
वेडा झाला,म्हणा हवेतर उठला जनतेतुनी,
कवी हा तन्मय निजगायनी;
सुख दु:खांच्या व्यामोहाच्या सुटला फेऱ्यातुनी
नसे जग त्याच्या ध्यानीमनी
स्वार्थ विसरला अविरत फिरतो गुंतत विजनी,वनीं
म्हणोनिया ऩिंदो याला कुणी.
परी जगी मिळाले याचे याला पुरे,
वैभवे वाटती यास दुजी पामरें,
मग करील कां हा स्पृहा तयांची बरे?
एकच याचे यास पुरे, मग हसोत, हसतील कुणी,
कवी हा, हा जगताचा धनी,ll१ll
मदांध दमले! जगी कुणावर या पसरी मोहिनी,
न हा वश कविवर तुजलागुनी!
दंभा! नीचा! कळे न कां तुज हा सत्याचा झरा,
सुखें जा नाच जगी पामरा!
सैताना! मत्सरा! अरेरे! जासी कोणाकडे?
दिसेना कविवर कां तुज पुढे?
हा पवित्र ज्ञानसूर्य की अहा!
जा, तमा नीघ,हा उदया आला पहा!
अविवेका,घूका, दडुनी कुठेही रहा.
हा प्रेमाचा धवलचंद्रमा भूवर ये उतरुनी;
कवी हा, हा जगाचा धनी ll २ ll
स्वच्छंदी हा प्रभातवायू झोके घे अंबरी,
लतांना पुष्पित करितो तरी;
चंद्र पहा हा गगनमंडली हसतो वेडयापरी;
कर्षीतो सागरलहरी तरी;
हो!असाच समजा हा स्वच्छंदी कवी
हा जगास आपुल्या इच्छेसम वागवी,
हा भूस अर्पितो सदैव सुख मानवी,
खरा भिकारी, खरच वेडा,परंतु मोठा गुणी;
कवी हा,हा जगताचा धनी ll ३ ll
*************************************
बालकवी
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment