aभंकस करणे हा स्वभावच होऊन गेला आहे.मला ज्या विषयात बऱ्यापैकी ज्ञान, माहिती आहे तो विषय; समोरचा माणूस सांगू लागतो, मी वेडयाचे[अडाणीपणाचे] सोंग घेऊन ऐकतो, प्रश्न विछारतो, तो प्रामाणिकपणे निरसन करतो.हा माझा आवडता खेळ.कारण माझ्या बोलीभाषेवरून वगैरे मी काही शिकलासवरलेला वगैरे अजिबात वाटत नाही.[पण थोडाफार शिकलो आहे.] त्यात देशी दारूच्या दुकानात याची मजा फार येते.त्यात भर म्हणजे मागच्या तीन वर्षात नोकरीत शिपाई, चतुर्थश्रेणी पद!याचा तर ह्या खेळात फार फायदा होतो.कारण समोरच्याचे माझ्याबद्दल तुच्छ मत होते.मग मी हळूहळू या खेळाची मजा घेतो.सकाळचेच उदाहरण यासाठी देतो...
सकाळी टीडीए आटोपून आम्ही कांहीजण उन्हाला थांबलो होतो.कुणी गात होते, कुणी कुणाला तरी शनिवारी काय गाणार हे विचारीत होते, एकजण म्हणाला, 'इथे कांही कुणी अजून कविता गात नाही.'[काव्यवाचन]
बास, मला फिरकी घ्यायची लहर आली.मी म्हणालो, 'कविता गातात? गाणं गातात! इथे मराठी गाणं तर बरेचजण गातात की!'
त्यावर तो उसळून म्हणाला, 'तसं नाही, काव्यवाचन नावाचा प्रकार असतो'.मी म्हणालो, 'म्हणजे शेरोशायरी का?'त्यावर माझ्या अज्ञानाची कीव करत तो म्हणाला, 'त्या दिवशी नाही का, मॅडमनी वाचली होती? तशी!'मी परत म्हणालो,'म्हणजे आम्हाला शाळेत होत्या तशा कविता का?'येरे येरे पावसा' सारख्या?यावर पुन्हा माझ्या अडाणीपणावर कमालीचा खेद व्यक्त करत तो चिडून पुटपुटला, 'तुझ्या डोक्याबाहेर आहे, आता शनिवारी बघ म्हणजे कळेल.'
आता या प्रसंगात वास्तविक त्याला चिडवणे हा हेतू नव्हता तर मी प्रामाणिकपणे तो सांगतो ते ऐकत होतो.खरे पाहता मला आद्य कवियत्री [मराठीतील] महानुभाव पंथातील 'महदंबा' तीव्ह्या रचना 'धवळं' पासून नवकाव्याचे जनक बा.सी.मर्ढेकर यांचे 'पिपात मेले ओल्या उंदीर' ते संदीप खरे पर्यंत सारे माहित होते, मी काव्य संमेलने ऐकली आहेत, पण एकंदर रिकामा वेळ कसा काढावा हे मी गुत्त्यात शिकलो.त्यात कुणी २३ अध्यायाची ज्ञानेश्वरी देखील सांगितली, न्यूटनला आईनस्टाइन बरोबर गुरुत्वाकर्षणाचा २रा की ३रा नियम शिकवला.हे सारे मजेशीर होते.कदाचित मला ते अजूनही आवडते पण ह्या सर्व प्रकारात मी भंकस म्हणून सोडून द्यायला तयार नसतो.काही माहिती अजून कदाचित मिळेल म्हणून रमतो.[खरेतर ते सोडून द्यायला जमायला हवे.कारण उगाच गैरसमजही होतात.]
No comments:
Post a Comment