
मी खुलासेही कशासाठी करावे?
लोक पाठीमागून घेतात चावे!
ही सुखाच्या इंद्रजालाचीच जादू
पिंज-याला मानिती आकाश रावे!
या फुलांना सारखा दुर्गंध येई...
हे वसंताचे गटारी बारकावे!
धाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाट्याचे करावे?
या पिशाच्च्यांच्या कशा आबाद वस्त्या?
माणसांची ही कशी ओसाड गावे?
सांगतो जल्लाद रक्ताचा घरोबा
( सांडलेले रक्त का होते परावे? )
कोणते नाहीत डोळे आज ओले?
आसवांनी आसवांना काय द्यावे?
पाहुनी घ्यावे भविष्याच्या दिठीने...
बोलण्यासाठी जगाचे ओठ व्हावे!
काय साधी माणसे बोलून गेली?
घेतले सिंहासनाने हेलकावे!
जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे
देश हा बेईमान झालेल्या ऋतूंचा
येथले आषाढ सुद्धा आगलावे!
सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment