Sunday, 18 April 2010

पाच गद्य परिच्छेद : बालकवी


१ : वाचक, प्रेमाची नशा करिताना तू आपले तोंड प्रथमच वेडेवाकडे करशील हे मी जाणून आहे. पण एकदा भरपूर नशा भरल्यावर जो ब्रम्हानंद प्राप्त होणार आहे त्याची तुला कल्पनाही नाही. तुझ्या जीवनाचे सर्व रहस्य एका याच नशेत भरून राहिले आहे असे मी म्हणू लागल्यास तू मला शेणमार करू पाहशील. पण माझा अनुभव हाच आहे आणि मी म्हणतो त्याचे तुला कदाचित आश्चर्य वाटेल; पण तुझाही अनुभव तोच आहे. तो तुझ्या अंत:करणाला पटला आहे. पण त्याचे साकल्याने ज्ञान न झाल्यामुळे तुला तो खरा वाटत नाही. एखादी नवोढा आपले प्रेम झाकून ठेवते त्याप्रमाणे तुही या तुझ्या दिव्यानंदाला दृष्टीआड करावयास पाहतोस-जगाच्या पापपुण्याच्या, सुखदु:खाच्या, हर्षखेदाच्या कैचीत आवळला गेल्यामुळे तुझी तुलाच वाढ करिता येईनाशी झाली आहे. कीर्ती, पैसा, संसार, प्रपंच यांच्या नसत्या नादाला भुलून तू आपल्या ख-या सुखाचा, आत्मत्वाचा खून करून खोटे आत्मत्वाचे भूत उराशी धरून त्याच्याच भीतीने भेदरून गेला आहेस. असे का झाले याची चिकित्सा करीत बसण्यापेक्षा तू पूर्ववत कसा होशील याचीच तरतूद केल्यास बरे नाही का? तर मग माझे ऐक; हे औषध-हि नशा चढवणारी मदिरा प्राशन कर आणि पहा तुझे तुलाच काय वाटते ते.

२ : "मायेचा पसारा मोठा गहन आहे. या संसाराचा पाश तोडणे महाकठीण आहे. माती म्हटली तरी ती सुद्धा कशी वाढत जाते. तुम्ही एवढाली रोपे. तुम्हाला पाणी घातले, रात्रीचे दिवस केले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला मोठे केले, तुमचे दोहोंचे चार हात केले. देवाच्या दयेने माझा चिमणा बाळकृष्ण-तुमचा मधु-माझा बाबा माझ्या मांडीवर खेळला. आता आणखी काय राहिले? पण हि ओली माती नाही सुटत. हरी हरी."

3 : "बाबा, माझी आई गेली आणि तुम्हीही आता असे म्हणू लागला तर" पुढे माधवरावांच्या तोंडून एक शब्दही निघेना. एखाद्या कोमल अर्भकाप्रमाणे पित्याच्या वक्षस्थळावर डोके टेकवून ते स्फुंदूनस्फुंदून रडू लागले. म्हाता-याने आपला जीर्ण हात त्यांच्या पाठीवर टाकला आणि दुस-या हाताने त्यांचे अश्रू पुशीत म्हटले, "वेडा-अरे पिकली फळे आज नाही उद्या पडायचीच-आम्हाला आई-बाप नव्हते का, जगाची तशी रीतच आहे. दहा वर्षापासून बरोबर वाढली, गेली न सोडून, वेडा नाही तर! पुरे, मधुबाळ कोठे आहे? रमा, अगं तुही रडतेस. तुमचे दोघांचेही होणार तरी कसे?"


४ : माई, मला काहीच कळत नाही. तू मला कोठे नेतेस? हि बघ संध्याकाळ झाली. त्या पलीकडच्या कड्यातून धुक्याचे लोटच लोट जागे झाले. पहा, भगवान सविता किती अंधुक होत चालला; त्याची सगळी किरणे गेली. कुठे गेली कुणास ठावूक? हे लाल बिंबसुद्धा त्याच अंधुक पडद्याखाली त-हेत-हेच्या रंगांनी रंगीत होत हळूहळू वरचेवर दिसेनासे झाले. मी सकाळी पहिले तर असेच मला दिसले, या जगाच्या जादूगाराचाच हा खेळ. माई, आपले तरी असेच नाही का गं? थोडेसे तेज, थोडा परमेश्वरी अंश या शरीराच्या दात धुक्यात गुंडाळला जातो. निरनिराळे रंग त्याच्यावर उठतात. तीच सूर्यकिरणे जखडली गेली. हे चंचल धुके जरा इकडच्या तिकडे सरले, झाले गेले, त्या पूर्वीच्या रंगाची त्या सोनेरी हिरव्या पिवळ्या रंगाची काहीतरी खूण तरी राहते का मागे? मला नाही बाई समजत. बोल, बोल गडे, हे असेच न आमचे जीवित, हे रंग तरी का बरे उठतात? सांग मला हे धुके कसले? हा कसला खेळ? तो पहा तो पलीकडचा मेघ किती आक्राळविक्राळ दिसू लागला.

५ : नीरा-शबरी, तुझ्या मस्त रंगाबरोबर माझे मन काही तरळ बनत नाही पण बाळे, जरी हे असे असले तरी यात खेद करण्यासारखे काय आहे? आज जशा आपण मावळत्या सूर्यनारायणाकडे, या ढगाकडे, या पर्वतांच्या अनंत शिखरांकडे पाहत आहो तसेच आपल्या हृदयस्थ सूर्यनारायणाकडे-सुखदु:खात्मक जीविताच्या मेघांकडे, या सृष्टीच्या असंख्य लीलांकडे, एका निराळ्या दृष्टीने तेजोमय दृष्टीने आपण पहिले तर प्रत्येक पदार्थाचे आपण कौतुक करू. या पलीकडच्या आकाशातल्या देखाव्याकडेच पहा ना? किती त-हे त-हेचे रंग आहेत. या सोनेरी, गुलाबी, पांढ-या, अंधुक काळ्या अशा विविध वर्ण समुच्चयनेच हे संध्येचे चित्र नितांत रमणीय झाले आहे. जर हे धुके चंचल नसते तर असला विविध चमत्कृतीजन्य हा देखावा आपणास कधीतरी पहावयास मिळाला असता का? बाई गं, जग तरी असेच आहे, ते अस्थिर आहे, चंचल आहे, नेहमी बदलणारे आहे म्हणून मनुष्यप्राणी त्यात सुखाने राहू शकतो. चंचलपणा हेच तर त्या संध्येप्रमाणेच सृष्टीचे जीवन आहे.

'समग्र बालकवी'
संकलन:प्रवीण कुलकर्णीNo comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....