Monday, 12 April 2010

डॉ. आंबेडकर


धर्माच्या जातीच्या लिंगाच्या वंशाच्या वर्गाच्या चिलखती खुराड्यांना
मूठभर कल्पिणा-या
झडणा-या बासरीच्या मंद्र पावसात
आत्म्याला रस्ते फोडून विजेरी झाडांना घेरून
ओढल्या गेल्यायत माझ्या दो-या तुझ्या कर्तृत्वाच्या दिशेनं
म्हातारीच्या बुडख्यात खोल खोल लाथ हाणणा-या
उडून जातोय पारा आरशांचा
फाटतोय समुद्र नरकाचा
उंच उंच विखरून नाहीशी होतेय पापग्रस्तांच्या हाडांची भुकटी
मावळतोय सूर्य सैतानांच्या प्रदेशातून
वसंतातून पुराणाची पानं फाडण-या
माझ्या कंठातून अभद्र लोकांची निर्भर्त्सना घडविणा-या
तुझ्या स्वर्गीय झ-यातून मिळतंय पाणी जन्मोजन्मीच्या असृश्य कातडीला
देवाच्या नि माण्साच्या अस्थिरतेला वाव देणा-या
अवदसाच्या नि हडळीच्या मोहमयी मांड्या पोखरणा-या
देवदत्त वा-याचं गंडस्थळ फोडणा-या
मी जिथून सुरुवात करतो त्या तुझ्यापासूनच्या सर्वमान काळाला
बांधणारांनी बांधावे भूतात गोणपाटात
नि द्याव्यात तिला मूर्त अमुर्तासारखी भन्नाट नावे
अशा नावाचं संकेतचिन्ह उंच कपाळावर
रेखाण्यासाठी असतो सरसावलेला आंधळा समुदाय
स्वतःच्याच महात्मेपणाला सुरुंग योजणा-या
मी शोधणार नाही तुला तेजीमंदीच्या अराशीत घडीच्या घड्याळीत
कावळा ते कारखाना मुतारी ते फरासखाना
गंज ते ७ वर्षाच्या मुलाच लखलखत काळीज
या तमाम परिस्थितीतून दोलायमान होणा-या सागा
मी चोखाळतोय स्थित्यंतराच्या लाटा कालखंडाच्या अग्रावरून
नि विचार करतोय तुझ्या ब्राँझच्या पुतळ्यावर शिटणा-या रानवट
नि शहरी पाखरांचा
तसा विचार हा विचार नसतोच मुळी तो अस्तो परिक्रमेला गिळत सुटलेला
बांडगुळ
ज्याच्यापासून व्यक्तिमत्वाचा उगम होतो नि खुंटते दीर्घ आत्मयात्रा
ज्यात ज्योत नसते नि धारदार सुरीही
ज्यात सुसरीच्या पाठीसारखी असते स्त्रैणलिंगी कठीणता नि गेंड्यासारखी
उदासीनता
ज्यात नुस्तीच जगण्याच्या मुलस्त्रोताची बडबड नि चिवट घोरपड
नि किल्ल्याबुरुजांसारखी अव्याहत शरीरं
माझ्या छातीत्ली पोकळी हलवणा-या
विचार मरण धादांत दोन्ही
चिलीम संभोग धादांत दोन्ही
जणू संपूर्ण विवस्त्रतेला विकत घेतलेलं पांघरूण चिंध्यांच्या देवीपासून
विचार-चीरवेदना जिला सदोदित टोकरतो अस्तित्वाचा पोपट
मरण-शिलालेख ज्याला सदोदित भितो विचारवंत
मरण
विचार
चिलीम
संभोग
१ चक्रवर्तिखडा जो काळालाही दाताने चावता येत नाही
तसं पाहिलं तर मलाच माझा चेहरा पाहता येत नाही
ज्याच्याबद्दल
शिसारी वाटावी असा मी त्यांच्या कच्छपी एकुलता प्राणी व्हावा
इतक्या महत्वाच्या दारात तू मला लोटले आहेस
कुल्ल्यात उगवलेलं दयार्द्र मातीचं घुबड नि काळ्याशार रक्ताचा गुलाब
ज्याच्या पिकल्या श्वासातून माझ्या ओकारीला आज्ञा घडतात
नि मला गर्दीतून चालवतात
नि चालतात माझ्याबरोबरीने माण्सासारखी झाडं
नि माझे हात रचतात कल्पांताची बाड
मला अच्छादन घालणारी मिरवणूक जिला नस्त मरणमूळ
जिच्यासाठी माझ्या मनात पेटलेला अग्निकुंड नि हवेवर डोलणारे शुभ्र ससे
जी एकाच कुलाची तेजस्वी धारणा ऋतूंनी योजलेली
मिरवणूक नि मी दोन नव्हतोच कधी
समलिंगची वर्गवारी करत नसतो काळ : कारण त्याचे डोळे नस्तात
सेन्सॉरइतके अधू
तसे असेल तर माझ्या नि मिरवणुकीच्या तळाशी
जो तुझा चेहरा
देवमाशांनी दुखावलाय तो विभिन्न कल्पिलाय काय लोकसभांतून

वेदनेतून यातनेतून दृश्यमान होणा-या
डोक्यावर भक्ष्य शोधीत हिंडतोय लष्करी विमानांचा घोगरा आवाज
नि मार्शललॉची इंगिते
पुसटताहेत नकाशावरून रेषा नि रेषांचे जाळे
नि आणीबाणीतून माझा अट्टाहास निघालाय अधिष्टानासाठी
अश्वमेधी इच्छा घेऊन
सोबत डाळिंबी अरण्यातून तटस्थ समाज : तो उखडला नाही तर
धोंड येईल तुझ्यात नि माझ्यात नि दिसणार नाही
कमळांनी वेढलेल्या स्फटिकात तुझं तेजोबिंब सर्वजड वस्तूंना नकार देणारं
नि माझ्याशी एकरूप असलेलं भाजलेल्या भाकरीसारखं खरपूस नि कसदार
एखादी मिल एखादी झोपडी
एखादा दमेकरी एखादा सैनिक
दीर्घ वसाहतीमधून दिवस जातात बाळपणीच्या अंगणात
खेळतात तांबूस झिप-या कुत-याच्या पिलांबरोबर
आणि हुंगतात कैयापूर्वीचा मोहोर
नि पकडून ठार करतात भेडसावणा-या प्रतीसावल्या
हरणासारख्या बागडण-या खवल्यासारखा चमकणा-या कळपकळपांनी
मला भीती वाटते मी सण्कत चाललोय त्याची
तू गेल्याच्या तब्बल १५ वर्षानंतर
तुझ्या एका साथीला मृत्युच्या धुळीनं भरवलं
नि ७१ वर्षाच्या लांबीवर थडगवलं
नि तुझ्या वेळेला पसरलेल्या अवकळेची पुनरावृत्ती झाली
तुझ्या बाबतीत वापरलेल्या हेडलाईन्स
वर्तमानपत्रांनी त्याच्याही बाबतीत वापरल्या
'दलितांचा कैवारी गेला
दलित समाजात खोल दरी निर्माण झाली'
चळवळीतल्या हरेक नेत्याचे अंगरखे सारखे असतात काय?
नि त्यांच्या संबधातील शाई नि अक्षरं नि चपला नि पावलं
ज्याच्या हातून कधीच घडत नाही प्रमाद अगोदरच्याची पावलं सोडून
मागं किंवा पुढं जाण्याचा
अशाच्यात नस्ते गतीचं इंधन जे बसवलेलं अस्त जन्मजात शरीरात
नि धम्मक अगोदरच्याच्या उपस्थितीत स्वतःच कफन
नि गुंततो सनदी सवलतींच्या बाहुपाशात आवर्जून
नि बसतो घोड्यांवर निपुत्रिक खुर्चीसाठी
जो बदलत नाही रात्र आणि दिवसाची चव किंवा जीभ किंवा
जीभेवरली लाळ किंवा लाळेतल पाणी
जो हरवतो मातीतली जीवंतता नि निर्मितो गटबाजीचे
काळेगोरे राक्षस
अशांसाठी मी डोळे सोडून रडत नाही हृदयानी
नि अंगातलं तेल काढून पेटवत नाही मेणबत्त्या
नि जात नाही काळे कपडे घालून त्यांच्या जाहीर शोकसभेला

लोकांनी दिलेल्या सिंहासनावर विराजमान होणा-या
उद्रेक नि शोकातून मला फक्त तुझाच वास येतो
नि सुटतो माझ्यातील मालवलेल्या बुबुळांना नि अपंगांना कंड
तू दिलेल्या संघर्षशील शिकवणुकीतून मी देतो मुलभूत श्रद्धांना वचनांना
आव्हान
नि खोदतो स्वतःला दु:खदैन्यातून अंतिम कणापर्यंत
नि मारतो स्वतःच्याही काळजात पाजळलेल्या कुदळी
नि भिजवतो तुझ्या आयुष्याची पानं उष्ण रक्तानी
नि जागवतो माझ्यातली एकमात्र सच्चाई
नि वावरतो बंदुकांच्या फैरीतून तोफांच्या फेकीतून रणगाड्यांच्या धुमश्चक्रीतून
नि गव्हाच्या हिरव्याकंच पात्यांतून
तसा सुईच्या अग्रापासून जुळलेला असतो जिव्हाळा प्रेमाशी नि हिरव्या
रंगाशी
नि चपटीतून थरथरणा-या वळूच्या शक्तीशी
नव-याला पडलेली स्वप्नं बायकोला पडतात बायकोला पडलेली स्वप्नं
पोराला नि बांधली जाते साखळी उद्याच्या सुखरूप परिस्थितीची
तसा प्रत्येकजण असतो पूर्ण सूर्य
जो राखतो निगा निवडूंगासकट सगळ्यांची
नि पाकळ्यांवर सांडलेले दव जो वापरतो
निरंतर पीडेच्या अहितासाठी
जायला कळतो जनावर नि माणूस यातला फरक
जो उब्तो दिवसरात्रीच्या त्याच त्याच पणाला
जो मारतो छलांग सर्वांवरून
ज्याला जन्ममृत्युचा रंग वाटतो मोसंबीचा नि कुचकामी
ज्याची चोच बनते पितळी नि टोचते लूत वर्षांवरली
जो वाहतो जयजयकाराच्या नद्यांतून बारमाही
नि हलताना दिसतो फुलाच्या स्मितातून
जो नाकारतो रयतेची चाकरी नि येसकरपणाची भाकरी
जो आणतो जनशक्तीच्या किमयेला गाज
जो केकीच्या नि रमच्या चिखलात रुजत नाही
जो पायपुसन्यावर बसत नाही
जो नूतन वर्षाच्या फुलपाखरासारखा उडतो नि प्रकाश पसरवतो
जो रूळांबरोबर वाढत जातो
जो युनिव्हर्सिट्याचे चिरेबंद ढिले करतो
जो स्वतंत्रतेकडून स्वतंत्रकडे जातो
असा तू एकुलता एक आमच्या रथाचा सारथी
जो दिग्विजयी तंद्रेतून आमच्यात उतरतो
नि शेतातून गर्दीतून नि मोर्च्यातून नि लढ्यातून
आमच्याबरोबर असतो
नि आम्हाला शोषणातून सोडवतो
तोच तू
तोच तू आमचा



नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी





No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....