
भास्करा, येते दया मजला तुझी अधीमधी
आहेस का रे पाहिली तू, रात्र प्रणयाची कधी?
[यावर सूर्य शायराला उत्तर देतो]
आम्हासही या शायराची, कीव येऊ लागते
याच्या म्हणे प्रणयास याला, रात्र यावी लागते
ना म्हणू की इश्क त्याला, आहे जराही समजला
इष्कातही दिवसास की जो रात्र नाही समजला
खेळू नको बेधुंद ऐसा, चंद्रा अरे, तारांसवे
घे जरा लक्षात आहे, रोहिणीही तुजसवे
पृथ्वीवरी असतास जर का, छंद तू हा घेतला
खास तुझिया रोहिणीने, डायव्होर्स असता घेतला
तोंडही जेंव्हा कुणाला, दावू नयेसे वाटते
दुनियेसही आमुच्यात कांही, तेंव्हाच आहे वाटते
नजरेस मिळवी नजर वा, नजरेस तू येवू नको
यातील कांही कर हवे ते, वाया अशी जाळू नको
भाऊसाहेब पाटणकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment