
भेटताच तू मला भेटले मरूद्यान सखये
माझ्यासाठी तूच धरा अन आसमान सखये
कैद करोनी ठेवलेस मज काळजात आपुल्या
इतके सुंदर कुठे पाहिले अंदमान सखये
एकजात बघ सारे उठले मुळावरी अपुल्या
अशी कशी गं सती दुनिया बेईमान सखये
हृदय आणखी हृदय मिळोनी एक हृदय होते
प्रीतपुस्तकामधले सांगे पान पान सखये
पोटासाठी बाग बनवली खुडताना कळले.
कळ्या फुलांना विकतो आहे बागवान सखये
मरूद्यान मी शोधायाचा ध्यास घेतला होता
स्वतः उंट अन स्वतःच बनलो सारवान सखये
इलाही जमादार
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment