
गती! हि कुणाला चुकवता येणार नाही. तिला हवे ते नाव द्या. कमी करा की जास्त करा. पण विरती हा शब्दच उच्चारता येत नाही. अक्षय गती, अविरत, अखंड गती. या गतीला अंत आहे की नाही हे मला सांगता येत नाही. पण विरती हा मात्र केवळ भास आहे. किंवा तीही असल्यास साक्षेप आहे, यात शंका नाही. गतीविरहित स्थिती; विरतीची कल्पना सुद्धा होत नाही. कारण माझी स्थिती म्हणजेच गती आणि गती म्हणजेच स्थिती, असा हा येथला नियम दिसतो. गतीविरहित स्थिती व स्थितीविरहित गती यांची सुद्धा कल्पना करवत नाही, स्थिती व गती यांच्या संमिश्रणापासून दिक्कालाची कल्पना माझ्या मनात आली आणि अस्पष्ट द्वैतभावनेच्या रूपरेषा ठळक होऊ लागल्या. प्रथम येथील स्थिती व गती एकच प्रकारची आहे, असे मला वाटत होते. ते आता एकात अनेकत्व दिसू लागले व अनेकत्वात एकत्वाचा भास होऊ लागला. आकाशात फिरणा-या ग्रहगोलांना एक प्रकारची गती आहे. गतीविरहित स्थितीची कल्पनासुद्धा होत नाही, हे वर सांगितलेलेच आहे. पण वरील प्रकारच्या गतीत व माझ्या गतीत एक प्रकारचे अंतर आहे. त्यांच्या गती निसर्गनिर्मित आहेत; माझ्या गतीचा कालचक्र मी आहे.
"समग्र बालकवी"
संकलक: प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment