
अंगाभोवती काळी चादर गुंडाळून एक वृद्ध स्त्री स्मशानाच्या कोपऱ्यात एका कबरीजवळ शांत उभी हती. दुरून तर ती जड शिळाच वाटावी आणि हा कोपराही कसा? तर फक्त अनाथ आणि गरिबांना पुरण्यासाठी सोडून दिलेला.
काही अंतरावरून मी तिला न्याहाळत होतो; पण ती तर जशी सगळं भान हरपून त्या लहानशा कबरीकडंच बघत होती. मी काहीसा तिच्याजवळ गेलो; पण ती आपल्याच दुनियेत हरवलेली होती. माझी चाहूल लागताच तिने फक्त आपला चेहरा फिरवत, अगदी खोल गेलेल्या डोळ्यांनी मला न्याहाळलं. मग हळूवार आपला चेहरा झुकवत पुन्हा त्या कबरेत नजर गाडून टाकली.
खरं तर एखादा अनोळखी माणूस जवळ येताना पाहून उत्सुकता, बेचैनी असे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसायला हवे होते. मात्र तसं कोणतंच चिन्ह नव्हतं. पांढरी होत चाललेली केसांची एक बट तिच्या सुकलेल्या गालावर रेंगाळत होती, तिचे पातळ ओठ आत ओढले गेलेले होते आणि त्यांच्या सुरकुतलेल्या कडा तर चेहऱ्यावरची उदासी आणखीनच गडद करीत होत्या.बहुधा, रात्रीची जागरणं आणि कायमच्या रडण्यानं पापण्याही कोमेजून डोळ्यांवर लटकत होत्या...
मला त्या म्हातारीबद्दल फार सहानुभूती वाटायला लागली. अगदी प्रेमळ शब्दांत मी बोलण्याचा प्रयत्न केला.
तिला विचारलं, "इथं कोण झोपलंय, आजीबाई?"
"माझा मुलगा कालुशा." भावशून्य रूक्ष शब्दांत ती उत्तरली.
"किती मोठा होता?"
"बारा वर्षांचा."
"कधी वारला तो?"
"चार वर्ष झालीत"
मग तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि हलकेच आपल्या अस्ताव्यस्त केसातून बाहेर पडणाऱ्या बटेला चादरीत खोसून दिलं...
एव्हाना दिवस माथ्यावर आला होता. सूर्य अगदी कठोरपणे आग ओकत होता. कबरीवर उगवलेले गवताचे खुरटे पाते उष्णता आणि धुळीनं पिवळे पडले होते. आजूबाजूची धुळीनं माखलेली आणि वाळलेली झाडेही या कबरीमध्ये इतक्या उदासपणे उभे होते कि जसे तेही शवच वाटावेत...
तिच्या मुलाच्या कबरीकडे सहानुभूतीने पाहत मी विचारलं, "असा अचानक कसा गेला तो?"
"घोड्यांनी चिरडलं त्याला." पुन्हा औपचारिक संक्षिप्त उत्तर.
मग तिनं आपला सुरकुत्या पडलेला हात त्या लहानशा कबरेवरून अलगद फिरवला. जशी ती आपल्या लेकराला झोपू घालत होती...
"कशी झाली हि दुर्घटना?" मी विचारलं.
खरं तर अशा प्रकारे चौकशी करणं हे सभ्यतेला धरून नव्हतं; पण त्या आजीबाईचा शोकविव्हल चेहरा आणि त्यावर दाटून राहिलेलं दु:ख माझी उत्सुकता वाढवत होतं. तिचा शांत आणि वेदनेनं काजळलेला चेहरा मला अस्वस्थ करत होतं. तिच्या निर्जीव डोळ्यातून अश्रू ओघळावेत असं राहून-राहून वाटत होते.
माझा प्रश्न ऐकून तिने पुन्हा माझ्याकडे पाहिलं. मग एक लहानसा श्वास घेऊन अगदी खोल आवाजात ती म्हणाली, "माझं दु:ख काय सांगू बाबा? माझ्या नवऱ्याला एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पोलीस घेऊन गेले. त्याला दीड वर्षाची कैद झाली होती. आधीचं आमची परिस्थिती नाजूक, तो गेल्यावर तर रोजच्या भाकरीचेही हाल व्हायला लागले. कारण घरात तोच एकटा कमावता होता. घरात होतं नव्हतं ते विकून आम्ही माय-लेक दिवस काढत होतो; पण ते संपल्यावर तर आमचे हाल फारचं वाढले...
मग नातेवाईकांच्या मेहरबानीवर आम्ही दिवस ढकलू लागलो. एका माळ्यानं आमच्या नातेवाईकाकडून खराब झालेलं गाडीभर गवत घरी आणून टाकलं. आम्ही तेच वळवून खात होतो, पण ते बेचव अन्न घशाखाली उतरत नव्हतं...
कालुशा शाळेत जायचा. अभ्यासाठी तो हुशार होतं. काय सांगू?...खूप समजदार होता हो माझं कालुशा! त्यानं कधी काही मागितलं नाही कि कशाची जिद्द केली नाही. उलट शाळेतून येता-येता रस्त्यात सापडलेलं एखादं लाकूड तो घरी येऊन यायचा.
तेंव्हा वसंत ऋतू चालू होता. बर्फ वितळत होता. आणि माझ्या कालुशाकडे पायात घालायला कापडी बुटाशिवाय काहीचं नव्हतं...
घरी आल्यावर तो ते बूट काढायचा, त्याचे पाय लाल लाल झालेले असत, पण आसवं गाळण्याशिवाय मी तरी काय करू शकत होते?
एक दिवस कालुशाच्या वडिलाला सोडून देण्यात आलं; पण तुरुंगातच त्याला लकवा झाला होता. घोडागाडीतून त्याला घरी आणून सोडलं. आधीच आमची खायची मारामार होती. आता खायला आणखी एक तोंड वाढलं. तो अगदी उदास डोळ्यांनी काही न बोलता आमच्याकडे बघत राहायचा. मला तर त्याचा फार राग येई. त्याच्यामुळेचतर आम्हा माय-लेकराचे असे हाल होत होते. कधी कधी वाटायचं, या मुर्द्याला उचलून तळ्यात फेकून द्यावं...
जेंव्हा कालुशानं पहिल्यांदा आपल्या वडिलांची हि स्थिती पाहीली, तेंव्हा तर त्याने दु:खाने किंकाळीच फोडली होती. अगदी पांढरा-फटक चेहरा पडला होता हो माझ्या पोराचा. डोळ्यांना तर धाराच लागल्या होत्या त्याच्या.
"काय झालंय बाबांना?" कालुशानं रडतंच विचारलं होतं.
"त्याचे दिवस भरलेत आता." मी रागातच म्हणाले होते.
नंतर तर आमची स्थिती आणखीनच वाईट होत गेली. मी मजुरी करत होते. दिवसभर अगदी अंग मोडेस्तर मी राबायचे; पण हातात वीस पैशापेक्षा जास्त रक्कम कधीच आली नाही आणि तेही हाताला काम मिळालं तरच. काय सांगू पोरा, नरकापेक्षाही वाईट स्थिती होती ती. कधी कधी तर वाटायचं कि हे आयुष्यच संपवून टाकावं. एकदा अगदीच सहन होईना, तेंव्हा मी चिडून म्हणाले, 'मला तर या जीवनाचा अगदी वीट आलाय. असं वाटतं कि, एक तर मी मरावं किंवा तुमच्या दोघांपैकी एकानं संपून जावं.'
माझ्या या बोलण्यावर नवरा तर केवळ मानच हलवू शकत होता. तो जणू म्हणत होता, 'तिरस्कार का करतेस माझा? थोड्याच दिवसांचा तर मी पाहुणा आहे. कबरेतच तर पाय लटकवून बसलोय...'
कालुशा काही न समजून माझ्याकडे पहातच राहिला. थोड्या वेळानं तो उठला आणि बाहेर गेला. नंतर मला माझ्या बोलण्याचा फार पश्चाताप होत होता. अगदी मेल्याहून मेल्यासारखं होत होतं मला.
त्यानंतर एखादा तासच झाला असेल, एक शिपाई आमच्या घरी आला.
तो म्हणाला, "कालुशाची आई तूच का?"
माझा तर जसा श्वासच अडकला. मी हो म्हणून मन हलवली.
'तर तुला दवाखान्यात यावं लागेल. तुझा मुलगा एका व्यापाऱ्याच्या घोडयाखाली येऊन गंभीर जखमी झालाय,' शिपाई म्हणाला.
ज्याची भीती वाटत होती तेच झालं होतं. शिपायाच्या गाडीतच मी दवाखान्याकडे निघाले...
गाडी तर जसे गरम कोळसे ठेवल्यासारखं वाटत होतं. मी राहून राहून स्वतःलाच शिव्या देत होते. कोणत्या अशुभ क्षणी माझ्या मेलीच्या तोंडून ते शब्द निघाले होते!
दवाखान्यात कालुशाची स्थिती पाहून तर मी सुन्नच झाले. पलंगावर जसा पांढऱ्या पट्ट्यांचा गठ्ठाच टाकलेला होता. त्याचं अख्खं शरीर कापडी पट्ट्यांनी गुंडाळलेलं होतं. त्यानं क्षीण नजरेनं माझ्याकडे पाहिलं, मग नकळतच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो कसा-बसा म्हणाला, "आई मला माफ कर. मी जास्त काळ तुझी सेवा करू शकत नाही...आणि पैसे शिपायाकडे आहेत." हे ऐकून तर मला आश्चर्यच वाटलं.
"पैसे? कसले पैसे? हे तू काय बोलतोस बेटा?" मी रडतच विचारलं.
"तेच पैसे जे रस्त्यावर लोकांनी मला दिले आणि हो, त्या घोड्याच्या व्यापाऱ्यानंही काही पैसे दिलेत." कालुशा कसा-बसा बोलला.
"पण हे सगळं कशासाठी बाळा?"
माझा गोंधळ संपत नव्हता.
"यासाठी कि..." इतकं म्हणून त्याच्या तोंडून हलकीशी किंकाळी बाहेर पडली. त्याला शरीरभर वेदना होत असाव्यात. त्याचे डोळेही आपोआप मोठे झाल्यासारखे वाटले.
"कालुशा... माझ्या पोरा! मी ओरडलेच. बेटा, हे सगळं कसं झालं? तुला काय ते घोडे येताना दिसले नाहीत?"
अगदी सहजपणे कालुशा उत्तरला,"घोडे तर मी पहिले होते आई! मुद्दामच मी जागचा हललो नाही. मी विचार केला कि, या घोड्यांनी मला चिरडलं, तर लोक सहानुभूतीनं पैसे देतील आणि घोड्याच्या मालकालाही नुकसानभरपाई द्यावीच लागेल. त्याने तुझा भार काही प्रमाणात तरी हलका होईल...पैसे त्या शिपायाजवळ आहेत आई. ते तू घेऊन टाक."
कालुशाचे हे शब्द माझं काळीज चिरून गेले. माझे डोळे तर अश्रूत बुडून गेले होते. माझ्या लाडक्या पोराच्या या स्थितीला तर मीच जबाबदार होते. मी, मी, त्याची स्वतःची आई! पण आता पश्चाताप करण्याशिवाय मी काय करणार होते...आणि दुसऱ्या दिवशी काळूशाने कायमचे डोळे बंद केले. त्याला शेवटपर्यंत आमचीच चिंता होती. तो शेवटपर्यंत बडबडत राहिला, बाबांसाठी हे घे, ते घे आणि आई, तुही स्वतःसाठी काही तरी घे बरं का!
"माझ्या लेकराचा जीव घेतला ते एकूण सत्तेचाळीस रुपये जमले होते. खरं म्हणायचं तर त्या पैशांनी नाही तर मीच कालूशाचा जीव घेतला होतं..."
इतकं बोलून ती म्हातारी स्त्री शांत झाली तिचं बोलणं थांबताच भयाण शांततेनं ती स्मशानभूमी व्यापून गेली. असं वाटत होतं कि, सभोवतालची शांत झाडं, आजूबाजूला पडलेली मातीची ढिगारं आणि कबरीवरच्या टोकदार निशाण्या या सगळ्यांचं तिची कटू कहाणी ऐकत होते.
आकाश अगदी निरभ्र होतं. ढगांचा लहानसाही धब्बा कुठं दिसत नव्हता. सूर्याचं धरतीवर आग ओकणं चालूच होतं. एवढं दु:ख सहन करूनही ही स्त्री कशी जिवंत राहिली असेल याचा मी विचार करत होतो. काय करावं ते न समजून मी खिशातून काही नाणी काढली आणि तिच्याकडे हात सरकवला.
आपली मान वळवत ती उपरोधानं म्हणाली, "माझ्यावर दया करू नकोस बाबा! आजच्यासाठी माझ्याकडे भरपूर आहे. माझा कालुशा सोडून गेलाय ना! आणि पुढच्या काळासाठी मला गरजच नाही...मी एकदम एकटी आहे...या जगात एकदम एकटी."
ती पुन्हा शांत झाली. आपल्याच तंद्रीत कबरीकडे मान वळवत ती पुन्हा आपल्या लाडक्या कालूशाला पाहण्यात गुंग झाली....
मॅक्झीम गॉर्की
अनुवाद:डॉ. विशाल तायडे
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment