Thursday, 1 April 2010

बस्तरचे अरण्यरुदन: अनिल अवचट :६


० ६ ०
भोपाळच्या सेमिनारमध्ये दिल्लीची नलिनी सुंदर ओळखीची झाली. तिने बस्तरवर रिसर्च करून पुस्तक लिहिलंय. तिने मला जगदलपूरजवळच्या 'आसना' या गावातल्या इक्बाल व कार्यकर्त्या मित्राची गाठ घ्यायला आवर्जून सांगितले होते. आम्ही त्या रात्री त्यांचे घर शोधून काढले. दुमजली कौलारू घराचा त्रिकोणी माळा असतो ना, तशा माळ्यावर तो रहात होता. सावळा, केस वाढवून मागे रुळताहेत असा, पस्तीशी-चाळीशीतला जर्किन-पटमधला माणूस. त्याला दुस-या दिवशी
जगदलपूरमध्ये भेटायला सांगितले आणि मुक्कामाला जगदलपूरला गेलो. पुढच्या दोन गावात इक्बाल आमच्याबरोबर होता.
जगदलपूर छोटेसे शहर आहे. एक लांबच लांब मध्यवर्ती रस्ता. त्याला समांतर दोन रस्ते आणि त्यांना छेद देणारे काही आडवे रस्ते. त्या गावात पावलोपावली एस.टी.डी. बूथ आहेत. एवढे बूथ या छोट्या गावात कशाला, हा प्रश्न मी अनेकांना विचारला. एकाने हे व्यापारी गाव आहे म्हणून सांगितले. दुस-याने सांगितले, की हा आदिवासी जिल्हा आहे. इथे अग्रक्रमाने सवलतीत बूथ मिळतात म्हणून. पण एवढे खरे, की हिरेमठांची अशा गावात चंगळ होणार. विटांची लांबच लांब भिंत आणि वेशीसारखा दरवाजा, म्हणजे इथला राजवाडा. प्रविरचेंद्र भंजदेव या राजाला इथेच मारले गेले होते.
सरकारी ऑफिसच्या, पी.डब्ल्यू.डी. ने बांधलेल्या ठोकळेबाज इमारती एका बाजूला. मधून मधून पेरलेली अगदी भडक आर्टीटेक्चरची तारांकित[?] हॉटेले. मधल्या रस्त्यावर आदिवासींकडून करून घेतलेल्या कलावस्तूंची दोन-चार दुकाने. इक्बालची मैत्री व्हायला काही वेळ लागला नाही. नंदिनी हा आमच्या बोलण्यातला दुवा होताच. त्याचा इतिहास आमच्या बोलण्यातून हळूहळू समजत गेला. तो नागपूरचा. एम.ए.झालेला. मिलिटरी अकाउट्स मध्ये नोकरी होती. या भागात [बहुधा बांगला निर्वासितांच्या कामासाठी] त्याची बदली झाली. दोन वर्ष इथं होता. त्याने भूगोलाच्या वाचले होते बस्तर, तिथले आदिवासी, त्यांची संस्कृती वगैरे. इकडे आल्यावर तो नोकरीच्या वेळाव्यतिरिक्त तो बस्तरच्या आतल्या भागात भटकू लागला. तिथले बाजार बघू लागला. आदिवासी लोक चिंच, चारोळी असे काय काय विकायला आणायचे. व्यापारी मोठाल्या वजनात ते घ्यायचे. माल द्यायला नकार दिला तर अक्षरश: जबरदस्तीने ओढून न्यायचे. आदिवासींचे सर्व बाजूंनी होणारे हे शोषण पाहून त्याला इथेच राहून काही करावेसे वाटू लागले.
तो म्हणाला, "माझी १४ वर्ष सर्व्हिस झाली होती. परत बदली झाली तर नोकरी सोडून इथंच राहायचं ठरवलं. मित्र म्हणत होते, "तू करणार काय? खाणार काय? त्यापेक्षा आणखी सहा वर्ष थांब. वीस वर्षानंतर नोकरी सोडलीस तर पेन्शन सुरु होईल." पण अगर उस लालच में मैं पडता तो कभी नाही इधर आ सकता." आणि काही प्रश्न इतके तीव्र होत चालले होते, की त्या घटना तिथेच थांबवल्या नाहीत, तर कायमचं नुकसान होणार होतं. म्हणून इथं असतानाच नोकरी सोडली आणि मागचे सगळे आधार तोडून टाकले.
त्याचे तिथल्याच कलावती नावाच्या आदिवासी स्त्रीशी प्रेम जमले आणि लग्नही झाले.
"घरी नागपूरला कळवलंच नाही. नंतर मुलगी झाली तेंव्हा मुलीसह गेलो." त्याच्या लग्नाचे समजल्यावर सगळे म्हणाले, "ये तो पागल बन गया." आणि मुलगी दाखवल्यावर म्हणाले, "ये तो पुरा पागल बन गया है." मुलगी पाहून आई विरघळली आणि तिने यांना प्रथम स्वीकारले; मग बाकीच्यांनी. आता इक्बाल-कलावतीला तीन मुली आणि एक मुलगा आहे. सुटी लागल्या लागल्या मुले नागपूरला पळतात.
इक्बाल म्हणाला, "लग्नानंतर नोकरी नव्हती. मी फ्री लान्स पत्रकार म्हणून काम करू लागलो. पण त्यात पैसे किती मिळणार? घरात अन्नाचा कण नसायचा. मी कालावतीकडून खूप शिकलो. भूक अंगावर काढायला शिकलो. घरात खायला काही नसलं की कलावती मला घेऊन जवळपासच्या जंगलात जायची. तिला जमिनीखाली कंद कुठं असतात, वरून कसं ओळखायचं, ते माहित असायचं. आम्ही कंद काढून आणायचो. पहिल्यांदा पाण्यात घालून कंद उकडला आणि त्याचा पहिला तुकडा मी खाल्ला, त्या क्षणी मला वाटलं की, मी कशाला इथं आहे? हे सगळं सोडून परत जावं नागपूरला. पण नंतर त्याची सवय होत गेली. आदिवासींकडे प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहण्याची कला असते, जिद्द असते. आपण ती हरवून टाकली आहे. तिच्याकडून मी खूप काही शिकलो."
नंदिनी नंतर त्याच्याबद्दल सांगत होती, की कोणी आदिवासी काही प्रश्न घेऊन आला की ही दोघे निघतात. कला आपल्या ट्रायबल ड्रेसमध्येच सायकलवर फिरत असते. ही दोघे कधी सायकलवर पन्नास-साठ किलोमीटर जाऊन आदिवासींची गा-हाणी ऐकतात. त्यांना जगदलपुरला घेऊन येतात. अधिकार-यांपुढे घेऊन जातात. प्रेस-कान्फ्रंस घेऊन ते प्रकरण मांडतात. कलावतीने जंगल कामगार सोसायट्या केल्या आहेत. सायकलवर फिरून त्यांचा कारभार बघते.
ही दोघे असे फिरत असल्याने जंगल तुटत असल्याचे त्यांना पटकन कळते. इक्बाल त्याचे फोटो काढतो. प्रसिद्धीला देतो. फारेस्टवाल्यांकडे निवेदने देतो.
एका दुपारी त्याने घरी जेवायला बोलावले होते. कलावती मागे गाठ मारलेली आदिवासी साडी नेसलेली. दोन्ही नाकपुड्यावर चांदीच्या मोठ्या नक्षीदार टिकल्या. दंडात, पायात वाक्या, जोडावी. नुसती हसत होती. माझ्याशी बोलण्याचा प्रश्नच नव्हता. काही विचारलेच तर, "हा-नाही" एवढे उत्तर देऊन छान हसायची. आमच्यासाठी डाळ-भात असे जेवण केले होते. मुले, ती दोघे, मधुकर यांच्यासह जेवताना खूप छान वाटू लागले.तो डाळ-भात म्हणजे जगातला सर्वात सुग्रास पदार्थ वाटू लागला.
नंदिनी याच घरात तिच्या रिसर्चसाठी आली तेंव्हा उतरली होती. ते आठवले. तिचे कौतुकही वाटून गेले. नंदिनीमुळे दिल्लीला आता इक्बालविषयी संबंधिताना माहित झालेय. त्यामुळे रिसर्च वर्कर्स आले, की हा त्यांना बस्तरमध्ये फिरण्यास मदत करतो. त्याचा काही मोबदला याला मिळतो. परवा 'सुरभी' च्या लोकांना आदिवासींच्या गोंदवण्यावर छोटी फिल्म करायची होती म्हणून ते आले होते. त्यानाही हा खेड्यात घेऊन गेला होता.
त्याचे कलावती-मुलांबरोबर फोटो काढले. नंतर म्हणत होता, "या मुलांविषयी मला जरा काळजीच वाटते. त्यांच्यावर नागपूरचा इफेक्ट जास्त वाढतोय. हे सुटीत गेले की सगळे त्यांचा लाड करतात. कपडे घेतात. पिक्चरला नेतात. त्या लाइफची आवड लागली, तर ते आम्हाला कसं झेपणार? परत ते त्याच चैनी संस्कृतीचे भाग होणार."
त्याच्याबरोबर दोन गावाला गेलो. एक मार्केल आणि दुसरे कुरुंदी. मार्केलमध्ये आदिवासींचा प्रश्न नव्हता. दलितांचा होता. कालू महारा, थिओ महारा अशी त्यांची नावे. वस्तीत जाऊन बसल्यावर जाणवले, की त्यांची घरे, त्यावरची नक्षी, चित्रे, तिथल्या बायकांचा वेश हे सगळे आदिवासींसारखे. ते भद्री भाषा बोलतात. मला समाजशास्त्रज्ञ एम.एन.श्रीनिवासांच्या 'संस्कृतायझेशन' या शब्दाची आठवण झाली. त्या लोकांना सरकारने पट्ट्याने जमीन दिली होती. हे लोक शेतमजूर. 'लुनिया' या जगदलपूरच्या व्यापा-याने इथल्या २६ जणाची ८१ एकर जमीन, तिची बाजारभावाप्रमाणे किंमत ५० लाख रुपये इतकी आहे. ती १८ हजारात घेतली. [ती अतिशय सुपीक जमीन आहे आणि जगदलपूरच्या जवळ आहे.] प्रत्यक्ष त्यांतले १५ हजार दिले आणि २६ जणांना लुना दिल्या. तिथला माणूस म्हणाला, "उसमे डालने को पेट्रोल कहा से लाये? सब लोंगोने बेच दिया."
नायडूंच्या पत्रात या प्रकरणाचा उल्लेख आहे. या जमिनीत लुनियांनी निलगिरीची लागवड केली आहे. निलगिरी वाढवून ओरिसातल्या पल्प फकट्रीजना विकायची, असा त्या वेळी ट्रेंड आला होता. अडिशनल कलेक्टरपुढे हे प्रकरण येताच सरकारने दलिताना दिलेली जमीन विकता येत नाही, या कायद्याप्रमाणे हे खरेदीखत रद्द ठरवले. लुनियांनी [विभागीय कमिशनर] नारायण सिंगांकडे अपील केले. त्यांनी लुनियांच्या बाजूने निकाल दिला. त्याला कारण दिले, की लुनियांनी त्यासाठी बँकलोन घेऊन झाडे लावलीत. नायडूंनी या "एक्स्ट्रा-लीगल' तकलादू कारणावर कठोर टीका केली आहे.
कुरुंदी गावापासून आम्हाला लुनियांचे, नेतामांचे दडपण जाणवू लागले. ज्यांच्यावर अन्याय झाला तेही बोलेनासे झाले. आम्ही तिथल्या लोकांसमोर बसलो. ते हुं कि चू करीनात. प्रश्न विचारला तर जेवढ्यास तेवढे उत्तर. इक्बालने, शिवचरणने खूप बोलते करायचा प्रयत्न केला; पण नाही. त्यांची अशीच मोठी जमीन लुनिया फमिलीने स्वस्तात घेतली. त्यातला वयस्क माणूस म्हणाला, "आम्ही त्यांच्याकडे दागिने गहन ठेवून पैसे आणले. आता आम्ही ते पैसे परत केलेत." एवढे वाक्यच तो परत परत बोलला. एकीकडे राग येत होता आणि एकीकडे दु:खही वाटत होते. शेवटी बडे गुड्राला जाणार होतो; पण त्याआधी जगदलपूरमधल्या शरच्चंद्र वर्मांना भेटायचे ठरवले.
पुण्याची मैत्रीण उषा पागे जगदलपूरला रेडीओ-स्टेशनची डायरेक्टर म्हणून काही काळ होती. तिने मला त्यांचा पत्ता दिला होता. त्यांचे नाव काढताच इक्बाल म्हणाला, "ते माझे इथले गुरूच आहेत. आम्ही बरोबरच काम करतो."
वर्मांनी नाश्त्यालाच बोलावले.
त्यांचा 'बस्तर सोसायटी ऑफ कान्झार्वेशन ऑफ नेचर' [बस्कान] नावाचा ग्रूप आहे. वर्मा रिटायर्ड झालेले शिडशिडीत गृहस्थ. पांढ-या बारीक कापलेल्या मिशा. त्यांनी उषाची चौकशी केली. या विषयावर आमचे बोलणे सुरु झाले. तशी त्यांच्या , मनातली या विषयातली तळमळ व्यक्त होऊ लागली.
ते म्हणाले, "बस्तरमध्ये जंगल आहे कुठे?आता फारेस्टवाले सारखे वनीकरणाच्या गोष्टी करतात.; पण मूळ जंगलाचं का रक्षण केलं नाही? जंगल ऑफिसर जंगलमे रहाताही नही! जंगल एक खुला खजाना है ऐसे बोलते है, तो फिर शहरमे क्यो बैठते है? इधर ब्रेकफास्ट लेते है, उधर चक्कर लगाकर रातमे डिनरके लिये यहां वापस. हे जे जंगलावर आक्रमण चाललाय ना, त्याला यांचंच प्रोत्साहन आहे. कोणी पैसे देतं कोणी कोंबडी देतं. या सगळ्यांची कोणी सुरुवात करून दिली? अकबराच्या काळात जबलपूरच्या दक्षिणेचा सर्व भाग म्हणजे ज्यात शिरकाव करता येणार नही असं जंगल होतं. आदिवासींचा जंगल हा सर्वात शेवटचा सहारा आहे. आणि आता केवळ वाळवंटीकरण चालू आहे. त्यांनी कुठं जायचं? शासनाची मानसं याबाबत अगदी बेफिकीर आहेत. ती ठरलेल्या रस्त्यानं जातात. आणि त्याच रस्त्यानं येतात आणि म्हणतात, 'जंगल टूट गया, अब हम क्या करेंगे?' आदिवासींच जीवन केवढं खडतर झालंय! आपण म्हणतो,की जंगल में मंगल, ये मंगल हमारे लिये, उनके लिये नही."
मी विचारलं, "साल बोअररचं जे प्रकरण झालं होतं, ते काय होतं?"
ते म्हणाले, "साल इथल्या अगदी वैनगंगेपर्यंतच्या जंगलातली प्रभावी जात आहे. आमचे फोरेस्टवाले साल वृक्षांना सवतीच्या मुलासारखं वागवतात. त्यांना साल तोडून साग किंवा निलगिरी लावायची फार घाई झालेली असते; उत्साह असतो. [वास्तविक सागाखालोखाल सालच्या झाडाचे लाकूड चांगले.] निलगिरीच का? तर त्यातला सेल्युलोज एक्स्पोर्ट करता येतो. साल बोअरर काही आज आलेला नाही, तो असतोच; पण सुप्रीम कोर्टाची स्टे ऑर्डर आली. सगळ्यांचेच हात बांधले गेले. मग हा साल बोअरर बरोबर बाहेर निघाला."
"ते असं म्हणतात, की त्यासाठी आसपासची बरीच झाडं तोडवीच लागतात. खरं आहे का हे?"

इक्बाल म्हणाला, "छे: छे:! त्याचं निमित्त करून लाखो झाडं तोडली. या छत्तीसगड भागातली तीन एक लाख झाडं तोडली. लोकांनी, पेपर्सनी खूप आरडओरड करून ती तोड थांबवली. आमचे फारेस्ट मिनिस्टर शिव नेताम म्हणाले, "याला स्टे आला नसता तर आणखी दुप्पट झाडे तोडणार होतो."
"पण याला उपाय काही नाही का?"
वर्मा म्हणाले, "पावसाळ्यात झाडाचा सप बाहेर येतो. तेंव्हा हा किडा त्याकडे आकर्षिला जातो व बाहेर येतो. तो धरून मारणं हाच इलाज आहे. अब देखिये, ये फारेस्ट के लोग बारीश के दिनो में घरमे बैठना जादा पसंत करते है! बारीश में जंगलमे जाकर कौन किडे पकडेगा?"
वर्मा, इक्बाल आणि मित्रांनी जंगलावरचे एक मोठे संकट टाळलेय. दिल्लीच्या फारेस्ट तज्ञांच्या डोक्यात आले, या भागात ट्रोपिकल पाईनची लागवड करावी. पाईन वृक्ष हे हिमालयाच्या पायथ्याशी थंड वातावरणात वाढणारे, पण उष्ण कटिबंधातली पाईनची जात इथे रुजली तर? फतवे गेले. बस्तरच्या अधिका-यांनी टेस्ट घेण्यासाठी जंगलाचा चांगला पच आधी साफ केलं. झाडे तोडण्यात आपल्याला नेहमीच उत्साह. आणि तिथे पाईनची रोपे लावली. पाईनची झाडे एकाच वेळी कापायला येतील, अशी सर्व सोय पहिली होती. ते साफ्टवूड असल्याने त्याचा पल्प एक्स्पोर्ट करता येईल. या '
स्कान' ग्रूपने या सगळ्या योजनेला विरोध केला. दिल्लीपासून सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या छापून आणल्या, तेंव्हा कुठे हा प्रकल्प बारगळला. हा विरोध झालं नसता तर बस्तरचे उरलेसुरले जंगलही साफ झाले असते. वर्मा म्हणाले, "हम गरीब तो थे, लेकीन अब कंगाल बन गये याने 'मेंटली' कंगाल हो गये."
जंगलाकडे फक्त 'लाकूड देणारे जंगल' म्हणून का पहायचे? , असा त्यांचा प्रश्न मला वेधक वाटला. मायनर फोरेस्ट प्रोड्यूस ज्याला म्हणतात त्याला कमी का लेखता? आवळा, हिरडा, बेहडा, चारोळी, साल-बिया, किती तरी औषधी वनस्पती-यांच्याकडे आपण खूप दुर्लक्ष केले. 'सर्पगंधा' हि हृद्यविकाराच्या औषधासाठी लागणारी वनस्पती पूर्वी बस्तरमध्ये जागोजाग दिसायची. आता ती दिसेनाशी झाली आहे. त्यांचे प्लांटेशन फारेस्ट डिपांर्टमेंट हातात का घेत नाही? मोठी झाडे कायम ठेवून तुम्हाला मायनर फारेस्ट प्रोड्यूस जंगलाला डिस्टर्ब न करता मिळवता येतील, आदिवासींचे हित त्यात पहिले जाईल.
"एका बाबतीतल वरदान हे दुसऱ्या बाबतीतला शाप कसा असतो पहा." वर्मा म्हणाले, "आदिवासी का दुर्भाग्य है, कि इस भूमी के मिचे तऱ्ह तऱ्ह के मिनरल्स है- लोखंड, बॉक्साईट, डोलोमाईट, टीन, माणिक, कॉरान्डम, हिरे, युरेनियमसारखे थोरियम असे. दक्षिण बस्तरमध्ये माती खणून चाळून टीनचे दगड बाहेर नेले जातात. तोम पाल नावाचं एक अगदी छोटं झोपलेलं गाव होतं. तिथं टीनची खाण सुरु झाली. तिथं आता एवढी वस्ती वाढलीय, की तिथल्या पोलीस-स्टेशनला बदली मिळावी म्हणून पोलीस अधिकारी लाखो रुपये मोजतात. राजस्थान, यु. पी. हून सगळे लोक आलेत आणि तिथं बकाल वस्त्या झालेल्या आहेत. आता तिथं तुम्हाला एकाही आदिवासीचा मागमूस सापडणार नाही."
नंतर मला पुण्याला शिवाजीराव किरदत्त नावाचे रायपूरला शेती करणारे गृहस्थ भेटले. आमच्या धोंडेसरांचे ते मित्र. ते या खानिजांबद्दल आणि बस्तरच्या जंगलावर येणा-या दडपणाबद्दल सांगत होते. इथली आयर्न ओअर [लोखंड ज्यातून निघते ती दगडमाती] जगातली सरोत्तम ओअर आहे. लोखंडाचे प्रमाण ऐंशी टक्के म्हणजे 'हायेस्ट इन द वर्ल्ड' आहे. आदिवासी नुसत्या भट्टीत दगड घालून लोखंड करतात, अवजारे बनवतात. जपान्यांनी ती लोहामती नेण्यासाठी बस्तरमधल्या बेलाडेला खाणीपासून ते थेट विशाखापटणमपर्यंत ६०० किलोमीटरचा ब्रॉडगेज लोहमार्ग बांधला. न जाणो केवढे जंगल त्यासाठी तुटले असेल. त्यासाठी मजूर आले, वस्त्या झाल्या, बिजलीचे टॉवर आले. खाणींमध्ये खनिज धुतात. त्याचे नाले होतात. जमिनीतली माती वाहून जाते. तीस वर्षापूर्वी हा लोहमार्ग बांधला. हि इनस्टंट कोकण कोकण रेल्वेच' आहे; पण हा लोहमार्ग फक्त आर्यन ओअरसाठीच होता.दिवसातून दोन आगगाड्या जात होत्या आणि दोन रिकाम्या परत येत होत्या. एकेका गाडीला सहा डीझेल इंजिने लावावी लागायची. शंभर डब्यांची गाडी होती. विशाखापट्टण बंदरात बोटीत ओअर भरण्यासाठी automatic लोडिंग प्लांट बसवला होता.
त्यांनी व धोंडेसरांनी हिशेब करायला सुरुवात केली. एका डब्यात पन्नास टन म्हणजे गाडीत ५००० टन, अशा दोन गाड्या म्हणजे १० हजार टन....रोजचे. असे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस. अशी वीस वर्ष. बाप रे! इतकी शून्ये वाढत चालली की शेवटी ते म्हणाले, "ऐसा समझीये, एक पूरा पहाड ले गये."
बस्तरच्या जंगलावर येणा-या दडपणाबद्दल ते सांगत होते, "बांगला देश व्हायच्या आधीपासून अनेक हिंदू निर्वासित आले. त्यांना कुठं वसवायचं? बाकीचे प्रांत विरोध करतात. बस्तर सब लोगोंके के लिये बहुत अच्छी जगह है. दिल्लीवाले तो ऐसे एक्स्पेरीमेंट के लिये हमाराही चोईस करते है. त्यांच्या वस्त्या झाल्या. त्यांच्यासाठी जंगलतोड झाली. त्यांनी आल्यावर आजतागायत ती चालूच ठेवली आहे. दुसरं, रेल्वेसाठी आता आता सिमेंटचे स्लीपर्स आले. परवापर्यंत लाकडाचे स्लीपर्स होते. सर्व भारतातल्या लोहमार्गाच्या स्लीपर्सपैकी पंचवीस टक्के गरज बस्तर भागवत होता."
परत धोंडेसरांची गणिते सुरु! भारतातील एकून लोहमार्ग ६०,००० किलोमीटर आहे. एका स्लीपरचा साईज काय असतो, त्यावरून एका किलोमीटरला २००० स्लीपर्स लागतील. म्हणजे एकूण बारा कोटी स्लीपर्सची गरज. एका स्लीपरला चार घनफूट लाकूड लागते. म्हणजे ४८ कोटी घनफूट लाकूड. बरे, जुन्या झालेल्या स्लीपर्स बदलाव्या लागतात. समजा, दहा वर्षांनी बदलतात. एका झाडात पाच स्लीपर्स निघतील. म्हणजे वीस लाख झाडे दरवर्षी लागत होती. ७० किलोमीटर बाय ७० किलोमीटर दर वर्षी उध्वस्त! धमतरीला मोठा डेपो होता. रायपूरहून धमतरीला फक्त स्लीपर्स आण्यासाठी लोहमार्ग टाकलाय. बाप रे!
किरदत्त म्हणाले, "आता जपानच्या त्या लोहमार्गावर पसेंजर गाडी सुरु आहे. मायबाप सरकारनं आमच्यासाठी कधी रेल्वे केली नाही, पण एवढी भयानक किंमत देऊन हि रेल्वे लाईन आम्हाला मिळालीय."


संकलक:प्रवीण कुलकर्णीNo comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....