
पंचेंद्रिये न् तर्क यांच्या साह्यानं तुला सिद्ध करता येतं
की समुद्राला मिळाल्यावर नदीची पृथगात्मता
उरत नाही न् पाण्याचे वेगळेपण
तू योद्धी आहेस न् अस्तित्वाच्या स्थापनेसाठी
अज्ञानाशी झगडतेस
सत्याच्या पराभवानंतर
जेती असूनही तू नि:शस्त्र होतेस
वाफसा नसतानाही जमिनीतून चाळवतेस
न् के. एच . आराच्या न्यूडचित्रांसारखी
माझ्यातून स्वाभाविक न् तल्लख वावरतेस
कामवासनेच्या मुक्ततेशी न् शांततेशी
अंत:करणाच्या समतोलाशी न् निर्वाणाशी
शरीराची फेडाफेड करून : शरीर = इच्छा + भावना + विचार
व्यवहाराला नामरूप देतेस
जडलेल्या गंडाचा परिहार करून
साखळदंडातून मला निसर्गाचा बनवतेस
कंसाचं गाणं गायला लावतेस
तुझ्याबद्दल मी काय सांगणार
तू दुध भरलेलं दीर्घ रूप
१०० मरणं मरूनही न मरणारं
न् लोकांनी बदनाम ठरवलेलं माझ्याचसमोर
गोलपिठा
नामदेव ढसाळ
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment