
रांडकी पुनव साजरी करतात हिजड्यांचे अप्रूप उत्साह
कुठल्याही सोम्यागोम्यानं यावं दार ठोठावून जावं
वीर्याचं भुईनळ पाजळीत आडदांड ८४ आसनं
कुल्ल्यांचे हिशोब चुकते करणारे आयुष्य फडफडतेय
खैरेबांडे पांजरपोळ ॥ डग्गा
ह्या सातानवसाच्या चुडेवाढवीस जातीने उपस्थित
-हायलेला हिजड्यांचा अफलातून बॉस
त्याने आपल्या अस्तित्वाचे टचटचीत कॉरीडॉर्स
पब्लिक केलेत....
तुम्ही तुमची वस्त्रं विसरून जा डोळे विर्घळवून पा
स्थिरजंगम जडावलेले ३६ नखरे गिलाव्याचे पालुपद
पुरुषगुढी
टाळ्या पिटून पिटून रोजाना उकळणारे खुजखुजते तांडे
हॅण्ड प्रॅक्टिसचा गंध नसलेले
वर्षातून एकदाच जगतात खुल्लमखुल्ला उरूस
देहावर डकवून बावटे अथवा झिळमिळत्या फिंदारून
आदाकारी जंगली षंढावरून
आर्त आर्त किंकाळत
खरं म्हंजे या धांदलीत चंद्रानं मावळू नये सूर्यानं उगवू नये
ही बीभत्स रात्र सतीसावित्री होऊन नाचतेय टिंगमटोल
कब्री उकलून आलेत सांगाडे
हिजड्यांचे अजनबी अग्निदिव्य पायला
आत्ता हिजडेविरहित जे जे ऑब्जेक्टीव्ह प्रेक्षक
त्यांनी आपापले सामान चाचपून बघावे
धेडधाय पोटले बेवडा ठोकून वाजताहेत
क्लासिकल म्युझिक पेटताहेत गदारोळ गजलांचे
॥ आयी दिवाली : आयी दिवाली ॥
तू पतंगासंग नाचे मैं किसके संग नाचू
बता जा :
तुम्ही आपापली पोरं ओळखून न्या
हिजड्यांनी झगे वर केलेयत
हिजडे आभाळ झालेयत
नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment