० ५ ०
पहिल्या वेळी हिरेमठांबरोबर पुढे जगदलपूरपर्यंत जावून आलो. पण सर्व गाठीभेटी होत्या त्या संबंधित अधिका-यांच्या. फोरेस्ट-अधिकारी, सध्याचे कलेक्टर परवीर कृष्ण, विभागीय कमिशनर खात्री, असे अनेक. लोकायुक्त-कमिटी येऊन गेली होती. त्यांचा अंतरीम अहवाल आला होता. त्यात नायडूंच्या पत्रातल्या प्रकरणाना जवळपास पुष्टीच मिळत होती. पुढे काय होणार, सी.बी.आय. कडे तपास सोपवला जाणार काय, अशी चर्चा चाले. हिरेमठ म्हणजे अफाट कार्यशक्तीचे कार्यकर्ते.. त्यांची कामाची शैली पाहण्याजोगी होती. कुणीही भेटले, ओळख झाली, अगदी ट्रेनमध्ये असो कि ऑफिसात, की "भाईसाब, आपका नाम? पता? टेलिफोन? रेसिडेंस का? " अशी चौकशी करून डायरीत लिहून ठेवत. कितीदा मी म्हणायचो, "आता रेल्वेतल्या त्या माणसाचा तुम्हाला काय काय उपयोग आहे?" ते म्हणाले, "होतो कधीतरी" त्यांचे हे नेट्वर्किंग पाहून चकित व्हायचो. आम्ही बस्तरमध्ये एका गावी असलो, की पुढच्या गावाला त्यांची फोनाफोनी सुरु होत असे. ओळखीच्या फाॅरेस्ट किंवा अन्य अधिका-याला विनंती करून डाकबंगल्यात खोली मिळवायची. तिथल्या अनेकांच्या अपॉईटमेंट फिक्स करायच्या. वाहन लागत असल्यास तेही कुठून मिळवायचे. त्यामुळे त्या गावात जाण्याआधी तिथला प्रोग्राम एकदम सुरळीत व्हायचा. हे करताना धारवाडला, ओरिसाला, दिल्लीला फोन करून महिना दोन महिने नंतरच्या कुठल्या मिटींगा कुठे घ्यायच्या, कधी घ्यायच्या, कोणाला बोलवायचे, हे पक्के करत. मग त्या त्या लोकांना फोन. ते 'जनविकास आंदोलन' नावाच्या अखिल भारतीय फोरमचेही काम करत. रिक्षात बसले आणि ती सुरु झाली की रिक्षावाल्याला म्हणत, "भाई, रस्तेमे एक फोन करना है" ते एकदा एस.टी.डी. बूथमध्ये शिरले की आम्ही बाहेर कंटाळून जात असू. परत आल्यावर आमची माफी मागत आणि रिक्षा चालू होई. त्यांना झेरॉक्सचेही खूप आकर्षण. त्यांनी 'आतून' मिळवलेली सरकारी पत्रे, कमिट्यांचे रिपोर्ट असे काय काय ते नेहमी झेरॉक्सला टाकत. जाताना टाकायचे, येताना कलेक्ट करायचे. कुठल्याही अधिका-याशी बोलताना ते लगेच पिशवीतून संबंधित कागद पुढे करत. तो माणूसही या कार्यक्षमतेपुढे चकित होत असे. मी त्यांना म्हटले, "गांधीजींचा जसा चरखा, तसं तुमचं एस.टी.डी.बूथ आणि झेरॉक्स मशीन हे सिम्बॉल आहे." या दोन साधनांचा त्यांनी चळवळीसाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे; पण या सगळ्या गाठीभेटीतून मी लोकांपर्यंत जाऊ शकत नव्हतो. हिरेमठांची वावटळ पाहता 'मला खेड्यात जायचंय' असे म्हणूही शकत नव्हतो. म्हणून जसे जाईल तसे जाउद्या. हे नंतर बघू.असे म्हणून तो प्रवास पूर्ण केला.
पुढच्या वेळी मात्र मी आणि मधुकर देशपांडे निघालो. ते हिरेमठांच्या अगदी दुस-या टोकाचे. शांत, सौम्य, कमी पण छान बोलणारे. आम्ही नागपूरपासूनच "ट्रॅक्स' ठरवली. [खर्च अर्थात मधूकरांचा!] आणि बस्तरभर फिरलो. कांकेरमध्ये गेलो तेंव्हा रत्नेश्वर नसणार होता; पण त्याने शिवराणींवर सोपवले होते. शिवराणींनी शिवचरण नेताम नावाच्या तरून कार्यकर्त्यास बरोबर दिले. काळा तुकतुकीत रंग, उंच, शिडशिडीत. दाढी राखलेली. सुशिक्षित कार्यकर्ता. याच्या अनेक गावात ओळखी. याला वेगवेगळ्या आदिवासी बोलीही येतात, त्यामुळे अगदी योग्य माणूस.
कांकेरच्याच जवळ भानप्रतापपूर रस्त्यावर डोंगरकट्टा गाव आहे. जाताना रस्त्यावर 'माकडी धाबा' असा मोठा धाबा होता. मी विचारले, "इथं आल्यापासून 'माकडी' हे नाव बघतोय : माकडी ग्राम, माकडी धाबा. हे कसलं नाव आहे?
"ते आमच्या देवीचं नाव आहे. माकडी दंतेश्वरी ही या भागातील सगळ्या आदिवासींची देवी आहे."
जसे डोंगर दगडगोट्यांचे, तसे ते गोटे शेतामध्ये, रस्त्याच्या कडेला आलेलेही दिसत. आपण जसे इकडे रस्त्याच्या कडेने झाडांना पांढरा-तांबड्या रंगाचे पट्टे मारतो तसे तिकडे वाहनांना लक्षात यावे म्हणून त्या दगडांवर आडवे पट्टे ओढलेले. त्या दहा-वीस फूट उंचीच्या प्रचंड गोटयांवरच्या त्या रेघा पाहून शंकरांच्या पिंडीना भस्म लावल्यासारखे वाटे. काही ठिकाणी दगड फोडून लोक त्यांचे आठ-नऊ इंच लांबी -रुंदीचे ठोकळे बनवताना दिसत.
अशाच दगडगोट्यातून गेलेल्या रस्त्यातून डोंगरकट्टा गावात गेलो. पंचवीस-तीस घरांचे गाव असेल. शिवचरणला पाहून काही लोक थांबले. त्यावेळी वस्तीत असलेल्या पाच-दहा लोकांना जमवले. चट्टेरीपट्टेरी शर्ट, खाली गुडघ्यापर्यंत लुंगी घातलेला एक तरून मुलगा सरपंच होता. आम्ही सर्व जण कोरेने घेतलेल्या जागेकडे निघालो. शेतावरच्या बांधातून गावाच्या थोडे दूर गेलो. एका बाजूला चांगले जंगल असलेला भाग आणि त्याच्यासमोर हा विस्तृत साडेनऊ एकरांचा जमिनीचा प्लॉट होता. त्या जागेतून फिरू लागलो. मोठमोठी झाडे जमिनीपासून वीत-दोन वीत अंतरावर कापलेली होती. असे खुंट जागोजाग दिसत होते. शेजारचे जंगल पाहताना वाटले, एके काळी इथे असेच असणार. हे मोठे मोठे वृक्ष फांद्या पसरून उभे असणार. त्यांच्या खाली छोटी झाडे, त्याखाली झुडुपे, अशी छान 'इको सिस्टीम' असणार. आता सर्व काही उजाड झाले होते.
काही खुंट पूर्णपणे मृत झालेले. काहींमधून करंगळीच्या जाडीचे छोटे कोंब आलेले. हे जगलेच तर मूळ झाड व्हायला किती वर्षे लागणार? पन्नास...शंभर? तेही आसपास जंगल नसताना? त्या खुंटांचा परीघ पाच-पाच, आठ-आठ फूट असावा. झाड खालच्या बाजूला रुंद होते म्हटले तरी पाच-सहा फूट व्यासाची तरी झाडे असणार. या राधेलाल कोरेला उभे जंगल पाहून ते तसेच राहावे, असे का वाटले नसावे? बहुदा एकेका झाडाच्या जागी त्याला लाख लाख रुपये दिसले असणार. या कागदी नोटांच्या मोहात त्याने शेकडो-हजारो वर्षांचे निसर्गाचे आश्चर्य काही क्षणात पुसून टाकले होते.
या झाडांच्या कबरस्तानातून बराच वेळ फिरत होतो. ज्यांच्यावर या संपत्तीचे रक्षण करायला सोपवलेले, अशा सर्कल-इन्स्पेक्टरचे हे कृत्य होते. नकाशात खाडाखोड करण्याइतपत तो निर्ढावलेला होता. तरूण सरपंच आम्हाला हिंडून सर्व दाखवत होता.
गावात परत आलो. एका घराच्या आवारात इतर लोक आमची वाट बघत बसले होते. आवाजावरून आत छोटी शाळा असावी. आत डोकावले. पाच-सात छोट्या मुलांना एक बाई शिकवत होत्या. त्याही आदिवासी चेह-याच्या. जमीन पोपडे निघालेली.मागच्या खिडकीतून प्रकाश झिरपत असलेला. ती मुले उभी होती. बाईही उभ्या. बाई मोकळेपणाने हालचाली करून, थोडेसे नाचून शिकवत होत्या. मुले बाई करतील तसे करत होती.
तीन तीन तीन
आटो के चक्के तीन
असे म्हणताना हाताने टायरच्या गोल आकारासारख्या हात फिरवत बाई दोन पावले पुढे येऊन उडी मारून थांबत होत्या.
चार चार चार
घोडे के पाँव चारगावात परत आलो. एका घराच्या आवारात इतर लोक आमची वाट बघत बसले होते. आवाजावरून आत छोटी शाळा असावी. आत डोकावले. पाच-सात छोट्या मुलांना एक बाई शिकवत होत्या. त्याही आदिवासी चेह-याच्या. जमीन पोपडे निघालेली.मागच्या खिडकीतून प्रकाश झिरपत असलेला. ती मुले उभी होती. बाईही उभ्या. बाई मोकळेपणाने हालचाली करून, थोडेसे नाचून शिकवत होत्या. मुले बाई करतील तसे करत होती.
तीन तीन तीन
आटो के चक्के तीन
असे म्हणताना हाताने टायरच्या गोल आकारासारख्या हात फिरवत बाई दोन पावले पुढे येऊन उडी मारून थांबत होत्या.
चार चार चार
असे म्हणताना दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून, तो गुडघा वाकवून, पुढे उड्या मारत जायच्या. मुलेही त्यांच्यासारखे करायची.
पाँच पाँच पाँच
म्हणून असे दोन्ही हातांची बोटे पसरून, बाईंनी मोरासारखे डोलून दाखवले.
त्या पोरांचे मळके कपडे, हातपाय पाहून वाटले, कि, हे खरे भारताचे भाग्यविधाते. कारण शहरातील उच्चभ्रूंची मुले आता अमेरिकेची भाग्यविधाती झाली आहेत! मी त्यांना काही गमती करून दाखवल्या, हे ओघाने आलेच.
बाहेर येऊन बसलो.
शिवचरणने एका म्हाता-याला सांगितले, "त्यावेळी काय काय झालं ते सांगा साहेबाना."
ते सांगू लागले, "ती जंगलची जमीन. आम्ही कधी तिथली काटकी तोडली नाही. फोरेस्टचा गार्ड येईल अंगावर, अशी भीती होती. त्या कोरेनं वस्तीतील बन्सीलाल नावाच्या हरिजनाची जमीन घेतली, हेही आम्हाला माहित नाही. नंतर कळलं. पण एक दिवशी सकाळी ट्रॅकर-ट्रकमधून मानसं आली, मोठमोठी झाडं आडवी करून टाकायला लागली ट्रकमध्ये, ट्रॅलीत माल हलवायला लागली, तसं आम्ही घाबरलो. आम्ही जाऊन त्यांना थांबवलं."
आम्ही जगदलपूरकडे जाणा-या रस्त्याला लागलो. वाटेत एक घाट लागतो. तिथले जंगल सोडले, तर फारसे कुठे जंगल दिसलेच नाही. दोन्ही बाजूना नजर पोचेपर्यंत शेतजमीन आणि त्यात असलेली तुरळक झाडे. घाटात व आसपास असलेल्या जंगलावरूनच फक्त पूर्वी इकडे कसे जंगल असेल याची कल्पना येते. इकडे खांबासारखा सरळ उभा वाढणारा साल वृक्ष ही झाडामधील प्रभावी जात दिसत होती. त्याला इकडे लोक 'सराई' म्हणतात. कांकेरला शिवराणी सांगत होत्या, "तुम्ही दक्षिणेपलीकडे जाल तसं इथल्यापेक्षा कडक थंडी लागेल. कारण तिथं सराईची जंगलं आहेत. त्यात पाणी खूप असतं." पण थंडीत वाढ व्हावी एवढी जंगलंच राहिली नाहीत ही गोष्ट वेगळी. मध्य प्रदेशातल्याच मंडला भागात साल वृक्षांची प्रचंड मोठी जंगलं आहेत. तिथे 'साल बोअरर' नावाचा किडा निघाला म्हणून लाखो वृक्ष तोडली गेली, असे ऐकले होते.
इकडे आल्यापासून वृक्षतोडीचे आकडे ऐकताना गरगरायला होत होते. मागे हिरेमठ सांगत होते, "झूलना-तेंदू नावाच्या गावी एका इलेक्ट्रिकल गुत्तेदाराने तिथल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या लायनी टाकण्याच्या खांबासाठी आठशे एक्केचाळीस झाडं कापली. तीही सुप्रीम कोर्टानं सर्व त-हेच्या जंगलतोडीवर स्टे आणल्यानंतर. रत्नेश्वरनाथच्या कानावर हे येताच तो फोरेस्ट अधिका-याला भेटला. त्यानं त्याला कुठल्या जातीची किती झाडं पाडली, याचा अधिकृत कागदच [अनधिकृतपणे] हातात ठेवला. तो हाती मिळताच रत्नेश्वरने प्रेस-कॉनफरन्स घेतली; पण त्याचा एक शब्दही पेपरवाल्यांनी छापला नाही. हा कागद हिरेमठाना मिळताच ते रेव्हेन्यू सेक्रेटरीला भेटले. त्यांना पत्र दिले.लोकायुक्तांचे ओ.पी.दुबे म्हणून सेक्रेटरी होते, त्यांना पत्र दिले. सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलून आठशे झाडांची तोड होते, याचा अर्थ काय? या कलेक्टरला जिल्ह्यात काय चालतं, याची माहिती नाही? ते आपले भिंतीवर साक्षरतेच्या पाट्या रंगवत बसलेत. कमिट्यांच्या मिटींगा घेत बसलेत? हे सगळं भोपाळच्या इंग्लिश वर्तमानपत्रात आलं. बस्तरचे कलेक्टर परवीर कृष्ण आणि हिरेमठ यांचं बिनसलं होतंच. मागच्या वेळी मी गेलो तेंव्हातर वाकयुद्धच जुंपलं. मी या युद्धातला अम्पायर म्हणून काम केलं. ती झाडं गेली याचं त्या कलेक्टरला काही दु:ख नव्हतं. आपण कसे त्याला जबाबदार नाही, हे जोरजोरात पटवायचा प्रयत्न ते करत होते."
पुढचे आमचे गाव होते बिंजोली. हे नायडूंच्या पत्रातले नव्हते. हिरेमठांनी आणखी कांही प्रकरणांची भर घालून लोकायुक्त चौकशीत घालायला लावली होती. बस्तरच्या नकाशात कांकेरवरून खाली जगदलपूरकडे जाणा-या रस्त्यावर कोंड्गाव नावाचे मोठे गाव आहे. तिथून पूर्वेकडे ओरिसा बॉर्डरकडे जाणा-या रस्त्याला लागलो. दुपारची उन्हे कलली होती. आणि हळूहळू मोठी झाडे दिसू लागली. मधून मधून शेताचे पट्टे लागत; पण नंतर परत जंगलाचा भाग सुरु होई. इतका वेळ बस्तरमध्ये आल्यापासून जंगल असे जाणवलेच नव्हते. मोठी झाडे होती; पण ती विरळ होती. ती हळूहळू दाट होत चालली. अशा अनेक झाडांच्या सावलीतल्या एका छोट्या गावात पोचलो.
तिन्हीकडून एकमजली कौलारू घरे आणि मध्ये छोटे आवार असलेली जागा होती. तिथल्या खाटेवर आम्हाला बसवले. सगळे ओट्याओट्याने खाली बसले. ओरिसात एक महाराज आहेत. त्यांचे इथे कांही शिष्य आहेत. त्यांनी भगव्या रंगात बुचकळलेले विरविरीत कपडे घातले होता. समोरच्या बाजूला कांडण चालले होते. एक बाई तांदळाची साळ कांडत होती. पण हि पद्धत मी प्रथमच पाहत होतो. एक आडवे मोठ्ठे लाकूड. त्याला मध्याच्या एका बाजूला मध्ये लाकडी फ्रेम बसवलेली. मध्ये लोखंडी एक्सल होता. ती बाई आखूड भागावर पाय देऊन उभी राहिली, की लाकडाचा तांबडा भाग वर येत असे. त्याला खाली लोखंडी छोटे मुसळ. या बाजूवरचा पाय काढून घेतला की ती बाजू खाली यायची आणि मुसळ जमिनीतल्या उखळावर आदळायचे. तिथे भाताच्या साळीचा ढीग होता. दुसरी बाई त्या उखळाच्या दिशेने ती साळ सरकवत होती. वरून येणारी कांब तिला लागेल का, अशी भीती वाटून जात होती.समोरच्या ओट्यावर पूर्ण नागडे, धुळीने भरलेले मूल येऊन बसले. त्याने हातात मात्र प्लास्टिकचे मोठे घड्याळ घातले होते. मी या भारताच्या सुपुत्राचा फोटो काढला तेंव्हा इतरांना गंमत वाटली. शिवचरणने आमचे येण्याचे कारण सांगितले. ज्याच्या जमिनीचे प्रकरण होते तो त्या गावाचा पाटील होता. त्याला बोलावणे पाठवले; पण खूप वेळ झाला, कुणी दोनदा बोलावून आले, तरी तो येईना. मग दुस-याच म्हाता-याने हकीकत सांगितली.
त्या पाटलाकडे ध्रुव नावाचे तहसीलदार यायचे. त्यांची त्याला सरबराई करावी लागायची. एके दिवशी त्याने पाटलाच्या जमिनीतली झाडे बघितली, तसे त्याच्या तोंडाला पाणी सुटले. प्रेमलाल जैन हे व्यापारी त्याच्याबरोबर येऊ लागले. बृहस्पती हा त्यांचा दोस्त. या पाटलाला ते जमीन विकत मागू लागले. पाटील तयार होईना; पण तहसिलदारापासून सगळ्यांनी दबाव आणला: "आपकी जमीन नाही लुंगा, सिर्फ पेड चाहिये." नुसती झाडे तोडता येत नाहीत म्हणून जमीन घ्यावीच लागते. म्हणून पंचवीस हजार रुपये दिले आणि बृहस्पतीच्या नावे जमीन लिहून घेतली."किती झाडे असतील?"
म्हाता-याने सांगितले, "एकशे पंचाहत्तर सागवानाची झाडं."
मनात म्हटलं, म्हातारा शिकलेला दिसतोय.
"त्यांचा घेर किती होता?"
त्याने हाताने दाखवले. तीन-चार फूट व्यासाची असावीत. ती झाडे 'गर्डल' केली. ['गर्डल करणे' हा शब्दप्रयोग अशिक्षित आदिवासीपर्यंतही गेलाय. जे झाड पडायचे ते आधी मारून टाकतात. त्याला तळात कु-हाडीने खाचा घेतात. सहा महिन्यात ते पूर्णपणे वाळले की मग ते कापतात.]
त्या भागातले एक झाड म्हणजे लाख रुपयांचे असते. म्हणजे या झाडांचे १७५ लाख आले असणार. बाप रे! अगदी निम्मे आले तरी पन्नास-साठ लाखांची लूट झाली. मालकाची फक्त २५ हजारांवर बोळवण! नंतर हि फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर 'बृहस्पती हा आदिवासी नाही. हा जमिनीचा व्यवहार रद्द व्हावा' असा कोर्टात दावा लावल्यानंतर बृहस्पतीने आपण आदिवासी असल्याचे {यांच्या मते बोगस} सर्टीफिकीट दाखल केले आहे.
शहरात जर एखादा १ कोटी ७५ लाखांचा दरोडा पडला तर केवढा गाजावाजा होईल! पोलीस-यंत्रणा राबेल. आज ना उद्या टोळी उघडकीला येईल. इथे एवढा दरोडा राजरोस, तहसिलदाराच्या मध्यस्थीने घातला जातो, तरी मालकाला कुठे तक्रार करता येत नाही. आणि असे दरोडे तर बस्तरभर चालू आहेत.
शेवटपर्यंत तो पाटील पुढंच आला नाही. त्याच्यावर त्या लोकांचे खूप दडपण आले असणार. एवढे घडूनही समोर येऊन तक्रार सांगायची हिंमत नाही. काय परिस्थिती आहे!
परत जायला निघालो.
थंडीला सुरुवात झाली होती. गाडीच्या जवळ अनेक छोटी उघडी मुले जमली होती. मोटारीचे अप्रूप होते. समोर एक हापसा होता. एक आदिवासी स्त्री हापशावर पाण्याला उभी होती. तिची छोटी मुलगी हौसेने दांड्यावर सर्वांगाचे वजन घालून पाणी काढायचा प्रयत्न करत होती. आई कौतुकाने तिला ते करू देत होती.
गाडीने वळण घेतले तसे आम्ही एका जागी थबकलोच. एका प्लॉटमध्ये अशा गर्डल केलेल्या झाडांची फौजच उभी होती. ती झाडे उंच होती. घेर तीनचार फुटांचा असेल. त्यांच्या पायाला एका बाजूने खाचा पाडलेल्या होत्या. त्या झाडांची साले, पाने कधीच गळून गेली होती. आतला उघडा पडलेला भाग पांढरट निस्तेज रंगाचा दिसत होता. मागे चीनमध्ये मृत सैनिकांचे पुतळे सापडले. त्यांचे फोटो पाहिले होते. त्यासारखेच हे वाटले. हे कोणी केले कळायला मार्ग नाही. निसर्गाने झाडांना प्रतिकार करण्याचे काही तरी अस्त्र पुरवायला हवे होते, असे वाटले.
परत कोंडागावाला आलो.
आता हायवेने पुढे जगदलपुरला.
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment