभर देऊच्या पुढ्यात थांबला. त्या वेळी देऊ त्याच्या कानाच्या पाळीतल्या सोन्याच्या टिकल्या बघत होता. हॉटेलचा ऑर्डर घेणारा पोऱ्या, त्याच्या कानपाळ्यात
टिकल्या...देऊ बघता बघता विचार करत राहिला...
तेवढ्यात तो पोऱ्या पुढे जाऊन परत आला.
"पाव-मिसळ...कडक चाय..."
"पाव-मिसळ...कडक चाय..."
असे ओरडत तो टिकलीवाला आत गेला.
तेवढ्यात केवळ सवयीने देऊच हात त्याच्या कमरेकडे गेला.
अरे बापरे! घात झाला! घात!
देऊचा चेहरा काळाठिक्कर पडला. त्याने पटापट दोनदा कपाळावर हात आपटले. आणि टिकलीवाला मिसळपाव घेऊन येण्याआधी तो तिथून उठला. तडक बाहेर निसटला.
"हात साले का..." असे म्हणत देऊ मटकन फुटपाथवर बसला.
त्याच्या कमरेची गाठ कुणीतरी कापली होती. कमरेची सुतळी करगोटा तसाच होता. त्याला बांधलेली गाठ कुणीतरी अलगद उडवली होती....आणि कशी?....तो नवल करीत राहिला.
पायजम्याची बटने सुटलेली नव्हती. पोटाकडे, कमरेकडे पायजमा फाटलेला नव्हता तेवढीच गाठ कापली कशी?...कोणी? कधी?
त्याची शेवटची दहा रुपयाची नोट गेली होती. जवळ एखादे पाच पैशाचे नाणेसुद्धा नव्हते...आणि अशी चारदोन नाणी असली तरी त्याचा उपयोगही नव्हता. नाणी टाकून मिळते काय? सकाळपास्न कुठे कसले काम नव्हते. बाजाराचा सुट्टीचा दिवस! सोमवार!
दुपारीच त्याला झोप लागली. बसला तिथेच आडवा झाला, त्याला कळलेच नाही तो कधी झोपला ते! त्याला आठवले ते एवढेच-तो सावलीत बसला होता...विचार करीत...हे दहा रुपये संपले म्हणजे काय करायचे? ...आणखी मनात त्याच्या संताप होता तो साबजीबद्दल! मास्तरांनी पत्र पाठवले होते...साबाजीने पोराकडून लिहून घेऊन कार्ड पाठवले होते...मास्तरांच्या पत्त्यावर....कार्डात रडगाणे होते....हा आजारी...तो आजारी...पोटात अन्न नाही! पंचवीस रुपये पाठव. शिवाय दरमहा पन्नास रुपये पाठव! मास्तरांनी त्याला ते रात्री वाचून दाखवले होते!
त्या पत्राचा विचार करीत देऊ बसला होता.
त्याच्या शेजारी एक पाटीवाला बसला होता. डोक्याला टूवाल गुंडाळून! आपल्याच पाटीत बसून जुन्या ब्लेडच्या पात्याने आपल्या पायाची नखे काढीत होता.
तेवढ्यात तो कधीतरी झोपला होता.
तासदीडतासाने त्याला कुणीतरी ढोगसून जागे केले. तो जागा झाला. तेंव्हा लाथेने त्याला तो इसम ढोंगसतो आहे हे त्याच्या लक्षात आले. देऊने डोळे किलकिले करून पहिले. त्याच्या डोळ्यांवर अजूनही झोपेचा जाड पडदा होता, तरीसुद्धा त्याला दिसत होते...फुटपाथवर चार चाकाची गाडी चढली होती. त्याच्या अंगावर आली होती आणि ती गाडी धरून एक इसम त्याला लाथेने ढोंगसत होता.
त्याने देऊला लाथेने ढोंगसले, या गोष्टीची देऊला चीड आली...उठावे आणि भोसडीच्याच्या गांडीवर लाथ घालावी असे त्याला वाटले...घातलीही असती. पण वेळीच त्याच्या लक्षात आले. त्या हातगाडीबरोबर आणखी दोघे आहेत. तिघांना तोंड द्यायला पाहिजे आणि पोलीस आला तर हातगाडीवाला त्याच्या हाताला हात लावणार...आपल्याकडे द्यायला काय आहे? भडवा गाडीच फुटपाथवर व्हाधावतो तो काय पोलिसाला दिल्याशिवाय?
"आग लागो मेल्याच्या तोंडाला."
-असा मनातल्या मनात शाप देत देऊ उठला. संतापाने गाडीवाल्याकडे बघत बाजूला झाला.
बाजूला बसता बसता चिकट तोंडाने म्हणाला,
"पाय लावने कि क्या गरज? सोयेलेला समजत नायी?"
"दोन लाफा देन! साल्या इथे झोपलासच का?"
"ही जागा कोणाच्या बापाची आहे? फुटपाथची जागा कोनच्या बापाची?"
"तुझ्या बापाची आसलं! मी रोजची गाडी इथं उभी करतो!" असे म्हणत गाडीवाल्याने बटाटवड्याची गाडी मुद्दाम त्याच्या अंगावर ढकलली...एक चाक त्याच्यावर आपटावे म्हणून!
"आता उठतो का कंबरडा मोडू?"
त्यासरशी देऊ ताठ उभा राहिला, छाती पुढे काढून.
"हिम्मत असली तर उचल तुझा तंगडा-"
असे म्हणत देऊ आणखी ताठ झाला.
वडेवाल्याच्या दुसऱ्या पोराने त्याला तिथून ढकलला आणि तो म्हणाला,
"ही गाडी शिवसेना पुरस्कृत वड्याची गाडी आहे...."
म्हणजे काय ते देऊला कळले नाही. तो अजून ढकललेल्या जागेवर तसाच ताठ उभा
होता. त्याचे डोळे जबरदस्त तारवटले होते.
तेवढ्यात चारपाच माणसे जमली. मारामारी होईल म्हणून थांबली.
"मुंबै महाराष्ट्राची हाये! तुम जैसा उपरे का नही! समजा?"
असेही तो गाडेवाला ओरडला....आणि शांत चित्ताने कालवलेल्या पिठात हात बुडवून वडे कढईत सोडू लागला.
दोन पोरे काही झालेच नाही असे समजून आपापल्या कामाला लागली. पाण्याचे पिंप ठेवले....बशा लावल्या, लाल चटणी खालीवर केली. पाव कापले.
तरी देऊ अजून तिथेच उभा होता. क्षणभर त्याला वाटले, नेटाने हि हातगाडी वडेवाल्याच्या अंगावर उलटी करावी. उकळत्या तेलाची कढई त्याच्या अंगावर पडेल....पण त्याला तेवढा धीर झाला नाही...तो तेलात चुरचुर तरंगणाऱ्या वड्याकडे बघत राहिला. असले गुबगुबीत वडे. परातीतल्या बटाट्याच्या गोळ्यात हिरवे हिरवे मिरचीचे तुकडे खूप दिसत होते....त्याला वाटले, झाऱ्यातले ते आठ दहा वडे तोंड भाजत भाजत बसून खावे!
"खायेन! हिंमतीने खायेन! पण या भडव्याकडले नाय...."
-असे तो मनातल्या मनात रागाने बोलला. मनात बोलला तरी त्याच्या चिकट तोंडात त्याची जीभ तट
तट वर उडली.
"चला रे तुमी...आपल्या धंद्याला..."
असे म्हणत वडेवाला कढईतले वडे वरखाली करू लागला.
तिथेच घोटाळणारी माणसे पांगली.
"जो तो उठतो तो मुंबैत येतो! है क्या इधर?"
असे त्यालाच कुणीतरी वाटेला लागताना बोलला. तो त्यालाच बोलला असे देऊला वाटले. म्हणून तो चिडून म्हणाला, "माहित आहे मुंबे कोणाची ती....गरीबाची नाय मुंबे..." असे म्हणत देऊ चालत राहिला. जाता जाता त्याने आसपास पहिले. भोवती रंगारी, प्लंबर आपापली अवजारे पुढ्यात ठेवून गिऱ्हाइकाची वाट बघत बसले होते. कुणालाही काही ऐकू येत नसल्यासारखे. मरून पडल्यासारखे! पुढ्यात गि-हाइक थांबले म्हणून ते जिवंत होतात. मगच त्यांना दिसते, ऐकू येते!
देऊ तिथून हॉटेलात शिरला. तिथे त्याला कळले दहा रुपयाची शेवटची नोट गेली.
ती गेली कशी या एकाच गोष्टीचा तो परत परत विचार करीत राहिला. पण असा विचार करीत बसलो तर भागायचे नाही, हेही त्याच्या लक्षात आले. तो चटकन उठला. कुणीतरी हक मारून बोलवल्यासारखा चालत राहिला. त्याने इकडे तिकडे बघत बाजारातून फेरी मारली. जड पिशव्या नेणाऱ्याना 'घेऊ?' असे विचारले, पण त्याला काम मिळाले नाही.
तेथून तो भाजी मार्केटात फिरला. पण काम मिळाले नाही. तरतर चालीने तो स्टेशनसमोर फेऱ्या मारीत राहिला. तिथे आधीच आठ-दहा हेलकरी गळ्यातला टॉवेलशी चुळबूळ करीत उभे होते. एकाच्याही डोसक्याला टॉवेल गुंडाळलेला नव्हता. त्याच्या लक्षात आले....आज वेगळा दिवस आहे. आज कुणालाच काम दिसत नाही...त्यांच्या संशयखोर नजरा परत परत देऊकडे वळत होत्या...म्हणून तो निसटला. कुणीही सामान घेऊन आला, तरी हे बेकार हेलकरी आपल्याला सामानाला हात लाऊ देणार नाहीत, हे त्याच्या लक्षात आले. तो तेथून वळला. कबुतरखान्याकडून जैनमंदिराकडे आला. डावीकड जाऊन तो मोडक्या कट्ट्यावर बसला.
तिथे पंडितजीला गि-हाइक होते. दगदगलेली एक बाई त्याच्यासानोर उकिडवी बसून पंडितजी सांगतो ते भविष्य कानात जीव ओतून ऐकत होती. तिच्या कडेवर सहा महिन्याचे शेंबडे पोर झोपले होते.
मान आडवी झाली होती. कदाचित लचकली, मोडली असती. पण आईला शुद्ध नव्हती. ती आपले भविष्य ऐकण्यात हरवून गेली होती. तिच्या नवऱ्याला नोकरी नव्हती. वर्ष झाले. तो घरी बसून राहतो. विचाराविचाराने त्याची तब्येत हटली. माणसाने खायचे काय?....ती सांगत होती. आणि भिंगातून तिच्या हातावरच्या रेषा बघत पंडितजी तोंडाने तिखट मिरच्या चावल्यासारखा आवाज करीत, खालच्या खाजगी आवाजात काही काही सांगत होता....महिनाभरात नोकरी मिळेल....गिरणीत मिळेल....पण साडेसाती आहे....ती आहेही हे तिला पटावे म्हणून तो पाटीवरचे त्यानेच मांडलेले आणि सोडवलेले गणित परत परत तिला दाखवत होता. ती सगळे समजत असल्यासारखी मान हलवत होती....या साडेसातीतच तिच्या नवऱ्याच्या वारसदार लोकांनी तिच्या नवऱ्यावर करणी केली आहे हेही पंडितजीने सांगितले. ते तिला ताबडतोब पटले. पांढरे फटफटीत ओठ करीत ती तिथल्या तिथेच जाल्फ्ळून म्हणाली,
"एकनाथाला बरीss हगवण लागात. देव एकनाथाचा निसंतान करील..." असे म्हणताना तिने हाताचे तळवे एकमेकावर घासले. बघता बघता ती पिवळी झाली.
"घाबरण्याचे कारण नाही. हि अंगठी यजमानाच्या उजव्या हाताच्या या बोटात घाल..." असे म्हणत त्याने बोट दाखवले.
तिने अंगठीसाठी पटकन हात पुढे केला.
पण पंडितजीने अंगठी लगेच दिली नाही. त्याने पिंजऱ्याचे दर उघडले, त्यासरशी पोपट बाहेर आला. तो दारासमोर ठेवलेल्या वितभर उंचीच्या शिडीवर चढला. परत उतरला...आणि त्याने एका अंगठीवर चोच मारली....ती अंगठी पंडितजीने मंत्रून तिच्या हाती दिली. एकवीस रुपये मागितले, पण कमी होता होता पाच रुपयावर मिटले!
"यजमानास नोकरी मिळाली म्हणजे इथे येऊन अंगठीचे सोळा रुपये देऊन जा. आणि कोणी अंगठी बोटातून काढून मागेल तर काढायची नाही..."
असे पंडितजी म्हणाला.
अंगठी पदराच्या गाठीला मारत बाई उठून उभी राहिली. आपल्या कडेवर तान्हे मुल आहे, याची तिला अजून शुद्ध नव्हती,
"त्याची मान सांभाळ."
असे पटकन देऊ म्हणाला.
"हि आणखी पोरां देव पदरात घालता."
असे ती एकदम करदावून बोलली.
तिच्या भाषेमुळे देऊला जवळीक वाटली. त्याने विचारले, "खंयची गे तू?"
"मी होडावड्याची...तू खंयचो?"
"आर्लीचो..."
'आर्लीचो?....आर्ली म्हणजे...आजगाव...शिरोड्याकडची मरे?"
"होय..."
"असा -असा .."
ती एकदम ओळख पटल्यासारखी म्हणाली, "थय कोण भाईबंद?"
देऊची छाती उगाचच धडधडली.
"छा! माझी एक मावळण दिलीसा आर्लेक. पण आमचा जाणायेणा नाय-"
"कोणाकडे गे?"
"राण्याकडे..."
"राणे कोण?"
"साबाजी राणेची बाइल ती माझी मावळण...मी नाय बघूक तिका."
देऊ एकदम तिच्याजवळ गेला आणि तिला बघत राहिला, पण तिचे लक्ष नव्हते. गाठीला बांधलेली अंगठी ती पोटाला खोवलेल्या पिशवीत शोधत राहिली.
"अगे शोधतंय काय तू?"
"अंगठी खय दरवलय मी."
"पदराच्या गाठीत बांधलंय मगे?"
ती एकदम कपाळावर हात मारीत हसली आणि म्हणाली,
असा रे माझा कपाळ...एकदा या अंगठीच्या कृपेनं त्येंका नोकरी गावदे! वर्ष झाला! बसान असतत! असा बसान भागात? काय रे? तीन खानावळी आसत म्हणूनशान पोटात चार घास जातत! तीन खानावळीत भागता रे? साठ साठ रुपये....साठात करून घालतलय काय? तेतली चार शिता आमच्या चौघांच्या तोंडात पडतत म्हणून खानावळ!"
तिने पदराच्या गाठीला परत परत तीन चार गाठी मारल्या आणि ती तरातरा चालत राहिली.
तिच्या पाठीमागून कितीतरी वेळ देऊ चालत राहिला.
मग त्यालाच प्रश्न पडला, मी तिच्या मागून मागून का जातोय? तिचं घर कुठंय ते कळावे म्हणून? तिची खानावळ धरावी म्हणून? घरचे अन्न मिळावे म्हणून?
ती एकदम धावली आणि शिवडीच्या बसमध्ये चढली. मग त्याच्या लक्षात आले, तिला विचारायला हवे होते. तिचे नाव काय म्हणून? आणि ती राहते कुठे ती.....


जयवंत दळवी
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....