जमाखर्च स्वातंत्र्याचा मांडणार केंव्हा?
जाब उंच प्रासादांचा मागणार केंव्हा?
धूर्त शोषकांच्या ओठी घोष संस्कृतीचा
चूड इथे या ढोंगाला लागणार केंव्हा?
जाहिरात आई ज्यांची, जाहिरात बाप
आत्मविक्रयाचे झेंडे फाडणार केंव्हा?
विलायती वेषामधली भुंकतात कुत्री
माणसास माणुस येथे मानणार केंव्हा?
घाम ओतुनी जो पिकवी मळे अमृताचे
दिवा झोपडीतून त्याच्या लागणार केंव्हा?
प्राक्तनात अस्पृश्याच्या छळचीच गाथा
आग आंधळ्या धर्माला लावणार केंव्हा?
इथे पडे सत्तेभवती कडे भ्रष्टतेचे
काजळी दिव्याभवतीची झाडणार केंव्हा?
किती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे?
भास हे भ्रमाचे सारे फोडणार केंव्हा?
मंगेश पाडगांवकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment