Saturday, 30 January 2010

नास्तिक...


एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो,
तेंव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते
की कोणीतरी आपापल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे राहिल्याच्या पुण्याईची!

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा शक्यता होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची!

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा कोऱ्या नजरेने पाहात राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा...
कोणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायांवर
सांभाळत असल्याचे समाधान देवालाच!

म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित,
पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे!

देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, 'दर्शन देत जा अधून मधून...
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना!'

देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात
तेंव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन,
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो....

संदीप खरे
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....