Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Tuesday, 7 December 2010

प्रिझनर्स डिलेमा : अजय भागवत

मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू.
"प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू. 
गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात. नंतर पोलिस त्यांना वेगवेगळे भेटून त्यांच्यासमोर एकच आणि तोच प्रस्ताव ठेवतात. प्रस्ताव असा असतो- 

कैदी ब गप्प बसला
कैदी ब ने, अ बद्दल पुरावे दिले
कैदी अ गप्प बसला
दोघांना ६ महिन्याची साधी कैद
कैदी ब ची सुटका,
अ ला १० वर्षे कारावास
कैदी अ ने, ब बद्दल पुरावे दिले
कैदी अ ची सुटका,
 ब ला १० वर्षे कारावास
दोघांना ५ वर्षांचा कारावास
चौकटीत दाखवल्याप्रमाणे पोलिस त्या दोघांनाही तो प्रस्ताव समजावुन सांगतात. दोघांनाही त्यातील फायदे व तोटे स्पष्ट दिसतात. दोघेही गप्प बसले तर दोघांचाही त्यात फायदा असतो. पण एक जण गप्प बसला आणि दुसऱ्याने त्याच्याबद्दल पुरावे दिले तर साहजिकच गप्प बसणाऱ्याची मुक संमती आहे असे मानून त्याला गुन्ह्याची सजा मिळणार हे दोघांनाही समजते. 
आणि हाच त्यांचा पेच असतो. 
पहिल्या मार्गाचा अवलंब केल्यास (दोघांनीही गप्प बसणे), दुसऱ्याची काहीच शाश्वती नसल्यामुळे सरळसरळ आत्महत्या केल्यासारखेच होईल ह्या भीतीने गप्प आपण बसण्याचा मार्ग स्वीकारणे दोघांनाही योग्य वाटत नाही. त्यांना ही जाणीव असते की, त्यामुळे दोघेही कमीत-कमी शिक्षेच्या प्रस्तावाला मुकणार असतात. 
तो मार्ग दुसरा मार्ग स्वीकरल्यास (दोघेही एकमेकांबद्दल काही-बाही पुरावे देतील), दोघांनाही १० वर्षांऐवजी ५ वर्षे कैद होईल. आणि हाच मार्ग ते निवडतात. दुसऱ्याला आपल्या गप्प बसण्यामुळे पूर्ण फायदा होईल अ तो सुटेल आणि आपण मात्र १० वर्षे कैदेत खितपत पडून राहू हे शहाणपणाचे त्यांना वाटत नाही. दोघेही गप्प बसतील असा विश्वास त्यांना एकमेकाबद्दल वाटणे शक्य नाही, मग अशा परिस्थितीत ते दोघेही तोंड उघडतात व चक्क दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारतात. 
"दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारणे" हाच तो कळीचा मुद्दा, ज्याला कैदयांचा पेच असे म्हणले जाते. मनोभ्यासक ह्या मनोवृत्तीचा बारकाईने अभ्यास करतात व त्याचा संबंध आपल्या रोजच्या आयुष्यात कसा लागू पडतात ते पाहतात. 
सांघिक काम- टिमवर्क- हे जितके सोपे वाटते तितकेच अवघड असलेले एक कौशल्य. एकाच छपराखाली एकाच संघटनेत, कंपनीत, कार्यालयात काम करणाऱ्या संघांमधे अशी रस्सीखेच होणे हे नैसर्गिक आहे; पण ते हिताचे नाही. मानवाच्या ह्या अशा मनोवृत्तीची जाण असणे हे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा हा लेखाचा एक स्वतंत्र विषय आहे. नेत्यांना ह्याची ओळख एका खेळाव्दारे करुन दिली जाते- "विन ऍज मच ऍज यु कॅन". 
पण ह्या मनोवृत्तीचे अस्तित्व कसे व्यापक आहे ह्याची काही उदाहरणे पाहू-
१. दोन शेजारील राष्ट्रे आपल्याकडील शस्त्रसंख्या, वैविध्य, आधुनिकता ह्यांचा विचार करत असतांना, दोघेही एकत्र येऊन शस्त्रांवर होणारा खर्च कमी करु शकतात. पण तसे होत नाही. दोघेही राष्ट्रे आपल्या इतर आवश्यक गुंतवणूकीवर टाच आणून शस्त्रांवर जास्तीत जास्त गुंतवणूक करतात. 
२. खेळामधे स्टेरॉइडचा वापर एकाने न करणे व दुसऱ्याने करणे....
३. वातावरणाला घातक अशा वायूंचा उत्सर्ग रोखण्यासाठी काही कठोर बंधंनं स्वतः वर लादून घेणे. पण दुसऱ्या राष्ट्रांनी जर तसे केले नाही तर पहिला त्यात नुकसान करुन घेईल व दुसऱ्या देशातील लोक मजा करतील....
तर, असा आहे प्रिझनर्स डिलेमा!
 
संकलक:प्रवीण कुलकर्णी

Tuesday, 16 November 2010

माझी कादंबरी- एक ब्लडी हार्ड वर्क ! - भाऊ पाध्ये

(१९८१ साली 'आयुध' ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख.)
 
नुस्तं लिखाण करणं म्हणजे चक्क ब्लडी हार्ड वर्क (अभिनेत्री तनुजाच्या शब्दांत!) असतं. आणि कादंबरीसारखं विस्तृत लेखन करणं म्हणजे तर....., मराठीमध्ये हल्ली जो तो कादंबरी लेखन करू लागलाय. ते पाहून मनात विचार येतो की एक तर आपल्याला वाटतं तितकं काही कादंबरी लेखन हार्ड वर्क नसावं किंवा मराठी भाषेतले लेखक असे काही जिनिअस असावेत की एकोणिसाव्या शतकातील ग्रेट रशियन रायटर्सही त्यांच्यापुढे फालतू वाटावेत.
 
लेखनासंबंधी म्हणाल तर तनुजाची जी भूमिका फिल्म इंडस्ट्री व अदाकारीसंबंधी आहे तीच आहे. (तिच्या क्षेत्रात ती आणि माझ्या क्षेत्रात मी सारख्याच उंचीचे आहोत, असे मला म्हणायचा मोह होतोय!)
 
माझ्या 'वासूनाका', 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' अशा एक दोन चीजा गाजल्या तर तनुजाचीही 'दो चोर', 'अनुभव' अशी एक दोन पिक्चर्स चालली. दुसरे म्हणजे ती आपण फिल्म इंडस्ट्रीला बांधलेले आहोत असे मानते तसे मीही कादंबरी लेखनाला बांधलेलो आहे असे मानतो. कादंबरी हा सर्वात श्रेष्ठ वाङ्‌मयप्रकार असून नाटक-बिटक लिहिणे त्या मानाने फारच मामुली आहे असे मनापासून मी मानतो.
 
मी कादंबरी लिहायला घेतली त्या वेळी कादंबरी हा पॉप्युलर वाङ्‌मयप्रकार नव्हता. त्या वेळी मराठीत कादंबरीकार किती- तर हातावर मोजण्याइतके तीन-चार. श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर किंवा गो. नी. दां. कुठल्याही साहित्यप्रेमी व्यक्तीस मी, एका नवोदित लेखकाने कादंबरी लिहिली असे म्हटले, म्हणजे तो शॉक लागल्याप्रमाणे माझ्याकडे पहात असे. माणसाने हळूहळू लघुकथा लिहून हात घोटवावा. मग तो चांगला कसून तयार झाला की लिहावी कादंबरी असे तेव्हा मानले जात असे नि मला तसा हितोपदेश केला जात असे. अशी परिस्थिती. ...तोच प्रकार आता किती पॉप्युलर झाला पहा. मी लघुकथांचा संग्रह करावा म्हणून प्रकाशकाला शोधतो तेव्हा प्रकाशक मला सांगतो, "कादंबरी आहे का बोला? आज कादंबरी खपते." काय जमाना आहे पहा, ज्या वेळी मी हातात कादंबरी घेऊन प्रकाशकाकडे जात होतो, त्या वेळी त्याला कथा हव्या होतात. आता कथा घेऊन जातो त्या वेळी त्याला कादंबरी हवी. आज बाजारात हा माल खपतो म्हणून तो हवा. 'ऑफ सीझन'चा माल आणू नका. मागे दुसरा माल खपत होता, हा खपत नव्हता. हा माल 'ऑफ सीझन'चा ठरला होता. मराठी प्रकाशक प्रकाशक आहेत की बनिये?
 
असो. 'डोंबा-याचा खेळ' या माझ्या कादंबरीचे प्रकाशन म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासातली दर्दभरी दास्तान आहे. वो किस-किसको सुनाऊं! 'लग्न पहावं करून' या उक्तीप्रमाणे 'कादंबरी पहावी छापून' अशी एक म्हण मी त्या वेळी काढली होती. पण सध्या लग्न सराईची धामधूम पाह्यली की 'लग्न पहावं करून' म्हणण्याची सोय राह्यली नाही. ललित मासिकाचा कुठच्याही महिन्याचा अंक उचलावा नि नव्या कादंब-यांची जंत्री पहावी. लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंग तरी करता येते- पण कादंब-यांच्या प्रॉडक्शनचे काय? सध्या ज्या जोमाने हे प्रॉडक्शन चालू आहे, त्यांच्या हिशेबात स्वत:चा विचार करता मला नपुंसकत्व आल्यासारखे वाटते.
 
लिहिण्याबाबत आपले लहरी खाते- हवं तर म्हणा. हवं तर 'लिहावेसे वाटेल तेव्हाच लिहावे' अशी यामागे तात्विक भूमिका आहे असे म्हणा. परंतु दर वर्षी बाजारात आपण काही माल टाकला नाही म्हणून गेलाबाजार पश्चात्ताप करण्याची वेळ नियमितपणे आली आहे.
 
खरे म्हटले तर आपला कादंबरीचा माल बाजारात टाकला आणि माल कसा काय खपला म्हणून बाँबे बुक डेपोवाले, मॅजेस्टिक बुकवाले यांच्याकडे जाऊन 'कसं काय चाललंय?' म्हणून विचारावं आणि माल खपत असला तर त्यांनी म्हणावं. "आणा आणा, आणखीन असला माल आणा- चांगली डिमांड आहे तुमच्या मालाला!" असे मलाही वाटते. असे भाग्य आपल्याला कुठे? आपण इतके कुठे सेलेबल आहोत? आपण म्हणजे आपला माल! आपला माल आणि आपण यात फरक कुठे आहे? माल कसा प्रोड्यूस करावा याचे बाजाराचे तंत्र आपल्याला कुठे ठाऊक आहे? आपल्या देशात बांगलादेशचे युद्ध झाले. त्या निमित्ताने दादरला एक परिसंवाद झाला. या परिसंवादात शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी साहित्य व्यवसाय मार्गदर्शन करणारा बराच बोध केला. ते म्हणाले,"पहा, बांगलादेशचा लढा म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. यावर साहित्यिकाने लिहिले पाह्यजे! कुठे आहे साहित्यिक?" मी तोंड लपवले. कसं मी त्या शाहिरांना कादंबरीकार म्हणून आश्वासन देणार- "शाहीर, हा मी आहे. पाडतोच मी एक बांगलादेशच्या लढ्यावर कादंबरी!" आपली ती कुवत नाही. आपल्याला या मर्यादा मंजूर आहेत. त्यानंतर आणीबाणी आली तेव्हा हेच! ...हाही प्रसंग मोठा संघर्षमय! कुठे आहेत साहित्यिक? अश्या आपल्या रोमहर्षक ऐतिहासिक प्रसंगाच्या बसेस चुकत आल्या आहेत. एखाद्याच्या लेखणीच्या मर्यादा असतात! मर्यादा तरी वाचकांनी मंजूर करायला हरकत काय आहे?
 
कादंबरी लिहिणे हा हार्ड जॉब असो वा नसो, मला तो करावाच लागतो. आपल्याला मिळालेला तो शापच म्हणा. तुम्ही कधी एखाद्या प्रचंड कारखान्यात गेलात त्या वेळी तुम्हाला प्रचंड चक्र फिरताना, शॅफ्टस् हालताना दिसतात. अनेक वेळा ही यंत्र थांबवण्यासाठी आपला हात घालण्याची वेडी उर्मी माझ्या मनात आली आहे. तशीच माझ्या डोक्यात चालणारी चक्रे, शॅफ्टस्, पिस्टन्स थांबवावेत असे मला वाटले आहे. ही जोपर्यंत चालतात तोपर्यंत 'प्रॉडक्शन' निघणारच. ते अटळच असतं. कुठल्याशा अमेरिकन कादंबरीकाराला एका पत्रकाराने मुलाखतीत सवाल विचारला होता, 'आपण लेखक होऊ असे तुम्हाला केव्हापासून वाटू लागले?' मला हा प्रश्न विचारला असता तर मी उत्तर दिले असते, "अगदी फार पूर्वीपासून!. . . " पण, असे वाटत तरी मी लिहिण्याकडे कधीच तसे लक्ष दिले नव्हते. मला पुढारी व्हायचे होते, मला आदर्श शिक्षक व्हायचे होते. तरुण वय म्हणजे हिरो बनण्याची स्वप्न पहाण्याचे. ब्लडी हार्ड वर्क करण्याचे नव्हे. पुढारी बनणे सोपे आहे, कोवळ्या विद्यार्थ्यांवर भंपकपणे इंप्रेस करून हितोपदेश करून आदर्श शिक्षक होणे शक्य आहे. परंतु ब्लडी हार्ड वर्क केल्याखेरीज कादंबरीकार बनणे कसे शक्य आहे? मला वाटते म्हणूनच मी कादंबरी लिहिण्याचा माझा मनसुबा पुढे ढकलला होता. आयुष्यात चांगले कर्तृत्व संपादन करून उतार वयात निवृत्त व्हावे. आपली एखादी लायब्ररी असावी. उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन करून आपण व्युत्पन्न व्हावे. आपल्या जवळ भरापूर वेळ असावा. कधीही कॉन्स्टीपेशन होऊ नये आणि आपण तोंडात पाईप धरून धुराची वलये काढत गालिच्यावरून येरझारा घालत आपला नायक नायिकेशी कसा वागेल याचा विचार करावा वगैरे वगैरे. म्हणजे आपण पूर्ण कादंबरीकार बनू असे मला वाटायचे. सुप्रसिद्ध पाश्चात्य लेखक सॉमरसेट मॉम यांनी लेखनाविषयी एक ग्रंथ लिहिला आहे, तो मी वाचला होता. त्यातले एक वाक्य माझ्या नजरेत अंजन घालणारेच होते. "बरेच लेखक आपल्या तारुण्याच्या उर्मीमध्ये लिहितात, पण. . . " आपण तरुण असलो म्हणजे लिहिणे बरे नाही असे माझ्या मनात तेव्हापासून घर करून बसले होते. मग कादंबरीसारखा प्रदीर्घ व विस्तृत खटाटोप करण्यास पन्नाशीपुढचा निवृत्तीचा काळ योग्य नव्हे काय? तर कादंबरी लेखनासाठी योग्य काळाचे भान असूनही मी ऐन पंचविशीतच कादंबरी लिहावयास घेतली याचे कारण माझ्या डोक्यात चालणारी यंत्रेच होत, दुसरे काही नाही. पंचविशीत किंवा गद्धे-पंचविशीत विचार म्हणजे एक कथानक, एका विशिष्ट पार्श्वभूमीवर येणारी कॅरेक्टर्स व त्यातून निर्माण होणारे कथेचे सूत्र यापुढे गेलेला नसतो. हिंदी चित्रपटात कधी काश्मीर, कधी युरोप तर कधी मुंबई असे बॅक ड्रॉप वापरून हिरो-हिरॉईन व खलनायक, त्यांचे आईबाप, सहायक नट, त्याची प्रेयसी, विनोदी नट, नोकरचाकर असा एक संपूर्ण प्लॉट तयार करावा लागतो, त्याचप्रकारे कादंबरीचे आहे. तसे हिंदी चित्रपटाची पटकथा जमवणे वाटते तितके सोपे नसते. त्याचप्रमाणे ना. सी. फडक्यांच्या तंत्र - मंत्राने बेतून लिहिलेली कादंबरी लिहिणे सोपे नसते. दोन्ही हार्ड जॉब्स असतात. निवृतीच्या वयात बुद्धिबळ खेळण्याचा जो आनंद मिळेल तोच आनंद असे हार्ड जॉब्स करण्यात मिळतो. म्हणून हार्ड जॉब्स न करता लेखन हे इझी व्हायला हवे असते. असे इझी झालेलं लेखन हे केव्हाही अधिक समाधान देणारे असते. मी 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर' ही कादंबरी एका महिन्यात 'नॉन स्टॉप' लिहिली. त्यामुळे ती चांगली उतरली यात मला शंकाच राह्यली नाही. कादंबरी लिहिताना आपला अनुभव, धडपड, मेहेनत, डोक्यातील चक्रे यांचा अशा रीतीने मिलाफ झाला पाहिजे की कधीही कॉनस्टीपेशन झाल्याप्रमाणे अस्वस्थ होता कामा नये. लेखन हे तेव्हाच स्वस्थता निर्माण करते जेव्हा तुम्हाला ते पार करताना कॉनस्टीपेटेड अवस्था अस्वस्थता निर्माण करत नाही. हा एक असा ब्लडी हार्ड जॉब आहे की जो कादंबरीकाराला आवडायला हवा. मी जेव्हा तो ब्लडी हार्ड जॉब म्हणतो, त्या वेळी कादंबरी लेखनाविषयीचा तिटकारा आणि कादंबरी लेखनाची ओढ यातील 'लव्ह-हेट रिलेशनशिप' मी अनुभवतो. या 'लव्ह-हेट रिलेशनशिप'मधूनच कादंबरी निखार चढतो. 'वैतागवाडी' हे माझ्या कादंबरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 'वैतागवाडी' ही मुंबईतल्या बेघर कारकुनाची कहाणी. ती लिहिताना मला फारच कॉनस्टीपेटेड अस्वस्थता जाणवली. मी हा विषय का लिहिण्यास घेतला हे मलाच समजत नव्हतं. या कादंबरीतला मध्यमवर्गीय बेघर माणूसच एकदा म्हणतो, "मला घर नाही ही काय समस्या आहे?" एका मोठ्या प्रकाशकाने ही कादंबरी (स्क्रिप्ट) वाचल्यावर मला म्हटलं, "ही कादंबरी तुम्हाला यश मिळवून देणार नाही कारण ही हिणकस आहे!" मी त्याच्याशी सहमत झालो नाही. माझे मित्र अशोक शहाणेही सहमत झाले नाहीत. मला बेघर माणसाचे दु:ख लिहिण्याची इच्छा डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या एका भाषणातून झाली. ते म्हणाले होते, "कल्पना करा, एखाद्या माणसाला रस्त्यावर पडल्यानंतर त्याची काय परिस्थिती होते ती." मी अनेक वेळा आमच्या गृहनिर्माण मंडळातील अनधिकृत भाडेकरूंना घराबाहेर काढल्याची दृश्ये पाह्यली. केव्हढी दर्दभरी शोकांतिका! सामानसुमान, बायकामुले यांसह माणूस घराबाहेर फेकला जातो, ते केव्हढे प्रचंड क्रौर्य दिसते. मी आमच्या समाजवादी कार्यकर्त्यांनाही तो कायदा बदलण्यासाठी हलवू लागलो होतो. 'वैतागवाडी'चा नायक अखेर आपला संसार, आपली ड्यू असलेली बायको घराबाहेर पडणार अशा परिस्थितीत येऊन पचतो, त्या वेळी त्याचा पुरुषार्थ संपतो. डोळ्यासमोर एक प्रचंड काळोखाची खाई पसरते नि तो रडतो. बेघर माणसाच्या प्रचंड शोकांतिकेच्या त्या शेवटाला पॅरलल फक्त डी-सिकाच्या 'बायसिकल थीफ'मधल्या नायकाच्या रडण्यामध्ये मिळेल.

कुठचीही कलाकृती म्हणजे कलाकाराने पसंत केलेला विषय आणि त्याचे व्यक्तिमत्व यांचे लग्न अशी माझी एक स्वत:च्या लेखनाच्या संदर्भात केलेली सुटसुटीत व्याख्या आहे. आपल्याकडचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'कोसला' ही कादंबरी आहे. ही कादंबरी आणि प्रा. भालचंद्र नेमाडे यांचे व्यक्तिमत्व ह्या गोष्टी अविभाज्य आहेत. आय राईट अ‍ॅज आय लिव्ह, असे ज्या वेळी लेखकाला म्हणता येते, त्याच वेळी आपल्याला त्या लेखकाची लेखन प्रवृत्ती लक्षात येते. बाजारात अनेक प्रकारचे खपाऊ माल हारीने पेश केले जातात, त्या वेळी लेखक स्वत:ला पेश करून आपले व्यक्तिमत्व अनेक प्रवाहपतितांपेक्षा वेगळे असे असल्याचे स्वच्छपणे दाखवतो. कादंबरी हे तुमच्या स्टेटमेंट व्हायला हवे. 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर'मध्ये त्या कादंबरीचा नायक एका अपघाताविषयी चिंतन करताना दिसतो. मी असा अपघात- सामान्य अपघात जो मुंबईसारख्या शहरात घडतो- तो पाह्यला. तो पाह्यला यात विशेष काहीच नाही. तसा तो त्या वेळी अनेकांनी पाह्यालाच होता. हेमिंग्वेच्या शब्दांत 'एव्ह्री डेथ डीमीनिशेस मी' अशी अवस्था मला जाणवली. आणि ती बॅ. धोपेश्वरकराच्या चिंतनामध्ये मी मांडली. जो अनुभव अनेकांनी घेतला होता तरीसुद्धा मला तो माझ्या लिखाणातून पुन्हा सर्वांप्रत पोचवावासा वाटला, इतका तो माझ्या व्यक्तित्वाशी अटळ बनला होता.


असाच एक अनुभव म्हणजे माझ्या एका प्रिय पात्रासंबंधी. तिने एक दिवस लग्न जमवल्याची बातमी मला दिली. मला धक्का बसला. मी म्हणालो, "माझ्याबरोबर राह्यल्यानंतर तुला लग्नाची इच्छा कशी होते?. . . ज्या पुरुषाशी तू लग्न करण्यास तयार झालीस त्याच्यापासून तुला सुख मिळण्याची खात्री कुठे आहे?" तिने मला काय उत्तर द्यावे. "त्यात काय आहे? चार-चार वेळा पोट पाडूनही मुलींची लग्न होतात! मग माझे का होऊ नये?" ती स्वत:ला 'अग्रेसर चेंडू' म्हणवून घ्यायची. तिच्या या दृष्टीचा मी प्रथमच अनुभव घेत होतो. मी तिला मानलं. तिच्यासारख्या चार-चार वेळा पोट पाडणा-या समाजातल्या सर्व मुलींना मानलं! ती मुलगी चालू खरी परंतु तिच्या चालूगिरीमध्ये सुसंगतपणा होता. मानलं तिला मी!


मोटार अपघात ही एक सर्वसामान्य घटना असेल किंवा अग्रेसर चेडूची विचार करण्याची पद्धत जगावेगळी असेल, या दोन्ही घटनांकडे मी माझ्या दृष्टीकोनातून पाहातो म्हणूनच त्या मला सिग्निफिकंट वाटतात. ज्याप्रमाणे बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर हे माझे कॅरेक्टर मृत्यूच्या दर्शनाने हादरते व अंतर्मुख होते त्याच प्रमाणे अग्रेसर चेडूला सवाल करणारा मी आपल्या कनिष्ठ मध्यम वर्गातील तरुण मुली व्होअरिश लेव्हलवर कशा जगात असतात हे दाखवतो. पावित्र्याचे आणि पातिव्रत्याचे, सेलेबल नीतिमत्तेचे बोजड कुबड पाठीवर न बाळगता त्या अधिक मुक्त जीवन जगतात. (साहजिकच स्त्री-मुक्तीची चळवळ त्यांना अपील होत नाही.) सध्या लेखकांच्या व्यक्तिमत्वाविषयी मराठी भाषेमध्ये चर्चा करणे थांबलेच आहे. आणि चर्चा तरी कुणाची करणार?. .. आजचा एखादा लेखक स्वत:ला मार्क्सवादी म्हणवतो, म्हणजे काय, तर काहीच नाही! किंवा एखादा लेखक स्वत:ला दलित म्हणवतो. म्हणजे तो ज्या समाजात वाढला त्या समाजाचा आरसा समाजापुढे ठेवतो आहे. त्याच्याविषयी इंटरेस्ट वाटेल असे कुठे आहे. मी कादंबरीची व्याख्या केली त्याप्रमाणे कादंबरी म्हणजे लेखकाचा विषय आणि व्यक्तिमत्व यांचे लग्न आहे असे एकदा गृहीत धरले तर आजच्या कादंबरीच्या बोहल्यावर फक्त विषय उभा आहे. परंतु आंतार्पाटापलीकडे नवरा मुलगा जो लेखक असायला पाहिजे त्याचा पत्ताच नाही. लेखक हा युनिक असायला हवा. तो दुस-या कुणासारखा असू नये. अर्थात युनिक माणसालाच युनिक अनुभव मिळतात आणि युनिक अनुभवांतूनच तो युनिक निर्मिती करू शकतो. अलीकडे एका अमेरिकन ज्यू लेखकाची- आयझॅक सिंगरची मुलाखत वाचली. तो जे म्हणतो, टॅलेंट नेव्हर ट्राइज टू इमिटेट अदर टॅलेंट. इट इज इटसेल्फ. ही स्वत:च्या लिखाणाविषयी जागरूक असलेल्या लेखकानेच खबरदारी घेतली पाह्यजे. मी माझ्या कादंब-यांच्या आलेखाकडे वळून पहातो, त्या वेळी किती वेगवेगळ्या विषयांना मी हाताळले आहे, हे मला सांगावेसे वाटते. डोंबा-याचा खेळ, करंटा (कामगार चळवळ), वैतागवाडी (गृहहिनांची समस्या), वासूनाका (रोडसाईड रोमिओज), बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर (परात्म व्यक्तिमत्व), अग्रेसर (कनिष्ठ मध्यम वर्गातील मुलीचे जीवन), राडा (बेछूट तरुण व्यक्तित्व), वणवा (नवश्रीमंत व निसर्ग), होमसिक ब्रिगेड (शैक्षणिक विकासाचे प्रकल्प), वॉर्ड नं. ७ सर्जिकल (एका निर्मितीक्षम कलावंताच्या समस्या). प्रत्येक कादंबरीमध्ये मी आहे म्हणून या कादंब-यांमध्ये एक अदृश्य धागा आहे. मी जर पुढे मागे लिहीत राह्यलो तर तो धागा पुढे वाढत चालणार आहे. मी पाह्यल्या त्या मिशनलेस संस्था (कामगार चळवळ, शिक्षण प्रकल्प), घनघोर अंधाराने भरलेले आभाळ (वैतागवाडी, राडा) नव-श्रीमंतांचा उद्दामपणा व आत्मघातकीपणा (वणवा), अस्तित्व विचार (बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर) हे पेश करताना माझ्या व्ह्यू- पॉईंटमध्ये वाचकाला इंटरेस्ट वाटतो की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी जे कादंबरीमधून विधान करतो, त्यामुळे वाचक सिरीअसली स्टीम्युलेट होतो की नाही हा प्रश्न आहे. माझी 'होमसिक ब्रिगेड' दादा कोंडकेला दिली. अर्थातच ती त्याला आकलन होण्याच्या पलीकडची आहे, त्यामुळे तो कसा काय स्टीम्युलेट होणार? ते अशक्यच आहे.


वाचकाची समस्या सर्वच चांगल्या रीडर्सना भेडसावणार. अमेरिकेत ३ टक्के लोक वाचतात. ते सिंगर आपल्या मुलाखतीत म्हणतातच,
नंबर ऑफ पोटेंशिअल रीडर्स इज डिमीनीशींग. आपल्या वाचकाच्या संदर्भात मी माझी तक्रार पूर्वीही मांडली आहे.

आपल्या वाचकांचा प्रॉब्लेम काय आहे. आपल्याकडे दोन प्रकारचेच वाचक आहेत, एक प्रोफेसरी टीकाकार आणि दुसरे न वाचणारे वाचक. असे वाचक ज्या मराठी समाजामध्ये आहेत; त्या समाजात लिहिण्याचे ब्लडी हार्ड वर्क केल्यानंतर सवाल उभा रहातो तो असा की, कुणासाठी हा खटाटोप? गेल्या दहा वर्षांत मराठीतील वाङ्‌मयीन अ‍ॅक्टीव्हिटीज खतम होत चालल्या आहेत. आणि त्याबद्दल कुणालाही चिंता आहे, असं मला वाटत नाही. प्राध्यापक मंडळी सबस्टॅन्टीव्ह लेखनाची जाणीवपूर्वक दाखल घेण्याचे टाळत आहेत. एक आघाडीची समीक्षिका कुठच्याही व्यासपीठावरून मराठी साहित्याबद्दल रोजचीच तक्रार करत असे- "या देशात विकासाची कामे वगैरे काही चाललंय? पण मराठी वाङ्‌मयात त्याचं दर्शन कुठे आहे?" मला तिला विचारावसं वाटलं- "होमसिक ब्रिगेड हे काय आहे?" पण मला वाटतं, तिला त्या तपशीलात शिरणे सोईचे वाटत नसावे. भाऊ पाध्यांची कादंबरी टाळणेच सोयीस्कर वाटत असावे. प्राध्यापकांची काय कथा! वृत्तपत्रे, दैनिके, नियतकालिके तर साहित्य समीक्षा अंगाबाहेर टाकू लागली आहेत. मराठीतील सर्वाधिक खपाच्या दैनिकाच्या संपादकाला मग भाऊ पाध्येच्या पुस्तकावर लिहिणे म्हणजे आपल्या दैनिकाच्या जागेचा अपव्यय वाटतो. हेमामालिनी किंवा अमिताभ बच्चन यांच्यावरील मजकूर पेईंग वाटतो. परत इतकी मराठी साहित्यविषयक तुच्छता बाळगूनही परत मराठी साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर मिरवण्याची संधी ते सोडत नाहीतच! त्यातच टीव्हीसारख्या गोष्टीही मराठीतील पोटेंशिअल वाचकाला दूर नेत असतातच!


लिहावे लागते अश्या कुडकुडणा-या मॉर्गसारख्या जगामध्ये. मराठीमध्ये लिहिताना असेच म्हणावे लागते, "ही माझी भाषा आहे. मी सेलेबल असलो काय किंवा नसलो काय, मला निर्धार करून लिहिलेच पाहिजे. वैफल्य वाटून घेता कामा नये. शेंडी तुटो वा पारंबी तुटो. लिहिणे. दुसरं काही नाही! 'वासूनाका' आणि ' बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर' यापलीकडे मी काही लिहिलं आहे की नाही, हेसुद्धा आमच्या तथाकथित पोटेंशिअल रीडरला ठाऊक नसते. नाटके, टीव्ही, चित्रपट कथा- कुठचेच माध्यम आपण गाजवत नाही म्हणजे आपल्या अस्तित्वावरून या तथाकथित पोटेंशिअल रीडरने छेद मारलेला असतो. अर्थात या मुश्कील हालातमध्ये आपली जिंदगी कशी काटणार असे वाटत रहाते. पण तरीसुद्धा एक आशा नेहेमीच लेखकाला वाटावी लागते, आपण युनिक आहोत; आपण निवडलेला विषयही आगळा आहे. . . आय शल नेव्हर ट्राय टू अपील टू द रीडर व्हू हॅज लिटल ऑर नो टेस्ट बट बिग प्रिटेंशन्स! वन डे धिस रीडर इज गोईंग टू व्हॅनिश- आय सिन्सिअरली होप. अखेर लेखकाच्या सेलेबिलिटीची आपल्या समाजात कसोटी लागणार नसून या मिशनलेस समाजाच्या ससेप्टीबिलिटीची कसोटी लागणार आहे.


मिशनलेस सोसायटी इज अ थिंग आणि तिला सामोरे जाण्यात मला स्वारस्य वाटतं. हॅरॉल्ड रॉबिन्स स्टायलीने इथे तिथे चावे घेणे आणि अखेर एस्टॅब्लिश्ड व्हॅल्यूजना शरण जाणे मला मंजूर नाही. आयझॅक सिंगर म्हणतो ते मला यथातथाच वाटते. रिअल रायटर्स स्टे इन देअर इनव्हीरॉनमेंट- इन देअर कॉर्नर. मुंबईकर रहाणे आणि मुंबईकर म्हणून लिहिणे मला मंजूर आहे. एरव्ही माझे रूट्सही मुंबईतच आहेत. कुठच्याही ग्रामीण किंवा इतर समाजाशी नाते मला सांगता येणार नाही. अपघात म्हणून मी दिल्लीला जाईन (होमसिक ब्रिगेड), जंगलात फेरफटका मारीन (वणवा). परंतु मला मुंबईबाहेरच्या जगाबद्दल औत्सुक्य नाही.


मुंबईच्या जीवनाइतकाच लैंगिक संबंधही मी महत्त्वाचा मानतो. माझ्या 'डोंबा-याचा खेळा'पासून 'वॉर्ड नं. ७' पर्यंत माझ्या कादंब-यांमधून लैंगिक जीवनाचे दर्शन नॅचरली पेश केले गेले आहे. आपल्या समाजाच्या लैंगिक जीवनाबद्दल मी काय सांगावे. डॉ. लोहियांनीच आपला समाज लैंगिकदृष्ट्या विकृत आहे असे प्रतिपादन केले आहे. जर डॉ. लोहियांसारखा विचारवंत लैंगिक जीवनावरील भाष्य उघडपणे मांडतो तर ते मी 'वासूनाक्या'तून आणले तेव्हा अनेक प्रोफेसरी समीक्षकांनी, मला लैंगिक जीवनाशिवाय काही दिसतच नाही, अशी बोंबाबोंब केली होती. लैंगिक संबंध व न-संबंध, दोन्ही बाजू मी हाताळल्या आहेत. दुर्गाबाईंच्या मते या दोन्ही बाजू हाताळण्यातच लेखकाचे सामर्थ्य आहे.


मी 'वेडा' (एक सुन्हेरा ख्वाब) नावाची एक बलात्कार विषयावरील कथा माझी पत्नी शोशन्ना हीस वाचावयास दिली होती. ती वाचल्यानंतर शोशन्ना भयंकर अस्वस्थ. ते पाहून मला चित्रण यथार्थ असल्याचे समाधान झाले. लैंगिक चित्रणाचा आस्वाद वाचकांनी अलिप्तपणे घेतला तर ते खरे नव्हे. त्यामुळे वाचक अस्वस्थ झालाच पाह्यजे. तीच त्याची कसोटी होय. मीही हे चित्रण करताना खूपच अस्वस्थ होतो.



सेक्स ही दिलीप चित्रे म्हणतो त्याप्रमाणे एकच गोष्ट लिहिण्यासारखी आहे नि वाचण्यासारखी आहे. आपल्या एरव्ही अ‍ॅक्टीव्हिटीज खूप चालतात. परंतु अखेर आपल्या जीवनाचा ताळेबंद आपल्या लैंगिक जीवनातील यशापयशानेच होतो. मला वाटतं, कादंबरी किंवा कोणतेही लेखन या विषयाच्या संदर्भात असेल तरच ते वर्थ रीडिंग असते. मला ठाऊक आहे, सध्या लैंगिक विषयाकडे वाकड्या नजरेनं पहाण्याची लाट आली आहे. अरुण साधूसारख्या लेखकांना तर हा विषय हाताळताही येत नाही. (हे माझेच मत नाही, एका मोठ्या साहित्यिकाचेही मत आहे!) तरीसुद्धा तो मराठीतील अग्रगामी लेखक ठरतो. मराठी भाषेतच सेक्सशिवाय लिहिणारी माणसे मोठी होतात.

 
सेक्सवर लिहिण्यासारखे आपल्याला दर घडीला दिसून येते म्हणूनच आपण लिहीत आहे. मी सेक्सवरच लिहितो आणि त्याच्याबद्दल मला यत्किंचितही शरमेची बाब नाही. इंग्लंडमध्ये एका जुन्या जमान्यात सेक्स संबंधात स्त्री-पुरुषांना लाजा वाटत- ते त्यांचे लैंगिक संबंध हे कर्तव्यबुद्धीवर आधारलेले असत. मजा अशी की आज जुन्या जमान्याप्रमाणे आपल्या प्रोफेसरांसकट सेक्ससंबंधी टॅबू बाळगणारे लोक पाह्यले की माझ्या लक्षात येते- आपण काही आपल्या समाजासाठी लिहीत नसलो पाहिजे, याची खात्री पटते. सहाजिकच आपण सेलेबल नाही. वि. स. खांडेकरच निरनिराळ्या मुखवट्याखाली या भाषेत जन्म घेतात आणि आपण त्यांचे रोम्यांटिक, अलंकार-भारलेले सुखवस्तू व चमचमीत लेखन हीच त्यांच्या आस्वाद्यमान्यतेची सर्वश्रेष्ठ क्षमता म्हणावी लागेल. . .आय सिन्सिअरली होप, दे विल पास. मगच मला आपला लेखक म्हणवणारी पिढी जन्माला येईल.
संकलक:प्रवीण कुलकर्णी

Monday, 19 April 2010

गती : बालकवी


गती! हि कुणाला चुकवता येणार नाही. तिला हवे ते नाव द्या. कमी करा की जास्त करा. पण विरती हा शब्दच उच्चारता येत नाही. अक्षय गती, अविरत, अखंड गती. या गतीला अंत आहे की नाही हे मला सांगता येत नाही. पण विरती हा मात्र केवळ भास आहे. किंवा तीही असल्यास साक्षेप आहे, यात शंका नाही. गतीविरहित स्थिती; विरतीची कल्पना सुद्धा होत नाही. कारण माझी स्थिती म्हणजेच गती आणि गती म्हणजेच स्थिती, असा हा येथला नियम दिसतो. गतीविरहित स्थिती व स्थितीविरहित गती यांची सुद्धा कल्पना करवत नाही, स्थिती व गती यांच्या संमिश्रणापासून दिक्कालाची कल्पना माझ्या मनात आली आणि अस्पष्ट द्वैतभावनेच्या रूपरेषा ठळक होऊ लागल्या. प्रथम येथील स्थिती व गती एकच प्रकारची आहे, असे मला वाटत होते. ते आता एकात अनेकत्व दिसू लागले व अनेकत्वात एकत्वाचा भास होऊ लागला. आकाशात फिरणा-या ग्रहगोलांना एक प्रकारची गती आहे. गतीविरहित स्थितीची कल्पनासुद्धा होत नाही, हे वर सांगितलेलेच आहे. पण वरील प्रकारच्या गतीत व माझ्या गतीत एक प्रकारचे अंतर आहे. त्यांच्या गती निसर्गनिर्मित आहेत; माझ्या गतीचा कालचक्र मी आहे.


"समग्र बालकवी"
संकलक: प्रवीण कुलकर्णी

Sunday, 18 April 2010

पाच गद्य परिच्छेद : बालकवी


१ : वाचक, प्रेमाची नशा करिताना तू आपले तोंड प्रथमच वेडेवाकडे करशील हे मी जाणून आहे. पण एकदा भरपूर नशा भरल्यावर जो ब्रम्हानंद प्राप्त होणार आहे त्याची तुला कल्पनाही नाही. तुझ्या जीवनाचे सर्व रहस्य एका याच नशेत भरून राहिले आहे असे मी म्हणू लागल्यास तू मला शेणमार करू पाहशील. पण माझा अनुभव हाच आहे आणि मी म्हणतो त्याचे तुला कदाचित आश्चर्य वाटेल; पण तुझाही अनुभव तोच आहे. तो तुझ्या अंत:करणाला पटला आहे. पण त्याचे साकल्याने ज्ञान न झाल्यामुळे तुला तो खरा वाटत नाही. एखादी नवोढा आपले प्रेम झाकून ठेवते त्याप्रमाणे तुही या तुझ्या दिव्यानंदाला दृष्टीआड करावयास पाहतोस-जगाच्या पापपुण्याच्या, सुखदु:खाच्या, हर्षखेदाच्या कैचीत आवळला गेल्यामुळे तुझी तुलाच वाढ करिता येईनाशी झाली आहे. कीर्ती, पैसा, संसार, प्रपंच यांच्या नसत्या नादाला भुलून तू आपल्या ख-या सुखाचा, आत्मत्वाचा खून करून खोटे आत्मत्वाचे भूत उराशी धरून त्याच्याच भीतीने भेदरून गेला आहेस. असे का झाले याची चिकित्सा करीत बसण्यापेक्षा तू पूर्ववत कसा होशील याचीच तरतूद केल्यास बरे नाही का? तर मग माझे ऐक; हे औषध-हि नशा चढवणारी मदिरा प्राशन कर आणि पहा तुझे तुलाच काय वाटते ते.

२ : "मायेचा पसारा मोठा गहन आहे. या संसाराचा पाश तोडणे महाकठीण आहे. माती म्हटली तरी ती सुद्धा कशी वाढत जाते. तुम्ही एवढाली रोपे. तुम्हाला पाणी घातले, रात्रीचे दिवस केले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला मोठे केले, तुमचे दोहोंचे चार हात केले. देवाच्या दयेने माझा चिमणा बाळकृष्ण-तुमचा मधु-माझा बाबा माझ्या मांडीवर खेळला. आता आणखी काय राहिले? पण हि ओली माती नाही सुटत. हरी हरी."

3 : "बाबा, माझी आई गेली आणि तुम्हीही आता असे म्हणू लागला तर" पुढे माधवरावांच्या तोंडून एक शब्दही निघेना. एखाद्या कोमल अर्भकाप्रमाणे पित्याच्या वक्षस्थळावर डोके टेकवून ते स्फुंदूनस्फुंदून रडू लागले. म्हाता-याने आपला जीर्ण हात त्यांच्या पाठीवर टाकला आणि दुस-या हाताने त्यांचे अश्रू पुशीत म्हटले, "वेडा-अरे पिकली फळे आज नाही उद्या पडायचीच-आम्हाला आई-बाप नव्हते का, जगाची तशी रीतच आहे. दहा वर्षापासून बरोबर वाढली, गेली न सोडून, वेडा नाही तर! पुरे, मधुबाळ कोठे आहे? रमा, अगं तुही रडतेस. तुमचे दोघांचेही होणार तरी कसे?"


४ : माई, मला काहीच कळत नाही. तू मला कोठे नेतेस? हि बघ संध्याकाळ झाली. त्या पलीकडच्या कड्यातून धुक्याचे लोटच लोट जागे झाले. पहा, भगवान सविता किती अंधुक होत चालला; त्याची सगळी किरणे गेली. कुठे गेली कुणास ठावूक? हे लाल बिंबसुद्धा त्याच अंधुक पडद्याखाली त-हेत-हेच्या रंगांनी रंगीत होत हळूहळू वरचेवर दिसेनासे झाले. मी सकाळी पहिले तर असेच मला दिसले, या जगाच्या जादूगाराचाच हा खेळ. माई, आपले तरी असेच नाही का गं? थोडेसे तेज, थोडा परमेश्वरी अंश या शरीराच्या दात धुक्यात गुंडाळला जातो. निरनिराळे रंग त्याच्यावर उठतात. तीच सूर्यकिरणे जखडली गेली. हे चंचल धुके जरा इकडच्या तिकडे सरले, झाले गेले, त्या पूर्वीच्या रंगाची त्या सोनेरी हिरव्या पिवळ्या रंगाची काहीतरी खूण तरी राहते का मागे? मला नाही बाई समजत. बोल, बोल गडे, हे असेच न आमचे जीवित, हे रंग तरी का बरे उठतात? सांग मला हे धुके कसले? हा कसला खेळ? तो पहा तो पलीकडचा मेघ किती आक्राळविक्राळ दिसू लागला.

५ : नीरा-शबरी, तुझ्या मस्त रंगाबरोबर माझे मन काही तरळ बनत नाही पण बाळे, जरी हे असे असले तरी यात खेद करण्यासारखे काय आहे? आज जशा आपण मावळत्या सूर्यनारायणाकडे, या ढगाकडे, या पर्वतांच्या अनंत शिखरांकडे पाहत आहो तसेच आपल्या हृदयस्थ सूर्यनारायणाकडे-सुखदु:खात्मक जीविताच्या मेघांकडे, या सृष्टीच्या असंख्य लीलांकडे, एका निराळ्या दृष्टीने तेजोमय दृष्टीने आपण पहिले तर प्रत्येक पदार्थाचे आपण कौतुक करू. या पलीकडच्या आकाशातल्या देखाव्याकडेच पहा ना? किती त-हे त-हेचे रंग आहेत. या सोनेरी, गुलाबी, पांढ-या, अंधुक काळ्या अशा विविध वर्ण समुच्चयनेच हे संध्येचे चित्र नितांत रमणीय झाले आहे. जर हे धुके चंचल नसते तर असला विविध चमत्कृतीजन्य हा देखावा आपणास कधीतरी पहावयास मिळाला असता का? बाई गं, जग तरी असेच आहे, ते अस्थिर आहे, चंचल आहे, नेहमी बदलणारे आहे म्हणून मनुष्यप्राणी त्यात सुखाने राहू शकतो. चंचलपणा हेच तर त्या संध्येप्रमाणेच सृष्टीचे जीवन आहे.

'समग्र बालकवी'
संकलन:प्रवीण कुलकर्णी



Sunday, 4 April 2010

गोलपिठा व ढसाळ यांविषयी:विजय तेंडूलकर



नामदेव ढसाळ त्याच्या कवितासंग्रहाची बातमी सांगत आला तेंव्हा मला आनंद वाटला. कवितांचा मी व्यासंगी वाचक नाही. परंतु कविता समोर आली तर घाईने उलटतही नाही. ढसाळच्या कविता मी फुटकळ स्वरूपात वाचलेल्या होत्या. त्या मला वेधक वाटल्या होत्या. काहीवेळा पूर्णपणे कळल्या नव्हत्या. तरीही त्यामागचे मन जाणवले होते. नंतर ढसाळ एकदा भेटला. औपचारिक ओळख झाली. ढसाळ याच्या जगाविषयी त्याच्या कवितांमुळे माझ्या मनात किती औत्सुक्य साठले आहे, ते तेंव्हा कळले. इतके प्रश्न मनात जमले की काही विचारणेच जमले नाही. ढसाळ थोडासा हसला, मी थोडासा हसलो. ढसाळचे हसणे मला जवळिकीचे वाटले नाही. असेही वाटले की ते जवळिकीचे का असावे? त्याच्या मनात माझ्या जगाविषयी एक आकसच असला पाहिजे. त्याच्या लेखी मी त्या जगाचा प्रतिनिधीच नव्हतो काय?
नंतर काहीवेळा तो दिसत असे, पण हा माणूस आपल्याशी नीट बोलणार नाही असे माझ्या मनाने घेतले होते. ढसाळची कविताच त्याच्यापेक्षा मला जवळची होती. तिच्यातले अनेक शब्द, प्रतिमा कळूनही ती मला अस्सल,
कसदार आणि अस्वस्थ करणारी वाटत होती. या कवितेशीच माझी प्रसंगाप्रसंगाने एका मर्यादेपर्यंत दोस्ती जमलेली होती. आणि ढसाळ एकदा माझ्याशी आपण होऊन बोलला.मला खूप बरे वाटले.
या आश्चर्याला नंतर फार वाव उरलाच नाही. ढसाळ माझ्याकडे येऊ लागला, बसू लागला, हसू-बोलू लागला. इतके खोलवर वेदनेने आणि रागाने भरलेले काव्य लिहिणारा हा तरुण इतका प्रसन्न हसतो कसा, याचे मी नवल करी. असाच तो आला आणि हसत म्हणाला, 'माझ्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहा.' त्याने फार प्रयत्न करताच मी होकार दिला.
आता आठवते की माझ्याहून अधिकारी माणसांकडे जाण्याला मी आग्रहाने सांगितले पण त्याने ते विशेष मनावर घेतले नाही. त्याने माझी परीक्षा पाहण्याचे ठरवलेच होते. तो म्हणाला, "तुम्हीच लिहा. मी आता कोणाकडे जात नाही."
कवितासंग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडली आहे पण शब्दश: समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार? केवळ एखादी गोष्ट आपल्याला समजते तशी आणि तेवढी आवडते हा काही तिच्यावरील आपला अधिकार ठरत नाही. जसजसा विचार करू लागलो तसतसा माझा मुळातच कमी असलेला आत्मविश्वास आणखी कमी होऊ लागला.
मी प्रथम ढसाळचे शब्दभांडार जमेल तेवढे माहित करून घेण्याचे ठरवले. त्याने स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या, कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळपुढे विद्यार्थ्यासारखा बसलो. (ढसाळ मला 'सर' म्हणतो.) ढसाळने मला समजावून सांगितले. एरवी माझ्याशी (वरपांगी तरी) थोडा आदराने बोलणारा ढसाळ या वेळी एका निर्णायक आणि शांत अधिकाराने बोलत होता. कारण ते जग त्याचे होते. त्या जगाची रेशानरेषा त्याने जगून टिपलेली होती आणि एवढ्यापुरता त्याचा अधिकार होताच. अज्ञानी मी होतो. चंद्रबिंदी म्हणजे काय, डोबरी म्हणजे काय, सादळलेली जडे म्हणजे काय, रांडकी पुनव कशी आणि कुठे असते, खैरबांडे पांजरपोळ डग्गा याचा अर्थ काय, धेडधाय पोटले कशाला म्हणावे, .....नष्टचर्य असे एका कवितेत किंवा उज-एड असे दुस-या एका कवितेत आवर्जून त्याने का लिहिले आहे, पाणचट गवशी कुठे असते, छप्पनटिकली बहुचकपणा नक्की कसा, मगरमच पलीत्यांचा अर्थ काय, कु. अनुराधा बुधाजी उपशाम कोण आणि कोठली, थम घेऊन म्हणजे काय करून, महारोग्यासारख्या सांडलेल्या झोपड्या यात सांडणे शब्द कशाकरता, रायरंदी हाडूक कसे असते, खोडाबेडा हात म्हणजे कडे हात, बिंदाचिंदा हा कोठला शब्द, नेपाळी पोरी डावेउजवे कसे करतात, कंट्रीच्या मसाल्याची मलभोर मलय हे काय प्रकरण, पिंढ म्हणजे शरीराचा कोठला भाग, डिंगडांग धतींगचा शब्दार्थ काय, गुपची शिगा, डेडाळे, डल्ली,सल्ली, बोटी, गुडसे, डिलबोळ ही कोठली भाषा, अनबन कसे बनवतात,- एक ना शंभर गोष्टी. ढसाळने मला सारे सहनशीलपने आणि अधिकाराने समजावले. समजावताना एकीकडे तो संकोचत होता(विशेषत: घाणवाचक वा लिंगवाचक शब्द समजावताना) तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन मिळत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेह-यावर दिसत होता.
परंतु अर्थ विचारताना आणखीनच घोटाळा होऊ लागला. ढसाळच्या जगाविषयीच्या माझ्या घोर अज्ञानाने मला आता पुरते घेरले. कित्येक गोष्टींचे आपणाला ज्ञान नसते. नव्हे, अज्ञानच असते. परंतु जोवर त्या गोष्टीविषयी जाहीररीत्या ते देखील लेखी काही म्हणण्याचा सवाल येत नाही तोवर अज्ञानासकट आपण सुखात असतो. ढसाळने मला हसत हसत खिंडीतच गाठले होते. माझ्या अज्ञानाची मला (क्वचितच वाटू शकणारी) शरम वाटली. इतक्या जवळ जगणा-या या जगाविषयी आपण असे मख्ख असावे हे जाणवले आणि बोचू लागले. मी ढसाळला म्हणालो, "मला तुझे जग पाहायचे आहे." हसत त्याने ते दाखवण्याची तयारी दाखवली. ढसाळचे घर, त्याचा मोहल्ला, त्यातली माणसे आणि त्यांचे जगणे बघत ढसाळबरोबर मी एका रात्री चांगला दोन की तीन वाजेपर्यंत भटकलो. त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळने मला भेटवले. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात, भकास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळने मला त्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द माझ्या अद्याप चांगले लक्षात आहेत.
परंतु इतकेच. एका रात्रीत मी हे चेहरे आणि हे शब्द यामागचे आणि पलीकडचे काय पाहू शकणार? फार फार वर वर मी थोडेबहुत पहिले. ढसाळ आणि त्याचा एक जोडीदार मला आणखी माहिती पुरवीत होते. ती ऐकली. या सगळ्याचा ढसाळची कविता अधिक चांगली समजून घेण्यासाठी उपयोग करण्याची माझी धडपड होती. ढसाळची कविता आजही मला पुरती समजली आहे असे मला वाटत नाही. पण ती मला जरा जास्त समजू लागली आहे आणि त्याहूनही जास्त आवडू लागली आहे. ढसाळच्या जगात उभे राहून त्याच्या कवितेत डोकावण्याचा प्रयत्न टाकून, मी आता ढसाळच्या कवितेच्या पुलावरून त्याचे जग समजावून घेऊ लागलो आहे. ह्या जगाच्या प्रत्यक्ष आणि ढसाळनेच घडवलेल्या ओझरत्या दर्शनाने या कामी मला चांगली मदत झाली आहे.
पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी 'नो न्स '- निर्मनुष्य प्रदेश -जेथून सुरु होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, 'गोलपिठा' नावाने ओळखले जाणारे जग सुरु होते. हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे, उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणा-या मनुष्यादेहाचे, असोशी वाहणा-या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणा-या तरुण रोगी देहांचे, बेकारांचे, भिका-यांचे, खिसेकापूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्याचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणा-या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नाचे; गांजाच्या खाटल्याचे, त्याच खाटल्यावरल्या कोप-यात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे. त्या मुलाला 'शरीफ' बनवण्याची महात्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखान्याची रखवाली करणा-या क्षयरोगी बापाचे, हिजड्याचे, हातभट्ट्याचे, अध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणा-या ऊन चिकट रक्तांचे, वाफा ओकणा-या पाणचट लालभडक चहाचे; स्मगलिंगचे, नागव्या चाकूंचे, अफूचे. १९४३ साली मुंबईच्या गोदी भागात एक नंगा बाबा ओरडू लागला, माझ्यामागून या, जगबुडी येणार, माझ्यामागून या. लंगडे, थोटे, भुकेकंगाल, बेकार, रोगी, भोगी, जे कोणी त्याच्यामागून धावले ते या भागात येऊन वाचले म्हणे. कारण गोदीत प्रचंड स्फोट झाला. नंगा बाबाने गोलपिठ्याला आणून सर्वाना वाचवले. ढसाळच्या गोलपिठ्याला. जेथे महारोगी शरीरेही किंमत देऊन रस्त्याकडेला भोगली जातात, संभोगाशेजारी अर्भके रडतात, वेश्या गि-हाइकाच्या प्रतीक्षेत गळाभर प्रेमगीते गातात, जेथून कोणी जीवानिशी पळू शकत नाही, पळाले तर परत येते, तो गोलपिठा. दया-क्षमा-शांती यांचा लागता नसलेला गोलपिठा. ढसाळ सांगतो, 'इथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच-उफराट्या काळजाचा-असतो."
हे ढसाळच्या भोवतालचे आणि त्याला कायम वेधून राहिलेले जग. या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणा-या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते. नामदेव ढसाळ या पूर्वजांचा वंशज.-कदाचित तसाच जगाला असता; परंतु एक महार वेगळा निघाला. त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हीनदीन समाजाला क्रोध दिला. माणूसपणाचे हे महत्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. अस्पृश्य नवबौद्ध बनले, घटनेने दास्यमुक्त झाले, परंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळ, जुलूम, पिळवणूक विटंबना संपली नाही. कनिष्ठ वागणूक मिळतच राहिली. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते. अदम्य विषाद आणि क्रोध या कवितेच्या शब्दाशब्दावाटे जाळासारखा फुटत राहतो. पोरगेल्या वयातली ही हळवी आणि नाजूक होऊ बघणारी कविता जागोजाग आतल्या दाहाने करपलेली भासते. भोवतालच्या आयुष्यातले उबगवाणे आणि किळसवाणे तपशील ती अलंकारासारखे, एका मुजोरपणे, मिरवताना दिसते. या तपशिलांनी नटते, मुरडते आणि भेसूर होते. हागमूत, झवणं, लवडा, लेडाची गाडगी, जंतांच्या माळा यांचे नामदेव ढसाळ याच्या कवितेतले उल्लेख उपरे राहत नाहीत. त्याच्या सर्व कवितेमधून वाहणा-या खोलवरच्या संतप्ततेचे ते काव्यात्म उद्रेक बनतात आणि म्हणून कविताच वाटतात.
अनेक अपरिचित बोली-शब्द या कवितांतून सहजपणे येतात. परिचित शब्दांचे अनोखे उपयोग होताना दिसतात. या सा-यात विलक्षण आत्मविश्वास जाणवतो. पांढरपेशा थराने दिमाखात जपलेली अलवार घरंदाज भाषा नामदेव ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो, निर्दयपणे तिची मोडतोड करतो अथवा तिच्यात अशिष्ट भर घालून तिचे बुद्ध्याच एक विद्रूप करतो. त्याच्या कवितेतील आशयासाठी हे सारे त्याला आवश्यक वाटते. हे करताना भाषेचे पारंपारिक सामर्थ्य आणि सौंदर्य त्याला उमजले आहे याचेही पुरावे तो मधूनच देतो. या अशा गंगाजमनी, विद्रूप, मोडक्यातोडक्या परंतु अतिशय ओघवत्या आणि मनस्वी भाषेत नामदेव ढसाळ त्याचे जगणे एका अनावरपणे आणि सहजपणे काव्यरूप घेते. या जगण्यातला असह्य दाह कवितारुप होतो. या जगण्यातल्या अदम्य संतापाचा उकळता लाव्हा सुस्थित , संभावित जगावर चौफेर भिरकावीत नामदेव ढसाळ याची कविता जेंव्हा 'रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना' हकारित, 'अंधारयात्रिक' होण्याचे नाकारीत, 'शहराशहराला आग लावण्या' चे पुकारे देत सुसाट निघते तेंव्हा आजच्या मराठी कवितेत क्वचित आढळणा-या ख-याखु-या बंडखोरीच्या झळाळत्या प्रत्ययाने मी दिपून जातो. या प्रकारचे जे कवी ढसाळ याने लिहिले आहे, ते चुकूनही प्रचारकी झालेले नाही हे विशेष. हि बंडखोरी आत्म्याची आहे; कंठाळी नाही. या बंडखोरीला -कवितेपुरते तरी-राजकीय रंग नाहीत, ती अधिक मूलभूत स्वरूपाची आणि म्हणून अस्सल आहे. 'स्वातंत्र्य कुठल्या गाढवीच नाव आहे', 'पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद भगोष्ठ' , असे म्हणण्याचा छातीठोक निर्भयपणा तिच्यात आहे. 'गोलपिठ्या'च्या गल्लीबोळांतून मशाली पेटवून हिंडणा-या 'महाग्यानी' लोकांना उद्देशून, 'ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार काळात नाही त्यांनी पेटलेल्या माणसांना छप्पन टिकली बहुचकपणा अजूनही दाखवावा?' असे ती न कचरता म्हणू शकते. 'व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावेत, साहित्यसंघ, शाळा, कॉलेजे, हॉस्पिटले, विमानअड्डे यांवर हातबॉम्ब, हैड्रोजनबॉम्ब टाकावेत.', असे घोषित करण्याइतकी ती निर्णायक आहे. तडजोडीचे सर्व पूल तिने केंव्हाच उडवले आहेत आणि प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा तिने उचलला आहे. कवी ढसाळ याच्या कवितेला निकाली झुंजीचा जसा काही ध्यास लागून राहिला आहे. या ध्यासातली तिच्यात व्यक्त होणारी क्षणिक उदासीनतादेखील मरगळलेली नाही; तो बलदंड प्रज्ञेचा क्षणिक शीण भासतो. तो पराभव नव्हे; ती युद्धतहकुबी असते. या कायम युद्धमान कवितेतला शृंगार, तिच्यातला वियोग, तिच्यातील तात्कालिक वैफल्य, तिच्यातील तसलेच वैराग्य किंवा तिच्यातले गा-हाणे, या सा-याला बंडखोर गरम रक्ताचा जो स्पर्श आहे तो मला तरी फार लोभसवाणा वाटतो. समाजातील दडपून आलेल्या थरातून आलेला ढसाळ हा काही पहिलाच कवी नव्हे. तो या थरातील पहिलाच गुणी कवी देखील नाही. परंतु मराठी कवितेच्या परंपरेचा काही वारसा घेऊनही तिच्यातले अर्वाचीन पांढरपेशे मन आपल्या कवितेत सरकू न देणारा, आपल्या कवितेचा पिंड अंतर्बाह्य आपल्या जगाशी पक्का बांधला ठेवलेला आणि या प्रयत्नात कोठेही खोटा, प्रचारकी वा कंठाळी न होणारा ढसाळ हा विरळा दलित कवी मात्र नक्कीच आहे. अद्याप तरी त्याला हे जमले आहे. त्याच्या कवितेने मला अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगाची आठवण मला दिली असे मी म्हटले तर त्यात मी ढसाळची औपचारिक स्तुती करतो असे कोणी मानू नये. तुकारामाचा अध्यात्मिक नव्हे परंतु काव्यरचनेचा वारसा तिच्यातील उत्स्फूर्त, रांगड्या, रोकड्या, संतप्ततेसह ढसाळची कविता वागवताना मला भासते.
कवी ढसाळचा भविष्यकाळ कसा असेल ते मला माहित नाही. त्याच्या सामाजिक थरातून मोठा दिलासा देत पुढे आलेले लेखक, कवी पाहता पाहता चुकीच्या अर्थाने पांढरपेशे, शब्दाळ किंवा रोमटिक झालेले मी पहिले आहेत. त्यांच्या निर्मितीने आत्माच गमावला आणि ती निष्प्रभ बनली, जुन्या कीर्तीवर मिरवत राहिली. ढसाळ याचे असे न होवो.


'गोलपिठा' पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना
संकलन:प्रवीण कुलकर्णी









हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....