
रात्री बायकोबरोबर गाडीवरून घरी जाताना
ती खोडकर आवाजात सांगू लागते
आमच्याच घराच्या खाणाखुणा....
'हां...आता इथून डावीकडे...आता सरळ...
त्या मारुतीपासून उजवीकडे वळा....
थोडी पुढे घ्या अजून...पांढ-या गेटपाशी थांबवा...
हां...बास बास....इथेच'....
आणि मग उतरत, पर्स काढत
विचारते हसत हसत - 'हं...किती झाले?'
८४ लक्ष तर झालेच की प्रिये!
हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ...ठाऊक नाही!
गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला,
पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक, हसरे क्षण
आणि माझे अंत:स्थ उदासीन प्रश्न काही!!
आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर
एखादी साखरहळवी टॉफी...
गोड चवीने सरू दे अजून एक रात्र...
अंधारातच चढायचा आहे एक एक जिना...
हातात हात तेवढा राहू दे फक्त...
संदीप खरे
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment