

जिने माझ्या कपाटाचा
कोपरान् कोपरा तपासला
बाटल्यांची रांग पाहून
नेहमी ‘आ’ वासला.....
... त्या माझ्या प्रिय पत्नीस..
अविनाश ओगले


सांप्रतकाळी, मद्यपानाची घातक सवय जडल्याने रोज रात्री नव्या थापा मारुन घराबाहेर पळणारे,
मध्यरात्रीनंतर लटपटत घरात शिरणारे (क्वचित दुसर्याच्याही), आणि सकाळी सार्याचा पश्चात्ताप
करुन दारु सोडण्याचा निश्चय करणारे नवरोबा आणि त्यांना व्यसनापासुन परावृत्त करण्यासाठी
ढसाढसा रडणे, अबोला धरणे, माहेरी निघुन जाणे, रात्री उशीरा घरी आल्यास दरवाजा न उघडणे
वगैरे निष्फळ खटाटोप करणार्या त्यांच्या अर्धांगिनी हा आमच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
त्यामुळेच शासनाचा जसा एक शासकीय दृष्टीकोन असतो, तसा आमचा स्वतःचा एक खास असा
चषकीय दृष्टीकोन तयार झाला आहे. याच सुमारास मराठीत अमाप पिकत असलेला 'चारोळ्या' नामक
काव्यप्रकार [मी माझा वगैरे] आम्ही या दृष्टीकोनातून वाचला आणि या चषकीय चारोळ्या तयार झाल्या.
या चषकात ज्यांना आपलेच प्रतिबिंब दिसेल त्यांनी तो निव्वळ योगायोग समजू नये... चिअर्स!
♫


नेहमीच काव्याने नशा करु नये
कधी मद्यालाही वाव द्यावा
तहानलेल्या रसिकांना
थोडी पाजून भाव द्यावा....
♫
मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
कुणीही पिताना दिसला
की आशेने पाहणारा...
♫
माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका
एकदा प्यायला बसलो की
माझ्या 'असण्यावर' जाऊ नका
♫
दारुडे बेहोष होऊन कोसळतात
तेव्हा किंकाळी फोडत नाहीत
याचा अर्थ असा नाही की
त्यांची हाडे मोडत नाहीत....
♫
दारूचा गुत्ता कसा
कुठेही उगवतो
कुठेही उगवतो म्हणून
पिणार्यांना जगवतो....
♫
इथं प्रत्येकजण आपापल्या घरात
अन प्रत्येकाचा हातात ग्लास आहे
तरी निर्व्यसनीपणावर बोलणं
हा प्रत्येकाचा ध्यास आहे...
♫
मी पडताना माझा गाव
ओझरता पाहिला होता
मला पहायला सगळा गाव
गुत्त्यात जमून राहिला होता...
♫
गुलमोहर घोरताना
आधी उशीआडून पहावं
क्वार्टर खिशात टाकून
मग खिडकीमधून निघावं....
♫
गुत्त्यामध्ये प्रत्येकाला
खूपसं सांगायचं असतं
येताना चालायचं' तर
जाताना रांगायच असतं...
♫
मुकं मुकं राहून तुझं
नुसतंच रागानं पाहणं
कालची थाप न पचल्याचं
माझ्या लक्षात येत राहणं...
♫

रिकामी बाटली अलगद
माझ्या हातामधून पडली
तेव्हाच मला कळलं
आता खूप आहे चढली...
♫
इथं बेवडं असण्याचे
खूप फायदे आहेत
घरमालकापासून वाण्याला
रोज नवे वायदे आहेत ...
♫
तुला वजा केल्यावर
साकी काहीच उरत नाही
तुझ्याशिवाय मी चषक
हातातच धरत नाही...
♫
ग्लासात पुन्हा ओतताना
तुला कुंपणाबाहेर मी पहिलं
मी येऊ शकलो नाही. कारण
शरीर उभंच नाही राहिलं...
♫
तू नशेत असणं
किती छान असतं
कारण त्याच वेळी तुला
स्वतःचं भान असतं...
♫
ठाउक असतं आता पिणं अशक्य आहे
तरी मी हातातला चषक सोडत नाही
कुठं तरी मिळालीच जर बाटली
तर ग्लासाशिवाय अडत नाही...
♫
चढणं आणि पडणं
यात बरंच अंतर आहे
पाचव्या पेगपर्यंत चढणं
पडणं त्यानंतर आहे...
♫
तू माझ्यावर रागावणं
ही रोजचीच कहाणी आहे
तू दिसलीस की ती उतरते
तशी माझी नशा शहाणी आहे...
♫
तेव्हा मी माझ्यापेक्षा
तुलाच आवरायला हवं होतं
कारण मी बहकल्यानंतर
तूच सावरायला हवं होतं...
♫
मला वाटलं होतं मी पडल्यावर
तू मागे वळून पाहशील
वळून पाहण्याइतका तरी
तू नक्कीच शुद्धीवर राहशील....
♫


तू भिजत असताना तुझ्यासमोर
मी रमची बाटली धरली
तू पीत राहिलास एकटाच
नि मला हुडहुडी भरली
♫
सगळीच वादळं मी
खिडकीत बसून सोसली
अन् ही बाटलीसुध्दा
खिडकीत बसूनच ढोसली
♫
आता मलाही लागलंय जमायला
तुझ्यासारखं वागणं
चार मित्र जमले की
ग्लास शोधायला लागणं
♫
प्रत्येक तळीराम पितांना सांगतो
मी "चषक’ सोडणार आहे
चषक म्हणतो, तुझा संकल्प
मीच उद्या मोडणार आहे
♫
सगळीच माणसं वरुन
निर्व्यसनी दिसतात
वासावरुन कळतं
काही तळीराम असतात
♫
मद्याचा एक घोट चुकून
माझ्या घशात येऊन पडला
माझ्या साकीच्या बंगल्यावर
आणखी एक मजला चढला
♫
तेव्हा तू माझा
अलगद ग्लास धरलास
खरं सांग त्यासाठीच ना
तो काठोकाठ भरलास?
♫
नुसतंच बरोबर बसलं तर
ती मैफल होत नाही
आणि चषक हातात नसला तर
ती सफल होत नाही
♫
मद्य असं
ओतल्यासारखं वाहिलं
ओंजळीनंच प्यायलो
पाणी घालायचं राहीलं
♫
भट्टीकाठचा पोलीस
दादाशी सलगीनं वागायचा
कारण त्याला जगायला
दादाचा हप्ता लागायचा
♫


तळीरामाच्या नशेला
कसलाच खोटा आव नसतो
स्कॉच आणि कंट्रीलाही
तिथे सारखाच भाव असतो
♫
आपल्याला आणखी हवी असणं
म्हणजेच आपलं जगणं आहे
येणार्या प्रत्येक साकीकडे
आपलं काही मागणं आहे
♫
आठवतं तुला आपलं
एका ग्लासातून पिणं?
दुसरा घ्यायची ऐपत नसतांना
पहिलाही फुटणं?
♫
माझ्या प्रत्येक ग्लासात
तुझा वाटा आहे अर्धा
सोडा, पाणी तुझ्यासाठी
मद्य माझ्यासाठीच मर्दा
♫
तुझी आठवण हा
नित्य नवा अनुभव आहे
कधी फेसाळणारी बियर
तर कधी कॉकटेलची चव आहे
♫
घराभोवती कुंपण नको
म्हणजे नीट आत जाता येतं
बायकोनं नाहीच उघडलं दार
तर पायरीवरच झोपता येतं
♫
आता पुन्हा बंद दारामागे
तिच्या हातात लाटणं असेल
धरणीमाते पोटात घे
एवढंच माझं वाटणं असेल
♫
तिला नवीन बाटली मिळाली
परवा कपाट लावतांना
माझी किती उडाली धांदल
घराबाहेर धावतांना
♫
गुत्त्यामध्ये तळीराम
दाटीवाटीनं जमायचे
घोटभरच प्यायले तरी
बडबडून दमायचे
♫
तू बाटलीत असलीस की
नुसतंच तुला बघणं होतं
ग्लासात आल्यानंतरच
तुझ्यासोबत जगणं होतं
♫

चढवते, बुडवते
पाडते, कुरवाळते
माणसापेक्षा मद्यच
माणसाचे गुणधर्म पाळते
♫
अडकलेला घोट आधी
गिळतोय का बघतात
गिळत नाही म्हटल्यावर
निर्लज्ज ग्लासच मागतात
♫
चढल्यावर कुणी नाचतात
आणि त्यांचे ग्लास सांडतात
लोकं इतकी बेहोष की
ती त्याच्याही साठी भांडतात
♫
मी घराकडं यायला निघतो
पण घरापर्यंत पोहोचत नाही
ग्लास केव्हाच संपलेला असतो
पण वास जाता जात नाही
♫
नशेच्या वेशीवर
तळीराम बसवलेला
रम ऐवजी ‘कोला’ देऊन
बिचार्याला फसवलेला
♫
ग्लास कलंडतो तेव्हा
माझं मन बावरतं
घोटभरच होती उरली
म्हणून जरासं सावरतं
♫
भरतांना चषक वाटलं
आयुष्य असंच भरुन गेलं
मला जगायचंय ते असंच
हे पितांना ठरुन गेलं
♫
कुठलाच ब्रँड मागवितांना
मी कधीच अडत नाही
कारण मला कळून चुकलंय
आता फारशी चढत नाही
♫
कोण म्हणतं रात्री बडबडणारा नवरा
नेहमीच बेवडा असतो?
माझ्यामते तो कधी कधी
नुसताच बोलघेवडा असतो
♫
‘ती’च्या माझ्यात अंतर नाही
‘ती’चा मला दुवा आहे
‘ती’ नुसतीच नशा नाही
‘ती’ माझा ‘दवा’ आहे
♫

झेपेल तेवढीच ‘कीक’
मद्य आपल्याला देते
बायकोची पुन्हा कंबरेत बसणार
त्याला आधीच माहीत असते
♫
पिण्यासाठीच सोडलेल्या कवीची
एकदा बाटली फुटली
रसिकांना कळेचना
ती हातातून कशी सुटली?
♫
घरी जाण्याची वेळ झाली
तर पाय माझे फितूर झाले
तेव्हा माझे मित्र मला
खांदा द्यायला आतूर झाले
♫
इथं प्रत्येकाला ठाउक आहे
प्रत्येकाचं गुपित
पण एकच कळत नाही
एकत्र बसूनच का नाही पीत?
♫
वहावलेल्या मित्राला
आपणच असतं आवरायचं
त्यानं अंग टाकेपर्यंत
स्वतःला सावरायचं
♫
पिताना पैसे संपले तरी
आणखी प्यायला वाव आहे
कारण रिकाम्या बाटलीलाही
बाजारात भाव आहे
♫
वापरावा म्हणून ग्लास
मी बाटलीनं प्यायचं थांबवलं
तर कंटाळून ती म्हणाली
माझं ‘मोकळं’ होणं उगीच लांबवलं
♫
अनावर पहाट
आणि पेंगुळलेली रात्र
कलंडलेले चषक
थिजलेली गात्रं
♫
मैफल रंगात आल्यावर
सारेच बोलतात; गलका होतो
मुका असलेला तळीरामही
अशा वेळी बोलका होतो
♫
मी नशेत पळतो तेव्हा
साधी ठेचही लागत नाही
एरवी साधं चालतानाही
चौघांशिवाय भागत नाही
♫

पेटलेला तळीराम असा
घोटभरानं भिजत नाही
बॅरलमध्ये बुडवला तरी
ओला होतो, पण विझत नाही
♫
मळमळताना कळून चुकलं
आज जरा जास्त झाली आहे
झक् मारीत रिक्षा करणं आलं
अन् खिसा नेमका खाली आहे
♫
ज्या गोष्टीची भीती होती
तेच होऊन बसलंय
मी पिणं सोडलं म्हणून
मद्य माझ्यावर रुसलंय
♫
मद्याला फक्त चढणंच माहीत
त्यात त्याचा दोष नाही
हे मी जाणलं म्हणूनच
मला आता होश नाही
♫
मला पक्कं ठाऊक आहे की
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
बाटली रीकामी झाल्यावर
मी अगदी संत आहे
♫
भर दुपारी
बाटली
संपेपर्यंत
चाटली
♫
मद्य या शब्दात
केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
तोंडाला वास आहे
♫
कोणीतरी लागतं आपल्याला
‘बेवडूं’ म्हणणारं
‘बेवडूं’ म्हणत पाणी मारुन
शुद्धीवर आणणारं
♫
एकदा मला ना
मी बेहोष होताना पहायचंय
तेवढयासाठी पितांना
आरशासमोर रहायचंय
♫
मदिरा प्राशून खरंच
नशा मिळते का?
ती सरावाची झाल्यावर
पापणी तरी ढळते कां?
♫

गुत्त्यात जाऊन माणसं
घरात असल्यासारखी वागतात
‘हा पेग खरंच शेवटचा’
असं प्रत्येक वेळी सांगतात
♫
‘नशापाणी’ या शब्दाचा अर्थ
आपण किती उलटा लावतो
कुणाला ‘नशा’ चढताना दिसली
की ‘पाणी’ ओतायला धावतो
♫
रम चढायला वेळ लागत नाही
बियर चढायला वेळ लागतो
अधिक चांगल्या नशेसाठी
बियर-रमचा ‘मेळ’ लागतो
♫
वडीलांच्या खिशात मी
हात कधीच घालत नाही
त्यांचा ब्रँड वेगळा
तो मला चालत नाही
♫
तू मला नशा दिलीस
माझी रात्र गायला लागली
माझ्या नावानं खडे फोडत
अख्खी वस्ती जागायला लागली
♫
अशा बेसावध क्षणीच
पडणे टाळायचे असते
सावरला नाही तोल तरी
बाटलीला सांभाळायचे असते
♫
गुत्त्यात ‘रम’लेले तळीराम
नाईलाजाने दाराकडे वळले
शुद्धीवर आल्यावर त्यांना
सकाळ झाल्याचे कळले
♫
मद्याचं आवडणंही मला
कधी कधी सोसावं लागतं
तास दोन तास तरी नंतर
एकाच जागी बसावं लागतं
♫
खूपदा ते चोर पावलं न वाजवता
सारं सारं चोरतात
उशीरा आलेला नवरा समजून
बायका निवांत घोरतात
♫
दुकानातली रंगीत बाटली
दिवसा ढवळ्या खुणावते
आणि घाईत चालणारे पाय
रेंगाळत असल्याचे जाणवते
♫

प्रत्येक गावाबाहेर
छोटासाच गुत्ता आहे
तरीसुद्धा गावावर
त्याचीच आता सत्ता आहे
♫
पहाटेला ग्लासामध्ये
शेवटचे घोट
बाटली सारी संपून सुद्धा
सुकलेलेच ओठ
♫
रिता रिता राहून कधी
चषकही थकतो
आणि कुठेतरी जाऊन मग
बाटलीला टेकतो
♫
आता सरकारनंच जनहिताचा
एक नियम घालायला हवा
शहरातला एक तरी बार
रात्रभर चालायला हवा
♫
तुझं हे नेहमीचं झालंय
प्यायल्या प्यायल्या नशा चढणं
मी जातो, मी निघतो
म्हणत, धाडकन पडणं
♫
संध्याकाळची वाट पाहतांना
दुपारी जरा डुलकी लागते
अशा वेळी भरलेली बाटली
नेहमीपेक्षा हलकी लागते
♫
बियरचं हे फेसाळणं
मला नेहमीच पटतं
अर्धीच असते चषकात
तरी भरल्यासारखं वाटतं
♫
घरातल्या बाटल्यांचे प्रदर्शन मांडू नये
नंतर खूपच वांधे होतात
माणसं नुसती पहायला
तर ‘तळीराम’ रहायला येतात
♫
मद्याचं वागणं
किती विसंगत
आधी प्याल्यात बुडवून
मग ठेवतं तरंगत
♫
माझ्यामते रम हा
रमीचा समानार्थी शब्द आहे
कारण ‘लागल्या’नंतर दोघींवरही
मी मनापासून लुब्ध आहे
♫


प्रत्येकाला एक चषक असावा
पुन्हा पुन्हा भरण्यासाठी
हातामध्ये बळ असावं
चषक घट्ट धरण्यासाठी
♫
रंगलेल्या मैफली
पुन्हा पुन्हा आठवतो
रिकाम्या बाटल्या
हौसेनं साठवतो
♫
भरून आलेलं आभाळ
ढळत गेलेला ‘फ्रायडे’
पुढं दोन दिवसांची सुट्टी
आणि नेमका आलेला ‘ड्राय-डे’
♫
तू पितांना मी तुझ्याकडे धावलो
ते सोबतीला नव्हे, मदतीला
नाहीतर... ही अख्खी बाटली
तुला येईल का संपवायला?
♫
पाहुणा दाराशी आल्यावर मी म्हटलं
तुला शंभर वर्षे आयुष्य आहे
पार्टीहून परतताना मदतीला
एक न पिणारा मनुष्य आहे
♫
आवडतं मला पितांना
लिज्जत पापड खाणं
पा(प)डगावकरांच्या ऋणातून
मुक्त होत जाणं
♫
एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं
कि तू आहेस बेवडा
नंतर म्हटलं जाऊ दे
आपल्या तोंडून कुठे दरवळतो केवडा?
♫
आपण जायचो तो देशीचा गुत्ता
आता आलिशान ‘बार’ झालाय
आजच्या तरुण पिढीलाही
तोच एक आधार झालाय
♫
मला नाही आवडत तुझं
असं उशीरा येणं
आल्या आल्या आधाशासारखं
बाटलीच तोंडाला लावणं
♫
गुत्त्यातल्या बाकावर तळीराम
कसा स्वतःला सावरुन बसतो
शुद्धीवर दिसायच्या नादात
बाटलीच हरवून बसतो
♫


रानोमाळ पळून गेलेले गुंड
पोलीस गेल्यावर परत येतात
आणि तासाभरात भट्टी जमवून
पहिल्या धारेची काढून देतात
♫
माझा आणि ‘ड्राय-डे’चा
छत्तीसाचा आकडा आहे
त्या दिवशी रस्ता सरळ
पण माझा पाय वाकडा आहे
♫
ते प्रचंड धड कसे
उन्मळून पडले होते
घोटभर झाली जास्त, आणि
हे अघटित घडले होते
♫
लोकांच्यात वावरतांना मी
माझा वास लपवत वावरतो
कुणी जास्त जवळ आलं की
माझ्यातला मी बावरतो
♫
परवा एक तळीराम गुत्त्यात
आपली टोपी शोधत राहीला
कसं सांगू त्याला रोटीऐवजी
मी टोपी तोडताना पाहिला
♫
प्रत्येकानं सांभाळायला हवी
आपापली बाटली
चवीचवीनं प्यावी, जेव्हा
हवीहवीशी वाटली
♫
त्यावेळी नशाराणी
कशी हरलेली होती
पहाट होऊन सुद्धा बाटलीत
थोडी उरलेली होती
♫
गटारी अमावस्येच्या दिवशी
ते पितात आणि लोळतात
नंतर मात्र श्रद्धापूर्वक
श्रावण महिना पाळतात
♫
इथे प्रत्येकाला वाटतं
आपण किती शुद्धीवर
काही आहे का उपाय
तळीरामांच्या बुद्धीवर?
♫
चषकात मला ‘रम’ताना
एवढेच कळले होते
पिण्याने दिला दिलासा
जिण्याने छळले होते
♫