Thursday, 1 April 2010

बस्तरचे अरण्यरुदन: अनिल अवचट:४


बस्तर जिल्ह्यातून गाडी चालली होती. नागपूर, गोंदिया भागात अशी छोटी, नळीच्या कौलांची घरे असतात. तशी इथेही होती. घरांना मातीच्या भिंतींचे कंपाउंड असे आणि गंमत म्हणजे त्या भिंतीलाही दोन्ही बाजूंना उतरते, छोटेसे, लाबंच लांब कौलारू छप्पर असे. सगळीकडे शेते होती. जंगलाचा मात्र पत्ताच नव्हता.
कांकेर आले. कांकेरला गावाबाहेर रत्नेश्वरनाथाचे घर आहे. हा इथला 'एकता परिषदे'चा कार्यकर्ता. आसाममधून आलाय. त्याचा टिपिकल तिकडचा चेहरा आहे. ब्रूस ली सारखा. त्याची बायको आणि तो इथे राहतात. हे भाड्याचे घर. बाहेर-आत अनेक घोषवाक्ये, पोस्टर चिकटवलेले. 'जहाँ भूख है वहाँ शांती है?' असा प्रश्नही एका भिंतीवर लिहिलेला.
तुमने मुझे बांधा है
जकड़ा है जंजिरोंसे
पर लपटे मेरे क्रोध की
धधकती है, लपकती है l
असेही लिहिलेले. मध्यप्रदेशातील मजुरांचे मालकांकडून मारले गेलेले शंकर गुहा नियोगी नावाचे नेते याच भागातले. त्यांचे एक वाक्य लिहिलेले होते: 'खुशबू हूँ, कोई फूल नहीं हूँ, जप मुरझाऊंगा!'
या संघटनेने आज मोठी सभा आयोजित केली होती. त्यामुळे घरात, आवारात, रस्त्यांवर माणसेच माणसे होती. इथल्या आदिवासी स्त्रियांची वस्त्रे नेसण्याची पद्धत वेगळी होती. साडीची दोन टोके खांद्यावरून पाठीमागे घेऊन मानेमागे बांधलेली असत. गुडघ्यापर्यंत ती साडी असे. या पद्धतीने अंग असे झाकत, की ब्लाउजची गरजच पडत नसे. पायात चांदीचे जाडजूड पैंजण, दंडात चांदीचे बाजूबंद. केसांमध्ये फुलांच्या वेण्या. पुढेही मी अनेकदा-विशेषत: बाजाराला येताना-स्त्रिया पहिल्या. त्या अतिशय छान स्वच्छ राहतात. त्यांच्या चेह-यावर एक पॉईज असतो, चालण्यात एक डौल.
त्यांची संध्याकाळची रली जोरदार झाली. दोन-अडीच हजार आदिवासी जमलेले. वक्त्यांची जोरदार भाषणे, त्यांना हात उंचावून मिळणारा प्रतिसाद. सगळा विषय हाच. आदिवासींनाच नागवणारे आदिवासी नेते. आता लोकसभा-निवडणूक येऊ घातली होती. अरविंद नेताम हे इथले बहुदा उमेदवार असणार होते. त्यात हे नेतामांचे गाव. त्यामुळे या
लीला वेगळे महत्वही होते आणि पुढे निवडणुकांमध्ये ते दिसलेही. अरविंद नेताम कांकेर आणि जगदलपूर या दोन्ही ठिकाणी उभे राहिले-आणि दोन्हीकडे पडले.
कांकेरच्या आसपास डोंगर आहेत-मोठमोठ्या दगडांचे ढीग असावेत असे. कदाचित कंकड-दगड -यावरून कांकेर झाले असावे. हे पूर्वी संस्थान होते. इथे एक मोठे तळे आहे. त्यात राजा, त्याचा परिवार आंघोळ करीत असे. इतरांना ते खुले नसे.
रत्नेश्वर असाच घरातून न पटल्याने पळून आलेला मुलगा. विलासपूरला कुठल्यातरी शिबिरात योगायोगाने पोचला. आता कांकेरमध्ये स्थिरावलाय. लोक अडचणी, तक्रारी घेऊन आले की हा चाललाच तिकडं. अन्यायाची चीड आणि स्पष्टवक्ता असल्यानं अधिका-यांना, राजकारण्यांना नकोसा झालेला. याच्याविरुद्ध निनावी पत्रके निघतात. हा हेर आहे, हा अतिरेकी आहे, हा आदिवासींमध्ये फूट पडणारा उपरा आहे, इथपासून तो हा सी. आय. ए. चा एजंट आहे इथपर्यंत. याच्यावर हल्ले झालेत. आम्ही येण्यापूर्वी याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला होता. आमच्या पुढच्या प्रवासात तो यामुळेच नसणार होता. तो जगदलपुरला गेला तर हितचिंतकांचे हॉटेल आहे, तिथे राहतो. तेही वरच्या मजल्यावर.
त्यांच्या घरात कोण कोण राहते याचा मला काही दिवस पत्ताच लागत नव्हता. पन्नाशीची, तिकडच्या कुणबी पद्धतीचे लुगडे नेसणारी, कपाळावर कुंकू नसणारी स्त्री-शिवराणी गोस्वामी. या मूळच्या त्याच भागातल्या, भैरमगड गावातल्या. आल्यागेल्या पाहुण्यांची व्यवस्था त्या बघत. त्या हलबी, गोंडी, छत्तीसगढी भाषा बोलतात. कमी शिकलेल्या असूनही त्यांची डायरी पाहण्यासारखी. कुठल्या गावाला गेले, वेळ, भेटलेली माणसे, निरोप....सर्व काही. त्या मूळच्या अशिक्षित. चळवळीत आल्यावर लिहाय-वाचायला शिकल्या. त्या भागातल्या मरकाटोला या गावाच्या आंदोलनाविषयी मी विचारले असता सांगू लागल्या, की त्या गावालगत खूप मोकळे रान होते. गावाने तिथे हजारो झाडे लावून ती मोठी केली. त्याला 'पंचवन' असे नाव दिले. कुणीतरी येऊन तिथला सर्व्हे केला. खाली बॉक्सइट किंवा अभ्रक असे काहीतरी त्यांना सापडले म्हणे. बाजूच्या मिश्रा परिवाराची जमीन बिहारच्या कुठल्या कंपनीने विकत घेतली. हळूहळू ती चारशे एकर जमीन बेनामी पद्धतीने त्यांनी खरेदी केली आणि एके दिवशी त्यांनी वृक्षतोडीचा सपाटा लावला. गावात हलकल्लोळ मजला. लोक आमच्याकडे आले. आम्ही त्यांना साथ दिली. आम्ही कंपनीच्या लोकांना रोखले. सहा महिने आंदोलन चालले. एका वेळी तर सलग ३८ दिवस रात्रंदिवस आंदोलन चालू होते. त्यावेळी दलाई कलेक्टर होते. "आखिर जमीन तो मिल गई, लेकीन पेड तो सब कट गये थे. दस हजार पेड उन्होने काटे थे." असे म्हणून त्यांनी डायरीतून एक पान काढून, त्यातली कुठल्या जातीची किती झाडे होती त्याची यादीच दाखवली.
तिथे कांता मराठे नावाची गोरी पण उन्हातान्हात रापलेली, घा-या डोळ्यांची, पंचाविशितली लहानखुरी मुलगी भेटली. मला वाटले, हिच्याशी मराठीत बोलता येईल; पण तिला छत्तीसगढी येत होते. तिची आई आदिवासी. वडील भिलाई किंवा बोकारोमध्ये काम करणारे मराठे नावाचे मराठी गृहस्थ. त्यांनी लग्न करून तिकडे संसार थाटला होता. तिला मराठीतले काही शब्द कानावर पडल्याने माहित होते. तिच्या नजरेतला धारदारपणा तिने आईकडून उचलला असावा. ती छत्तीसगढमध्ये पूर्ण वेळ हेच काम करते.
असे अनेक कार्यकर्ते पाहताना हे एकदम पेव कुठून फुटले, याचा आश्चर्य व आनंद वाटला. आपल्या देशाची कूस फार मोठी आहे, याचा प्रत्यय आला.प्रश्न आणि प्रश्न
संकलन:प्रवीण कुलकर्णीNo comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....