
इराणी संगीताच्या प्रतिमा
आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी
संगीताच्या प्रतिमा....
मला अलिंगणात मरण तसा रात्रीचा शृंगार,
तुझे चांदरातीचे अर्थनिळे मन....
कुठे यांच्याही पलीकडे, कुठे त्यांच्याही पलीकडे संपूर्ण
अवकाशाला टाळून फक्त वाऱ्यालाच ऐकू येईल
अशी सारंगीची पिपासा
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा.....
वाळू पसरली देहापार, कुणाच्या नादात?
कुणाच्या शोधात?
स्वरसिद्ध तिचे अनंत कण; रेषाबद्ध उंटांच्या
मानेंत जसे चंद्रबन....
कुणी दिसत नाही; नाही दिसत एवढ्या प्रचंड
टापूत मला, कुण्या युगांत येथे झाडे उगवली
असतील त्या डोळ्यांच्या निरंगी नश्वर सुरमा
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा.....
मज्जेखालच्या तळमळणारे फुलांचे दैवी घोस....
की कुण्या वैदेहीची पंथविराम गुणगुण?
शिशिराच्या मागे वाजवी सूत्रधाराची धून....
नभ एवढे विराट, माझे नाही तसे तुझेही नाही या
वाळूच्या सप्तरंगी कणांचे अज्ञातपण
फक्त दु:खाच्या देखाव्यांना दिशाबद्ध
करणारे पिरॅमिडांचे अधांतर;
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा...
ग्रेस
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment