Tuesday, 16 March 2010

जिप्सी


एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून


आठवते बालपण होतो मी खेळत
होतो बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवते अजूनही होतो रंगत मी किती!
पण आकस्मात होतो जात सारे सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून


शाळेतले ते दिवस पाटी-पुस्तक हातांत
टोपी जरीची सुंदर....स्वारी निघाली थाटात
जड काचाची चाळीशी लावूनिया डोळ्यांवर
होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर
पण ठरेचना मन चार भिंतींच्या जगात
उडे खिडकीमधून दूरदूरच्या ढगात
झाडे पानांच्या हातानी होती मला बोलावीत
शेपटीच्या झुबक्याने खार होती खुणावीत
कसे आवरावे मन? गेलो पळून तिथून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून


आणि पुढे कशासाठी गेलो घर मी सोडून?
सारी सारी सुखे होती, काही नव्हतेच न्यून
पण खोल खोल मनी कुणी तरी होते दु:खी
अशा सुखात असून जिप्सी उरला असुखी
दिसू लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथे कुणीतरी मला नेऊ लागले ओढून
मिटलेल्या डोळ्यांपुढे खळखळणा-या लाटा....
सळसळणारी पाने.... दूर पळणा-या वाटा
वाटासवे त्या पळालो सारे काही झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून


कधी कधी पहाटते उरी आगळी प्रतीती
जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती
जाचू लागते जिप्सीला ज्ञात विश्वाची चौकट
आणि जाणवते काही गूढ...अंधुक...पुसट!
खेळ मांडिलेला सारा पुन्हा उधळाया सजे
गूढ अज्ञात धुक्यात आणि जातसे बुडून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून


घर असूनही आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणी सांगावे? असेल पूर्वजन्मींचा हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप...
कुणीतरी साद घाली दूर अनंतामधून....
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून


मंगेश पाडगावकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....