
रोजचे आरोप येती माझिया दारी
बोलतो मी साफ, हि माझी गुन्हेगारी!
घास मी घेताच त्यांनी ओरडा केला
( काय त्यांच्या ढेकरा होत्या निराहारी? )
हा तुझा आसुडही माझ्या भल्यासाठी
पाठ आभारी तुझी...हे रक्त आभारी!
काळ ओलांडून आलो मी तुझ्यापाशी...
धाडला माझा निकामी देह माघारी
न्याय मागण्यास केला व्यर्थ मी त्रागा
आसवे होती कुठे माझी सदाचारी?
हा असा आजार, कोणी वाचला नाही
औषधेही येथली आहेत आजारी!
सापडाया लागली मोडीतली नाती
मी कसा हिंडू मनाच्या चोरबाजारी?
थांबवा हा वाद, स्वप्नांनो हळू बोला...
(झोपले आहेत माझे सभ्य शेजारी!)
मी जरी आरास माझी मांडली नाही
ऐक तू टाहोच हा माझा अहंकारी!
सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment