Saturday 6 March 2010

प्रस्तावना


साहित्यात बराचसा मान मजकुरापेक्षा मथळ्यामुळे हे ध्यानात येई येईपर्यंत पन्नाशी आली. आमचे उथळ लिखाण आम्ही उथळ आहे हे सांगून दिले होते. त्याशिवाय लोक खळखळून हसत नाहीत हा अनुभव होता. उथळ पाण्याप्रमाणे उथळ लिहिण्यालाही खळखळाट फार, इतक्या इमानाने सांगूनही अखंड ज्ञानेश्वरी एखाद्या कसरीसारखी खाऊन काढणारे विद्वान, लिटर लिटर शांतरस बसल्या बैठकीला रिचवणारे महापंडित [१], आम्ही विद्वत्तेचा धंदा न करता हसवण्याचा धंदा करतो म्हणून विषय सोडून आमच्या विरुध्द बरळू लागले. नशीब, विषयच सोडला. कारण त्यांचा संताप अनावर झाल्याचे कळले होते. हे सारे ऐकून आम्ही अंतर्मुख झालो. एकाएकी 'मी' पणा जाऊन 'आम्ही'पणा[२] आला. "खोली वाढवली पाहिजे", म्हणू लागलो. आमचे एक मित्र म्हणाले, "त्यापेक्षा ओनरशिपचा ब्लॉक घ्या." त्यांचा वामयाशी संबंध नाही. नुसतेच वाचक आहेत. त्यांना वामयीन खोली कशी असते ठावूक नाही. शेवटी 'वामयाचा इतिहास' लिहील्याखेरीज गत्यंतर नाही हे उमगले.
मुकुंदराजाचा विवेकसिंधू, परमामृत, पवनविजय, मुलस्तंभ वगैरे न वाचल्याचे हे परिणाम आहेत हे ध्यानी आले. पहिला सोडून बाकीचे तीन
हे वैद्यकीय ग्रंथ आहेत अशी आमची समजूत होती. आणि पाहिला ग्रंथ नसून आयुर्वेद रसशाळेने बनवलेले औषध आहे असे मानीत होतो. आम्ही मुकुंदराज वाचला नाही, लोलींबराज ठावूक नाही, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी [पसायदान तेवढे सभासंमेलनात ऐकून होतो], लक्ष कवीचा 'रत्नकोश', मोगलीपुत्त तिष्य [हा ग्रंथ कि ग्रंथकार हे अजूनही ठाऊक नाही.सॉरी!], भोजलिंगाचे 'महात्मसार', मन्मथस्वामीचे 'मन्मथबोधामृत', म्हाईभटाचा 'पद्य खरडा' [हा आदेश नसून ग्रंथ आहे.], असले ग्रंथ आपण वाचले नाहीत ह्याचे परमदु:ख झाले. आणि अभ्यासासाठी म्हणून पूर्वसुरींचे आणि चालू सुरींचे ग्रंथ मागवले. चार-पाच चार-पाच किलो वजनाचा तो एकेक ग्रंथ पाहून थक्क झालो आणि वाचू लागल्यावर एक जुने विनोदी व्यंगचित्र आठवले.[विनोदाशी हा शेवटला संबंध.पुढे तलाक तलाक तलाक.]

वेटलिफ्टरचा दृष्टान्तु
एक वेटलिफ्टर लोखंडी दांडीच्या दोन्ही बाजूना लावलेले मोठ्या फुटबॉलएवढे लोखंडी गोळे उचलून दाखवतो आणि ती गोळे लावलेली जड दांडी खाली ठेवतो. लोक त्या आधुनिक भीमाच्या सामर्थ्याने थक्क होतात. तेवढ्यात एक कुत्रे येते आणि दातात दांडी धरून पळते. जे लोखंडी गोळे वाटले होते, ते लोखंडी रंगाचे रबरी फुगे होते. असो.

धीर आला
आम्हास धीर आला. आणि अनेक ग्रंथांचे परिशीलन केले. लायब्ररीतून घरी पुस्तके आणून ती बरीच दिवस ठेवून देण्याच्या क्रियेला परिशीलन म्हणतात हेही आम्हास ठाऊक नव्हते. असो. कालांतराने शब्दांना आलेली सूज आणि बाळसे साहित्याच्या क्षेत्रात एकाच कौतुकाने पहिली जातात हे कळले. पुन्हा धीर आला. अनेक ग्रंथांचा जाहीर थोरपणा आणि अंगभूत मेदवृद्धी पाहून थक्क झालो. त्यातली चरबी वितळवल्यावर उरलेला मराठी वामयाचा गाळीव इतिहास पुढील पानांत आहे.
आता तरी या विद्वानांच्या आत्म्यास शांती मिळो ही प्रार्थना. हसवण्याच्या धंद्याला वेळीच जर 'हास्यरसपरीपोषात्मिका' म्हणायचे सुचले असते तर हा ताप वाचला असतं. असो.
ग्रंथाच्या शेवटी संदर्भग्रंथांची यादी जोडणार होतो. परंतु ती पाने मूळ ग्रंथाच्या पानाहून अधिक भरू लागल्यामुळे जोडता येत नाहीत, तरी वाचकांनी क्षमा करावी. संदर्भग्रंथांची यादी नसली तरी तळटिपावरून आंम्ही विद्वत्तेचा किती कळस गाठला आहे हे कळेल.
आभार

या ग्रंथलेखनात कु. चपला रांगणापुरकर, एम. ए. या माझ्या विद्यार्थिनीचे सहाय्य झाले आहे हे नमूद केले केलेच पाहिजे. प्रस्तुत लेखकाच्या मार्गदर्शनाखाली 'यादवकालीन मराठीसंबंधी आजकालीन यादवी' हा प्रबंध त्यांनी पुरा करत आणला आहे.[३]

शालिवाहन शके १८८९
अश्विन वद्य एकादशी.[४] __ग्रंथकर्ता
_______________________
१. म्हणूनच ह्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर म्हणतात का हो?

२. 'मी' पणा जाऊन 'आम्ही' पणा आला कि मीपणा वाढतो हे व्यावहारिक सत्य असले तरी साहित्यिक असत्य आहे.

३. हल्ली हेही एक ठेवून द्यावं लागतं. बरं असतं म्हणे. एक साधं विद्वान व्हायचं म्हणजे काय काय ताप असतो पहा!

४. तारीख घालण्याऐवजी तिथी घातल्यामुळे ग्रंथाला भारदस्तपणा येतो हे सुचवल्याबद्दल डॉ. सौ. 'ळ', एम. ए. ह्यांचा मी ऋणी आहे.

मराठी वामयाचा [गाळीव] इतिहास
पु. ल.देशपांडे
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....