
सकाळ झाली...
कोवळी कोवळी उन्हे पसरली आहेत परत...
घर आवरतो आहे परत स्वच्छ
पण खरंच 'आवरता' येणार आहे का हे घर?...
वस्तू पोचल्या आहेत जागच्या जागी
कॅसेटसच्या जागी पोचल्या आहेत कॅसेटस
आणि 'मी त्यातला नाहीच' असा साळसूद टेप...
जमिनीवर जाणवत आहेत अजून
घरभर पसरलेल्या उदास गझला...
भिंतीवर चिकटलेल्या, झुंबर झालेल्या...
दारुनी ओलेत्या मनाला
जरा जास्तच बसतो गझलचा शॉक....!!
गच्चीतल्या धुळीत उतरले आहेत
माझ्याच पावलांचे वेडेवाकडे ठसे...
मी इतका अस्ताव्यस्त चाललो?
पण विश्वास ठेवणे भाग आहे!
आता हे नीट झाडून ठेवण्यापूर्वी
फोटो काढून ठेवावा का ह्यांचा?
'येती' च्या पावलांचा ठेवतात तसा?
संदीप खरे
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment