
हा ठोकरून गेला, तो वापरून गेला..
जो भेटला मला तो वांधा करून गेला?
वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला
चाहूल हि तुझी की, हि हूल चांदण्यांची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!
केंव्हाच आसवांची गेली पुसून गावे...
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला
बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा?
मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला!
कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"
आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा...
माझाच भास माझ्या अंगावरून गेला!
सुरेश भट
संकलक:प्रवीण कुलकर्णी
nice collection
ReplyDelete.........prashant patwa ,A'nagar