२१-१०-२००९
दिवाळीचे चार दिवस छान गेले. त्याचबरोबर आज पुन्हा १/२ दिवसांपूर्वी एम्पथी य विषयावरच्या आउटपूट विषयी आठवले.कारण आपल्या दिवाळीतल्या कार्यक्रमाला भाऊ आला होता. याआधील, ०८ ची दिवाळी 'मुक्तांगण' मध्ये झाली! त्यामुळे दिवाळीविषयी खास असे आकर्षण वाटत नाही.
महत्वाचा मुद्दा असा कि पुढील काय विचार केलास? असे त्याने विचारले.मी सांगितले, पहिल्यांदा नोकरी आहे, नाही ते पाहीन, नाहीतर bj चा कोर्स करेन. कारण दुसऱ्या कशात मला रस नाही.वास्तविक त्यावेळी मी त्याला दोष द्यायला नको होते, कारण हि bj वगैरे ची पदवी मला आज ९ वर्षाखालीच मिळाली असती, मात्र त्यावेळी मी रीहॅब मध्ये असल्याने परीक्षा देऊ शकलो नाही.त्यावेळी मी थोडाफार बोलण्याच्या देखील मनस्थितीत नव्हतो. विचार करणे दूरच. त्यावरून तीन महिन्यात इथे मी थोडेफार चांगले बोलू शकतो पण भावाशी बोलताना एकदम थोडे फटकळपणे बोलतो, म्हणजे थोड राग अजून आहे हे जाणवते.
बिडीझोनमध्ये कुणी विचारले, त्याच्या जागी तू असतास तर? मी म्हणालो, "तो खरेच चांगला आहे. त्याच्या जागी मी असतो तर, दोन कानफटीत देऊन सांगितले असते, कशाचा आजार नि बिजार? दारू पिऊ नको बास झाले." असो. तर खरे पाहता घरचे लोक वैतागलेले असतात. बंर, असेही नाही, कि कांही खास वैशिष्ट्ये वगैरे माझ्यात आहेत!केवळ रक्ताचे नाते, थोडाफार वाटेकरी म्हणून किंवा रस्त्यावर दारू पिऊन फिरल्याने त्यांची इज्जत जाते म्हणून, दया, सहानुभूती म्हणून ते आम्हाला [मला] अशा केंद्रात दाखल करतात.सुधारण्याची इच्छा वगैरे हा दुय्यम भाग.पण हि पिडा आता आम्हाल नको, निदान तात्पुरती सुटका हाच उद्देश, भावना असते. आणि तसे असण्यात गैर काय?कारण जर थोडे डोळे उघडे ठेऊन मी मागच्या घटना आठवल्या तर खरेच त्यांच्याही सहनशक्तीच्या मर्यादा लक्षात येतात.पण पुन्हा मी नशेत होतो, समजून घ्यावे, मला खरेच कांही आठवत नाही, अशा अनेक सबबी असतात! बर्याचदा त्या खऱ्याही असतील, पण एकाच चूक वारंवार केली तर तो गुन्हा ठरतो, या न्यायाने त्यांचे कांही चुकत नाही हे लक्षात येते.
मी भावाला सांगितले कि किमान पुन्हा प्रमाणपत्रे आणणे वागिरे साठी मी परत गावाकडे जाईन. तेंव्हा त्याने भीती व्यक्त केली कि, तिथे दारू चालू झाली तर? मी म्हणालो, ' मग इतके दिवस इथे राहण्याचा काय फायदा? पुण्यात व्यसनमुक्ती केंद्रे, वैद्यकीय मदत याशिवाय दुसरे कांही नाही तेंव्हा काम कुठेही मिळेल असे म्हणून चालत नाही. केंव्हातरी बाहेर यावेच लागेल, तेव्हा तूच इथे बोल, कारण सध्यातरी दोन महिने कसला विचार करायचा नाहीं असे संगीता मॅडमनी सांगितले आहे.
केवळ तू बोलल्यामुळे मी बोललो."
No comments:
Post a Comment