Wednesday, 17 March 2010

टाकलेला : जयवंत दळवी


पंडितांच घर.
त्यांची कन्या अस्वस्थ होती. पराकाष्ठेची भ्यालेली होती.
या क्षणी कोणीतरी घरी यावं असं तिला वाटतं होतं.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
तिनं दे उघडलं. दारात रंगा उभा. तिचाच धाकटा भाऊ.
"अरे बाबा, आहेस कुठं तू?"
"काय झालं?"
"काय झालं म्हणजे काय? आईचा कुठं पत्ता नाहीये..."
"म्हणजे?"
"सकाळपासून कुठं गेलीय ती आलेलीच नाहीये..."
"जेवण?"
"जेवण केलेलं नव्हतं...ऑफिसात माझा डबासुद्धा आला नव्हता..."
"करंदीकरांना कळवलं?"
"ते ऑफिस सुटल्यावर आले, तेंव्हा मी सांगितलं त्यांना..."
"ते कुठं गेले?"
"ते तीन पत्ते घेऊन गेलेत आईच्या मैत्रिणींचे."
"तुला काय वाटतं?"
"काय?"
"आई कुठं गेली असेल?"
"कसं सांगणार?"
"आज ती बया इथं यायची होती..."
"कोण?"
"तीच...प्रमिला!"
"कशाला?"
"इथं राहणार आहे म्हणे ती कायमची!"
"तुला कोणी सांगितलं?"
"आईनं..."
"आई मला कशी बोलली नाही?"
"तू रडशील म्हणून..."
एकदम तिच्या डोळ्यातनं घळघळा पाणी वाहू लागलं. ती म्हणाली,
"रडू नको तर काय करू? काय आहे आपल्या हातात?"
"खरं आहे! आपला जन्म आपल्या हातात नाही! आपलं आयुष्य आपल्या हातात नाही!"
तो बाहेर जाण्यासाठी वळला. तोही अस्वस्थ झाला.
"तू आता कुठं निघालास?"
"सिगारेटच पाकीट घेऊन येतो..."
"आता तू कुठं जाऊ नकोस..."
"मन बेचैन झालं की सिगारेट ओढल्याशिवाय मला चैन पडत नाही..."
"तू बाहेर जाऊ नकोस..."
"का?"
"भीतीनं माझे हातपाय थंड पडताहेत! कदाचित मला चक्कर येईल."
"कॉफी करून देऊ?"
"नको! तू बोलत रहा काहीतरी."
"पुर्वीच्यासारख्या तू कविता करत नाहीस?"
"अं...हं."
"का?"
"का करायच्या कविता? कशासाठी? कशात कसला पर्पजच आता वाटत नाही."
"तू, रंगा, पूर्वीसारखा अभ्यास केला असतास, तर आता कॉलेजात गेला असतास."
"-आणि?"
"कवी म्हणून तुझं नाव गाजलं असतं....याही परिस्थितीत तू शिकायला हवं होतंस..."
"का?"
"भीतीनं माझे हातपाय थंड पडताहेत! कदाचित मला चक्कर येईल."
"कॉफी करून देऊ?"
"नको! तू बोलत रहा काहीतरी."
"पुर्वीच्यासारख्या तू कविता करत नाहीस?"
"अं...हं."
"का?"
"का करायच्या कविता? कशासाठी? कशात कसला पर्पजच आता वाटत नाही."
"तू, रंगा, पूर्वीसारखा अभ्यास केला असतास, तर आता कॉलेजात गेला असतास."
"-आणि?"
"कवी म्हणून तुझं नाव गाजलं असतं....याही परिस्थितीत तू शिकायला हवं होतंस..."
"तू शिकलीस! काय झालं?"
"आमचं सोडा...आमचं शिक्षण डिग्रीसाठी! डिग्री नोकरीसाठी! आणि नोकरी लग्नासाठी!"
"-आणि लग्न? लग्न कशासाठी? ते तरी झालं का?"
"आता तर तेही मला नकोच आहे!"
"का?"
"आई-बाबाचं जे काही चाललंय ते पाहिल्यावर कुणाला वाटेल आपण लग्न करावं म्हणून?"
तेवढ्यात दोनदा बेल वाजली. हि पंडितांची पद्धत.
"रंगा, दार उघड! बाबा आलेत..."
"तू उघड!"
तो घाईघाईनं आत गेला. तो पंडितांच्या समोर कधीच उभा राहत नसे! अंजीनं दार उघडलं. ती त्यांच्या तोंडाकड भीतीनं बघत राहिली.
"बानू कुठं गेली?"
त्यांनी आत येता येता विचारलं.
"बाबा, आईचा कुठं पत्ताच नाही."
"म्हणजे..."
"सकाळपासून कुठं गेलीय ती..."
"करंदीकर कुठं गेलेत?"
त्यांना संशय आला...ती शेजारच्या करंदीकरांच्याबरोबर गेली की काय!
"काका आईला शोधायला गेलेत..."
"कुठं?"
"त्यांनी तीन पत्ते घेतलेत..."
"कुणाचे?"
"मालूताई चौबळ...कुसुमताई....निराताई..."
"निराताई कोण?"
"चिटणीस..."
पंडित विचार करत बसले. आतून ते अस्वस्थ झाले होते. त्यांच्या हातांची बोटे विचित्रपणे थरथरत होती, पण काहीच घडलेलं नाही असं ते दाखवत होते.
अंजी त्यांच्याकडे बघत राहिली...ते काही बोलतील म्हणून!
तिला काही विचारायचं होतं, पण धीर होत नव्हता, ती अवघडून उभी होती,
"तुला काही विचारायचंय का?"
"हो!"
"काय?"
"बाबा, ती..ती.."
"कोण?"
"प्रमिला...ती इथं राहायला येणार?"
"हो..."
ते एकदम चिडले. रागानं म्हणाले.
"म्हणूनच बानू तिला अपशकून करतेय...आपलं नाक कापून!"
अंजीच्या गळ्यातनं एकदम हुंदका फुटला. ती रडू लागली.
"तुला रडायला काय झालं?"
तिला वाटलं, यांना काय सांगायचं? ती फक्त रडत राहिली!
"प्रमिला आली तरी तुम्हा कुणाला काही कमी होणार नाही!"
तिनं एकदम रडू आवरलं. धीर केला आणि ती म्हणाली,
"बाबा, मी कधी तोंड उघडून तुम्हाला बोलले नाही!...पण तुम्ही आमचा सगळ्यांचा बळी घेताय. आईला कसलं म्हणून सुख नाही...आज ती कुठं कोण जाणे. माझं आणि रंगाचं तर आयुष्यच विस्कटून गेलंय! तो आज कॉलेजात शिकला असता....कवी म्हणून नावारूपाला आला असता...आपल्या आयुष्याला त्यानं उमेदीनं आकार दिला असता..."
पंडित तिच्याकडे बघत राहिले. आणि म्हणाले,
"ते त्यानं करावं! सगळं करावं! मी काही कमी पडू देणार नाही!"
"या गोष्टी पैशानं होत नाहीत, बाबा! घरात मन आनंदित राहील असं वातावरण हवं...माझं काय झालं?'
"काय?"
"मी ऑफिसात असते तेंव्हा चार घटका माझं मन रमलेल असतं! ऑफिस सुटलं की मी रेंगाळते...मला घरी येउच नये असं वाटतं-"
त्यांनी एकदम वळून बाजूला पाहिलं. कोणी तरी चुकून घरात आलेला परका माणूस बाहेर जावा तसा रंगा तोंड लपवित बाहेर जात होता. बोलणं थांबवून तिनंही रंगाकडे पाहिलं. "जरा थांब", असं तिनं किंवा त्यांनी रंगाला सांगितलं नाही. कारण दोघानाही ठावूक होतं. तो थांबला नसता!
"स्वप्नं बघण्याचं वय आमचं! पण आमची स्वप्नं तुम्ही चिरडून टाकलीत!"
"उगाच काही तरी बडबडू नकोस-"
ते किंचित रागारागानं म्हणाले,
"मी तुझं लग्न करून देईन-"
"काही नको...! सगळीकडे पत्रिकेचं निमित्त होणार आहे...असल्या बापाची मुलगी कुणीही आपल्या घरात घेणार नाही!"
"अंजे थोबाड फोडीन-"
ते हात उगारून ओरडले.
"फोडा....फोडा....ठार मारा मला....आज मी उभ्या आयुष्याचं बोलून घेतलंय!"
ती खूप मोठ्यानं रडली. रडता रडता ती धावत आपल्या खोलीत गेली. पंडित तिला पाठमोरी बघत काही क्षण तसेच बसून राहिले.
आपलं काय चुकतंय याचा त्यांनी क्षणभर विचार केला. पण नीट कळलं नाही! कळून चटकन वेगळा मार्ग घेता येतो असंही नाही!
त्यांना मद्याची तलफ आली. व्हिस्कीची बाटली घेण्यासाठी ते उठले. बाटली आणून पुन: स्वस्थ बसले. क्षण दोन क्षण बाटलीकडे टक लावून बघत राहिले!
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्यांना वाटलं, बानू आली. त्यांनी मनाशी ठरवलं, तिच्याशी एक शब्दसुद्धा बोलायाचा नाही! तिला अशीच तडफडत ठेवायची. कुठं गेली होतीस एवढंसुद्धा विचारायचं नाही-
त्यांनी दार उघडलं. बाहेर शेजारचे करंदीकर उभे होते. थकलेले दिसत होते.
"या-"
"आल्या का बानुताई?"
"नाही अजून-"
"तुम्हाला कधी कळलं?"
"आत्ताच इथं आल्यावर-"
"मी तिन्ही ठिकाणी जाऊन आलो.....चिटणीस...चौबळ...कुलकर्णी....त्या म्हणाल्या, कित्येक दिवसात बानुताई भेटलेल्या नाहीत-"
"बसा करंदीकर! तुम्ही व्हिस्की घेणार?"
'नाही-"
"एक स्मॉल वन?"
"नो!"
"सरबत?"
"काही नको!"
"का?"
"छे!...आता यांना शोधायचं तरी कुठं?"
"कुणाला?"
"बानुताई-"
"येईल, बसा तुम्ही!"
करंदीकर बसले. पण अस्वस्थ होते. मधेच उठत म्हणाले.
"पंडित, आपण पोलीस-स्टेशनवर जाऊया."
पंडितांनी ग्लास भरता भरता विचारलं, "कशाला?"
"रिपोर्ट करायला-"
"रिपोर्ट काय करायचा?"
"कुठं एक्सिडट झाला असला तर-"
"चिअर्स-"
पंडितांनी सवयीनं ग्लास उचलला आणि तोंडाला लावला.
"मघाशी अंजी म्हणाली....अंजी कुठं गेली?"
"आत झोपली आहे!...भ्यालीय ती-"
"मघाशी मी आलो तेंव्हा तर रडायलाच लागली!"
"ती काय म्हणाली?"
"कोण?"
"अंजू-"
"म्हणाली-आईनं जीवबीव तर...गाडीखाली..."
"छे-"
पंडित हातातला ग्लास ठेवून उठले. आणि टेबलावर शोधाशोध करू लागले.
"काय शोधता?"
"काही चिट्ठीबिठ्ठी ठेवलीय का पाहत होतो-"
चिठ्ठीच्या कल्पनेने करंदीकर एकदम दचकले. त्यांनी विचारलं,
"आहे?"
"नाही!"
पंडित घरात येऊन बसले. शांतपणे पिऊ लागले.
"काल काही विशेष घडलं नव्हतं ना?"
"काय घडणार? रोजचंच!"
"ती इथं येतेय?"
"कोण?"
"प्रमिला जोग-"
"तुम्हाला कुणी सांगितलं?"
"कानावर आलं!"
"बाबून सांगितलं?"
"नाही!'
"रंगा म्हणाला."
"काय म्हणाला?"
"हेच...ती इथं येऊन राहणार आहे म्हणून-"
"आणखी काय म्हणाला?"
"काय म्हणणार? पण तो फार अस्वस्थ, बेचैन आहे!"
पंडित एकदम गप्प झाले. न बोलता ग्लास भरू लागले.
करंदीकरानी विचारलं,
"हे तुम्ही बानूताईना कधी सांगितलं?"
"काल रात्री-"
"मग बरोबर! म्हणजे त्या घर सोडूनच गेल्यात-"
"जाऊ दे! येईल परत-जाऊन जाणार कुठं?"
दोघेही गप्प राहिले. थोडा वेळ! मग पंडित म्हणाले,
"आमचे खांडेकर...पर्सोनल मनेजर...त्यांनी दुसरं लग्न केलं म्हणून चिडून त्यांची पहिली बायको माहेरी निघून गेली होती! काय झालं? सहा महिन्यांनी परत आली! तिला जायला माहेरतरी होतं...बानूला तेही नाही!"
'अहो पंडित, पण बानूताईनी आत्महत्या केली तर?"
करंदीकर एकदम घाबरून उठून उभे राहिले.
"काही करीत नाही! बसा तुम्ही!"
पंडित आपण शांत आहोत असे दाखवत होते. पण ते आतून अस्वस्थ होते. गटागटा पीत होते. तिनं आत्महत्या केली तर अब्रू जाईल म्हणून!
"पण मी म्हणतो, पंडित, आता या वयात तुम्हाला असं काही का करावंस वाटतं? अड अवॉट प्राइस?"
"त्याला इलाज नाही! बायको म्हणून बानू मला आता सुख देऊ शकत नाही! मला माझ्या सुखाची गरज आहे! ती गरज घरच्यांनी ओळखायला पाहिजे. एनी वे, आय विल मनेज!"
ग्लास एकदम उलटा करून त्यांनी तोंडात ओतला!
"पंडित, बानूताईंनी आत्महत्या केली असं तुम्हाला या क्षणी कळलं....तर तुम्हाला काय वाटेल?"
"तुम्हाला आठवतं करंदीकर? तुमच्या कमलाबाईंची किडनी फेल होत होती....ते सांगताना तुम्ही माझ्या खांद्यावर मान टाकलीत.... आणि ढसाढसा रडलात-"
"मी रडलो म्हणजे काय? त्यावेळी मी दुभंगून....उन्मळून पडतोय असं मला वाटलं-"
हे सांगतानाही करंदीकरांचा गळा दाटून आला!
"मला तसं काहीही वाटणार नाही!"
"तुम्ही आयुष्यात कधी सुखी होणार नाही, पंडित! ज्याला प्रेम म्हणजे काय ते कळलं नाही-"
"मला प्रेम आणि शरीरसुख यात कधी फरकच करता आला नाही!"
"तुम्हाला एक खाजगीतल सांगू का, पंडित?"
"काय?"
"आमची कमल...तुम्हाला माहित आहे....दिसायला बरी नव्हती! आमचं दुर्दैव म्हणजे चांगली दिसणारी मुलगी आम्हाला कधी सांगून आलीच नाही! ज्या आल्या त्यात कमल उजवी! म्हणून केली! पण मला ती मनापासून आवडत नव्हती...."
"पण तुमचं केवढं प्रेम होतं तिच्यावर?"
"तेच सांगतोय! हे लग्न झालं तेंव्हाच! .....पण मग मी एकदा विचार केला....'आवडत नाही....
आवडत नाही' म्हटलं तर आम्ही दोघंही जन्मभर दु:खी होऊ! म्हणून मग आम्ही एकत्र फिरायला लागलो...बोलायला लागलो...एकमेकांच्या आवडीनिवडीत लक्ष घातलं...आणि मग एकदम चमत्कार झाला, पंडित! मग तिच्या रूपाचा...आपल्या शरीरसुखाचा विचारच गळून पडला! पण...मग ती गोडच दिसायला लागली!....तीच आपल्या अस्तित्वाचा आधार आहे असं वाटू लागलं!"
"व्हेरी स्ट्रेंज!"
काही समजत नसल्यासारखा पंडितांनी चेहरा केला! आणि ते कानोसा घेतल्यासारखे म्हणाले,
"बाय द वे...कमलावहिनी जाऊन आता दोन वर्ष झाली!...मला सांगा, तुमच्या मनात दुस-या कुण्या बाईबद्दल कधी....?"
करंदीकर हसले आणि म्हणाले,
"मनातून काही वाटणं आणि तसं वागणं यात फरक आहे, पंडित! आपण मानसं आहोत! आपण विचार करून लक्ष्मणरेषा आखू शकतो!"
"
लक्ष्मणरेषा! लक्ष्मनान आखायची आणि सीतेने ओलांडायची-"
पंडित हसले-ग्लासातल्या मद्याकडे बघत राहीले. त्यांच्या मनाचा निर्णय होत नव्हता...विचारावं की नको? पण त्यांनी निश्चय केला.
"करंदीकर, तुम्हाला एक मोकळेपणानं विचारू का?"
"आपण इथं नको त्या गोष्टी बडबडत बसलोय....आणि बानूताईचा अजून पत्ता नाही-"
"तुम्हाला तिची एवढी काळजी वाटतेय?"
"तुम्हाला नाही वाटत, पंडित?"
"तुम्हाला एक विचारू, करंदीकर?"
"विचारा ना-"
"तुम्हाला बानुमध्ये काही इटरेस्ट?"
करंदीकराना एकदम धक्का बसला.
"विचारून हे काय विचारलंत, पंडित? याचा अर्थ मी यापूढ इथं यायचं नाही."
ते त्याच क्षणी उठून उभे राहिले.
"कमॉन, करंदीकर-"
त्यांना खाली बसवीत पंडित मोठ्यानं हसले. म्हणाले,
"वी आर फ्रेंड्स, आफ्टरऑल-"
"पण तुम्हाला हा संशय कधी आला?"
"कसला?"
"की मला बानूताईमध्ये इटरेस्ट वाटत असेल-"
"छे...छे! संशय कसला?"
"त्याशिवाय का तुम्ही असं विचाराल?"
"सांगू?"
"सांगा ना-"
"गेल्या वर्षी मी इथं मोठी पार्टी दिली...माझ्या वाढदिवसाची-"
"हो! आपण सर्वजण खूप प्यालो-"
"बानुही प्याली-"
"राईट!"
"पार्टी रंगात आली तेंव्हा तुमचा व्हिस्कीचा अर्धा ग्लास एकदम बानू प्याली-"
"अशक्य! अगदी
अशक्य!....तरीही बानूताईचा अर्धा ग्लास मी प्यालो असं तुम्ही म्हटलं नाही हे माझं नशीब!"
"जे नी पाहिलंय तेवढंच सांगतोय-"
"मला हे खरं वाटत नाही! त्या प्याल्या असल्या तरी त्यांना कल्पना नसावी, की तो अर्धा ग्लास माझा होतं म्हणून-"
पंडित ते मान्य करायला तयार नव्हते! हट्टालाच पेटल्यासारखे!
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. करंदीकरानी दरवाजा उघडला.
दारात बानू उभी होती.
रात्रीचे दहा वाजले होते.
"अगं अंजू, बानुताई आल्या-"
करंदीकर एकदम जोराने ओरडले. ते हर्षभरित झाले होते.
बानू नेहमीपेक्षा अधिक प्रफुल्लीत होती.
ती हसत हसत आत आली. अंजून तिला कडकडून मिठी मारली.
पंडित बघत होते. पण तिने त्यांची दखल घेतली नाही. त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा नाही.
अंजूला गदगदून आलं होतं. रडता रडता, हसता हसता ती म्हणाली,
"सकाळी आठला तू गेलीस...आता वाजले किती?"
"कुठूनतरी फोन करायचा, बानुताई!"
करंदीकर म्हणाले. त्यांना त्या क्षणी बानुताई खूपच वेगळी दिसत होती.
"नाही केला फोन! आज वेगळं स्वातंत्र्य घेतलं! आजपर्यंत
स्वातंत्र्य की सुरक्षितता म्हटलं की, सुरक्षितता बरी वाटायची!....आता सुरक्षितता झिडकारायचं ठरवलंय मी!"
बानू बेफिकीरीन म्हणाली.
"कुठं गेली होतीस?"
पंडितांनी विचारलं. आवाजात अधिकार होतं.
"का?"
"मला प्रश्न नको आहे! आय मस्ट नो-"
"मी बांधलेली नाही-"
"बानू, तू मर्यादा ओलांडते आहेस-"
"होय! आज प्रथमच-"
"परिणाम वाईट होतील-"
"मला पर्वा नाही!"
बानू कमालीची स्वस्थ, शांत होती!
"मी जाऊ का?"
करंदीकरांनी अवघडून विचारलं, प्रसंग विचित्र होता.
"चला तुम्ही, करंदीकर तुम्हाला एंबरसिंग वाटेल-"
"थांबा काका! बानू म्हणाली, "प्रथमपासून तुम्ही या घरच्या दुर्दशेचे साक्षीदार आहात. एकदा हे शेवटचे ऐकून जा!
"इनफ ऑफ इट, बानू!" पंडित डोळे गरगर फिरवीत ओरडले. ते संतापले होते.
"मिस्टर पंडित, मी आजपासून तुम्हाला टाकलेलं आहे!"
ती एक एक शब्दावर कमालीचा जोर देत म्हणाली.
"शटप! मी तुला घटस्फोट देणार नाहीये! पोटगी मिळणार नाही!"
"मला काहीच नको आहे!"
"मग जाशील कुठं?"
"मी कुठंच जाणार नाही! तुम्हालाच जावं लागेल-"
"वॉट डू यु मीन, बानू?"
"ही जागा माझ्या नावावर आहे! सुदैवानं ! या जागेत प्रमिला येऊ शकणार नाही. तुम्हाला इथनं घालवण्याची व्यवस्था मी केलेली आहे- अतिप्रसंग टाळायचा असेल तर तुम्हाला मुकाट्यानं गेलं पाहिजे."
पंडित आणि करंदीकर तिच्याकडे बघत राहिले. तिनं रुद्रावतार धारण केला होता.
पंडितांच भस्म होत होतं!
पूर्वीच्या काळात त्यांनी तिचं थोबाड रंगवलं असतं!
पण या क्षणी त्यांना भ्याल्यासारखं वाटलं!


संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....