
मानु अम्ही कि इश्क अमुचा, त्यांनाच आहे समजला
नजरेतला या भाव ज्यांना, न पाहताही समजला
कौशल्यही या अभिनयाचे काय मी सांगू तिच्या
भावही या समजण्याचा वदनावरी नव्हता तिच्या
लपविली होती जरी का प्रणयार्तता मी आमुची
आले तिच्या नजरेस कोठे नजर होती आमुची
शालीनता सांभाळुनीही सम्मानिले आम्हां तिने
निखळत्या पदरास नाही स्पर्शही केला तिने
संमती ज्या कुशलतेने होती तिने आम्हां दिली
कुशलतेने त्याच मी ही जाहीर ना होऊ दिली
नुसतेच ना इष्कास आमुच्या ऐसे तिने सम्मानिले
आमुच्या आपुल्या स्वतःच्या शिलासही सम्मानिले
त्यांशी करावा इश्क,ज्यांनी इष्कातही काही पुढे
ना टाकले, ना टाकू दिले, पाऊलही याच्या पुढे
दोस्तहो दुसऱ्याच क्षणी तो इश्क आम्ही विसरलो
ऐसे जरी ऐसे नव्हे कि एकमेका विसरलो
आग आहे इश्क, उपमा दुसरी काय द्यायची
पेटूनियाही यात नसते राख होऊ द्यायची
भाऊसाहेब पाटणकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment