Thursday, 1 April 2010
बस्तरचे अरण्यरुदन: अनिल अवचट :७
० ७ ०
आमच्या प्रवासाची 'आखरी कडी' होती बडेगुड्राचा प्रवास. लुनिया, नेताम कुटुंबीय यांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष सहभाग होता. लुनियासारखे अनेक व्यापारी आहेत; पण या प्रकरणात लुनिया प्रकाशात आले. त्यांची या व्यापाराव्यातिरिक्त सिमेंट फॅक्टरी आहे,सिनेमा -थियेटर आहे.{ग्रॅनाईट खाणही असावी.} या बडेगुड्राच्या जमिनीचा व्यवहार अरविंद नेतामांचे भाऊ वीरेंद्र नेताम आणि तिथले आदिवासी यांच्यात झाला. २६ लाखांच्या या व्यवहाराचा स्टॅम्पपेपर लुनियानी आणल्याचे त्यावर नमूद आहेच. चार कोटी रुपये ज्यांची किंमत येईल अशी साडेआठशे झाडे त्या जमिनीवर होती. हिरमा आणि इतर अठ्ठावीस आदिवासी यांच्या जमिनीचा हा व्यवहार होता. वीरेंद्र नेतामांच्या जोडीला आणखी पाचजण होते.-'नाम के वास्ते', ही जमीन घेऊन ती 'कोरे' -पद्धतीने बडे झाडके जंगलमध्ये दाखवली होती. या आदिवासींना सव्वीस लाख रुपये दिले गेल्याचे दाखवले होते. त्यांचे त्यांनी काय केले असेल, ते त्यांना दिले तरी गेले होते का? हे प्रश्न मनाला येत होते. हे गाव खूप आतल्या भागात. जगदलपुरनंतर पश्चिमेला गेल्यावर दांतेवाडा हे मोठे गाव लागते. तिथे
माँ दंतेश्वरीचे मोठे देऊळही आहे. तिथून दक्षिणेला आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरकडे हे बडेगुड्रा गाव आहे. तिकडे फिरताना जपून जा अशा सूचना आम्हाला जगदलपुरमधेच मिळत होत्या. आम्ही इथे फिरतोय हे एव्हाना लोकांच्या कानावर गेले असणारच. ते आता सावध झालेले होते. सी.बी.आय.नेही चौकशी सुरु केल्यानं त्यांच्यावर आधीच दडपण आलेले होते. या सगळ्या, आपल्याला पूर्ण अनोळखी भागात आपली जीप कुणी अडवली तर आपण काय करणार? पण जाणेतर भाग होतेच.
रात्री दंतेवाड्यात मुक्काम केला. स्वतंत्र जिल्हा होऊनही ते छोटे गाव होते. डाकबंगला असल्याने सोय झाली; पण तिथल्या हॉटेलचे जेवण गिळवत नव्हते. एका दुकानाचे उद्घाटन असल्यामुळे काही बायका जमून 'ॐ नम: शिवाय' असे एकच एक वाक्य लाउडस्पीकरवरून करुणपणे रात्रभर ओरडत होत्या. जंगलातल्या या गावातल्या त्या आवाजाने वर शंकरालासुद्धा झोप आली नसणार. सकाळी साडेपाचलाच निघालो. सकाळच्या कोवळ्या-पिवळ्या उन्हात जंगल छान चमकत होते. रस्ता वळणावळणाने जात होता. जंगल कधी शेती, त्यात छोट्या वस्त्या असे लागत होते. शेवटी एका वस्तीपाशी आलो.
'बडेगुद्रा' मधला 'बडे' हा शब्द कशाला उद्देशून असावा? कदाचित इथे एके काळी असलेल्या जंगलाला?
'हिरमा' नावाच्या माणसाची चौकशी करत शिवचरण फिरत होता. थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी होती. जीप बघायला जमलेली मुलं पूर्ण उघडी. खांद्यावर कुदळ घेऊन कामाला निघालेले आदिवासी पहिले. कंबरेला छोटा टॉवेल गुंडाळलेला. तोही मागून फाटका. आम्ही थोडे पुढे होऊन त्यांच्या वस्तीजवळ येऊन उभे राहिलो. सगळी वस्ती आम्हाला पाहायला जमलेली. घरांची कुंपणे वेलींच्या नागमोडी, ओव्हरलॅपिंग' डिझाईनने छान बनवलेली. वरच्या झाडावर खाली फुगत गेलेले हिरवे भोपळे लटकले होते. एक जण असाच हिरवा भोपळा आतून पोकळ करत होता. शिवचरणचा थोरला भाऊ इथे पूर्वी ग्रामसेवक असल्याने तो या हिरमाला ओळखत होता. तो त्याला घेऊन आला. लहानखुर्या दिसणाऱ्या चाळीशीच्या हिरमाला शहरातल्या कुणीतरी दिलेला, 'रफ अँड टफ' ही अक्षरे छापलेला, जुना टी शर्ट त्याने घातला होता. त्याने घराच्या अंगणात नेले. बसवले.
तो काही बोलायलाच तयार होईना. शिवचरणशी त्यांच्या भाषेत बोलू लागला. नंतर बाहेर पडल्यावर शिवचरणने सांगितले, की त्यांच्यावर फार दडपण आलेय. कुणी विचारायला आले तर काही सांगायचे नाही. हा शाळेत झाडझूड आणि पाणी भरून ठेवायचे काम करतो. याला महिना सहाशे रुपये मिळतात. मागे हे प्रकरण निघाल्यावर याने खरे ते सांगितले. त्यावर त्या लोकांनी त्याला शाळेतून काढून टाकले. त्याची उपासमार व्हायला लागली, तेंव्हा परत जाऊन हा पाया पडला. मग त्यांनी सांगितले, की याबद्दल एक शब्दही कुठे बोलायचा नाही. तर परत घेतो. मग याने तसे कबूल केले. म्हणून तो बोलायला तयार नव्हता. पण केवळ शिवचरणच्या भावाकडेही त्याने पाणी भरायचे काम केल्याने एवढे बोलू शकला. नंतर तिथल्या दडपणाबद्दल आम्हाला शिवराणीनीही सांगितले. हे प्रकरण निघाले तेंव्हा त्या इथे जवळच्या गावी त्यांच्या ओळखीच्या बाईकडे येऊन राहिल्या. त्या बाईने त्यांना खूप मदतही केली. पण लोकायुक्त-कमिटी आली. लोकांनी हिम्मत धरावी, नीट साक्षी द्याव्या म्हणून या गेल्या तर. तर त्या बाईंनी सांगितले, की घराची पायरी चढू नका. या म्हणाल्या, "ठीक आहे. पण पाणी तर द्याल?" यावर ती बाई म्हणाली, " पाणी पण मागू नका आणि त्याचं कारणही विचारू नका." शिवराणी सांगत होत्या, "आदिवासी गावात जेंव्हा पाणी मागूनही मिळत नाही, तेंव्हा त्या लोकांनी केवढं दडपण आणलं असेल!" मला हिरमाचे ऐकताना स्वरांवरून, हावभावांवरून अर्थ कळत होताच. एके काळी जंगलचा राजा असलेल्या त्या 'रफ अँड टफ' आदिवासी माणसाचे गुलामात झालेले रुपांतर मी बघत होतो. त्याच्या पाठीमागे उभी असलेली हजारो वर्षांची समृद्ध आदिवासी संस्कृती, तिच्यातली जान कुठे गेली? त्यांच्यातल्याच काही आदिवासींना आमच्या संस्कृतीने स्पर्श केला आणि आम्ही त्यांना बाटवले, पुढारी बनवले आणि दुसऱ्यांचे शोषण करायला, एवढा भव्य निसर्ग ओरबाडायला शिकवले?
एवढे सव्वीस लाख रुपये मिळालेल्या लक्षाधीश लोकांची घरे तरी बघावीत म्हणून उठलो. पुण्यातल्या झोपड्यामध्ये कितीतरी वस्तू बघण्याची सवय. इथे काहीच नव्हते. घरची माणसे हिवाळ्यातही उघडी. एका झोपडीमध्ये काळ्या रंगाची, पांढरे केस पिंजारलेली, वृद्ध स्त्री चुलीवरच्या मोठ्या मडक्यात काही भाजत होती. काठीनेच आतले काय ते हलवत होती. दोन-चार अल्युमिनियमचे टोप आणि दोन-चार मडकी, एवढीच तिची गृहसजावट. घर पाहून बाहेर आल्यावर मी मागे वळून पहिले. ती दारात येऊन उभी राहिली. एक निस्तेज, भकास चेहरा.
उषा पागे कधी भेटली की म्हणते, "अनिल, तू परत कधी बस्तरला जाणार आहेस, मला संग. मी तुझ्याबरोबर येणार आहे. बस्तर फार फार सुंदर आहे. आम्ही तिथं खूप भटकलोय. असं जंगल मी कधी बघितलंच नाही."
मी तिला म्हणतो,"तो आता भूतकाळ झालाय!"
प्रश्न आणि प्रश्न
अनिल अवचट
संकलक: प्रवीण कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
हंस-दमयंती
Dhingana
an alcoholic
- Pravin Kulkarni
- Pune, Maharashtra, India
- Hi.. I am Pravin and I am an alcoholic....
No comments:
Post a Comment