Tuesday 2 March 2010

शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा : राजा शिवछत्रपती प्रा. शिवाजीराव चव्हाण


आज शिवजयंती. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शेती, शेतकरी जीवन, महसुली व्यवस्थेची माहिती देणारा हा विशेष लेख दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य स्वतः डोळ्यांनी पाहणारा बखरकार कृष्णाजी अनंत सभासद लिहितो, "राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्‍वरीपर्यंत द्वाही फिरविसी देश काबीज केला. आदिलशाहीस कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही या चारी परकीय पातशाह्या व समुद्रातील बेविस पातशहा फिरंगे असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून हिंदवी स्वराज्य स्थापिले, सिंहासनाधीश छत्रपती जहाले. शककर्ते झाले, ए जातीचा कोणी मागे झाला नाही. पुढेही होणे नाही.' या बखरकाराप्रमाणे देशी-परदेशी इतिहासकारांनी शिवरायांची अलौकिकता जागतिक युगपुरुषांमध्ये अशीच गणना केलेली आहे.

शिवकालीन लष्करी शासनव्यवस्था, मुलकी प्रशासनव्यवस्था, शासकीय न्यायव्यवस्था वर्तमानकाळातही मार्गदर्शक अशीच आहे. कोणत्याही राज्याचा गावगाडा, त्या राज्याच्या शेतीच्या चाकावर चालत असतो. वास्तविक शिवकालीन गावगाड्यापासून शिवकालीन कृषी व्यवस्था बाजूला काढता येणार नाही. कारण कृषी व्यवस्था त्या गावगाड्याचे एक अविभाज्य अंग होते.

"रयत सुखी, राजा सुखी', "शेतकरी सुखी तर राजा सुखी' हे शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ्यांच्या, रयतेच्या कल्याणासाठी आहे, ही त्यांची भावना, त्यांच्या अनेक आज्ञापत्रातून व्यक्त झालेली आहे. म्हणूनच त्यांचे वर्णन अनेक इतिहासकारांनी ""शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा'' असे केलेले आहे.

शिवकालीन शेतीचे स्वरूप ः शिवकालीन शेतीचे गावात "पांढरी' आणि "काळी' असे दोन भाग पडले होते. गावाची वसाहत पांढऱ्या मातीच्या जमीनीवर केली जात असे. ज्या जमिनीमध्ये पीक घेतले जात असे त्या जमिनीस "काळी आई' असे, तर ज्या शेतीवर वसाहत केली जात असे त्या शेतीस "पांढरी आई' असे म्हणत असत. शिवकालीन समाजात शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने या "काळी आईस' सर्वांत महत्त्वाचे उत्पादनाचे साधन मानले गेले. या "काळ्या आईचे' प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. प्रत्यक्ष लागवडीखाली असणारी पिकाची जमीन आणि नापीक पडीक जमीन. अशा पडीक जमिनीचा वापर गावकरी गुराढोरांना चराऊ रान म्हणून वापरत. अशा रानास "गायरान' असे म्हणत असत. एकूण सर्व जमिनीचे मालक सरकार असले, तरी सरकार काही प्रत्यक्ष जमीन कसू शकत नाही. त्या करिता सरकारला जमीन शेतकऱ्याला मुदत मालकीहक्काने द्यावी लागत असे. शेतकरी त्या जमिनीचा सरकारात मोबदला "खंड' म्हणून भरत असे. म्हणजे रयत "सारा' सरकारला भरत असे. शासन काही जमीन धार्मिक संस्थाना इनाम म्हणून देत असे. त्यावर सारा माफ असे. गावच्या जमिनीपैकी २० टक्के जमीन अशा पद्धतीने काही धार्मिक संस्थांना इनाम म्हणून दिली जात असे. सरकारच्या धोरणानुसार कसण्याची जबाबदारी त्या शेतकऱ्यावर असे. सरकारच्या विरोधात वर्तन केल्यास ती इनामी जमीन काढून घेतली जात असे.

शेतकरी जीवन ः शिवरायांच्या प्रशासनामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुखी, समृद्ध होते. शेतकऱ्यांस रयत, कुणबी, कुळवाडी अशा विविध नावांनी संबोधले आहे. प्रत्यक्ष शेतावर कष्ट करणारा, राबणारा शेतकरी हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता; पण त्याचा व्यवसाय हा समाजातील प्रमुख व महत्त्वाचा मानला जात होता. कारण त्याचे उत्पन्न हेच खरे राज्याचे उत्पन्न होते, म्हणून सरकारसुद्धा शेतीच्या प्रश्‍नांविषयी जागृत होते. पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने जमिनीचे "बागायत' व "जिरायत' असे दोन प्रकार केले जात. छोट्या छोट्या ओढ्या-नाल्यांवर किंवा नद्यांवर लहान लहान बंधारे घालून त्यातील पाणी पाटांनी शेतीस पुरवले जाई. अशा जमिनीस "पाटस्थल' असे म्हणत. काही ठिकाणी विहिरीच्या पाण्यावर काही जमीन पिकविली जात असे. अशा जमिनीस "मोटस्थल' जमीन असे म्हणत. काही जमिनींना छोट्या ओढ्यांना बंधारा घालून जमिनीच्या उंचीचा फायदा घेऊन पाणी पुरविले जात असे. अशा जमिनीस फुग्याखालील जमीन म्हटले जात असे. शेतीसाठी अधिक मनुष्यबळाची गरज असे. शेतकरी आपल्या बायका-मुलांसह शेतावर राबत असे. उत्पन्न चांगले काढत असे. जीवनावश्‍यक धान्याचा तुटवडा पडत नसे, खाऊन पिऊन शेतकरी सुखी होता.

शेतजमिनीची मोजणी ः शिवकाळात शेतीची मोजणी हा महत्त्वाचा घटक मानला होता. जमीन मोजणीसाठी "काठी'चा वापर केला जात होता. या काठीला "शिवशाहीकाठी' असे म्हणतात. ही काठी पाच हात व पाच मुठी इतक्‍या लांबीची असे. एक हात सात मुठींचा व एक मूठ दोन तसूंची असे. याप्रमाणे प्रमाण मानले जाई. एक मूठ म्हणजे अंगठ्याजवळचे बोट व करंगळीमधील अंतर व एक तसू म्हणजे दोन बोटांच्या सांध्यातील अंतर मानले जाई. अशा प्रकारे पाच हात व पाच मुठी यांनी बनलेल्या वीस चौरस काठ्यांना मिळून एक "पांड' होई आणि अशा वीस पांडांचा मिळून एक "बिघा' होई. एकशेवीस चौरस बिघे मिळून एक "चावर' होई. कोकणात वीस औरस-चौरस पांडांऐवजी तेवीस औरस-चौरस पांडांचा एक बिघा मानला जाई. सरकारी अधिकाऱ्यांच्याबरोबर जमीन मोजणीचे काम वतनदार, तराळ करीत असे. त्याच्या हाती ही मोजणीची काठी असे व तो जमीन मोजत असता काठी उडवीत असे. म्हणजे एक काठी जमीन मोजल्यावर दुसरी काठी टाकताना ती काठी उडी घेत असे. त्यामुळे या काठीस त्या काळी "चलती काठी' असे म्हणत. अशा प्रकारे काठी उडी घेत असल्यामुळे बिघ्यातील काठ्यांची संख्या सर्वत्र सारखीच राहते, असे नाही. तेव्हा लांब दोर धरून अंतर सारखे केले जात असे. शेतीची मोजणी अधिकात अधिक बरोबर रास्त केली जात असे.

(लेखक इतिहास विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)


संकलन:प्रवीण कुलकर्णी


No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....