
उन्मत्त श्वापदांची आली वरात आली
जिंकून राजरस्ते घुसुनी वरात आली
एकही सज्जनाचे घर सोडिले न यांनी
प्रत्येक सत्विकाच्या बेडी करात आली
जमले थव्याथव्यांनी तांडे समर्थकांचे
लाचार गांडूळांची भक्ती भरात आली
जे माननीय होते लाचार तेही झाले
अब्रू पितामहांची सस्त्या दरात आली
गणवेश घातलेले मारेकरी सभोती
देण्यास लाच टोळी ही मंदिरात आली
मुर्दाड नागड्यांचा हा चालला तमाशा
ज्योती खुडून साऱ्या ही काळरात्र आली
विकिले न हात ज्यांनी झेलावयास थुंकी
कळ एक जीवघेणी त्यांच्या उरात आली
मंगेश पाडगावकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment