
ते दुखरं आहे...हळवं आहे...
चार पावलांतच खूप ठेचकाळलंय
पण चाललंय....
गरीब, शहाण्या म्हाता-यासारखं चाललंय....
त्याच्याकडे बलदंड स्नायू नाहीत,
धारदार सुळे नाहीत....
जमिनीत मान घालून चरणा-या शेळीसारखं
जन्माला आलंय आणि मृत्यूकडे चाललंय....
आणि तरीही त्याला नावं ठेवायचा हक्क
माझ्यासकट कुणालाच नाही;
कारण माझं म्हणावं असं तेवढंच तर आहे!
मलाच येतो त्याचा खूपदा राग
आणि मलाच येते त्याची खूपदा दया....
डोंगरात हरवलेल्या वासरासारखं
चुकतमाकत आई शोधतंय....
त्याला ना कधी मी बोलणार,
ना हिडीसफिडीस करणार....
एकसंध दिसलंच कधी तर कुशीत घेईन
तोंडावरून हात फिरवेन
जमेल तेवढी माया देत राहीन....
इनमिन साठ वर्षांसाठी तर आलं असेल बिचारं....
पडून राहील कुठल्यातरी कोप-यात
कुणाच्या अध्यात ना मध्यात....
एवढ्यांची पोटं भरतात रोजच्या रोज
भाकरीचे चार तुकडे काही आकाशाला जड नाहीत!
अखेरचं 'निदान' तर केंव्हाच झालंय;
मलाही आहे ठावूक, त्यालाही आहे माहित!!
संदीप खरे
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment