Saturday, 30 January 2010

18-11-2009

मी इथे पहिल्या महिन्यात होतो त्यावेळी करकरे मॅडमचे एक इनपुट विचारप्रक्रिये संदर्भात होते. त्यावेळी विचार करण्याबाबत मी उस्फुर्तपणे उद्गारलो होतो, 'कि, दोन क़्वार्टर मारल्याशिवाय आपलं तर डोकंच चालत नाही!'
यावर हसून
मॅडम म्हणाल्या, आमचं चालतं बुवा! तर सांगण्याचा उद्देश असा कि, आता या चार महिन्यात मी दारू न पिता थोडा 'विचार' केला आहे.
माझा मूळ मुद्दा कांहीच न करण्यापाशी जो अडत होता किंवा तोच अधोरेखित करून स्वयंकेंद्रित न राहता थोड्या सर्व शक्यता पडताळून केला आहे.वेळेत लिहिता येणार नाही पण जेवढे येईल तेवढे लिहितो आहे.
मी प्रथमच उल्लेख केल्याप्रमाणे मला मूळ नोकरी 'विस्तार अधिकारी' किंवा वरिष्ठ सहायक म्हणून पदावर नेमणूक मिळेल अथवा न मिळेल, पण प्राप्त परिस्थितीत आहे ते पद आवश्यक वाटते.हे मी नमूद केलेले आहेच.
त्यासाठी मला तेथील सध्या कांहीच माहिती नाही, मात्र नियमात असल्यास सर्व प्रयत्न करून परत मिळवू धाकतो, हि एक शक्यता.
मग हा प्रश्न येतो कि, माझ्या अधिकाऱ्याने मला वेळ दिला होता तेंव्हाच मी का गेलो नाही?
# त्यानंतर २-३ वेळा रीहॅब झाले तरी का नाही?
# आर्थिक सुरक्षा आताच महत्वाची का वाटते?
# वडिलोपार्जित जी कांही मालमत्ता आहे ती आताच का हवी?
उत्तरं कांही सरळ नाहीत, कारण असुरक्षितता हे महत्वाचे कारण आहे.
मी इथे येण्याआधीच स्वतःसाठी वेळ हवा, दारू आता पुरे झाली हि उद्दिष्टे घेऊन आलो.
आता दुसरा भाग असा कि, मी पत्रकारितेचा अभ्यास वगैरे करीन तेंव्हा करीन [कारण रीहॅबमध्ये ते शक्य नाही याची मला जाणीव आहे.आणि तसेही शैक्षणिक वर्षाला अजून बराच अवधी आहे.] पण त्याच वेळी मला दोन गोष्टी करायच्या आहेत..
१ आहे ती नोकरी सोडणे.
२ वडिलोपार्जित जमीन वगैरेचा नाद सोडून देणे.
कारण माझ्या आताच्या अनुभवानुसार मी त्या पातळीवर मदत मिळेल म्हणून कदाचित कृतीशून्य आहे.
दुसरे क्षेत्र, पत्रकारिता वगैरे करून त्यात यश मिळेल कि नाही हे महत्वाचे आता नाही.करणे, सुरुवात करणे,त्याचबरोबर एखादी नोकरी शोधणे [कामाची, पगाराची अपेक्षा फार न ठेवता] कारण सद्यस्थितीत घरच्यांचा प्रतिसाद अनुकूल असावा अशी अपेक्षाआहे.
याचबरोबर शक्यता दोन, हे सर्व लिहिणे वरवर फार आदर्श वाटते पण, उद्या भावाने मदत माकारली, नोकरी नाही, सरकारी, खाजगी दोन्हीही नाही, सर्व बाजूने प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर? त्यावेळी मी काय करणार? निदान जगण्यासाठी आवश्यक पैसे देणारी पर्यायी नोकरी आता किंवा कालांतराने [म्हणजे किती?] हे ठरवणे भागआहे.

मी आतापर्यंत यासंदर्भात तरी मनमानीच केली; स्वतःच निर्णय घेतले, यावेळीही स्वतःच घ्यायचा आहे, मनमानीच आहे पण माझ्यापेक्षा जास्त ज्यांना कळत, ज्यांच्यावर मी सध्या अवलंबून आहे, किंवा पुढील वाटचाल आहे अशांना विचारून, चर्चा करून घ्यायचा आहे.[ तसाही हा कांही ज्वलंत राष्ट्रीय प्रश्न नाही!]
राहिला प्रश्न मर्यादांचा, क्षमतांचा तर मी स्वतःला कधी आणि कुठे सिद्ध केले? कोणत्या कसोटीवर पारखले? म्हणून लगेच कस लागणार?
एक गोष्ट मात्र निश्चित कि, निर्णय कांहीही असला तरी, प्रतिसाद दारूचा देऊ नये हि प्रामाणिक इच्छा आहे....हि झाली आपली रडकथा! आता थोडा रिलीफ...!
मागे संगीता मॅडम इथे कांही कामासंबंधी बोलल्या होत्या, त्यावेळी तिथे जोशी सरही होते, त्यावेळी मी हसलो, मी का हसलो ते सरांना,मॅडमना कदाचित कळले नसेल! त्याचा आता खुलासा करावा वाटतो....
त्याचं असं आहे, एक दिवस 'सरकारी' काम केलं की माणूस 'सरकारी' होतो! मी तर तब्बल तीन वर्षे केलं आहे! [पुढे जे विधान करणार आहे त्याची सत्यता पटवण्यासाठी इथे तीन सरकारी नोकर आहेत, अप्पा, शंकरराव, राहुल त्यांना विचारा!
तर आमच्या डिक्शनरीत 'नाही' हा शब्द नसतो! काहीही काम सांगा, [करणे अथवा न करणे; शक्यतो करणे आमच्या हातात असते!] आणि शक्यतो करणे शक्य नसले तरीही आम्ही 'नाही' कधीही म्हणणार नाही!
कुणी जर भर टळटळीत उन्हात 'सूर्याचा चंद्र करा' म्हंटले तरी तितक्याच शांतपणे, आत्मविश्वासाने आम्ही "होय" म्हणतो!
तेंव्हा मी 'नाही' म्हणणे ही रिकव्हरी ची पहिली पायरी!

नमस्कार,
साहित्यिक विश्वात रमणार असाल [कारण त्याबद्दल तुमचं ज्ञान आणि शैली उत्तम आहे.] तर या संदर्भात कांही तरी निर्णय घेण्याची गरज आहे.कारण आपण पुढील आयुष्यासाठी कांहीच ठरवले नाही.इथे किंवा घरी राहून कशाचाच त्रास नसू शकतो; परंतु आपल्या वागण्यामुळे ही परिस्थिती कायम टिकू शकत नाही. त्यामुळे यासंदर्भात कांहीतरी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु करा.
संगीता जोशी
मॅडम



No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....